।। मूळ ओल अंतरींची।।

सन १६४८. तुकोबांनी जलदिव्य केले त्याला आता दहा वर्षे झाली होती. तुकोबांनी वयाच्या चाळिशीत पदार्पण केले होते. अवघ्या मावळात त्यांच्या नावाचा डंका होता. आतापावेतो हजारो अभंग त्यांच्या नावावर जमा झाले होते. ती अभंगवाणी लोकगीतांसारखी असंख्य लोकांच्या जिभेवर रुळली होती. लोकप्रिय झाली होती. इतकी की आता त्या अभंगांची चोरी होऊ  लागली होती. काही भामटे तुकोबांच्या अभंगांतील त्यांची नामखूण काढून टाकून ते स्वत:च्या नावावर खपवू लागले होते. सालोमालो हा त्यातला एक. तो कोण, कुठला याचा ठाव नाही. पण खुद्द तुकोबांनीच तो वाङ्मयचौर्य करीत असल्याचे लिहून ठेवलेले आहे.

What Ashish Shelar Said About Uddhav Thackeray?
उद्धव ठाकरे हे मोदी-शाह यांच्या संपर्कात आहेत का? आशिष शेलार म्हणाले..
avimukteshwaranand saraswati
VIDEO : “गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळवून देऊ”, नववर्षानिमित्त शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींनी व्यक्त केला संकल्प!
lokmanas
लोकमानस: वालचंद हे मराठीच होते..
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

सालोमालो हरिचे दास।

म्हणऊन केला अवघा नास।।

अवघें बचमंगळ केलें। म्हणती एकाचे आपुलें।

मोडूनि संतांची वचनें। करिती आपणां भूषणें।।

स्वत:ला हरिचे दास म्हणवून सालोमालोने सगळा नाश करून ठेवला आहे. दुसऱ्याचे कवित्व आपले म्हणून सांगत अवघा गोंधळ घालून ठेवला आहे. संतांच्या वचनांची मोडतोड करून त्या कविता आपल्याच असे सांगत आहे. असे दुसऱ्याचे शब्दधन स्वत:चे म्हणून मिरविणारे पातकी आचंद्रसूर्य नरकातच खितपत पडल्याशिवाय राहणार नाहीत. –

उष्टय़ा पत्रावळी करूनियां गोळा।

दाखविती कळा कवित्वाची।।

ऐसे जें पातकी तें नरकीं पचती।

जोंवरी भ्रमती चंद्रसूर्य।।

तुकोबांना हे सहन होणे शक्यच नव्हते.

घरोघरीं झाले कवी। नेणे प्रसादाची चवी।।

लंडा भूषणांची चाड। पुढें न विचारी नाड।।

घरोघरी कवींचे पीक आले आहे. पण काव्यगुण कशाला म्हणतात ते त्यांना माहीत तरी आहे का? उगाच जगात भूषण मिरवण्यासाठी कविता करतात. पण ती स्वत:चीच फसवणूक आहे. या अशा कवींचा त्यांनी ‘कवीश्वरांचा तो आम्हांसी विटाळ। प्रसाद वोंगळ चिवडिती।।’ अशा शेलक्या शब्दांत ठिकठिकाणी केलेला धिक्कार पाहता, त्या काळात तुकोबांच्या अभंगांवर डल्ला मारण्याचा धंदा चांगलाच फोफावला होता असे दिसते. पुढच्या काळात हीच गोष्ट उलटी झाली. म्हणजे इतरांचे अभंग तुकोबांच्या नावावर खपविण्यात आले. गाथ्यात असे अनेक प्रक्षेप आढळले आहेत.

हे सारे तुकोबांवर अन्याय करणारेच. कारण अशाच प्रक्षेपित अभंगांतून तुकोबांची प्रतिमा बिघडविण्यात आली आहे.

तुकोबांना या अशा कवडय़ांचा मन:पूत त्रास होत होता तो केवळ कवीच्या अहंकारातून नव्हे. तुकोबांच्या ठायी तसा अहंकार नव्हताही. काव्याचा, शब्दांचा अभिमान मात्र जरूर होता. शब्द हे त्यांचे धन होते, शस्त्र होते, जीवाचे जीवन होते, दैवत होते. त्याची पूजाही ते शब्दानेच करीत होते.

त्या काळीही पोटार्थी कवी नव्हते असे नव्हे. तुकोबांसाठी मात्र कविता हे पोट भरण्याचे साधन नव्हते.

