हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘भारतकुमार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक मनोजकुमार यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यावर अनेकांनी नाकंही मुरडली. प्रत्यक्षात मनोजकुमार यांच्या मर्यादा लक्षात घेताही त्यांना हा पुरस्कार मिळणे गैर नाही, हे साधार सांगणारा लेख..
तोंडानं सहिष्णुतेचा जप करायचा आणि वागायचं असहिष्णुतेनं- हा सध्या युगधर्मच होऊ पाहतो आहे. त्यातही गंमत म्हणजे प्रत्येकाची सहिष्णुता वेगळी. म्हणजे तो म्हणेल ती सहिष्णुता आणि दुसरा जे म्हणेल ती असहिष्णुता! प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. एक स्वत:ची आणि दुसरी चुकीची, ही जुनीच तालिबानी वृत्ती पुन्हा डोकं वर काढू लागली आहे. पाहा ना, मनोजकुमारला यंदा ‘फाळके पुरस्कार’ मिळाला तर कोण गदारोळ चाललाय! मनोजकुमार किंवा फाळके पुरस्कार म्हणजे काय, हे ठाऊक नसलेलेसुद्धा त्याला खडे मारताहेत. मतस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे; पण आपलं मत जाहीर करण्यापूर्वी थोडा तरी विचार करायला हरकत नसावी. अभ्यास करायला किंवा जाण असायला वकूब लागतो. विचार करायला समंजसता (आणि सहिष्णुता) पुरेशी असते.
मनोजकुमारला फाळके पुरस्कार देऊन सरकारनं मेहेरबानी केलेली नाही. त्यानं तो कधी मागितलाही नाही. या सरकारकडे नाही आणि याआधीच्याही नाही. मनोजची ‘भारतकुमार’ प्रतिमा इथं गैरसमज निर्माण करतेय. त्याला तो सरकारकृपेनं मिळायचा तर वाजपेयी सरकारच्या काळातच मिळायला हवा होता. तेव्हा त्याचा ‘जय हिंद’ हा चित्रपट आला होता आणि त्यात त्यानं काश्मिरी पंडितांच्या विस्थापनेची दखल घेतली होती. काश्मीरविषयक कोणत्याही प्रश्नाची दखल घेणारा तो त्या वेळेपर्यंतचा पहिलाच चित्रपट होता. कोणत्याही समांतर चित्रपट निर्मात्याला वा दिग्दर्शकाला हे याआधी सुचलं नव्हतं.
मनोजकुमार काही काश्मीरपुत्र नाही. तेव्हा ‘जय हिंद’च्या माथ्यावर हिंदुत्ववादाचा टिळा लावून त्याला तेव्हाच कोणता ना कोणता सरकारी पुरस्कार देता आला असता. असा पुरस्कार तर त्याला काँग्रेस सरकारही देऊ शकलं असतं. ‘जय जवान, जय किसान’ हा चित्रपट त्यानं तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या सूचनेवरून काढला होता. ‘शहीद’ आणि ‘उपकार’ हे मनोजचे चित्रपट पाहून खूश झालेल्या शास्त्रीजींनी त्याला ही सूचना केली होती. ‘उपकार’ शेतकऱ्यांबद्दल होता आणि ‘गावाकडे चला’ हे सांगणारा होता. पुन्हा हे सांगणारा मनोजकुमार हा काही किसानपुत्र नव्हता. ‘उपकार’ त्यानं स्वयंत्स्फूर्तीनं काढला होता.
आणि ‘शहीद’सुद्धा! भगतसिंग तेव्हा जयंती वगैरे कारणांनी ‘न्यूज’मध्ये नव्हते- तेव्हा!! ‘शहीद’वर दिग्दर्शक म्हणून मनोजचं नावसुद्धा नव्हतं. तो त्यानं दिग्दर्शित केलाय हे खूप नंतर उघड झालं. तो चित्रपट पाहिला तर मनोजच्या फाळके पुरस्कार-पात्रतेबद्दल शंका येणार नाही. (त्या चित्रपटात त्याने दाखवलेली समज, त्यातला संयम मनोजकुमारनं पुढे राखला असता तर ‘भारतकुमार’ हे विशेषण उपहासानं त्याच्या नावामागे लागलं नसतं.)
