‘कवितेचा पंजा/ गिरवायचा राहूनच जातो माझा’ – तुलसी परब
दिनकर मनवर यांच्या ओळखीचे संक्रमण सांगायलाच हवे असे आहे. मनवर हे पहिल्यांदा उमेदवारी करणारे, मुंबई-पुण्यापासून दूर असलेल्या एका तालुकावजा शहरगावातले कवी होते. नंतर त्यांना अचानकपणे चित्रकार म्हणून लोक ओळखायला लागले. चित्रकारामुळे त्यांच्यातला कवी धूसर झाला, पण थांबला नाही. या कवीने उमेदवारी सोडून आतला रस्ता (अंतस्थ) मनाशी खुणगाठ बांधत धरला. या रस्त्यावरून कवितेच्या महामार्गावर येण्याचा त्यांचा प्रयत्न चालूच होता, सातत्याने. या प्रयत्नांच्या आहारी गेल्यामुळे त्यांची चित्रकार ही ओळख आतबट्टय़ात आली. चित्रकार-कवी या ओळखीला टिकवून ठेवण्यासाठी ते दुसऱ्या पर्वातील अनियतकालिकांचे खंदे समर्थक बनले. यातून पुन्हा ‘अतिरिक्त’सारख्या नव्या अनियतकालिकाचे जन्मदाते बनले. (अगोदरसुद्धा ते अनेक अंकांचे अर्थसहाय्यक होतेच.) ‘अतिरिक्त’ने कवितेसाठी काही तरी म्हणून ‘पहल’सारखे दोन बिनकामाचे, उपयुक्तता- संदर्भमूल्य चुकून सापडेल अशा अंगाचे दोन जाडजूड अंक काढले. या सगळ्या संक्रमणाचे स्वरूप मनवर यांच्यापुरते गंभीर असले तरी बाकीच्यांसाठी ‘फक्त कवी’ अशा अर्थाचे, चित्रे- कोलटकर- ओक- धुरी या बेफिकीर वृत्तीला (स्टाईलला) वाहून घेणारे होते. या घडामोडीचा परिणाम खेडय़ापाडय़ातल्या मुलांवर झाल्याचे उदाहरण अपवादानेच सापडेल. कदाचित हा अपवाद दिनकर मनवर होऊ शकतो. गटातटांच्या अस्तित्वावर अवलंबून राहिल्यावर एखाद्याच्या सर्जनशीलतेचे स्वरूप कसे विस्तारते, बिघडते, टिकून राहते याचा शोध मनवरांच्या संक्रमणशीलतेत शोधता येईल. हा शोध त्यांच्या नव्या कवितासंग्रहाला गृहीत धरूनसुद्धा सांगता येईल.
‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ (२०१४) हा मनवर यांचा दुसरा कवितासंग्रह (ते पहिला म्हणत असले तरी). या संग्रहाच्या अगोदर काही कवितांचा छोटा संग्रह- ज्याचे स्वरूप कॅटलॉग असे होते (चित्रे, लेख, कविता) आणि या कॅटलॉगचे नाव होते ‘रूट्स’ (Roots). ‘अजूनही बरंच काही बाकी’ हा मनवरांचा नवा कवितासंग्रह. हा संग्रह अनेकार्थानी महत्त्वाचा आहे. या संग्रहातील त्यांच्या कविता, त्यांची जुनी ओळख पुसून टाकणाऱ्या अशा आहेत. ‘आपण बोलतो त्याचे काय होतेय’ अशा एका नव्या भानाकडे कवितेचा प्रवास सुरू झाल्याचे जाणवत राहते. या अगोदरच्या त्यांच्या कविता आधुनिकता- उत्तर आधुनिकता या एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातील काव्यात्म वातावरणाला जोडून घेणाऱ्या होत्या. ज्याच्यात नव्वद टक्के भारत (महाराष्ट्र) अस्तित्वातच नव्हता. व्याकरण, शब्दच्छलाची फॅशन, तोडून मोडून उलटय़ा-सुलटय़ा छापलेल्या ओळी, आयटीची भाषा, अधून मधून वारकरी- तुकाराम असा येडपटपणा.. असे काहीतरी कवितेचे भयंकर आवर्तन होते ते. हे आवर्तन संपुष्टात आल्याची शक्यता जाणवायला लागली आहे. उत्तर-आधुनिकतेच्या वैचारिक शक्यतांची चाचपणी न करताच अशा प्रकारच्या कवितेचा अतिरेक केल्यामुळे प्रत्यक्ष जगणे आणि कविता याचा फारसा संबंधच उरला नाही, हे सांगण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे कवी आपल्या कविता निकामी, काळहीन आणि अवकाशहीन ठरतात की काय अशा जाणिवेने भयग्रस्त बनले आहेत. अशा वेळेला कविता लिहिण्याचे प्राचीन कारण काय होते? अशा विचारापर्यंत आपण येतो. कविता लिहिण्याचे हे प्राचीन कारण ज्याला सापडले तोच कवी आपल्या कवितेला कोणत्याही काळात टिकवू शकतो. मनवरांच्या या नव्या संग्रहातील कविता वाचत असताना असेच काहीतरी वाटत राहते. या संग्रहातील जवळपास सर्वच कविता बौद्ध तत्त्वज्ञानाच्या धारेवर काटेकोर चालताना दिसतात. आशयाचा एक भरभक्कमपणा कवितेत टिकून राहतो. पृथ्वीचा इतिहास आणि असुरक्षितता याचे भयग्रस्त सूचन या कवितेत पुन: पुन्हा येत राहते आणि रुजण्याची भाषा त्याच्यावरचा उतारा बनते. हा तत्त्वज्ञानात्मक समतोल संपूर्ण कवितासंग्रहात विस्तारलेला दिसतो.
