27 September 2020

News Flash

पुनरुज्जीवन.. अजिंठा लेणीचित्रांचे!

स्तूप, चैत्यगृह, विहार यांमधील असंख्य शिल्पे एवढे काही सांगत असतात की त्याचा नवा गुंता तयार होतो.

अजिंठा लेण्यांतील चित्रे कालौघात धूसर होऊ लागली आहेत. या चित्रांतून जातककथा चितारलेल्या आहे. त्यातली १५-२० चित्रे मात्र अजूनही ठळकपणे दिसतात. ही धूसर झालेली चित्रे पुनरुज्जीवित करण्याचे काम एम. आर. पिंपरे यांनी हाती घेतले आणि या चित्रांना त्यांनी आता नवी झळाळी प्राप्त करून दिली आहे. लेण्यांतल्या या चित्ररूप कथा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चित्रकार विजय कुलकर्णी यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

१८९९ मध्ये अजिंठा लेणी जगाला माहीत झाली. त्याला आता ११९ वर्षे पूर्ण होतील. तरीही लेणी पाहून आल्यानंतर त्याच्या भव्यतेत माणूस एवढा रममाण होतो, की त्यातील बारकावे, त्याकाळचा इतिहास आणि त्या कलाकारांनी दिलेला संदेश आपल्यापर्यंत पोहोचतो खरा; पण त्याचे अर्थ कसे लावायचे, याचा संभ्रम काही दूर होत नाही. स्तूप, चैत्यगृह, विहार यांमधील असंख्य शिल्पे एवढे काही सांगत असतात की त्याचा नवा गुंता तयार होतो. तो सोडवता येणारी माणसे तशी कमीच. कारण त्याला अभ्यासाच्या शिस्तीची गरज भासते. ‘जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहिलीत का?’ असे कोणी विचारले तर उत्तर ‘हो’ असे देता येते. मग ‘काय पाहिले?’ असे विचारले की आपल्यापैकी बहुतेकांना काही सांगता येत नाही. शब्दांत मांडता येत नाही. लेणी पाहणे हा एक विलक्षण अनुभव असतो. लेण्याच्या मध्यभागी बुद्धाची मूर्ती ध्यानस्थ असते. पण त्याचा भोवताल वेगळेच काहीतरी सांगत असतो. बऱ्याचदा बुद्ध लेण्याच्या भोवताली बऱ्याच नर्तिका दिसतात. त्यांच्या अवयवांची ठेवण विलोभनीय असते. वस्त्रप्रावरणांशिवाय किंवा कमी वस्त्रांतील शिल्पांमध्ये दिसणाऱ्या स्त्रिया अश्लीलतेला पार पाठीमागे सोडून जातात. ध्यानस्थ असणाऱ्या गौतम बुद्धाला भोवताल विचलित करू शकत नाही, असा संदेश तर नसेल ना त्यात? स्तूप, विहार आणि त्यांना उभे करणारे मोठमोठे स्तंभ पाहिल्यानंतर भारावून जाणार नाही असा कोणीच नाही. पण तरीही लेणी मनात शिल्लक राहते.. अनेक प्रश्नांसह. कधी ही शिल्पे नवे प्रश्न जन्माला घालतात, तर कधी इथली चित्रे. कोणाला त्यांत धार्मिकता दिसते, कोणाच्या मनात त्याकाळच्या सामाजिक-आर्थिक रचनांबाबतचे प्रश्न निर्माण होतात. इथली शिल्पे आणि चित्रांमधली केशरचना, दागदागिने, वस्त्रप्रावरणे यांतील लोकप्रिय पद्धतीचा धांडोळा घेता येतो. तर एखादा कलाकार नृत्यकलेतील शास्त्र त्यातून मांडून दाखवतो. आतापर्यंत नाना पद्धतीने वेरुळ आणि अजिंठा लेण्यांवर अनेकांनी काम केले आहे. पण तरीही काम शिल्लकच आहे. या शिल्पांचा, चित्रांचा अर्थ लावणे अजूनही आपल्याला पुरेसे वाटत नाही. चांगली कलाकृती अस्वस्थता निर्माण करते ती अशी. पण गेल्या काही वर्षांत अजिंठा लेण्यांमध्ये काढलेली चित्रे धूसर होऊ लागली आहेत. बऱ्याचशी आता दिसेनाशीही झालेली आहेत. तेव्हा जी काही ठळक चित्रे उरली आहेत, ती जशीच्या तशी उतरवता येतात का, याचा ध्यास घेणारी मंडळी आज त्यावर काम करत आहेत. पण असे ध्यासमग्न कलाकार आता उतारवयाला लागले आहेत. पण त्यांनी केलेले काम महत्त्वपूर्ण आहे. औरंगाबादमधून दोन चित्रकारांची नावे याकामी आवर्जून घ्यावी लागतील. एम. आर. पिंपरे आणि विजय कुलकर्णी.

