X

संत-साहित्याची समीक्षा का होत नाही?

वास्तविक संत-साहित्य हे मराठीचा मानदंड मानले जाते. संत-साहित्य हे मराठी साहित्याची गंगोत्री आहे.

आधुनिक मराठी समीक्षा ही कथा, कविता, कादंबरी, ललित गद्य इ. च्या पलीकडे गेलेली नाही. वास्तविक संत-साहित्य हे मराठीचा मानदंड मानले जाते. संत-साहित्य हे मराठी साहित्याची गंगोत्री आहे. परंतु आधुनिक मराठी समीक्षेने संत-साहित्याला समीक्षा-परिघाबाहेरच ठेवले असून आजची समीक्षा संत-साहित्याला अस्पृश्य मानते की काय, अशी स्थिती आहे.

मराठी वाङ्मय समीक्षेतील संत-साहित्याचे दालन हे दुर्दैवाने अलीकडे अनुल्लेख व दुर्लक्षिततेच्या कडीकुलपात बंद आहे. आजची मराठी समीक्षा ही फक्त ललित वाङ्मयापुरतीच मर्यादित झाली आहे/ ठेवली गेली आहे. आधुनिक मराठी समीक्षा ही कथा, कविता, कादंबरी, ललित गद्य इ. च्या पलीकडे गेलेली नाही. वास्तविक संत-साहित्य हे मराठीचा मानदंड मानले जाते. नव्हे, ते आहेच. संत- साहित्य हे मराठी साहित्याची गंगोत्री आहे. ते मुख्यत्वेकरून ओवी, अभंग अशा काव्यरूपातच अवतरले आहे. संतांनी आपला गद्यविचारही जनमानसासमोर पद्यरूपानेच मांडला. मराठी साहित्याचे संस्थापकत्व, आदिबंध हे मराठी संत- साहित्यालाच द्यावे लागेल. प्रजासत्ताकोत्तर काळात आधुनिक मराठी समीक्षेने संत-साहित्याला समीक्षा-परिघाबाहेरच ठेवले असून आजची समीक्षा संत-साहित्याला अस्पृश्य मानते की काय, अशी स्थिती आहे. स्वत:ला समीक्षेचे भाष्यकार म्हणवणारे महानुभावदेखील संत-वाङ्मयाला आजच्या समीक्षावर्तुळात घेत नाहीत. हे मराठीचे वाङ्मयीन दौर्बल्य आहे. परिणामी साहित्याच्या सर्व प्रकारांना, क्षेत्रांना स्पर्श करण्याऐवजी आजची मराठी समीक्षा ललित वाङ्मयाच्या पिंडीलाच वेटोळे घालून बसली आहे. संतकाव्य हे काव्य नाही का? जर असेल तर त्यावर अलीकडे झालेल्या लिखाणाची समीक्षा का केली जात नाही? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. नाही म्हणायला माझ्या माहिती व अभ्यासाप्रमाणे, असा प्रयत्न पूर्वी डॉ. मा. गो. देशमुख यांनी ‘मराठीचे साहित्यशास्त्र- ज्ञानेश्वर ते रामदास’ या समीक्षा- ग्रंथातून (१९४०) केला आहे. आपल्या पसंतीच्या संतांवर त्यांच्या वाङ्मयाचा समग्र, संक्षिप्त वा विशिष्ट अंगाने धांडोळा घेऊन ‘साहित्य वाचस्पती’ पदवी मिळविणारे आहेत. परंतु हे प्रमाणही काहीसे मर्यादित स्वरूपाचे आहे. संतांच्या कवितेवर लिहिलेले सर्व काही आजच्या समीक्षेत अंतर्भूत होणे अनिवार्य व आवश्यक आहे. त्यामुळे संत- विचारांचा, त्यांच्या प्रबोधनाचा प्रचार, प्रसार व त्यानुसार वागणूक झाली असती. आज ज्याची आत्यंतिक निकड आहे, तेच आज अस्पर्शित झाले आहे. हे दृश्य खंतावणारे आहे. नामदेव, ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम व रामदास या संतकवितेच्या पंचप्राणांसह इतरही अनेक संतांनी व संत- कवयित्रींनी आपले जीवनसंचित या कामी लावले आहे. त्यांच्या साहित्याला आज उतारवयातील वा निवृत्तीकाळातील ‘वाचन’ म्हणून समीक्षेतून बाद करण्याची प्रवृत्ती नक्कीच गर्हणीय आहे.