सरकारी वर्तुळातली ऊठबस हा पुरस्काराचा निकष असेल तर मनोजकुमारला इतका उशिरा तो मिळणं, हा अन्यायच म्हणावा लागेल! दोन्ही सरकारांमधल्या दिग्गजांशी त्याचे जवळचे संबंध होते. याला नशिबाचा असहकार म्हणावा की संधिसाधूपणाच्या कौशल्याचा अभाव, किंवा चक्क सभ्यतासुद्धा! मनोजची ही जवळीक केवळ चित्रपटांतून नव्हती; त्याला इतिहासाची आणि राजकारणाची चांगली समज आहे. शत्रुघ्न सिन्हानंतर राजकारण खरोखर करणारा तो एकमेव चित्रपट कलाकार असेल.
खरं म्हणजे मनोजला निवडणुकीचं तिकीट.. गेलाबाजार राज्यसभेवर किंवा लोकसभेवर पाठवायला हवं होतं. डायलॉगबाजीचे फटाके फोडून ‘पर्दे को आग लगाने’वाले सरकारकृपेनं अशा ठिकाणी गेल्यावर गांधीजींचे उपासक बनून मौनव्रती होतात. आज प्रच्छन्न भाटगिरी करणाऱ्या अनुपम खेरचं अभिनयाचं दुकान जोरात चालू होतं तेव्हा राजकारणाचं किंवा काश्मिरी पंडितांचं नाव घ्यायलाही त्याला वेळ नव्हता. आज आपल्या लोकोत्तर नेत्यावर चित्रपट काढायला निघालेल्या परेश रावलनं ‘और चांद डुब गया’मधला खलनायक साकारण्याकरता आपल्या ‘करंट’ परमेश्वराचाच ‘गेटअप’ केला होता.
असा दुटप्पीपणा मनोजनं कधी केला नाही. दोन्ही सरकारी घरांचा सन्माननीय अतिथी असूनही तो उपाशीच राहिला. असो! फाळके पुरस्काराबद्दल त्याच्यावर तोंडसुख घ्यायचं असेल त्यांनी ते खुशाल घ्यावं. त्याचा सरकारी मेहेरबानीशी संबंध लावू नये. याआधीचे फाळके पुरस्काराचे मानकरी असामान्य गुणवत्तेचे धनी होते. त्यांची पात्रता निर्विवाद होती. त्यांच्याशी तुलना केली तर मनोजकुमारची पात्रता पन्नास टक्केच ठरण्याची शक्यता आहे. पण तितपत पात्रता असणारे तरी आज कितीजण चित्रपटसृष्टीत आहेत?
शोकांतिका अशी आहे, की फाळके पुरस्कार असो की पद्म पुरस्कार- ते कुणाला द्यावेत, असा दुष्काळी प्रश्न निर्माण झालाय. तरुण कलाकारांसाठी तो नाही. आणि ज्यांच्यावर त्यांचा खरा अधिकार होता, ते आज या जगात राहिलेले नाहीत. त्यांच्या काळात एक तर हा पुरस्कार अस्तित्वात तरी नव्हता आणि नंतर त्यांच्या नावाला झळाळी राहिली नाही म्हणून हा पुरस्कार गुणवंतांना पारखा झाला. एरवी के. ए. अब्बास, कैफी आझमी, एस. डी. बर्मन, सलील चौधरी यांना तो मिळाल्याचं सुखद दृश्य आपल्याला पाहायला मिळालं असतं. आता हयात कलाकारांची यादी काढून बहुधा लॉटरी पद्धतीनं हे दोन्ही पुरस्कार दिले जातात.