कविता लिहिण्याचे प्राचीन कारण दु:ख हेच आहे. हे कारण बौद्ध तत्त्वज्ञानात ‘अनित्यता’ अशा अर्थाने सांगितले जाते. गौतम बुद्ध म्हणतो, सर्व रूपे अनित्य आहेत, हे जो ओळखतो त्याला दु:ख स्पर्श करत नाही. थोडक्यात, बुद्ध रूपाचे अस्तित्व, ठळकपणा नाकारतो. त्यामुळे शैली, आकार या गोष्टी आपोआपच त्याज्य ठरतात. आशय, कारणमीमांसा नीटपणे आकार घेते. मनवरांच्या या नव्या संग्रहात हा अनित्यपणा भूमिकेचा गाभा असल्यामुळे सेंद्रियता-असेंद्रियता, ओळख-अनोळख, दु:ख आणि त्याचा कायमस्वरूपी अस्तित्वात राहणारा पोत, त्याचा मानवाला प्रत्येक वेळी होणारा नवा परिचय, असे एक तत्त्वज्ञानात्मक वळण ही कविता घेताना दिसते. ‘मरण्यापूर्वी बापाने काय आठवले असेल’, ‘मरणइच्छा,’ ‘पृथ्वी विपुल आणि दु:ख विराट,’ ‘खूप ऊन आहे पृथ्वीवर,’ ‘तू सर्वसंग परित्याग,’ ‘निब्बाण,’ ‘काही तरी उरलेच शेवटी’ या कविता या अर्थाने पाहता येतात. हा मूलभूतपणा एकमेकाला विरोधी अर्थाने कसा जोडून येतो ते पाहण्यासारखे आहे.
अजूनही मातीतून
उगवून येतेय खाण्यालायक काही तरी
कसं सांगू की कसं आटत चाललंय
जीवन तिळातिळाने पृथ्वीच्या सोबत
– (खूप आटत चाललंय जीवन/ पृ.१४२)
याच्या उलट मृत्यूच्या संदर्भात आलेला समंजसपणा जो बौद्ध तत्त्वज्ञानाचा गाभा आहे.
मृत्यू खरं तर खूप सुंदर गोष्ट आहे
जणू आईच्या कुशीत लागणारी निर्मोही समाधी
– (निब्बाण/ पृ.१४४)
मनवरांची कविता बौद्ध तत्त्वज्ञानाला समांतर जाते, हे त्यामुळेच म्हणावेसे वाटते.
‘दृश्य’ हा मनवरांचा आवडता शब्द. त्यांच्या अगोदरच्या संग्रहाचे नाव ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ असे होते. या नव्या संग्रहातसुद्धा ‘आता या दृश्यात खूप वेळ,’ ‘एक दृश्य उमलतेय,’ ‘पाऊस न पडण्याच्या दृश्यात’, ‘या दृश्यातून एक खिडकी’ अशा अनेक कविता आहेत. मुळात दृश्य बघणे, त्याचा अर्थ लावणे, त्यात अडकून राहणे, त्या दृश्याच्या जवळ जाणे, दृश्याचा पाठलाग करणे, त्याच्या सामाजिक बंधाचा विस्तार करणे हे सगळे मानसिक प्रक्रियेचे निरनिराळे टप्पे आहेत. आपल्या कल्पनाशक्तीला बळ मिळवून देण्यासाठी असा प्रयत्न आवश्यक आहे. पण नसलेल्या दृश्यात दृश्य बघणे आणि असलेल्या दृश्यात दृश्य बघणे यातील फरक अमूर्त आणि मूर्त असा आहे. मनवरांचा सुरुवातीचा प्रवास दृश्य नसलेल्या दृश्यात शिरण्याचा अमूर्त (Absurd) असा असला तरी आता तो मूर्त (fact) असा बनला आहे. ही त्यांच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. मनवर कवी म्हणून या दृश्यांकडे पाहत असल्यामुळे त्यांचा कवी असल्याबद्दलचा आत्मविश्वास अधिक बळकट होईल असे म्हणण्याला भरपूर वाव आहे. दृश्यात बघत असताना त्यातील अर्थ सार्वजनिक करणे किंवा त्यातील अर्थ नाहीसा करून कल्पित अर्थ उभा करणे अशा दोन शक्यताच समोर असतात. या शक्यता सांस्कृतिक वर्चस्व अशा अर्थाने कार्यरत असतात. मनवरांच्या दृष्टीने पहिली शक्यताच अधिक महत्त्वाची आहे. आणि त्याचे कारण प्राचीन म्हणण्याच्या आसपास आहे. ते असे..
