News Flash

दोन पायांचा घोडा..

‘आर्ट गॅलऱ्या’ म्हटलं की फक्त जहांगीर आर्ट गॅलरी माहीत असणारे बरेचजण आहेत, हे चांगलंच.

दोन पायांचा घोडा..
श्रेयस कर्ले यांच्या प्रदर्शनातील एक कलाकृती (छायाचित्रे : अभिजीत ताम्हणे)

‘आर्ट गॅलऱ्या’ म्हटलं की फक्त जहांगीर आर्ट गॅलरी माहीत असणारे बरेचजण आहेत, हे चांगलंच. पण जहांगीरसारख्या सार्वजनिक संस्थावजा कलादालनाच्या पलीकडे खासगी मालकीच्या गॅलऱ्यांमधून भारतातल्या चित्रकला क्षेत्राचा तथाकथित ‘मुख्य प्रवाह’ आणि देशातल्या दृश्यकलेचा ‘बाजार’ किंवा ‘मार्केट’ आहे हे अनेकांच्या गावीही नसतं, हा काही त्या माणसांचा दोष नव्हे. कलेच्या बाजारानं- आणि म्हणून कलाक्षेत्रानंही सामान्य माणसाला दूरच ठेवल्याची भावना सार्वत्रिक आहे आणि ती खरीदेखील आहे. पण गेल्या दहा वर्षांत या परिस्थितीत हळूहळू फरक पडू लागलेला आहे.

सांगलीच्या वार्षिक ‘कलापुष्प’उत्सवाची वाढत गेलेली प्रतिष्ठा, पुण्यातलं ‘सु-दर्शन कलादालन’ आणि त्यांचे ‘चित्रसंवाद’सारखे उपक्रम, कणकवलीत आणि पुण्यातही भरलेलं ‘चित्रकला संमेलन’ अशी काही पुरावेवजा उदाहरणं सांगता येतात. पण मुंबई आणि दिल्लीच्या- म्हणजे पैसेवाल्या महानगरांतल्या- कलाक्षेत्राचं लक्ष सामान्य माणसाकडे गेलं की नाही? याच दोन शहरांत- त्यातही दिल्लीत- कलाबाजार २००८ पूर्वी प्रचंडच फोफावला होता. सूजच आली होती कलेच्या बाजाराला. विशेषत: २००३ ते २००८ ही पाच वर्ष नुसता महापूर होता कलाक्षेत्रात पैशांचा! अमेरिकेत आणि मग युरोपातही २००८ ची ती कुख्यात मंदी आली आणि भारतात कलाबाजाराला याचा फटका एवढय़ाचसाठी बसला, की तोवर आपल्याही कलाबाजारात वाहणारा परदेशी पैसा बंद झाला. जागतिकीकरणोत्तर भारतातली नवी कलानिर्मिती थांबली नाही; पण ‘ग्राहक कोण?’ हा प्रश्न पडला! ‘आपण फक्त पैसा कमावला.. नवा ग्राहकवर्ग निर्माण करण्याची जबाबदारी निभावलीच नाही’ अशी उपरती भारतातल्या खासगी आर्ट गॅलऱ्यांना होण्यासाठी जो फटका आवश्यकच होता, तो अखेर बसला. यानंतरच्या दशकभरात स्वत:ला कलाक्षेत्रातला ‘मुख्य प्रवाह’ समजणाऱ्या खासगी मालकीच्या आर्ट गॅलऱ्यांचं काय झालं?

एका शब्दातलं उत्तर म्हणजे- आधी या गॅलऱ्या ‘हडकल्या’! अशक्त झाल्या. पण तिथपासून आत्तापर्यंतचा दहा वर्षांचा प्रवास हा कलाक्षेत्राचं आरोग्य सांगणारा ठरला आहे. तो कसा होता, याची चर्चा करण्यासाठी आत्ताइतकं चांगलं निमित्त नाही; याचं कारण येत्या १८ फेब्रुवारीपर्यंतचा पंधरवडा हा चित्रकला क्षेत्राच्या सद्य:स्थितीचे विविध विभ्रम दाखवणारा ठरणार आहे! मुंबईत परवाच्या ३१ जानेवारीपासून एकाच वेळी १८ खासगी गॅलऱ्यांमध्ये त्या- त्या गॅलरीचं महत्त्वाकांक्षी प्रदर्शन सुरू झालंय. दिल्लीत येत्या आठ फेब्रुवारीपासून सुरू होणारा ‘इंडिया आर्ट फेअर’ हा कलाव्यापार मेळा यंदाच्या ११ व्या वर्षी आणखीनच दिमाखाचा आणि ‘सर्वसमावेशक’ होणार अशी चिन्हं आहेत.. ‘१९७० च्या दशकात उभरलेले सामाजिक जाणीव जपणारे कलावंत’ अशी ख्याती असलेल्या दोघा चित्रकारांना ‘ज्येष्ठ’पद देणारी, त्यांच्या आजवरच्या कारकीर्दीचा आढावा घेणारी प्रदर्शनं यंदा भरवण्यात खासगी क्षेत्राचा सहभाग मोठा आहे (हे कलावंत कोण आणि खासगी क्षेत्राचा सहभाग कसा, हे पुढे पाहूच.).. ही सारी कलाक्षेत्राचं आरोग्य सुधारू लागल्याची लक्षणं आहेत. ती दशकभरानंतर पहिल्यांदाच दिसली किंवा कलाक्षेत्राला अचानक ‘अच्छे दिन’ आले, असलं काहीही झालेलं नाही. कलाक्षेत्रातला ‘मुख्य प्रवाह’ म्हणवणाऱ्या खासगी गॅलऱ्यांच्या क्षेत्रानं दशकभरात जे काही प्रयत्न केले, त्याचं हे फळ आहे!