ललित वाङ्मयाचा हेतू हा मानवी मनोव्यापारातील कल्लोळ, घुसमट, उद्रेक यांच्या परिणामांचे कृतिचित्र रेखाटणे हा आहे, असे मानले तरीही संत-वाङ्मय यात उणे ठरत नाही. संत- साहित्यातून मानवी भावना, विचार, कल्पना, कामना, वासना, विखार, आशा, आकांक्षा व त्यांचे द्वंद्व, त्याच्या परिपूर्तीसाठी होणारे मार्गक्रमण आणि मानवी आचरणाचे (म्हणजेच ऐहिक, लौकिक जीवन) स्वरूप स्पष्ट व परखडपणे मांडलेले असते. मानवी भावभावनांचे खेळ संयमाने, वैध व सन्मार्गानेच व्हावेत असे त्यात अधोरेखित केलेले असते. ललित साहित्य हे रंगीत व आकर्षक छायाचित्र मानले तर संत-साहित्य हे क्ष-किरण छायाचित्र ठरते. ललित वाङ्मयाचे चित्र आकर्षक, दर्शनीय, प्रदर्शनीय म्हणून उजवे असेलही; परंतु संत-साहित्यातील मानवी भावभावनांचे चित्रण ‘जसे आहे, जेथे आहे’ स्वरूपाचे यथातथ्य असून त्यावरील संतांचे भाष्य, विवरण, चिकित्सा, परामर्श हे सारे सकारात्मक, प्रबोधक, जीवनाला प्रगल्भता देणारे, तसेच स्व आणि सवरेन्नतीचे दिशादर्शन करणारे आहे. संत-साहित्य केवळ बोधपर, उपदेशपर, योग्य-अयोग्य स्पष्ट करणारे किंवा आचरणाचे नीतिनियम सांगणारे आहे म्हणून त्याकडे समीक्षेचे दुर्लक्ष होते का, हे तपासणे गरजेचे झाले आहे. मुदलात मराठी समीक्षा ही तद्दन परभृत, परावलंबी आहे. प्रारंभी तिला संस्कृत साहित्य- समीक्षेचे मापदंड जवळचे होते. कालांतराने पाश्चात्त्य साहित्यविचारांचे मराठी समीक्षेला आकर्षण वाटले आणि त्यानुसार आजतागायत तिची वाटचाल होत आहे. पाश्चात्त्य साहित्यात मराठीतल्याप्रमाणे संतांची व संतविचारांची मांदियाळी नाही, हे लक्षात घ्यायला हवे. आपल्याकडील संत-साहित्य जुने आहे, पण जीर्ण नाही. तरीही आजच्या समीक्षेला त्याचे अजीर्ण होते.

सहा-सात दशकांपूर्वी बिगरी ते मॅट्रिकपर्यंतच्या मराठी क्रमिक अभ्यासक्रमात सर्व मराठी वाङ्मय- प्रकारांचा (कादंबरी सोडून) समावेश असे. त्याद्वारा गद्य-पद्य ओळख व आवड निर्माण होई. तेव्हा शिक्षकांना, अध्यापकांना, प्राध्यापकांना मराठीची सर्वकष जाण व त्याबद्दल रुची होती. परिणामी मराठी क्रमिक पुस्तकांच्या अध्ययन, अभ्यासाने अभिरुचीवर्धन होत असे. कालांतराने यात स्थित्यंतर झाले. राज्यकर्त्यांच्या संकुचित व धरसोड धोरणामुळे मराठी क्रमिक पुस्तकांतून असणारे संतकवितेचे विलोभनीय दृश्य लोप पावले. याचा दृश्य परिणाम म्हणजे आजची युवा पिढी संत-वाङ्मयविन्मुख झाली आहे. याविरुद्ध आज कोणीही आवाज उठवत नाही.. उठवायला तयार नाही.

