अलंकारिक चित्रशैलीसाठी प्रसिद्ध असलेले चित्रकार आलमेलकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन नुकतेच मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये भरविण्यात आले होते, त्याविषयी..

चित्रकार आलमेलकर हे त्यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘आलमेलकरी’ अलंकारिक चित्रशैलीकरता प्रसिद्ध आहेत. त्यांच्या एकंदरीत चित्रकलेचं, शैलीचं, ती ज्या कालखंडात घडली त्या काळच्या पाश्र्वभूमीवर वेध घेणारं, त्याकडे पाहणारं प्रदर्शन  मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये नुकतच भरविण्यात आलं होतं.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..

‘आलमेलकरी’ किंवा तत्सम शैलीची स्तुती करणारे आणि अशा शैलींमधील चित्रकलेवर नाकं मुरडणारे, तोंड वाकडं करणारे असे दोन प्रवाह असतात, आहेत. परंतु या दोन्हीही प्रवाहांतील आवेगामुळे ही चित्रं, चित्र शैली यांचा स्त्रोत, विकास व अर्थ याबाबत निश्चित व तपशिलावर विचार करायची संधी प्राप्त होत नाही. ‘ए. ए. आलमेलकर- इन्स्पिरेशन अ‍ॅण्ड इम्पॅक्ट’या प्रदर्शनाने असा विचार करण्यासाठी मोठी साधन सामुग्री व काळ पट समोर ठेवला.

स्वातंत्र्यपूर्व काळात, स्वातंत्र्यलढा जसजसा तीव्र झाला व ‘स्वदेशी’ची संकल्पना बळ घेऊ लागली; तशी चित्रकलेतही त्याचे पडसाद उमटले. ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या कलाशाळांतून ज्या पाश्चात्त्य वास्तववादी शैलीचं शिक्षण दिलं जाई; त्या शैली, कला प्रकारांचा अस्वीकार  करण्याची विचारधारा विकसित झाली. या अस्वीकारतेतूनच भारतीय सांस्कृतिक ओळख दृश्यं पातळीवर दर्शवणारी चित्रशैली निर्माण करण्याचा प्रयत्न जोमाने सुरू झाला. या चित्रशैली विकसित करण्याकरता अजंठय़ातील चित्र, भारतीय लघुचित्र यांचा स्रोत म्हणून वापर झाला. आलमेलकरांनीसुद्धा पर्शियन, मुघल, पघडी व दख्खन लघुचित्रं यांचा प्रदीर्घ अभ्यास केला होता.

सर. ज. जी. कला महाविद्यालयात या वातावरणाचा परिणाम झाला. पाश्चात्त्य वास्तववादी शैलीतील अभ्यासा सोबत, भारतीय लघुचित्रांवर, अजिंठा चित्रांवर आधारित चित्रशैलीचा अभ्यास सुरू झाला. या अभ्यासाबरोबर भारतीय सौंदर्यशास्त्रीय चर्चाचाही आवाज घुमू लागला. पाश्चात्त्य कला संकल्पना व भारतीय कला संकल्पना यांना मानणारे गट निर्माण झाले. वैचारिक पातळीवर या दोन विचार धारांमधील अंतर हळूहळू वाढत गेलं.

सत्य परिस्थिती ही होती की; आर्ट स्कूलमधील चित्रकार- विद्यार्थ्यांसाठी पाश्चिमात्य वास्तववादी शैली जेवढी अपरिचित होती, तितकीच पारंपरिक भारतीय लघुचित्रं, अजंठा अपरिचित होती. दोन्ही शैलींचा अभ्यास करूनच आत्मसात केली. त्यामुळे या दोन्ही शैलींचा भाव अभिव्यक्तीसाठी वापर करत असताना चित्रकारांना कल्पनाशक्तीचा बराच वापर करावा लागत असे. मग अगदी विषय भारतीय खेडय़ांतील जीवनाशी संबंधित असले तरीही! याखेरीज या चित्रशैलींचा एकत्रित अभ्यास केल्याने कदाचित, पाश्चात्त्य व भारतीय चित्रशैलींचा मिलाफ, संकर झाल्याचंही दिसून येते. त्यामध्ये रंगवण्याची-रेखाटण्याची पद्धत, अभ्यास पद्धती अशा अनेक गोष्टी एकत्र आल्याचे दिसून येतात. अर्थातच या सर्व गोष्टींबाबत आज जेवढी वैचारिक स्पष्टता असू शकते, तेवढी ती पूर्वी असणं कठीण होतं. परिणामी अनेक चित्रकारांना असं निश्चित वाटत होतं की, ते भारतीय सांस्कृतिक ओळख असलेली कला निर्माण करत आहेत. पण ते असो!

