ज्येष्ठ पत्रकार व विचारक कै. डॉ. अरुण टिकेकर यांचा ‘कालचक्र’ हा नवा लेखसंग्रह रोहन प्रकाशनतर्फे  प्रकाशित होत आहे. डॉ. टिकेकरांच्या निधनाला नुकतंच वर्ष झालं. निधनापूर्वी केवळ चार दिवस आधी या पुस्तकाला त्यांनी प्रस्तावना लिहिली होती. त्यातील अंश..

स्वास्थ्य असेल तर ‘दिसामाजि काहीतरी ते लिहावे’ हा समर्थाचा उपदेश कृतीत उतरवण्यात अडचण नसते. पण ‘कधीतरी’, ‘काहीतरी’ लिहिलेलं प्रसिद्ध करण्यापूर्वी परत वाचणं, त्यावर लेखन-संस्कार करणं, हे अपेक्षित असतं. तसं करण्याची संधी नसेल तर? म्हणजे असं की, लिहिलेलं लगेच प्रकाशित होण्यासाठी छापखान्यात पाठवायचं असेल तर? एखाद्या वृत्तपत्रासाठी दररोज सदर लिहिण्याची जोखीम उचलायला अनुभवी साहित्यिकसुद्धा फारसे उत्सुक नसतात. दररोज विषय शोधणं आणि त्यावर ठरावीक शब्दांत लिहिणं ही आगळीवेगळीच शिस्त आहे. दररोज लिहिलेला मजकूर प्रसिद्ध करणं, लेखनसंस्कार करण्याची संधी नसणे म्हणजे लेखनकामाच्या दर्जाशी तडजोड करणं, असाच साहित्यिकांचा ग्रह असतो. वृत्तपत्रात दररोज एखादा कॉलम मजकूर लिहावयाचा म्हटला तरी दिवसभरात अन्य काही करता येत नाही. असं सदरलेखन ही जणू काळाशी स्पर्धाच! अधिकाधिक वृत्तपत्रांचं आणि ग्रंथांचं सतत वाचन, घडलेल्या ताज्या घटनांविषयी माहिती मिळवणं, कोणता विषय निवडता येईल, हाताळता येईल यासंबंधीचं मनन, भेटीगाठींतून विषयशोध यांत गुंतावं लागतं. शिवाय त्या भाष्यातून एखादा मननीय दृष्टिकोण दिला जावा, निदान वाचणाऱ्याचं मनोरंजन व्हावं, हे अपेक्षित असतं. सदरांचे उद्दिष्ट नवीन माहिती देणं आहे, की मनोरंजन करणे आहे यावर अभ्यास किती, हे ठरू शकेल. प्रश्न असा विचारला जाऊ शकेल की, मग दररोज सदर लिहिण्याचा अट्टहास का? मुळात सदरलेखन हा प्रकारच सर्वार्थाने वाचकांकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेला बसण्याचा आहे. मग ती परीक्षा साप्ताहिक असो, पाक्षिक वा मासिक असो. सदर लिहिणं हे एक प्रकारे आव्हान असतं. सदराची यशस्वीता ही लेखकाला नशेसारखी चढते आणि तो अधिक चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करतो. असं असता दररोज परीक्षेला बसायचं, हेही आव्हानच आहे.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
what is learning disorder marathi, learning disorder marathi article
Health Special: अध्ययन अक्षमता म्हणजे काय ? अशा मुलांसाठी काय करायचं?
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : वंचित नव्हे, मविआच भाजपची ‘बी टीम’?
How did Swargate get its name in Pune
Pune : पुण्यातील ‘या’ ठिकाणाला स्वारगेट हे नाव कसे पडले? जाणून घ्या ‘स्वारगेट’ नावामागचा इतिहास