‘काय आता आम्ही पोटचि भरावें।

जग चाळवावे भक्त म्हूण।।’

मान-सन्मान, भूषणांसाठी ते अक्षरांचा श्रम करीत नव्हते.

अनुभवें आलें अंगा। तें या जगां देतसें।।

नव्हती हाततुके बोल। मूळ ओल अंतरींची।।

आपले अनुभवाचे बोल ते जगाला वाटत होते. ते हाततुके-पोकळ नव्हते. अंतरीच्या जिव्हाळ्यातून आलेले ते ज्ञान होते. ‘धर्माचे पाळण’ आणि ‘पाषांड खंडण’ हे त्याचे काम होते. आणि नैतिकता हे त्याचे स्वाभाविक अंग होते.

आणि त्यामुळेच त्या कवित्वाला ‘शिकल्या शब्दाचे उत्पादितो ज्ञान’ अशी निव्वळ पुस्तकपंडितीकळा नव्हती. त्यात अभ्यास होताच, पण त्याहून अधिक रोकडा जीवनानुभव होता. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत २२ वेळा ‘मऱ्हाटाची बोलु’ असे ज्या अर्थाने म्हटलेले आहे तो स्पष्ट, उघडावागडा रांगडेपणा त्यात होता. गीतेचा मंत्रगीता हा अभंगरूप अनुवाद करणारे तुकोबा अभिजनांच्या अभिरुचीला तोषविल अशी शिष्ट काव्यरचना नक्कीच करू शकत होते. परंतु त्यांनी प्रकट होण्यास निवडली ती लोकभाषा. लोकांच्या उन्नतीचे तत्त्वज्ञान मांडायचे तर ते लोकांच्याच बोलभाषेत हे त्यामागचे साधे कारण होते.

आत्मोन्नतीप्रमाणेच समाजोन्नतीची तळमळ, सत्य-असत्याशी ग्वाही केलेले मन, जीवनाचा उत्कट अनुभव यांतून उतरलेली ही भावकविता. ‘कन्या सासुऱ्याशी जाये। मागे परतोनि पाहे। तैसे जाले माझ्या जीवां। केव्हा भेटसी केशवा।।’ अशी आर्त वेदना ती कधी व्यक्त करीत होती, तर कधी ‘नभोमय झालें जळ। एकीं सकळ हरपलें।।’ किंवा ‘आकाश मंडप पृथिवी आसन। रमे तेथे मन क्रीडा करी।।’ असा पारलौकिकाला स्पर्श करीत होती. कधी ती ‘न देखोनि कांहीं। म्यां पाहिलें सकळही।।’ अशी दिव्यत्वाच्या अनुभूतीला कवेत घेत होती, कधी ‘बोल बोलतां सोपे वाटें। करणी करितां टीर कांपे।।’ अशी थेट अनुभवाला भिडत होती, तर कधी सरळ ‘माझे लेखी देव मेला। असो त्याला असेल।।’ असा थेट विद्रोही पवित्रा घेत होती.

हे सारे अभंग म्हणजे तुकोबांचे आत्मवृत्तच. त्यातून त्यांच्या स्वभावाचा अंदाज सहजच लावता येतो. आणि सांगता येते, की आयुष्यभर अस्मानी, सुलतानी आणि सनातनी छळवाद सोसूनही तुकोबांमध्ये छानशी विनोदबुद्धी सदा शाबूत होती.

हीनवर बीजवर दोघी त्या गडणी।

अखंड कहाणी संसाराची।।

माझे पति बहु लहान चि आहे।

खेळावया जाय पोरांसवें।।

माझें दु:ख जरी ऐकशील सई।

म्हातारा तो बाई खोकतसे।।

खेळे सांजवरी बाहेरी तो राहे।

वाट मी पाहें सेजेवरी।।

पूर्व पुण्य माझें नाही वा नीट।

बहु होती कष्ट सांगो कांही।।

जवळ मी जातें अगां अंग लावूं।

नेदी जवळ येऊ  कांटाळतो।।

पूर्व सुकृताचा हा चि बाई ठेवा।

तुका म्हणे देवा काय बोलू।।

हा अभंग म्हणजे जणू एखादा विनोदी नाटय़प्रवेशच.

‘तेलणीशीं रूसला वेडा। रागें कोरडें खातो भिडा।।’, ‘शेजारणीच्या गेली रागें। कुतऱ्यांनीं घर भरिलें मागें।’, ‘सुगरणीबाई थिता नास केला। गूळ तो घातला भाजीमध्यें। क्षीरीमध्यें हिंग दुधामध्यें बोळ। थितेंचि वोंगळ नाश केला।।’ अशा अनेक अभंगांतून तुकोबांचा विनोद, उपहास प्रकट होतो.