आलमेलकरांच्या प्रदर्शनातून या पाश्र्वभूमींचा व्यूह तर मिळतोच, पण त्या कलानिर्मिती प्रक्रियांवरही प्रकाश पडतो. उदा. आलमेलकर स्केचिंग करण्यासाठी पाश्चात्त्य वास्तववादी कलेशी संबंधित जलद रेखाटनाची पद्धत वापरीत असत. त्याचा वापर बऱ्याचदा दृश्य स्वरूपाची नोंद म्हणून केला जायचा. त्या आधारे ते अलंकरणात्मक चित्राचा ढाचा, प्रतिमा निर्माण करत असत.

‘अलंकरण’ याच्या अनेक छटा आहेत. ब्रिटिशांनी भारतीय पारंपरिक अलंकरण पद्धती- जी मंदिर किंवा इतर वास्तू, वस्त्र, दागिने, भांडी, अशा अनेक गोष्टींशी संलग्न झालेली होती, तिला ‘कलाकुसर’ (क्राफ्ट) म्हणून त्यातील अर्थ छटा व प्रत्यक्ष तसेच, भावनिक वास्तवाशी त्या अलंकरण पद्धतीचा असलेला संबंध तोडून टाकला. अलंकरण पद्धतीविषयी नाकं मुरडणारे लोक याच विचाराची री ओढत असतात.

प्रत्यक्ष, भावनिक वास्तव व त्यातून निर्माण झालेले अर्थ व त्यातून तयार होणारी अलंकरण पद्धती या एकमेकांत घट्ट विणल्या गेल्या असतील, तर त्यातून होणारी अभिव्यक्ती ही कलाकार विशिष्ट संस्कृतीतील जीवनप्रवाहात पूर्णपणे समरसून गेला आहे याचं द्योतक ठरते. स्वातंत्र्य पूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय शैलीतील चित्रं, त्यांतील अलंकारिक शैली, अलंकरण पद्धती या त्यामुळेच वरवरच्या वाटतात. कारण बऱ्याच वेळा शहरात राहणारे चित्रकार; भारतीय निसर्ग, त्यात समरसून गेलेलं जीवन, जीवनानुभव व त्याशी निगडित भावानुभव यापासून दूर गेलेले होते. त्यामुळे मेंदीप्रमाणे वळणावळणानंही अलंकरण जाऊ शकतं.आलमेलकरांच्या कलेचा हाच महत्त्वाचा गाभा या प्रदर्शनातून शोधल्यास समोर येतो. म्हणजे एका बाजूला आलमेलकरांना पाश्चिमात्य वास्तववादी शैली, पद्धती ज्ञात होती, त्यातील वास्तवाचा दृश्यात्मक वेध घेण्याची पद्धत त्यांनी वापरून भारतीय खेडय़ांतील जीवन, तेथील निसर्ग, लोक, त्यांची घरं, खेडय़ापाडय़ांची रचना, अलंकार, भांडी, दागिने, आहार-गोंदण, नृत्यप्रकार, शरीर रचना, वस्त्रं अशा अनेक अंगांनी अभ्यास केला व त्याच वेळेला विविध भारतीय लघुचित्रं शैलींचा, त्यातील बारकाव्यांचा अभ्यास करत या दोन गोष्टींतील संबंध शोधण्याचा प्रयत्न कळत-नकळत केला व या अंगांनी हे प्रदर्शन पाहिल्यावर आलमेलकरांच्या चित्रकलेच्या अनेक छटा आपल्या समोर उलगडतात. प्रत्यक्ष वास्तवातील दृश्यात्मकतेचा वेध घेऊन, त्याचा सांस्कृतिक भावजीवन व अर्थाशी असलेला संबंध ओळखून तयार होणारी दृश्यं भाषा जेव्हा वास्तवाच्या दर्शनापेक्षा अर्थाच्या अभिव्यक्ती करता अलंकरण पद्धतीचा शोध घेते; त्यातून अलंकारिक शैली तयार होते, याचा पुरेपूर अनुभव या प्रदर्शनातून आला.

महेंद्र दामले