आणि या कारभारात मनोजकुमार आणि अजय देवगण यांना पुरस्कार उशिरा तर मिळतातच; शिवाय त्यांना शंकाकुशंकांचं गालबोटही लागतं. देवगणला हा पुरस्कार याआधीच मिळायला हवा होता. बिहारमध्ये सरकारी पक्षाचा प्रचार केल्यानंतर तो त्याला मिळणार असेल तर ते निव्वळ दुर्दैव आहे. ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये अनिल कपूरचा अद्यापि नंबर लागत नसेल तर मग त्याच्यावर सरकारी कृपेचं किटाळ येणारच. मनोजकुमारच्या बाबतीत तो ‘देर आये, दुरुस्त आये’ म्हणायला हरकत नसावी. त्याच्या देशभक्तीसाठी त्याला तो मिळाला, असं म्हणून त्याला कमी लेखायचं असेल तर त्याचा ‘शोर’ हा चित्रपट आठवावा.
‘स्टँडर्ड’ देशभक्ती, भ्रष्टाचार, सामाजिक समस्या सोडून त्यानं अगदी साधा विषय घेतला होता. तो आजच्या काळातला चित्रपट म्हणता येईल. शहरातल्या गर्दीला आणि कोलाहलाला त्याचा नायक- एक सामान्य, मध्यमवर्गीय माणूस इतका कंटाळलेला असतो, की शेवटी त्याला बहिरेपण येतं ते वरदान वाटतं. हा चित्रपट आज बनला असता तर कोणत्या ना कोणत्या फेस्टिव्हलमधलं अ‍ॅवॉर्ड घेऊन आला असता. ‘एक प्यार का नगमा है’ आणि ‘शहनाई बजे ना बजे’ ही गाणीदेखील मनोजनं छान ‘शूट’ केली होती. त्याचे चित्रपट केवळ भारतीय संस्कृतीचे भाबडे गोडवे गाणारे असते तर विपुल शहासारख्या गुणी दिग्दर्शकाला ‘पूरब और पश्चिम’चा ‘रीमेक’ करावासा वाटला नसता. त्या चित्रपटावरून वीस-पंचवीस वर्षांनी बनलेला ‘नमस्ते लंडन’ सुपरहिट् ठरला हे अवश्य लक्षात घ्यायला पाहिजे. शहांचा रीमेक मनोजच्या मूळ चित्रपटापेक्षा सरस होता, हे मान्य. पण मनोजच्या मूळ चित्रपटात दम होता, हे का अमान्य करायचं? शेवटी आडात असलं तरच पोहऱ्यात येणार ना!
निर्माता-दिग्दर्शक म्हणून आपल्या काळात वेगळेपणा दाखवण्यात मनोज यशस्वी ठरला. त्याच्या काळातले दिग्दर्शक परदेशात ‘शूट’ केलेल्या प्रेमकथा किंवा दु:खाच्या गारपिटीत भिजलेले कुटुंबपट अथवा रुचिपालट म्हणून स्मगलर मंडळींचे प्रतापपट दाखविण्यात मश्गूल होते तेव्हा मनोज ‘रोटी, कपडा और मकान’, ‘क्लार्क’ वगैरेंमधून त्या काळातल्या ताज्या सामाजिक समस्या समोर आणत होता.
इथं आठवण होते देव आनंद, महेश भट, महेश मांजरेकर आणि गजेंद्र अहिरे यांची. या सर्व दिग्दर्शकांमध्ये आणि मनोजकुमारमध्ये एक गुण अन् एक दोष समान आहे. हे सगळेजण चालू घडीचं वर्तमान पडद्यावर आणण्याचं धाडस दाखवतात, पण त्यांच्या विचारामधला वेगळेपणा त्यांच्या चित्रपटांमध्ये मात्र उतरत नाही. देव आनंदच्या आणि मनोजच्या दिग्दर्शनात ही उणीव इतर तिघांच्या मानानं फारच जाणवते. बाकीच्या तिघांनी काही चित्रपटांमध्ये तरी आपलं उद्दिष्ट गाठण्यात यश मिळवलं. देव आणि मनोज चांगले विषय निवडण्याचे- ‘टापटीप व स्वच्छता’ यांचे गुण मिळवून गेले. व्यावसायिक चित्रपट दोघांच्या अंगात मुरला होता. तो त्यांना चौकटीबाहेरचे विषय चौकटीत कोंबायला लावत होता. आजच्या दिग्दर्शकाला ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ बघून तयार झालेला आणि प्रयोगशीलतेसाठी उत्सुक असलेला प्रेक्षक मिळतो. हा प्रेक्षक देव आनंद आणि मनोजकुमार यांना व त्यांच्या पिढय़ांमधल्या दिग्दर्शकांना मिळाला नाही. प्रेक्षकाच्या मर्यादा कलाकारांवरही मर्यादा आणतात.. त्यांची वाढ थांबवतात.