खरंच आहे. संपादक असं दररोज परीक्षेला बसत असतो. तो दररोज संपादकीय लिहितो. त्यावर वाचक भाष्य करतात. त्याला पास-नापास ठरवतात. पहिला वर्ग देतात. दुसरा वा कधी तिसराही देतात. संपादकीय (पूर्वी त्याला ‘अग्रलेख’ म्हणत.) हे लिहिणाऱ्याच्या नावाने प्रसिद्ध होण्याची प्रथा अजून तरी रूढ झालेली नाही. शिवाय हल्ली एकच एक व्यक्ती सर्व अग्रलेख लिहीत नाही, हे वाचकांना ज्ञात आहे. संपादकाच्या शैलीवरून, त्याच्या खास म्हणता येतील अशा शब्दप्रयोगांवरून किंवा वाक्यरचनेवरून संपादकाचं लेखन ओळखण्याचा प्रयत्न सुज्ञ वाचकांकडून होत असतो. दररोज एकाचाच लेख त्याच्या सहीनिशी प्रसिद्ध होण्याने त्याची आणि वाचकांची नाळ जुळते आणि यशस्वी लेखकाचे लेख वाचकांना भावतात. त्या लेखांचा वाचकांच्या मनावर प्रभाव पडतो. विषयांचं वैविध्य वाचकांचं कधी मनोरंजन करते, कधी सकाळी-सकाळी त्याला प्रसन्न करते, तर क्वचित कधी उदासही करते. सदर-लेखकाचा मूड वाचकांचा दिवसभराचा मूड बनवतो. कमीत कमी सहा महिने तरी दैनंदिन सदराचा प्रयोग चालतो. सहा महिन्यांत लेखकाची दमछाक होते, त्याचा ज्ञान-संचिताचा घडा रिता होतो. वाचकही कंटाळतात त्याच्या लेखनाला आणि शैलीला. मग ते नव्या शैलीत लिहिलेलं  दुसरं काही शोधू लागतात..

सदराविषयीच्या माझ्या अनुभवाला दुसरी एक किनार होती. माझ्या स्वत:च्या सदर-लेखनाव्यतिरिक्त दशकाहून अधिक काळच्या ‘लोकसत्ता’च्या संपादकीय कार्यकाळात एकूण २२२ (प्रतिवर्षी २२ याप्रमाणे) सदरं प्रसिद्ध केली. या साप्ताहिक किंवा क्वचित पाक्षिक सदरांची आखणी करताना काही गोष्टी विचारात घ्याव्या लागल्या. वृत्तपत्रांचे वाचक विविध गटांतील असतात- लोकल गाडीने किंवा थोडा लांब पल्ल्याचा प्रवास करणारे, गृहिणी, शिक्षक, युवकवर्ग, ज्येष्ठ नागरिक, तसंच दुपारची वामकुक्षी करताना वाचणाऱ्यांपासून ते त्या लेखनाचं अभ्यासपूर्ण मनन करणाऱ्यांपर्यंत. वाचकांच्या या विविध गटांना रुचेल, पचेल अशा रीतीने सदरांची आखणी करायची तर त्यात हलकेफुलके, दैनंदिन जीवनातले अनुभव यांपासून माहितीपर, वैचारिक, प्रबोधनपर असे वेगवेगळ्या स्तरावरचं लेखन आणायचं होतं. संवादपर बोलीभाषेबरोबर सहज-सोपं आणि विचारप्रवृत्त करणारं आणि म्हणून थोडं अवघड भाषेतील लेखनही अंतर्भूत करायचं होतं. हे अवघड शिवधनुष्य वाटलं तरी नव्या-जुन्या लेखकांच्या सहकार्याने ते वाचकांच्या पसंतीस उतरलं. त्यांची कात्रणं काढून जपून ठेवली गेली. या लेखनाची पुस्तकं प्रकाशित होऊन त्यांची विक्रीही बऱ्यापैकी झाली. एकंदरीत सदरलेखनाला बऱ्यापैकी प्रतिष्ठा प्राप्त झाली.