जागतिक मंदीचा फटका २००८ च्या डिसेंबरपासून जाणवू लागल्यावर अनेक गॅलऱ्यांनी २०११-१२ पर्यंत फार कमी प्रदर्शनं भरवली. त्यापूर्वी कोणत्याही खासगी गॅलरीत प्रदर्शनाची पहिली संध्याकाळ ही ‘ओपनिंग पार्टी’ (किंवा अधिक छान शब्द ‘व्हर्निसाज’) असायची. तिथं मद्य आणि खाद्य यांची रेलचेल असायची. जरा बडय़ा गॅलऱ्या सर्व उपस्थितांसाठी ‘डिनर’ ठेवायच्या. हे सारंच सुमारे तीन-चार वर्षांसाठी अगदी मंदावलं. अशा मद्य-खाद्यप्रचुर संध्याकाळ पाटर्य़ा केवळ ‘धंद्या’पुरत्या नसतात, तर चित्रकला क्षेत्रातल्या अनेक संभाषणांचा जन्म तिथं होत असतो, ही संभाषणं पुढे जातात, संवादाचे पूल उभारले जातात.. हा जागतिक कलाक्षेत्राच्या ‘मुख्य प्रवाहा’चा (म्हणजे प्रामुख्यानं तिथली कलासंग्रहालयं आणि थोडय़ाफार खासगी गॅलऱ्या यांचा) अनुभव नाकारता येण्याजोगा नव्हता आणि नाही. आपल्याकडेसुद्धा साधारण २००२ पासूनच कलाविद्यार्थी, होतकरू कलावंत, काही निव्वळ हौशी प्रेक्षक यांची हजेरी मुंबई/ दिल्लीच्या खासगी गॅलऱ्यांत होणाऱ्या पाटर्य़ाना असायची; ती काही केवळ वाइन पिण्यासाठी, मद्यपानासाठी नव्हे. हे सारं लक्षात घेऊन काही गॅलऱ्यांनी कमी खर्चाचा देशी उपाय काढला. लिंबू सरबत आणि साधे वेफर्स एवढय़ावर ‘ओपनिंग नाइट’ उरकायची. त्याच प्रदर्शनासाठी संभाव्य ग्राहकांना अपॉइंटमेंटवजा निमंत्रणं द्यायची. प्रदर्शित झालेल्या कलाकृतींखेरीज त्याच कलाकाराच्या कमी किमतीच्या कलाकृतीही अशा ग्राहकांना दाखवायच्या आणि ‘पदरी पडलं, पवित्र झालं’ म्हणायचं! मुंबईतल्या ज्या गॅलरी संचालकांचा परदेशांत राबता होता त्यांनी आणखीनच नवी युक्ती केली. पैसा परदेशांतच कमवायचा. इथल्या गॅलरीत अशाच कलावंतांना संधी द्यायची, की जे युरो-अमेरिकी संग्रहालयांच्या अभिरुचीला पसंत पडू शकतील! बाकी मग भारतात अधूनमधून भारतीय कलेतिहासावर प्रकाश टाकणाऱ्या एखाद्या प्रदर्शनाच्या जुळणीसाठी सरकारी किंवा संस्थात्मक गॅलऱ्यांना ‘सशुल्क सेवा’ पुरवणं किंवा थेट सामाजिक कार्यकर्त्यांच्या कळपात शिरून आपल्या गॅलरीत त्यांनाही (तोलूनमापूनच; पण तरीही-) थोडंफार स्थान देणं.. हेही काही खासगी गॅलरी चालकांनी करून पाहिलं. दक्षिण मुंबईत अनेक गॅलऱ्यांना जागा परवडेना. मग गॅलऱ्यांनी जागा बदलल्या. पण काम सुरू ठेवलं. दोन गॅलऱ्यांनी त्या प्रतिकूल स्थितीतही अवसान कायम ठेवलं होतं. कुलाब्यातली मोठी जागा कायम ठेवली होती. पण या दोनपैकी एक गॅलरी सध्या अलिबागला स्थलांतरित झाली आहे, तर दुसरी वरळीला.