लोकांना असे चिमटे काढता काढता कधी मात्र ते संतापून अगदी शिव्याच घालतात. सज्जनांचा अपमान करणारे निंदक ते रोजच पाहात होते. त्यांच्याविषयी भावना व्यक्त करण्यास शिवीशिवाय अन्य कोणता पर्याय असणार? तुकोबा म्हणतात-

तुका म्हणे नाहीं संतांची मर्यादा।

निंदे तोचि निंदा मायझवा।।’

त्यांच्या अशा शिव्यांतून त्यांचा देवही सुटलेला नाही.

‘बरें आम्हां कळों आलें देवपण। आतां गुज कोण राखे तुझें।’

तुझे देवपण काय आहे ते आता आम्हांला समजले आहे. तुझे ते गुपित आता आम्ही राखणार नाही.

‘निलाजिरा तुज नाहीं याति कुळ। चोरटा शिंदळ ठावा मज।..

गाढव कुतरा ऐसा मज ठावा।

बईल तूं देवा भारवाही।।..’

देवाला चोरटा, शिंदळ, गाढव ठरवूनच ते थांबत नाहीत. एके ठिकाणी ते म्हणतात –

कान्होबा तू आलगट। नाही लाज बहु धीट।।..

जरी तुझी आई। आम्ही घालूं सर्वा ठायी।

तुका म्हणे तेंही। तुज वाटे भूषण।।

पण या कोणा गुंड दुर्जनाच्या शिव्या नाहीत. भाषेचे हे एक आड-वळणच म्हणावे लागेल, की अनेकदा तेथे शिव्यांमधून प्रेम वाहत असते. शिष्ट अभिरुचीला हे मानवणारे नसले, तरी तुकोबा ज्या जनसामान्यांशी बोलतात त्यांना ही भाषिक कळा चांगलीच अवगत आहे. कीर्तनांतील अभंगांत म्हणा वा तमाशातील गणगौळणीत म्हणा, देवाला शिव्या घातल्या म्हणून कधी या समाजाच्या भावनांचे गळू फुटले नाही.

लोकांसाठी लोकांच्या भाषेत रचलेल्या या लोककविता. उत्कट, उत्स्फूर्त, आत्मनिष्ठ, ओजस्वी. करुणा, जिव्हाळा, तळमळ अशा भावनाशील. अंतरीची ओल असणाऱ्या. आणि म्हणून सुंदर. त्या जनसामान्यांच्या ओठांवर रुळल्या. सुसंस्कृतांच्या काळजाला भिडल्या.

हे अभंग आणि त्यांचा झरा जेथून वाहात होता ते तुकोबांचे जीवन यांमुळे या महाकवीला आता जनमान्यता मिळाली होती.

ते लोकप्रिय झाले होते. त्यामुळे एक झाले. त्यांचा उघडपणे होणारा छळ थांबला होता. पण त्यांचे विरोधक मनातून धुमसत होते. तुकोबाही हे जाणून होते. –

पतिव्रतेची कीर्ति वाखाणितां।

शिंदळीच्या माथां तिडिक उठे।।

आमुचें तों आहे सहज बोलणें।

नाहीं विचारून केले कोणीं।।

अंगे उणें बैसे त्याच्या टाळक्यांत।

तेणें ठिणग्या बहुत गाळीतसे।।

तुका म्हणे आम्हीं काय करणें त्यासी।

धका खवंदासी लागतसे।।

आम्ही जे बोलतो ते सहज बोलतो. आधी कुणाचा विचार करून बोलत नाही. पण पतिव्रतेची स्तुती केलेली ऐकून छिनालीच्या मस्तकाला तिडीक उठते. त्याचप्रमाणे ज्याच्या अंगात दोष आहेत त्याला आमचे बोलणे टाळक्यात हाणल्यासारखे वाटते. त्याच्या डोळ्यांतून ठिणग्या उडतात. साहजिकच आहे ना. अंगाच्या खवंदाला- क्षतांना धक्का लागला की दुखणारच. त्याला आम्ही काय करणार?

तुकोबा आपले काम तर थांबवू शकत नव्हते.

‘लावूनि कोलित। माझा करितील घात।।’ ही भयशंका मनात असूनही तुकोबा समाजोन्नतीचे कार्य करीतच होते..

तुलसी आंबिले

tulsi.ambile@gmail.com