मनोजकुमारजवळ चित्रपटकलेचा वारसा नव्हता. चित्रपटाचं प्रेम या एकमेव गोष्टीच्या आधारे तो आडगावातून मुंबईच्या मायानगरीत आला. तोही विवाहित अवस्थेत! म्हणजे हीरो बनण्याकरता मोठंच ‘डिस्क्वालिफिकेशन’! मनोजकुमारनंतरच्या दोन पिढय़ांमधले सनी देओल आणि आमिर खान हे आपलं ‘मॅरिटल स्टेटस’ लपवून पडद्यावर आले. (सत्यमेव जयते!) बाकी हा आपला राष्ट्रीय (अव)गुण आहे. आपले राजकारणीदेखील या खेळात मागे नाहीत. असो! मनोजकुमार आणि धर्मेद्र यांनी मात्र असली लपवाछपवी केली नाही.
दिलीपकुमारपासून प्रेरणा घेऊन हे दोघे नट आडगावांमधून येऊन बॉलिवूडमधले त्यांच्या काळातले मोठे स्टार बनले. आज क्रिकेटपासून सिनेमापर्यंत सर्व क्षेत्रं लहान गावांमधले गुणीजन गाजवीत आहेत. त्यांचं आपण तोंडभरून कौतुक करतो. मग काडीमात्र अनुभव नसलेला कुणी हरेकृष्ण गोस्वामी नावाचा तरुण अभिनयाबरोबरच निर्मिती, दिग्दर्शन व लेखन क्षेत्रांतही यश मिळवतो तेव्हा त्याचं कौतुक करताना आपण कंजूषपणा का करतो? त्याचं फिल्मी नाव ‘मनोजकुमार’ आहे म्हणून? त्यानंही त्याच्या क्षेत्रात बऱ्याच चांगल्या गोष्टी केल्या. त्यानं प्राण नावाच्या पट्टीच्या खलनायकाला ‘उपकार’मधून यशस्वी चरित्र-नट बनवलं. निवृत्तीच्या वाटेवर असलेल्या दिलीपकुमारला त्याच्या ‘क्रांती’मुळे ‘सेकंड इनिंग’ मिळाली, म्हणूनच आपण ‘मशाल’ आणि ‘शक्ती’मध्ये अस्सल अभिनय पाहण्याचा आनंद लुटू शकलो. संतोष आनंद नावाच्या फार गुणी गीतकाराला त्यानंच पहिली संधी दिली. इंडस्ट्री त्याला फार लवकर विसरली; पण ‘मैं ना भुलूंगा’सारखी त्यांची सुंदर गाणी विसरणं अशक्य आहे. ‘तेरी दो टकिया दी नौकरी, मेरा लाखों का सावन जाए’ अशी नायिकेची गोड, पण धीट तक्रार त्याच्याच ‘रोटी, कपडा और मकान’मध्ये ऐकायला मिळाली.
‘कोई जब तुम्हारा हृदय तोड दे, तडपता हुआ जब कोई छोड दे, तब तुम मेरे द्वार आना प्रिये, ये दर खुला है, खुला ही रहेगा तुम्हारे लिए..’ हे इंदिवरचं नितांतसुंदर गीत मनोजच्याच चित्रपटात ऐकायला मिळालं. कल्याणजी-आनंदजी आणि लक्ष्मी(कांत)- प्यारे(लाल) यांच्या संगीताची कमान त्याच्या चित्रपटातूनच उंचावली. एखाद्या चित्रपटामधले कलाकार, संगीतकार, गीतकार उत्कृष्ट कामगिरी करतात तेव्हा त्यांच्यामागे त्यांचा दिग्दर्शकच असतो. मग हे श्रेय मनोजला देण्याची वेळ येते तेव्हा आपण काचकूच का करतो?