तुम्हाला माहिती नाहीये शाप मिळालाय तुम्हाला
या जन्मी स्वत:ची भाष न उच्चारण्याचा
(मी त्यांना सांगून पाहिलं/ पृ. १७)
स्व:प्रस्थापनेसाठी अंक छापून चळवळीचा आव आणणाऱ्या आणि साहित्य संस्कृतीत (मराठीतल्या) बदल घडवून आणण्याचे आव्हान स्वीकारणाऱ्या लोकांना भूमिका, तिचा आग्रह, विस्तार अभिप्रेत नसल्यामुळे काळ व्यापण्याशिवाय फार काही करता आले नाही. या सगळ्याचा केंद्रबिंदू खानदेश, विदर्भ असा असला तरी पुण्या-मुंबईच्या साहित्यिक वातावरणाला जोडून घेण्यासाठी यातल्या अनेकांनी आपली निम्मी ऊर्जा घालवली. प्रस्थापितांच्या गोटात सुरक्षित असे आश्रयस्थान मिळवले. शहरी मध्यमवर्गीय अभिरुचीला बगल देण्याऐवजी उरावर घेतले. विद्यापीठातील भाषेच्या अभ्यासकासमोर गोंडा घोळण्याचे काम केले. आणि बघता बघता प्रस्थापित वातावरणात स्वत:ला विरघळवून टाकले. त्यामुळे अंक काढण्याची ऊर्मी संपुष्टात आली. एक आभासी नवीन वातावरण तयार झाले. या सगळ्याचा मोठा परिणाम कविता नॉर्मल झाली आणि कवी अ‍ॅबनॉर्मल असा झाला. या सगळ्या बिघाड वातावरणातून ज्यांना जाणीवपूर्वक सूट मिळाली किंवा त्यांनी ती आपल्या क्षमतेवर मिळवली अशा काही हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या नावांमध्ये दिनकर मनवर यांचा समावेश करता येईल. मनवर यांनी या संग्रहात नेहमी येणाऱ्या अनेक विषयांना, प्रतिमांना मानवाच्या मूळ अस्तित्वाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. या त्यांच्या प्रयत्नामुळे त्यांच्या कवितेतील काळ, आत्मचिंतन इ. घटक कवितेच्या शब्दाबाहेर, ओळीबाहेर जात नाहीत. मनवरांच्या कवितालेखनाचा हा बाज कविता लिहिण्याच्या प्राचीन कारणांच्या हातभर अंतरावर आलेला आहे. पुढील काळात ते या कारणांना मीमांसेच्या पातळीवर ठेवून तत्त्वज्ञानात्मक खोली प्राप्त करतील असा प्रत्यय हा संग्रह देतो. नामदेव ढसाळ-तुलसी परब-भालचंद्र नेमाडे-प्रकाश जाधव हे आधुनिक मराठी कवितेतील ग्लोबल केंद्र. या केंद्राजवळ मनवरांची कविता आली आहे. हा निष्कर्ष ऐंशीनंतर कविता लिहिणाऱ्यांसाठी तसा सुखकारकच म्हणायला हवा. कारण मनवर अनेक अर्थानी पर्यायी होत चालले आहेत. अनुभवनिष्ठ कवितेला मराठी कवितेच्या केंद्रस्थानी आणून, कवितेची ढासळलेली मान्यता टिकवायची असेल तर अशा अनुकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही.
‘अजूनही बरंच काही बाकी’- दिनकर मनवर,
प्रकाशक- पोयट्रीवाला,
पृष्ठे – १४६, किंमत – २५० रुपये
जी. के. ऐनापुरे – ainapure62@yahoo.com

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
Election campaigning was stopped due to rain
प्रचार पाण्यात! पावसाची रिपरिप प्रचाराच्या मुळावार, उमेदवार घरातच