१८१५ मध्ये निजाम सरकारने पुराणवस्तू संशोधन खात्याची स्थापना केली. तत्पूर्वी व्हाइसरॉय लॉर्ड कर्झनने अजिंठा लेणी जपण्याचा सल्ला निजामाला दिला होता. पुरातत्त्व संशोधन खात्याची स्थापना झाल्यानंतर अजिंठा लेण्यांचा ऐतिहासिक वारसा जपण्याचे विविध प्रयोग सुरू झाले. आजही पुरातत्त्व विभागातील मंडळी मोठय़ा कष्टाने हा वारसा जशाचा तसा पुढच्या पिढय़ांना पाहता यावा म्हणून काम करीत आहेत. शिल्पांची झीज होण्याची प्रक्रिया ही वर्षांनुवर्षांची आहे. परंतु अजिंठा लेण्यांमध्ये काढलेली चित्रे अलीकडच्या काळात अधिक धूसर होऊ लागली आहेत. अजिंठा लेण्यांमध्ये जातककथा चित्रांतून मांडलेली आहे. त्यात साधारणत: ५४७ जातककथा आहेत. त्यातील १५-२० चित्रे अजूनही ठळकपणे दिसतात. बाकी चित्रे धूसर होऊ लागली आहेत. कितीतरी गोष्टी दडल्या आहेत या चित्रांमध्ये!

जातककथा म्हणजे काय? धर्मतत्त्वे समजावून सांगण्यासाठी सोप्या भाषेत सांगितलेल्या कथा. नीतिनियमांची नैतिक चौकट कशी असावी, याची मांडणी सर्वसामान्यांना त्यांच्या भाषेत कळावी यासाठी रचलेल्या या कथा! त्यामुळे त्या सर्वसामान्यांना आवडाव्यात, त्या अधिक परिपूर्ण व्हाव्यात असा ध्यास असणाऱ्यांनी अजिंठय़ात ही लेणीचित्रे काढली. ‘भित्तिचित्रांच्या दुनियेत अजिंठा लेण्यांतील चित्रे म्हणजे नीलमणी’ असे वर्णन या चित्रांच्या बाबतीत केले जाते. चुनखडीचा गिलावा ओला असताना नैसर्गिक रंगांतून ही चित्रे रंगवली गेली आहेत. ज्वालामुखीतून निर्माण झालेल्या खडकांचे रंगही यात वापरल्याचे सांगितले जाते. एवढी शतके लोटली तरीही ऊन, वारा, पावसाच्या माऱ्यातही ही चित्रे कशी टिकून राहिली, असा प्रश्न निर्माण होत होता. पुरातत्त्व विभागातील मॅनेजर सिंग यांनी केलेल्या संशोधनात मिळालेली माहिती त्या काळातील प्रगत तंत्रज्ञानावर प्रकाश टाकणारी आहे. शिल्प घडवता येईल असा पाषाण असतानाही तेथे चित्रे का काढली गेली असतील याचीही उत्सुकता अनेक वर्षे होती. वेगवेगळ्या भाज्या, साळीचा भुस्सा, वेगवेगळ्या प्रकारचे गवतमिश्रित गिलाव्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीत काही गांजाची पानेही होती. गांजा पाणी शोषून घेतो. त्यामुळे लेण्यांवर कितीतरी पाऊस पडला तरी भिंतींमधून पाझर मात्र होत नाही. परिणामी अनेक वर्षे ही चित्रे टिकून राहिली. जातककथांमधील अनेक प्रसंगांची चित्रे लक्ष वेधून घेतात. पण सर्वाना आवडणारी आणि जगन्मान्य असणारी दोन चित्रे म्हणजे- पद्मपाणी आणि वज्रपाणी. पण त्यांचाही काही भाग दिसेनासा झाला आणि एका राखाडी लेपाच्या खाली चित्र बुजून गेले. ती धूसर झालेली रेषा पुन्हा ठळक करण्याचे काम एम. आर. पिंपरे यांनी हाती घेतले. केवळ एका चित्रालाच नाही, तर धूसर झालेल्या अनेक चित्रांना त्यांनी नवीन झळाळी मिळवून दिली आहे.

