14 December 2018

News Flash

‘अक्षय’ गणिती

त्याहूनही थोडय़ा गणितींनी ते सर्वसामान्यांना समजेल अशा प्रकारे दिलेले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

फील्ड्स मेडल हे गणितातील सर्वोच्च पारितोषिक जिंकलेल्या ऑस्ट्रेलियास्थित भारतीय वंशाचा गणिती अक्षय वेंकटेश हे नाव स्थलांतरित विजेत्यांच्या यादीत नवी भर घालणारे आहे. सध्या जगभर स्थलांतरितांचा प्रश्न उग्र रूप धारण करत असताना ही बाब विशेष उल्लेखनीय ठरावी.

गणिती विश्वात मुशाफिरी करणाऱ्यांना जोखणे सोपे नसते. अंक, चिन्हे, समीकरणे, सिद्धान्त, निष्कर्ष आणि नियमांच्या घनदाट जंगलात वावरणारी ही माणसे बहुधा सर्वसामान्यांच्या संगतीत हरवल्यासारखीच वावरतात. परंतु तो दोष त्यांचा नसतो; त्यांचे विश्व समजण्यापलीकडचे असणाऱ्या तुमचा-आमचा असतो. कारण खरे म्हणजे या गणितज्ञांसाठी आकडय़ांचा खेळ हा अद्वैतशोधाइतकाच अद्भुत ठरून गेलेला असतो. ‘जे न देखे रवि, ते देखे गणिती’ असे तमाम कविजनांची माफी मागून सांगावेसे वाटते. आकडय़ांमध्ये हे लोक नक्की शोधतात काय, याचे उत्तर फारच थोडय़ांनी दिलेले आहे. त्याहूनही थोडय़ा गणितींनी ते सर्वसामान्यांना समजेल अशा प्रकारे दिलेले आहे. विख्यात भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांनी लिहिले आहे.. ‘एखादे समीकरण माझ्यासाठी निर्थक आहे.. जर त्यातून एखादा दैवी विचार ध्वनित होत नसेल तर!’ फील्ड्स मेडल हे गणितातील सर्वोच्च पारितोषिक जिंकलेल्या ऑस्ट्रेलियास्थित भारतीय वंशाचा गणिती अक्षय वेंकटेश यानेही गणिताच्या उकलीतून मिळणारा आनंद असाच सोप्या शब्दांत मांडलेला आहे. तो सांगतो, ‘एक काहीसा अद्भुत अनुभव गणितातून मिळतो. तुम्ही अत्यंत अर्थपूर्ण अशा योजनेचे घटक आहात असेच वाटून जाते!’

गणितातील नोबेल मानल्या जाणाऱ्या फील्ड्स मेडलविजेत्यांमध्ये यंदा अक्षय वेंकटेश या भारतीय वंशाच्या गणितीचा समावेश आहे. गतिकी सिद्धान्ताच्या गणितातील उपयोजन आणि संशोधनाबद्दल अक्षय वेंकटेशला हे पारितोषिक दिले गेले आहे. अक्षय दोन वर्षांचा असतानाच त्याचे पालक ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले. लहानपणापासूनच त्याला गणिताची प्रचंड आवड आणि त्यामुळेच गणितावर हुकुमतही. १२ व्या वर्षी त्याने गणिती ऑलिम्पियाडमध्ये भाग घेऊन पारितोषिक जिंकले. ऑस्ट्रेलियात विद्यापीठ स्तरावरचे सगळे विक्रम त्याने मोडले. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने त्याला वयाच्या १३ व्या वर्षी दाखल करून घेतले. वयाच्या १६ व्या वर्षी त्याने गणितात (प्युअर मॅथेमॅटिक्स) पदवी मिळवली. हे दोन्ही विक्रम. मग अमेरिकेत प्रिन्स्टन विद्यापीठात तो गेला आणि २० व्या वर्षी पीएच. डी.ही झाला! तेथून मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि मग स्टॅनफर्ड विद्यापीठात संशोधन आणि प्राध्यापकी. अक्षय वेंकटेशने अंकगणितीय भूमिती, संख्या सिद्धान्त, संस्थिती, स्वयंरूपी फल अशा विविध गणिती शाखांमध्ये सखोल संशोधन केले आहे.