या खलोटय़ाच्या काळात कलाक्षेत्र हे तथाकथित ‘मुख्य धारे’ला न जुमानता निराळं वळण घेऊ पाहत होतं.. ‘नक्षलवादी’ असल्याच्या आरोपापोटी अटक झालेले डॉ. बिनायक सेन यांच्यावरील आरोप हे जामीन मिळण्याजोगे आहेत, हे अखेर सन २०११ मध्ये सिद्ध झाल्यामुळे त्यांची झालेली मुक्तता साजरी करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या संघटनेसारखं चालणाऱ्या ‘क्लार्क हाऊस’ या कलासंस्थेच्या ऐन कुलाब्यातल्या जागेत एक मोठं प्रदर्शन भरलं. त्यात अनेक नामवंत चित्रकारांचाही समावेश होता. किंवा अशांत क्षेत्रांमध्ये लागू असलेल्या लष्करी विशेष अधिकार कायद्याच्या विरोधात ‘अगेन्स्ट अफ्स्पा’ हा एक व्याख्यान आणि चार लघुपटांचा उपक्रम मुंबईच्या ‘राष्ट्रीय आधुनिक कलादालना’मधलं फक्त प्रेक्षागृह भाडय़ानं घेऊन २०११ च्या डिसेंबरात पार पडला. त्यात ‘जेजे’सह अनेक कला-महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि तरुण चित्रकार यांचा सहभाग होता.

विवान सुंदरम, सुधीर पटवर्धन, नलिनी मलानी यांसारखे कलावंत १९७० च्या दशकात (अनुक्रमे) डाव्या, युवकांच्या, स्त्रीवादी चळवळीमधून आपल्या कलेकडे पाहत होते. त्या तिघांचं एकत्रित प्रदर्शन भोपाळमध्ये १९७९ सालात भरलं होतं. या वर्षी या तिघाही कलावंतांच्या कारकीर्दीचं ‘सिंहावलोकन’ करणारी प्रदर्शनं भरताहेत. त्यापैकी नलिनी मलानी यांचं प्रदर्शन पॅरिस शहरातल्या ‘सेंटर पॉम्पिदू’मध्ये २०१७ च्या ऑक्टोबरात सुरू झालं. भारतातलं ‘किरण नाडर म्युझियम ऑफ आर्ट’ हे आता विवान सुंदरम यांचं सिंहावलोकनी प्रदर्शन (८ फेब्रुवारीपासून) भरवतंय, तर १३ फेब्रुवारीपासून ‘द गिल्ड’ या अलिबाग येथील गॅलरीच्या सहकार्यानं भोपाळच्या भारत भवनामध्ये         सुधीर पटवर्धन यांच्या सुमारे २८० रंगचित्रं, ड्रॉइंग्ज आणि काही शिल्पांचं सिंहावलोकनी प्रदर्शन सुरू होतंय. (हेच ते- आधी म्हटलेले दोघे चित्रकार. कौतुक आहे ते खासगी क्षेत्राच्या पुढाकाराचं. असो.) कलाबाजारात जे लोक क्रियाशील नसतात, त्यांच्यासाठी हा बाजार म्हणजे सहसा तिरस्काराचाच विषय असतो. पण भारतात ‘समकालीन कलेची संग्रहालयं’ (सरकारी, सार्वजनिक संस्थांची आणि खासगी मालकीची) आत्ता कुठे वाढू लागल्यानं कलाबाजारात काय मांडलेलं आहे हे पाहून आपली कलादर्शनाची हौस भागवून घ्यावी लागते. यादृष्टीनं दिल्लीच्या ‘इंडिया आर्ट फेअर’चा प्रेक्षक प्रतिसाद लक्षात घेण्याजोगा आहे. ‘इंडिया आर्ट समिट’ नावानं सुरू झालेल्या या कलाव्यापार मेळ्यात पहिल्या वर्षी (नेमकं २००८!) विविध खासगी गॅलऱ्यांचे ठेले होते, तरीही सहा हजार लोक तीन दिवसांत हे ‘महाप्रदर्शन’ पाहून गेले. दुसऱ्या वर्षी प्रेक्षकसंख्या ४० हजारांवर गेली आणि २०१६ साली तर ८० हजार प्रेक्षक तिकिटं काढून आले. याच ‘फेअर’मध्ये २०१४ साली  हाँगकाँग, लंडन आणि इस्तंबूलमधील कलाव्यापार-मेळ्यांचे संस्थापक आणि संचालक सँडी अँगस यांनी एक अवमानास्पद विधान केलं होतं- ‘‘भारतीय दृश्यकला-व्यवहार आजघडीला फक्त ८५०० माणसांपुरता मर्यादित आहे..’’ असं ते म्हणाले होते! त्यांचं ते विधान खरंही असेल. पण मग या ८५०० माणसांसाठी भारतात खासगी पुढाकारानं किमान ५० तरी नाव घेण्याजोगी कलादालनं सुरू आहेत, हे अगदी त्या २०१४ च्या कलाव्यापार-मेळ्यातले भारतीय ठेले मोजले तरीही सांगता येत होतंच की नाही?