कमळांच्या पाकळ्यांसारखे डोळे, धनुष्याकृती भुवया, मजबूत देहयष्टी, अजानुबाहू, रुंद छाती अशा शब्दांत कितीही वर्णन केले तरी पद्मपाणी आणि वज्रपाणी ही दोन्ही चित्रे शब्दांत उतरवता येत नाहीत. तो काळ कदाचित दागदागिन्यांनी स्वत:चे शरीर मढवण्याचा असावा. त्यामुळे वस्त्रे कमी आणि कंठमाळा, मोत्यांच्या माळा, मुकुटांमधील वेगवेगळे पाचू यांच्या रंगसंगतीनेच ते मांडता येऊ शकेल असे त्याकाळच्या कलाकारांना वाटले असावे. त्यातून या कलाकृती घडल्या असाव्या. म्हणूनच औरंगाबादमधील दोन कलाकारांनी अजिंठा लेण्यांतील ही नष्ट होत चाललेली चित्रे काढण्याचा जणू ध्यास घेतला. एम. आर. पिंपरे यांचे या क्षेत्रातील काम मोठे आहे. अजिंठय़ातील धूसर झालेली चित्रे पुन्हा नव्याने काढता येऊ शकतील का, हा ध्यास घेऊन गेली ३५-४० वर्षे पिंपरे काम करीत आहेत. आतापर्यंत लेण्यांतील जवळपास ३५० पेक्षा अधिक चित्रांची धूसरता त्यांनी दूर केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कलाकार म्हणून सेवानिवृत्त झालेले पिंपरे यांनी हे काम त्यांच्या नोकरीच्या काळातच हाती घेतले होते. आता ते पूर्ण झाले आहे. असे काम पूर्ण करण्यासाठी कलाकारामध्ये एक आध्यात्मिक शक्ती लागते. ती मला मिळाली आणि हे काम होत गेले, असे ते विनम्रपणे सांगतात. काय काय दडले आहे या चित्रांमध्ये? कुठे या चित्रांमध्ये सुबत्तेचा पांढरा हत्ती दिसतो, तर बऱ्याच ठिकाणी हंसही दिसतो. त्या काळातील प्राणीही चित्रांमध्ये दिसतात. एखादी कथा सांगताना आजी जशी ती गोष्ट रंगवून सांगते तसेच ‘रंगवून’ सांगण्याची कला प्रत्येक जातककथेत कलाकुसरींनी साध्य करण्यात आली आहे. शिबी जातक, संकपाल जातक, महाजनक जातक, चांपये जातक यांच्या या कथा मोठय़ा रंजक आहेत. त्यातून धर्मतत्त्वांची चौकट अधिक ठळकपणे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पद्मपाणी कोण होता? तो होता एक राजकुमार. बुद्ध तत्त्वज्ञानातील पारिमिता पाळणारा.  पारिमिता म्हणजे जगण्याची नैतिक वा मूल्याधिष्ठित चौकट! दान, शांती, शील, सत्त्व, अधिष्ठान, प्रज्ञा, मैत्री अशा या पारिमिता. त्यांचे जे पालन करतो आणि इतरांच्या सुखासाठी झटतो- असे बोधिसत्व म्हणजे पद्मपाणी. केवळ एकच जातक नाही, तर बोधिसत्वातील विविध जातककथांची चित्रे जगातील कलाकारांना नेहमीच आकर्षित करीत राहिली. कारण ते तत्त्वज्ञान तेवढय़ाच तन्मयतेने पोचविले गेले. कलाकार म्हणून आपल्या कलेतील सारे काही त्यांनी या चित्रांना अर्पण केले. तो कालजयी ठेवा जतन व्हावा म्हणून एम. आर. पिंपरे यांनी त्या रंगरेषांना नव्याने चित्रीत केले आहे. ही चित्रे पुनश्च होती त्याप्रमाणे काढणे हे मोठेच कष्टाचे काम होते. कारण अजिंठा लेण्यांमधील चित्रांतील प्रत्येक व्यक्तिचित्राची केशरचना ही निरनिराळी आहे. राजाचा दरबार जरी असला तरी त्यातील प्रत्येक व्यक्तीची केशरचना वेगवेगळी होती. त्यांच्या अंगावरील वस्त्र-आभूषणे वेगवेगळी होती. त्या प्रत्येकाचा पिंपरे यांना अतिशय बारकाईने अभ्यास करावा लागला. त्यांची ठेवण, धाटणी यासाठी ब्रशचे आघात ठरवावे लागले आणि मगच चित्रे रेखाटली गेली. या ऐतिहासिक ठेव्याचे एक प्रकारे पुनरुज्जीवनच करण्याचा प्रयत्न एम. आर. पिंपरे यांनी केला आहे.

