News Flash

आरते ये, पण आपडा नको!

मालवणी बोलीत काही इरसाल म्हणी आहेत.

मालवणी बोलीत काही इरसाल म्हणी आहेत. तिरफळं घालून केलेल्या बांगडय़ाच्या तिखल्यासारख्या झणझणीत. त्यातलीच एक आहे- ‘आरते ये, पण आपडा नको!’ म्हणजे जवळ यायला हरकत नाही, पण स्पर्श मात्र जरासुद्धा करायचा नाही. प्रतिवर्षी अखिल भारतीय स्तरावरच्या संमेलनाची जत्रा भरली की ही म्हण उगाचच आठवत राहते. भल्याभल्यांना भुरळ घालणारं संमेलनही जणू हेच म्हणत असतं. आणि तेवढय़ासाठीही- म्हणजे आपलंसं नाही केलं तरी चालेल, पण मांडवाखाली तरी जाता यावं म्हणून अनेकांची घालमेल चाललेली असते. ही साहित्य संमेलन नावाची व्यवस्थाही इतकी मुर्दाड आहे, की दरवर्षांची तीच ती दळणं, तीच माणसं नि तेच विषय, तेच रुसवेफुगवे नि वादविवाद मागील पानावरून पुढे सुरू असतात. तरी त्यात काही बदल घडवून आणावेत, काळाबरोबर बदलावं, नवे प्रवाह, नवे लेखक, नवे वाचक सामावून घ्यावेत असं या व्यवस्थेच्या ठेकेदारांच्या कधी मनातही येत नाही. यांचं आपलं एकच पालुपद वर्षांनुवर्ष सुरू असतं- ‘जवळ ये, पण तुझं काय आम्हाला ऐकवायचं नाही.’

खरं तर दरवर्षी लाखो-करोडो रुपयांची माती करून मराठी साहित्याचं नक्की कसलं पीक घेतलं जातं, ते संमेलनाच्या आयोजकांनाच ठाऊक. महात्मा फुलेंनी तत्कालीन उच्चवर्णीयांच्या साहित्य संमेलनांची ‘घालमोडय़ा दादांची संमेलने’ म्हणून संभावना केली होती, त्यालाही आता कैक वर्ष उलटून गेली आहेत. इतका काळ उलटला तरी साहित्य-संस्कृती व्यवहार आणि तो ज्यांच्या हाती आहे ते या व्यवस्थेचे ठेकेदार यांच्या मनोवृत्तीमध्ये मात्र काही विशेष फरक पडला आहे असे दिसून येत नाही. उलट, गेल्या काही वर्षांपासून तर साहित्य संमेलने, त्यांच्या निवडणुका, आयोजन या गोष्टी सत्ताकेंद्राच्या जवळ जाण्याची, वर्चस्व आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याची हुकमी साधने बनत चालल्या आहेत.

महात्मा फुलेंना अभिप्रेत असलेली खेडय़ापाडय़ांतील शूद्रातिशूद्र, बहुजन, कष्टकरी जातींतील मुले गेल्या काही वर्षांपासून शिक्षणाच्या आणि त्यामुळे साहित्य-संस्कृतीच्या मुख्य प्रवाहात आलेली दिसत असली तरी काही अपवाद वगळता यातल्या किती जणांना सन्मानपूर्वक या मुख्य धारेतल्या अखिल भारतीय पातळीवरच्या साहित्य संमेलनामधून सामावून घेतले जात आहे? नव्या जाणिवांनी आजवर मराठी साहित्यात कधीही न आलेले आपले अनुभव, आपापल्या पोटसंस्कृती, बोलीभाषा यांसह लिहित्या झालेल्या लेखकांची या संमेलनांना का आठवण होत नसावी? जागतिकीकरणानंतरच्या काळात बदललेले मूल्यभान, भाषिक संवेदन, जीवनजाणिवा इत्यादींविषयी लिहिणारी पिढी मराठी साहित्यात स्थिरावली आहे.. त्यांच्याविषयी संमेलनाला काहीच देणेघेणे का नसावे? तेच ते हौशेनवशे टाळ्याखाऊ कवी, हितसंबंधांच्या कोटय़ातून भरले गेलेले विद्वान चर्चक प्राध्यापक यांच्याशिवाय मराठी साहित्यात काही घडतच नाही का? असे अनेक प्रश्न अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे छापातले कार्यक्रम आणि त्यात सहभागी तथाकथित मान्यवर पाहिल्यावर पडत राहतात. त्यामुळेच गेल्या जवळपास नऊ दशकांपासून धूमधडाक्यात भरवल्या जाणाऱ्या आणि मराठी भाषा-साहित्य-संस्कृतीच्या संवर्धनाच्या नावाखाली कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या या संमेलनांबाबत साहित्यव्यवहाराकडे गांभीर्याने पाहणाऱ्या लोकांकडून नेहमीच शंका घेतली जात आहे. गेल्या काही वर्षांतले संमेलनांचे चंगळवादी स्वरूप, वाढता राजकीय हस्तक्षेप, साहित्यबा वाद, चर्चा आणि आपापल्या कळपातील, जातीपातीतील दुय्यम, तिय्यम दर्जाचे साहित्यिक वा करमणूक करणाऱ्या विचारवंतांना निमंत्रित करून उरकले जाणारे सुमार कार्यक्रम पाहता या अशा ‘अखिल भारतीय’ म्हणवल्या जाणाऱ्या संमेलनांची नक्की काय आवश्यकता आहे, असे मनात आल्यावाचून राहत नाही.

मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीशी गेल्या जवळपास शतकभरापासून जोडल्या गेलेल्या दिवाळी अंक आणि साहित्य संमेलन या दोन्ही  गोष्टींची थोडय़ा तटस्थपणे चिकित्सा केली तर काय दिसून येते? क्वचित काही अपवाद वगळता या संमेलनांनी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीला किती महत्त्वाचे लेखक मिळवून दिले आहेत? किती संमेलनाध्यक्षांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणांतून समकालीन सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नांवर काही भूमिका घेऊन मराठी समाजाला विचारप्रवृत्त केले आहे? मराठीतील लक्षणीय साहित्यावर वा लेखकांवर, साहित्यातील प्रवाहांवर वा प्रयोगांवर या संमेलनांतून आजवर किती चर्चा झाल्या आहेत? राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार, अनुवाद वा अन्य लेखनांतर्गत आशयगुणांमुळे दखल घेतल्या गेलेल्या किती मराठीभाषक लेखकांना या संमेलनाने वाचकांसमोर आणले आहे? या अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे जर नकारार्थीच येत असतील, तर शताब्दीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या संमेलनाने मराठी साहित्यासाठी नेमकं काय केलं, याचे वेगळे उत्तर देण्याची गरज भासू नये.

खरं तर साहित्यनिर्मितीचा शून्य अनुभव असलेल्यांच्या एकसुरी, कंठाळ्या कार्यक्रमांऐवजी थोडीफार कल्पकता दाखवून सर्जनशील लेखकांना बोलतं केलं गेलं तर वाचकांच्या दृष्टीनेही तो बदल स्वागतार्ह ठरू शकेल असं वाटतं. ज्या लेखकाच्या कलाकृती आपण वाचत असतो, तो लेखक केवळ ‘आननी कसा दिसतो’ एवढय़ापुरतंच वाचकांना कुतूहल असतं असं गृहीत धरणं बाळबोधपणाचं आहे. तर त्याहीपलीकडे जाऊन लेखकाची निर्मितीप्रक्रिया, त्याची पात्रे, लेखनातील परिसर, त्याच्या राजकीय भूमिका, सामाजिक दृष्टिकोन, समकालीन प्रश्नांबाबतची त्याची मते, त्याच्या अनुभवविश्वाची जडणघडण करणारे घटक अशा अनेक गोष्टींविषयी वाचकांना जाणून घ्यायचं असतं. वाचकांप्रमाणेच नव्या लेखकांनाही आपल्याला ‘आयकॉन’ वाटणाऱ्या पूर्वसुरींकडून शिकता येण्याजोग्या कितीतरी गोष्टी असू शकतात. कुठल्याही भाषिक साहित्यव्यवहाराला प्रगल्भ बनवण्याच्या दृष्टीने हा परस्परसंवाद निश्चितच खूप महत्त्वाचा असतो. अ. भा. साहित्य संमेलनासारख्या एका मोठय़ा व्यापक स्वरूपाच्या व्यासपीठावरून आजवर न घडलेले हे असे काही घडवता आले तर मराठीच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून ती नक्कीच स्वागतार्ह गोष्ट ठरावी.

भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर, वसंत आबाजी डहाके, महेश एलकुंचवार, रंगनाथ पठारे, राजन गवस, जयंत पवार यांसारखे भिन्न भिन्न शैली आणि प्रवृत्तींचे लेखक म्हणजे मराठीतील एकेका विचार- जाणिवा- दृष्टिकोनांची ‘स्कूल्स’ आहेत. यांना अनुसरणारे, त्यांच्या वैचारिक प्रकाशात वाटचाल करणारे आणि त्यातूनच हळूहळू स्वत:ची वेगळी वाट घडवू पाहणारे असंख्य नवे लिहिते हात आसपास असू शकतात. या लेखकांच्या शब्दांवर जीव टाकणारे वाचकही हजारोंच्या संख्येने आहेत. आपल्या आवडत्या लेखकांचे पुस्तकाबाहेरचे विचारविश्व जाणून घ्यायला तेही आसुसले आहेत. आजकालच्या सोशल मीडियावरून या लेखकांना त्यांच्या वाचकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता ही गोष्ट सहजपणे लक्षात येऊ शकते. त्यासाठी नेमकं काय करता येईल, कशा स्वरूपाचे कार्यक्रम आखता येतील, त्यात या मराठीतल्या महत्त्वाच्या लेखक, कवींना कसं सामावून घेता येईल, त्यांच्या त्यांच्या वाचकांच्या गटांना आपापल्या आवडत्या लेखकांपर्यंत कसं पोचवता येईल, त्यांच्याशी कसं संवादता येईल, यादृष्टीने नियोजन करता आले तर अशा संमेलनांची ती एक मोठीच उपलब्धी ठरू शकेल. संमेलनांतील कार्यक्रमांचा चाकोरीबद्ध पारंपरिक ढाचा सोडून देऊन, कालसुसंगत गरजा लक्षात घेऊन असे काही करता आले तर मराठीपासून आणि एकूणच वाचनापासूनही दूर जात असलेल्या तरुण पिढीला सामावून घेण्याच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचे ठरू शकते.

आपल्या भाषेत साहित्य अकादमीचे युवा पुरस्कार, अनुवाद पुरस्कार, मुख्य पुरस्कार मिळवणारे पंचवीसेक तरी साहित्यिक आहेत. या साहित्यिकांना सन्मानाने निमंत्रित करून युवकांशी, अनुवादकांशी, विविधस्तरीय वाचकांशी त्यांचा संवाद घडवून आणण्यामध्ये काय अशक्य आहे? पण आजवरच्या एकाही संमेलनाला या अखिल भारतीय स्तरावर पोचलेल्या आपल्या लेखक, कवी, अनुवादकांची दखल घ्यावीशी वाटलेली नाही. अखिल भारतीयत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या संमेलनांनी गावगन्ना कुठल्याही व्यासपीठावरून टाळ्याखाऊ कविता वाचणाऱ्या, लोकानुनयी आवेशी भाषणे ठोकणाऱ्या धंदेवाईकांना अखिल भारतीय संमेलनाच्या मंचावरून पवित्र करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने मराठीला देशपातळीवर घेऊन जाणाऱ्यांना स्थान देणे जास्त गरजेचे आहे. सोशल माध्यमांसकट उपलब्ध सर्व माध्यमांमधून निष्ठेने लिहिणारी गावागावांतली नवी मुले, आपल्या पिढीसाठी नियतकालिके चालवणारे तरुण संपादक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते अशा अनेकांना या संमेलनात सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू करता येऊ शकते. मराठी भाषा टिकवून ठेवण्याचे काम हीच मंडळी करीत आहेत. त्यांना या संमेलनाच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाणे- त्यांचा हुरूप वाढवणारी गोष्ट ठरू शकते. नुसते व्यासपीठावरून मराठी भाषा मरते म्हणून गळे काढण्यापेक्षा हे अधिक विधायक स्वरूपाचे काम होऊ शकते. सर्वस्तरीय साहित्याच्या वाचकांना संमेलनाशी जोडून घेण्याच्या दृष्टीनेही हे महत्त्वाचे ठरू शकते. साहित्य संमेलन ही जागतिकीकरणाच्या काळातही फक्त शहरी, पांढरपेशा वा तत्सम विशिष्ट वर्गाची मक्तेदारी राहू नये, कालनिहाय वाचकांची बदलती अभिरुची जाणून त्यात सर्वसमावेशकता यावी असे मनापासून वाटत असेल तर साहित्य संमेलनाने संकुचितपणाची, पारंपरिक मानसिकतेची आणि आपमतलबीपणाची वस्त्रे अंगावरून काढून टाकून खुलेपणाने मराठी साहित्य व्यवहाराला सामोरे जाणे जास्त गरजेचे आहे. तसे काही करता येत नसेल तर मात्र ही संमेलने शंभर वर्षांची झाली काय वा हजार वर्षांची झाली काय, मराठी भाषा आणि संस्कृतीच्या गंभीर व्यवहारांशी त्यांना खरोखरच काही आस्था आहे किंवा संमेलनाच्या अवकाशापासून दूर खेडय़ापाडय़ांतून पसरलेल्या पिढय़ान् पिढय़ांच्या सांस्कृतिक भूकबळींविषयी त्यांना काही देणेघेणे आहे असे म्हणता येणार नाही.

प्रवीण दशरथ बांदेकर

samwadpravin@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2018 3:21 am

Web Title: akhil bharatiya marathi sahitya sammelan 2018 in vadodara
Next Stories
1 द ग्रॅण्ड महारंगउत्सव!
2 चेहरा एक.. मुखवटे अनेक
3 संशोधन विश्वाची रंजक सफर
Just Now!
X