अखिल भारतीय म्हणविणाऱ्या साहित्य संमेलनातूनही संत-साहित्याला फाटा देण्यात येतो. शिरस्ता म्हणून परिसंवाद नामक भाऊगर्दी साचेबंदपणे साजरी होते. त्यात संतविचार कोणाला पसंत पडत नाही. चर्चा, विचारमंथन तर दूरच! अध्यक्षीय भाषणांतूनही संतविचारांचा मागोवा लुप्त झाला आहे. अध्यक्षीय भाषणेही गुळगुळीत, गुळमुळीत स्वरूपाची, ‘जुने औषध, नवी बाटली’ (किंमत मात्र वाढली!) अशीच असतात.

शासनकर्त्यांना स्वस्थानाची चिंता आहे. शासनात आज मराठी साहित्याच्या विविध प्रकारांची आवड व जाणीव आढळून येत नाही. अशा स्थितीत संतसाहित्याचा विचार संतांच्या जन्म वा पुण्यतिथीभोवतीच घुटमळतो. तेही ‘साजरे’ करण्यापेक्षा ‘उरकण्या’वर अधिक भर असतो. नाही म्हणायला शासन साहित्यप्रकारांना पारितोषिके देत असते. मात्र, अशा शासकीय पारितोषिकांनी कोणतीही भाषा, संस्कृती समृद्ध होत नसते. पारितोषिके देणे हा केवळ कृतज्ञता रिवाज असतो. साहित्याच्या संवर्धनासाठी प्रकल्प, दीर्घकालीन योजनांची गरज असते. शासन कोणतेही असले / आले तरी असे प्रकल्प निग्रहाने व अग्रक्रमाने राबवावे लागतात. त्यासाठी ठोस कृती व प्रामाणिक आणि निरलस प्रयत्नांची गरज असते. त्यात कंपूशाही, वर्णी लावून घेणारा वर्ग, आपपरभाव व तेच ते चेहरे असे (आजच्यासारखे) स्वरूप नसावे.

दुर्दैवाने अभिरुचीसंपन्न मासिके, नियतकालिकेही संत-वाङ्मयाच्या वाटेला जात नाहीत. प्रथितयश मराठी प्रकाशक आजकाल संत- वाङ्मयाचा वाराही स्वत:स लागू देत नाहीत. जी नियतकालिके केवळ संतसाहित्याला वाहिलेली आहेत ती यथाशक्ती तग धरून प्रतिसाद देत आहेत. मात्र, हेही केवळ मर्यादित वाचकवर्गावर विसंबून आहे. अशी नियतकालिके अद्याप टिकून आहेत, हेच अप्रूप. माझ्या शाळकरी वयात मी ‘संत विद्यापीठ निर्मिती’ची घोषणा ऐकली होती. मात्र, पुढे तर्कतीर्थाच्या पश्चात ती हवेत बाष्पीभूत झाली.

आजही संतकवितेचा आशय उमगतो. तिचे आकलन होते. पण ते वाचावे, समजून घ्यावे ही मानसिकता खंडित झाली आहे. त्यामुळे त्याचे वाचन होत नाही. अशावेळी लेखक, प्रकाशक, समीक्षक, प्राध्यापक मंडळींनी पुढाकार घेऊन संत- साहित्यातील श्रेयस लोकांसमोर मांडणे आवश्यक आहे.

मराठी समीक्षेने गेल्या पाच-सहा दशकांत संत- साहित्याकडे पद्धतशीर दुर्लक्ष केल्याने ही स्थिती आली आहे. यात संतांचे व त्यांच्या साहित्याचे काहीच नुकसान नाही. नुकसान समग्र मराठी साहित्याचे आहे. घरातील वडीलधाऱ्यांचा ‘अमृतमहोत्सव’ करायचा, पण त्यांची एरवी काळजी वाहायची नाही असे आजच्या समीक्षेचे संतसाहित्याबाबतचे वर्तन आहे. त्यात बदल होणे गरजेचे आहे.

अरविंद ब्रम्हे

Outbrain