27 February 2021

News Flash

उत्कट भावमय गजल

‘अलूफ’ या संग्रहात गजल, गीतिका, मुक्तके अशा एकूण ८५ रचना आहेत. डबीर ३०-३५ वर्षांपासून लिहिताहेत.

(संग्रहित छायाचित्र)

रमण रणदिवे

मराठी पद्य वाङ्मयात एकाच वेळी गजल, गीत अन् कविता या तिन्ही काव्यविधा समान ताकदीने लिहिणारे मोजकेच कवी, गजलकार आहेत. त्यात सदानंद डबीर यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. नुकताच त्यांचा ‘अलूफ’ हा गजल, गीतांचा संग्रह ग्रंथालीने प्रकाशित केला आहे. ‘अलूफ’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ ‘अलिप्त’ असा आहे. सहा कवितासंग्रह, तीन संपादित आणि एक अनुवादित अशी एकूण दहा पुस्तके डबीरांच्या नावावर आहेत.

‘अलूफ’ या संग्रहात गजल, गीतिका, मुक्तके अशा एकूण ८५ रचना आहेत. डबीर ३०-३५ वर्षांपासून लिहिताहेत. त्यांचा हात सतत लिहिता राहिला आहे. सुरेश भटांनंतरच्या पहिल्या फळीतले ते गजलकार आहेत.

आपल्याकडे सोन्याचा तुकडा असल्यावर त्याचा दागिना कसा घडवावा, हे प्रतिभावंताला माहीत असते. काव्य म्हणजे कवीच्या सर्जनशील आत्मभानाचा आविष्कार असतो. आत्म्याचा उद्गार, हुंकार असतो. किंबहुना मनाचे नितळ पाझरणे असते ते. बव्हंशी गीत, गजलांमधून डबीरांनी वाङ्मयीन गुणवत्ता, तंत्रशुद्धता सांभाळली आहे.

पुढील मुक्तक बघा-

‘अलूफ राहिलो तसा.. फारसा न ज्ञात मी

जगात हिंडलो असा, एकटाच गात मी

कुठे न फार थांबलो.. जायचे इथूनही,

निरोप घ्यायलाच, हे जोडलेत हात मी’

सदानंद डबीरांचा कल छंदोबद्ध रचनेकडे अधिक आहे. त्यामुळे गजल-गीतातील आशयात, शब्दकळेत कर्णमधुर गेयता अंगभूत आहे. गजलेतील शेर एकाच वेळी कविता अन् गीताशी स्वरसंवाद साधतात. त्यातूनच लयात्मक आशयगहनता उमलते. उदा. खालील शेर पाहा-

‘जन्म मरणाचे किनारे अन् मध्ये संसार आहे

ऐलही अंधार होता पलही अंधार आहे’

किंवा

‘मला वाटले स्वप्नामधली परीच ती

हात मिळवला तेव्हा कळले खरीच ती’

अथवा

‘हे असे जळणे मला मंजूर आता

मी मिठीतच घेतला कापूर आता’

कवितेतून जगणे वेगळे काढता येत नाही. लेखनात अनुभवाची सत्यता असावी लागते. अनुभूतीची प्रत वरच्या दर्जाची असावी लागते. जीवनानुभव कधी चिमटीत, कधी मुठीत तर कधी ओंजळीत भरावे लागतात. प्रत्येक अनुभव कलावंताकडे स्वतंत्र चेहरा मागत असतो. तो देणे हे कवीचे कर्तव्य बनते. डबीरांनी छोटय़ामोठय़ा जीवनानुभूतीला कलात्मकरीतीने गजलेत गुंफून आशयाचा परीघ विस्तारत नेला आहे.

संग्रहातील गीते, मुक्तके, गीतिकाही प्रासादिक आहेत. या गीतरचना सहज, सुबोध, आकलनाला कुठेही अडथळा न आणणाऱ्या आहेत. एकही गीत, कविता, मुक्तक संदिग्ध वा धूसर नाही. अनुभवांच्या व्यामिश्रतेमुळे आविष्कारात येणारी दुबरेधता अपरिहार्य असते. अनेक श्रेष्ठ कवींच्या काव्यातही तिचा आढळ दिसतो. दुबरेधता जेव्हा कवितेचा प्राणभूत घटक बनून येते, तिचा चतन्यांश असते, तेव्हा तिच्यावर कुणी आक्षेप घेण्याचे कारण नाही.

डबीरांची एकूणच कविता चित्रविचित्र प्रतिमांच्या जटिल अरण्यात आशय गुदमरवून टाकणारी नाही. वाचकाला चकवे घालणारीही नाही. त्यांच्या कवितांचे अंगभूत साधेपण फार विलोभनीय वाटते. त्यांच्या गीत-गजलांमधून सौंदर्यलक्ष्यी धारेतील अनेक अनुरतिभाव ते व्यंजकतेने मांडतात. शब्दांच्या पाठीवर जीवन-जाणिवांचे ओझे टाकताना अर्थघनता तथा शब्दांचे चारित्र्यही जपतात. रचनेची सफाई आणि भावनेची तरलता त्यांच्या बहुतेक रचनांमधून जाणवते.

उत्कट भावमयता काव्याची गुणवत्ता शतपटींनी वाढवते. कविता लिहिण्याआधी किंवा या घटिताच्या मागे कवीच्या अंतर्मनात बरेच काही साचलेले आहे हे कळते. इतर अनावश्यक आणि अप्रयोजक शब्दांच्या गर्दीतून नेमक्या चपखल शब्दांत अभिव्यक्त झालेले हे काव्यलेखन आहे, हेही जाणवते. एक चांगला संग्रह वाचल्याचे समाधान हा संग्रह वाचकाला देतो.

‘अलूफ’- सदानंद डबीर,

ग्रंथाली प्रकाशन,

पृष्ठे – ११९, मूल्य -१२५ रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2018 1:18 am

Web Title: article about aloof gazal songs collection by sadanand dabir
Next Stories
1 असभ्यांना आडवा जाणारा लेखक
2 ‘राग’बहादूर नौशाद
3 तुषार जोगची ‘रिकामी भिंत’
Just Now!
X