सदरांबाबतीतला एक अनुभव गमतीचा आहे. ज्या लेखकांना ते वर्षभर सहज लिहू शकतील एवढे विचार आपल्याकडे आहेत असं वाटायचं, त्यांतले काही महिनाभरात गळपटायचे. आणि ज्यांना सुरुवातीला अजिबात आत्मविश्वास नसायचा, त्यातले काही जण वर्षभर सदर खुलवू शकायचे. अधिक लिहिण्याइतपत त्यांची वैचारिक तयारी असायची. सप्टेंबर महिन्यातच संबंधितांची एक मीटिंग घेऊन पुढच्या वर्षी वेगवेगळ्या अभिरुचीच्या वाचकांना कोणते विषय वाचायला आवडतील, यावर चर्चा व्हायची आणि विषय ठरायचे. पुढचे तीन महिने योग्य लेखकांचा शोध घेतला जायचा. कोणतंही नवं सदर सुरू व्हायच्या अगोदर, तसंच सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या महिनाभर मी त्या लेखकाशी त्याच्या सदराबद्दल चर्चा करत असे. माझं मत काय झालं, वाचकांचा प्रतिसाद काय आहे, त्याबद्दल बोलत असे. महिनाभरानंतर मात्र मी मधे पडत नसे. सदराची वाचकप्रियता महिनाभर चढणीवर असते. नंतर ते जणू पठारावर येतं. लेखकाला व नंतर वाचकांनाही स्थिरावल्यासारखं वाटतं. विषय संपल्याची भावना होईपर्यंत- म्हणजे सदर उताराला लागेपर्यंत साधारणत: ५२ आठवडे झालेले असतात असा माझा अनुभव आहे. वर्षभराचाच लेखकाशी वायदा असायचा. त्यामुळे कोणत्याही सदरलेखकाशी ना माझा वाद झाला, ना संबंध बिघडले. सदर उठावदार, वाचकप्रिय होत नसेल तर मात्र त्या लेखकाला साह्य़ करावं लागे.

विषय निश्चित करताना केवळ एक दिशादर्शक आराखडा ठरवला जायचा. उद्दिष्टं निश्चित करावी लागायची. तपशील लेखकाने ठरवायचा. लेखन जर या उद्दिष्टांना आणि दिशेला धरून झालं तर सदर चांगलं वठे. स्तंभलेखनाबाबत विषय आणि चौकट आखून घेतल्यावर लेखनाची दिशा आणि टप्पे ठरवले म्हणजे हे लेखन प्रमाणबद्ध, आटोपशीर आणि वाचकपसंत होऊ शकायचं. हे सारं लेखन सुरू करण्याआधी निदान मनात तरी असावं लागायचं. संशोधन प्रकल्पाप्रमाणेच या लेखनाची उद्दिष्टं निश्चित असतील तरच ते लेखन कसदार व्हायचं.

माहितीपर लेखनाबाबत कधी नवोदित लेखकांना माहितीचे स्रोत सांगावे लागत. संदर्भ शोधून तपशील घेण्याचं काम त्यांनाच करावं लागे. त्यासाठी तासन् तास ग्रंथालयात बसावं लागायचं. वेगवेगळ्या माहितीसाठी वेगवेगळ्या ग्रंथालयांत जाऊन संदर्भग्रंथ शोधावे लागायचे. क्वचित लेखी माहिती पूर्णपणे उपलब्ध नसे. अशावेळी काही संबंधित व्यक्तींना भेटून कणाकणाने माहिती मिळवावी लागे. तिच्या सत्यासत्यतेची शहानिशा करावी लागे.

सदरांची शीर्षकं जेवढी आकर्षक, औत्सुक्य चाळवणारी असतील तेवढे अधिक लोक ती वाचायला प्रवृत्त होतात. या शीर्षकांचा खूप विचार करावा लागायचा. त्यांच्यावरील पुस्तकं त्याच शीर्षकाने प्रसिद्ध व्हायची तेव्हा हा विचार बरोबर असल्याचं जाणवायचं.