एम. आर. पिंपरे यांचे हे काम एका वेगळ्या उंचीवरचे. तर लेण्यांमधील चित्रे जशी दिसतात तशीच, पण त्यातील धूसरता बाजूला करून ती चित्ररूप कथा लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी चित्रकार विजय कुलकर्णी यांनी दिलेले योगदानही महत्त्वपूर्ण आहे. दहावीची परीक्षा झाल्यानंतर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्येच प्रवेश घ्यायचा असे ठरवून मुंबईत गेलेल्या विजय कुलकर्णी यांनी १९७२ मध्ये चित्रकलेची पदवी मिळविली. एम. एफ. हुसैन, प्रभाकर बर्वे यांच्यासमवेत त्यांच्या काही अमूर्त चित्रांचे प्रदर्शनही झाले होते. २० वर्षांपूर्वी राज्य सरकारच्या सचिवालयाला अजिंठय़ातील काही लेण्यांची चित्रे काढून हवी होती. म्हणून विजय कुलकर्णी यांना अजिंठा येथे जाऊन चित्रे काढण्याची परवानगी देण्यात आली. ४० दिवस मुक्काम करून अजिंठय़ातील जातककथांची चित्रे त्यांनी काढली. आणि तिथून त्यांना अजिंठय़ातील चित्रांचा ध्यासच लागला. गेली ४० वर्षे ते फक्त अजिंठा लेण्यांतील चित्रेच काढत आहेत. विविध कलादालनांमध्ये ती प्रदर्शित केली गेली आहेत. त्यांनी काढलेल्या या चित्रांना मोठी मागणी आहे. ते सांगतात, ‘अजिंठा लेण्यांतील छतावर काढलेली चित्रे सर्वात अवघड आहेत. त्या कलाकारांना ही चित्रे झोपून काढावी लागली असणार. त्यांत अगदी हंससुद्धा चितारले आहेत. त्यांनी काढलेले अजिंठय़ातील पहिले चित्र जहाजाचे होते. या जहाजात बरीच माणसे बसल्याचे दिसते. त्या काळातील व्यापाराचा हा संदर्भ आजही महत्त्वपूर्ण ठरू शकतो. कला म्हणून विजय कुलकर्णी यांनी नंतर अजिंठय़ाशिवाय दुसरी कोणतीही चित्रे काढली नाहीत. इथल्या चित्रांमध्ये कमळ पाकळ्यांच्या आकारातले डोळे, हातांच्या बोटांची आणि नखांची विशिष्ट अशी ठेवण असल्याचे ते सांगतात.