अक्षयच्या गणिती आकलनाविषयी एक किस्सा त्याच्या मार्गदर्शक आणि गुरू शेरिल प्रेगर सांगतात. अक्षय आई श्वेता वेंकटेश हिच्यासमवेत प्रेगर यांना भेटायला गेला होता. श्वेता स्वत: संगणकशास्त्राच्या प्राध्यापक. त्या आणि शेरिल यांचा संवाद सुरू होता. १२ वर्षांच्या अक्षयचे त्यांच्याकडे लक्ष नव्हते. त्याची नजर शेरिल यांच्या मागे असलेल्या फळ्यावर होती. त्यावर शेरिल यांच्या एका पीएच. डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांने काहीतरी खरडले होते. अक्षय त्या आकडे आणि चिन्हांमध्ये गुंतून गेला. ते कोडे काय होते, हे अक्षयने विचारल्यावर शेरिल यांनी त्याला ते समजावून सांगितले. ते सगळे त्याने नीट लक्षात ठेवले आणि आत्मसातही केले. फील्ड्स मेडल जिंकणारा अक्षय हा केवळ दुसरा ऑस्ट्रेलियन आहे. यापूर्वी २००६ मध्ये टेरी ताओ याने हा मान पटकावला होता.

फील्ड्स मेडलविजेते हे ४० वर्षांखालील असावे लागतात. हे पारितोषिक दर चार वर्षांनी दिले जाते. चार वर्षांपूर्वी मंजुल भार्गव या कॅनडास्थित भारतीय वंशाच्या गणितीला ते मिळाले होते. २०१४ च्या फील्ड्स मेडलचे वैशिष्टय़ म्हणजे- त्या वर्षी प्रथमच एका महिलेला- तेही इराणच्या- ते प्रदान करण्यात आले होते. मरियम मिर्झाखानी ही इराणमधील हे पारितोषिक जिंकणारी पहिलीच विजेती. यंदाच्या विजेत्यांमध्ये अक्षयसमवेत एक इटालियन आणि एका जर्मन गणितीचा समावेश आहे. तरीही अक्षयइतकीच चर्चा यावेळच्या चौथ्या फील्ड्स मेडलविजेत्या गणितीविषयी सुरू आहे. त्याचे नाव- काउचर बिरकार. केम्ब्रिजमध्ये संशोधन करणारा बिरकार मूळ कुर्दिस्तानचा. इराणमार्गे निर्वासित म्हणून तो इंग्लंडमध्ये आला. म्हणजे निर्वासित, स्थलांतरित, आशियाई नावेही फील्ड्स विजेत्यांमध्ये आता दिसू लागली आहेत. ऑस्ट्रेलियाचा पहिला फील्ड्स मेडलविजेता ताओ हाही एक स्थलांतरितच. ऑस्ट्रेलियापासून कॅनडापर्यंत आणि युरोपपासून अमेरिकेपर्यंत स्थलांतरितांविरोधात प्रक्षोभ भडकवण्याचे प्रयोग आणि प्रकार सुरू असताना फील्ड्स विजेत्यांमध्ये सलग दुसऱ्यांदा दोन स्थलांतरितांची नावे झळकावीत, याला बातमीपलीकडचे सखोल महत्त्व आहे. गेल्या वर्षी एका दुर्धर आजाराने मृत्यू पावलेल्या मरियम मिर्झाखानीने गणिती संशोधनाची तुलना जंगलात हरवण्याशी केलेली आहे. ‘सारे काही शोधत जायचे. लक्षात ठेवायचे. मग अखेरीस तुम्ही एका डोंगरमाथ्यावर पोहोचता आणि सारे काही स्पष्ट दिसू लागते..’ असे तिने म्हटले होते. अक्षय वेंकटेश तरुण वयातच आकडय़ांच्या या जंगलात शिरला आणि आता डोंगरमाथ्यावरही पोहोचला!

सिद्धार्थ खांडेकर

siddharth.khandekar@expressindia.com

First Published on August 5, 2018 1:46 am

Web Title: akshay venkatesh wins mathematical highest reward