राहता राहिला अभिनय! मनोजकुमारला प्रती- दिलीपकुमार बनायचं होतं. नसेल जमलं. अपयश हा कलंक वा गुन्हा नसतो; खुजं ध्येय मात्र असतं- हे आपल्याला इथं का आठवत नाही? त्याच्या आराध्यदैवतानं त्याला ‘आदमी’मध्ये घेण्याइतका विश्वास दाखवला. स्वत:च्या घरात शशी कपूरसारखा कलाकार असताना राज कपूरनं ‘मेरा नाम जोकर’मधली डेव्हिडची लोभसवाणी भूमिका त्याच्याकडे सोपवली. राज खोसला हा गुणी दिग्दर्शक असल्यानं त्याला घेत राहिला. विजय भट्ट (‘हिमालय की गोद में’) आणि शक्ती सामंत (‘सावन की घटा’) यांना तो पसंत पडला. मग आपणही याबाबतीत त्याला संशयाचा फायदा द्यायला काय हरकत आहे? शिवाय निर्माता-दिग्दर्शक म्हणून प्रस्थापित झाल्यावर त्यानं आपण होऊन बाहेरच्या चित्रपटांत काम करणं थांबवलं, हा त्याचा शहाणपणा का विसरायचा? स्त्रिया ज्याच्या गळ्यात पडतात अशा लाजाळू, भीरू नायकाची प्रतिमा त्यानं लोकप्रिय केली आणि सनी देओलनं त्याचा कित्ता गिरवला. सनीच्या ‘ढाई किलो’च्या अ‍ॅक्शन तडाख्यामुळे ही गोष्ट आपल्या लक्षात आली नाही, इतकंच!
माणूस म्हणूनही तो भला वागला. सायरा बानूला दुर्धर आजार झाला त्या काळात तिच्या नेहमीच्या निर्माता-दिग्दर्शकांनी तिला आपल्या चित्रपटांमधून दूर केलं. मनोज मात्र आपल्या ‘पूरब और पश्चिम’च्या नायिकेसाठी थांबला. त्यामुळे दोन र्वष चित्रपट रखडला. त्याची फिकीर त्यानं केली नाही. नंदानं तिच्या काळात अनेक नवोदित नायकांबरोबर काम केलं, पण स्टार झाल्यावर ते तिला विसरले. मनोजनं मात्र ‘शोर’करता तिला आवर्जून बोलावलं. होमिओपॅथीची औषधं इतरांना देण्याचा छंद त्यानं लावून घेतला.
आता इतकं सगळं असल्यानंतरही कुणी मनोजकुमारला ‘फाळके पुरस्कार’ नाकारणार असेल, तर त्याची मर्जी! आपण एखाद्या लग्नकार्याला जातो तेव्हा नवरदेव मुलीला शोभेसा नसेल तर ‘तुला दुसरा कुणी सापडला नाही का गं?’ असा अभद्र सवाल करत नाही. लोकांनी ‘लदादीदींनाही फाळके पुरस्कारासाठी दुसरा कुणी सापडला नाही का?’ असा प्रश्न विचारून अडचणीत आणू नये. यंदाच्या फाळके पुरस्कार निवड समितीवर त्यादेखील होत्या ना! आणखी काही वर्षांनी ‘पद्म’ आणि ‘फाळके’ पुरस्कारांच्या संभाव्य मानकऱ्यांचा प्रश्न पाणीटंचाईपेक्षाही उग्र होणार आहे. त्या वेळी (तरी) मनोजचा पुरस्कार शंभर टक्के पात्रतेचा ठरणार नाही कशावरून? ऐंशी वर्षांच्या मनोजकुमारला पुरस्काराचा आनंद निखळपणे उपभोगू द्या. एवढी सहिष्णुता दाखवणं आपल्याला अवघड नाही.

अरुणा अन्तरकर

rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”