इथल्या प्रत्येक चित्राचे अर्थ एखादी मार्गदर्शक व्यक्तीच सांगू शकेल. या जातककथांमधील रंजकता आता गाईडही फारशी समजावून सांगत नाहीत. मात्र काही चित्रे आपसूकच आपल्याशी बोलतात. फक्त त्यांच्याकडे बघायचे कसे, हे समजून घ्यायला हवे. एका चित्रात बासरी वाजवणारा पुरुष कलाकार आहे, तसेच महिला कलाकारही आहेत. या चित्रांचा आणि शिल्पांचा वेगवेगळ्या अंगाने अभ्यास करण्याची अजूनही आवश्यकता आहे. तसा तो केला जातो आहेही. नाशिकच्या प्रसाद पवार यांनी या लेण्यांची काढलेली छायाचित्रेदेखील अभ्यासासाठी  उपयुक्त ठरू शकतात, असे या क्षेत्रात काम करणारे आवर्जून सांगतात. लेण्या घडवण्याचा हा कालखंड सुवर्णयुग मानला जातो. त्याचा वेगवेगळ्या अंगाने अभ्यास करता येऊ शकेल. अगदी त्याकाळची वेशभूषा आणि फॅशन यांचाही अभ्यासक्रमात समावेश केला जावा एवढी त्याची व्याप्ती आहे. म्हणूनच आय. आय. टी.च्या ‘आर्ट हिस्टॉरिक इन्टरप्रिटेशन’च्या माध्यमातून काही नवीन अभ्यासही मांडले जात आहेत. पुणे येथील सायली पाळंदे यात अग्रेसर आहेत. १९५२ सालापासून वॉल्टर स्पिंक नावाचा माणूस या लेण्यांचा अभ्यास करतो आहे. आज वयाच्या ९४ व्या वर्षीदेखील ते तेवढय़ाच उत्साहाने मार्गदर्शन करत असतात. अजिंठा लेण्यांतील चित्रांमधून त्या काळातील सामाजिकता, तेव्हाचे अर्थशास्त्र यांचाही स्वतंत्रपणे अभ्यास केला जात आहे. अर्थात इतिहासाच्या उलटय़ा पावलांनी जाताना नव्याचा शोध घेऊन त्यातील चांगल्या गोष्टी वर्तमानात कशा आणता येतील, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सध्या सुरू असलेले हे प्रयत्न तसे व्यक्तिगत पातळीवरचे आहेत. स्वयंप्रेरणेने काम करणाऱ्या काही व्यक्तींनी या कामाला संघटनात्मक रूप देण्याचा प्रयत्न केला असला तरी जोपर्यंत सरकार अशा प्रयत्नांना राजाश्रय देणार नाही, तोपर्यंत हा ऐतिहासिक ठेवा पुढच्या पिढय़ांना उत्तम स्थितीत पाहायला मिळणे अवघड आहे. कारण चित्रांची धूसरता कालौघात वाढत जाईल. कधी ना कधी ती अधिकच धूसर होतील. तेव्हा आजच ती जपायला हवीत. याकरता कलाकारांना त्यांची कला बहरत राहील असे वातावरण देण्याचे काम सरकारचे आहे. अर्थात लेण्यांमधील चित्रांच्या जपणुकीसाठी पुरातत्त्व विभागाकडून केले जात असलेले प्रयत्नही तेवढेच मोलाचे आहेत. आज या क्षेत्रात काम करणारी पुरातत्त्व खात्यातील मंडळी सजग आहेत. पण अजिंठा लेण्यांची व्याप्तीच एवढी प्रचंड आहे, की त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतील.

suhas.sardeshmukh@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2018 12:35 am

Web Title: ajanta caves paintings painter vijay kulkarni
Next Stories
1 ज्ञानपीठविजेत्या लेखिकांचा शोध
2 रूपेरी पडद्यावरचे वादक
3 पर्यावरण सुसंस्कृतता कधी येणार?
Just Now!
X