बाजाराविषयी कितीही तिरस्कार असला, कला कितीही पवित्रबिवित्र हवी असली तरी प्रतिकूल परिस्थितीत कलाक्षेत्रातला खासगी गॅलऱ्यांचा पुढाकार थकलेला नाही, हे कौतुकास्पदच म्हणायला हवं. बरं, या क्षेत्रातल्या ‘व्यावसायिकां’ची एकमेकांशी स्पर्धा असली तरी त्यांचं साहचर्य आणि सहकार्य लक्षणीय आहे. मुंबईच्या १८ कलादालनांनी एकाच दिवशी नव्या प्रदर्शनांची सुरुवात करणं, इथवरच हे सहकार्य थांबत नाही. ‘मुंबई गॅलरी वीकएन्ड’  हा वर्षांतून एकदा होणारा उपक्रम सन २०१२ पासून दक्षिण मुंबईतल्या खासगी कलादालनांनी मिळून सुरू केला; तेव्हापासून गेली सहा वर्ष तो सुरू आहे. त्याचा भाग म्हणूनच परवाच्या ३१ जानेवारीपासून ही १८ प्रदर्शनं सुरू झाली आहेत. गेल्या वर्षीपासून या ‘वीकएन्ड’मध्ये ‘वॉक-थ्रू’चा उपक्रम सुरू झाला. ही प्रदर्शनं एकाच दिवशी (शनिवारी) त्या- त्या प्रदर्शनाच्या खुद्द कलावंतानं किंवा प्रदर्शनाच्या गुंफणकारानं (क्युरेटरनं) वा अन्य अभ्यासकानं लोकांना माहिती देता देता दाखवायची, असा हा उपक्रम सध्या इंग्रजीतच आहे आणि तिथं पैसेवालेच लोक दिसतात, अशी नाकं मुरडण्यात काही अर्थ नाही. कारण मुळात भारतीय चित्रबाजाराचा विस्तार करण्यासाठीच ही सारी धडपड सुरू आहे.

सध्या या धडपडीला यश आलंय असं म्हणता येत नाही. नव्या, तरुण चित्रकारांऐवजी ‘नेहमीच्या यशस्वी’ चित्रकारांनाच या गॅलऱ्या सध्या वाव देत आहेत. पण सध्या या गॅलऱ्यांत प्रदर्शित होणारे अनेक कलावंत निव्वळ ‘विक्री’च्या हेतूंना पुरून उरतात आणि आपल्या जाणिवा, आपला अभ्यास याच्याशी प्रामाणिक राहूनच काम करतात, हे आशादायक आहे. उदाहरणार्थ, श्रेयस कर्ले याचं सध्या मुंबईत ‘प्रोजेक्ट ८८’ हे भरलेलं प्रदर्शन विक्रीस अवघड असंच आहे. पण श्रेयसनं काम उत्तम केलंय. याच प्रदर्शनात तो ‘दोन पायांचा घोडा’ दिसतो.. कुठेही गोंद वगैरे न लावता दोन काचांच्या आधारानं हा घोडा उभा आहे.. आणि त्या काचासुद्धा केवळ खालच्या जाड लाकडी पट्टय़ांमधल्या खाचांमध्ये रोवून, वर फक्त दोन अगदी लहान लाकडी पट्टय़ांच्या आधारानं उभ्या आहेत.

हे असं एकमेकांच्या साथीनं उभं राहणं सध्या सुरू आहे.. दोन पायांच्या घोडय़ासारखं!

अभिजीत ताम्हणे

abhijit.tamhane@expressindia.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2018 1:31 am

Web Title: art galleries in maharashtra
Next Stories
1 पुढील पिढय़ांसाठीचा नाटय़ठेवा
2 सर्वव्यापी रामकथा
3 दुर्लक्षित नायकाचे चरित्र
Just Now!
X