‘लोकसत्ता’त आल्यावर मी ‘तारतम्य’ हे सदर सुरू केलं. ‘तारतम्य’मध्ये सभोवताली घडणाऱ्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींवर भाष्य असे. त्यात प्रश्न अधिक असत. पूर्वीच्या संपादकांप्रमाणे चबुतऱ्यावर उभं राहून संदेश देण्यापेक्षा मित्रत्वाच्या नात्याने प्रश्न उपस्थित करून समाजघटकांना विचार करायला लावणं, ही त्यामागची माझी भूमिका होती. ‘तारतम्य’ हे सदराचं शीर्षकसुद्धा साठ पर्यायी नावांमधून निवडलं होतं. ‘हे सदर जड आहे, दोनदा वाचल्याशिवाय कळत नाही,’ अशा प्रतिक्रिया मला येत असत. पण त्याचबरोबरीने या सदराबद्दल पुल, सुनीताबाई, गंगाधर गाडगीळ अशा अनेकांनी शाबासकीही दिली होती. सुनीताबाई आणि पुल यांनी दूरध्वनी करून ‘‘‘तारतम्य’साठी आम्ही रविवारी ‘लोकसत्ता’ घ्यायला लागलो,’’ असं म्हणत  ‘‘मला जे शब्दांत पकडावंसं वाटते, पण पकडता येत नाही, ते तुम्ही अचूक पकडता..’’ या शब्दांत शाबासकी दिली होती. तर डॉ. रा. भा. पाटणकर म्हणाले होते की, ‘गंभीर निबंध’ हा प्रकार मधल्या काळात मराठीत दुर्मीळ झाला होता, तो या सदरामुळे परत आला. मराठी वृत्तपत्रांच्या वाचकांची अनावश्यक शब्दांचा फाफटपसारा नसलेलं आणि ज्याला इंग्रजीमध्ये ‘३ी१२ी’ म्हणतात, तसं वाचण्याची सवय गेली आहे. त्यांना डोक्याला ताप देणारं काही नको असतं.

पण मी वाचकांच्या ज्या वर्गाला आवाहन करू इच्छित होतो, तो वर्ग ‘स्र््रल्ल्रल्ल ें‘ी१२’चा. त्या अल्पसंख्याक वाचकांसाठी मी लिहीत होतो. त्यामुळे नव्या-जुन्या संकल्पनांवर आधारित स्पष्टीकरण करायचं तर वाचकाच्या डोक्याला थोडा ताप होणारच. नाही तरी नव्या संकल्पना तयार होणं मराठीत थांबल्यात जमा आहे. पाश्चात्त्य संकल्पना मराठीत सांगायच्या तर त्या वर्णनात्मक पद्धतीनेच सांगाव्या लागतात. समाजघटकांनी विचार करायला लावणारं वाचलं तरच समाजबदल होण्याची शक्यता आहे, हा माझा आवडता सिद्धान्त आहे. ‘तारतम्य’ हे सदर मुळातच वाचकांच्या मर्यादित, विशिष्ट वर्गापुरतं होतं. त्यामुळे त्या सदराचा कोणी उपहासात्मक उल्लेख केला तरी तो मला बोचत अथवा खुपत नसे. ‘तान्प्रति नैष यत्न:’ अशी मनाची समजूत करून मी घेत असे. जेथून दाद मिळणं अपेक्षित होतं, तेथून ती मिळत असता तक्रार कशासाठी करायची?

‘तारतम्य’ सदर स्थिरावल्यानंतर मी ‘जन-मन’ हे सदर शनिवारच्या पुरवणीत सुरू केलं. हे सदर लिहिणं सोपं नव्हतं. जनमन घडतं कसं, प्रत्येक पिढीचे मापदंड आणि मानदंड वेगवेगळे कसे होत जातात, याचा मागोवा घेणारं, सांस्कृतिक इतिहासाच्या अंगाने जाणारं असं हे सचित्र सदर होतं. हे लेखन वाचनीय व्हावं, म्हणून त्याच्या शीर्षकात जुन्या गीतांचा, कवितांचा वापर केला होता.. जुनी चित्रं मिळवली होती. समाजसंस्कृतीतील बदलांचा वेध घेणारं हे सदर होतं. त्यामागे या दिशेने २०-२५ र्वष सातत्याने केलेलं वाचन आणि जमवलेली पुस्तकं याचं संचित होते. एकटाच संकलन करू पाहणारा मी; पण हे दस्तावेजीकरणाचं काम एकटय़ाने करण्याजोगं नव्हतं. अकाली निधन पावलेले माझे सन्मित्र अरुण आठल्ये यांना माझा विषय अतिशय आवडला होता. हे साहित्य जमवताना आठल्ये धावून आले. त्यांची मला खूप मदत झाली. माझ्या संपादकपदाचा सुरुवातीचा काळ हा ‘लोकसत्ता’च्या विस्ताराचा आणि राजकीय घटनांच्या धामधुमीचा होता. त्यामुळे आठल्यांची मदत ही ‘देव दीनाघरी धावला’सारखी मोलाची होती.

त्यानंतर ‘स्थल-काल’ हे सदर लिहिलं. यात भूतपूर्व मुंबई इलाख्याच्या स्थानीय इतिहासाची सचित्र झलक होती. त्यात अठराव्या-एकोणिसाव्या शतकांतील वास्तू आणि निवासस्थानं, पर्यटक अँग्लो इंडियन लेखिकांच्या नजरेतून मुंबई, मोठी स्वप्नं  पाहणारे मुंबईकर, मुंबई-पुणे प्रवास इत्यादी घटनांचा तसंच पुणे, उंब्रज, वाई, माथेरान, सातारे ( सातारा), पंढरपूर, रत्नागिरी, अलिबाग वगैरे स्थानांचा तसेच प्रदेशांचा रंजक इतिहास उभा करण्याचा मी प्रयत्न केला..

‘लोकसत्ता’चा संपादक म्हणून रोजचा धबडगा पुष्कळ होता. अग्रलेख लिहिणं, ‘तारतम्य’तून भाष्य करणं चालू होतंच. त्यात हे जुन्या काळात डोकावून इतिहासलेखन करणं- हा सर्व खटाटोप मला खूप थकवणारा होता. पहाटे चार-चार वाजेपर्यंत जागून या सदरांचं बरंचसं लेखन झालं आहे. सदरातील कित्येक लेख अगदी आयत्या वेळी डेडलाइनच्या आदल्या दिवशी लिहून झाले. काही संदर्भ आयत्या वेळी बघावे किंवा तपासावे लागत. पण एकंदर संदर्भाची जमवाजमव झाली होती, ती मात्र मी गेली २०-२५ र्वष सातत्याने केलेलं वाचन आणि जमवलेली पुस्तकं यांतून. वाचकांना द्यायचं तर काहीतरी नवीनच द्यायचं, हा ध्यास होता. मित्रमंडळींत मी फारसा वेळ दवडला नाही. माझा म्हणता येईल असा ग्रुप नाही. अभ्यास हा एकटय़ानेच करावा लागतो, एकटय़ानेच करायचा असतो..

‘कालचक्र’ या दैनिक सदरामध्ये एकंदर दोनशेच्या आसपास लेख प्रसिद्ध झाले. ते सर्व संग्रहित करायचे तर ग्रंथ फारच मोठा झाला असता. त्यामुळे लेखांची संख्या कमी करण्याचे प्रयत्न केले. त्या प्रयत्नांत काही बरे लेखही वगळावे लागले. त्यात नवी जबाबदारी आली, ती म्हणजे लेख कालबाह्य़ होऊ नयेत म्हणून तत्कालीन संदर्भ वगळण्याची. ‘कालमीमांसा’, ‘कालान्तर’ आणि ‘कालचक्र’ ही ‘जन-मन’, ‘स्थल-काल’, ‘इति-आदि’ यानंतरची माझी ही दुसरी ग्रंथ-त्रयी!