आसाराम लोमटे

कवितेला कोणत्यातरी वर्गीकरणात कोंबून तिच्यावर शिक्का मारण्याची समीक्षकांची रूढ पद्धत जुनीच आहे. काही कवींची कविता अशा कोणत्याही वर्गीकरणात बसवता येत नाही. जागतिकीकरणानंतरच्या पेचांची, दुर्बलांच्या कोंडीची, मूल्यभ्रष्ट बाजारपेठी अवकळेची सशक्त अशी कविता मराठीत अरुण काळे यांनी लिहिली. शोषण व्यवस्थांची परखड चिकित्सा करताना जनसामान्यांच्या बोलीला एक परिमाण मिळवून दिले. ‘नंतर आलेले लोक’ या कवितासंग्रहात समकालालाच त्यांनी शब्दबद्ध केले. अवघ्या समष्टीबद्दल बोलणाऱ्या त्यांच्या कवितेला ‘दलित कविता’ या वर्गीकरणात कोंबण्याचा प्रयत्न काही वेळा केला जातो, तेव्हा असे वर्गीकरण हे किती तोकडे आणि तकलादू आहे हे ध्यानात येतेच; शिवाय आपल्या वाङ्मयीन पर्यावरणातले न्यूनत्वही अधोरेखित होते.

drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या जन्मगावातील लोक म्हणतायत…
veer savarkar poem memory
वीर सावरकरांची ‘सागरा प्राण तळमळला’ कविता, लता मंगेशकरांनी सांगितलेली आठवण आणि शंकर वैद्यांनी उलगडलेला अर्थ

अरुण काळे यांच्याच कवितेशी नाते सांगणारी कविता अविनाश गायकवाड यांच्या ‘खिंडीत गोठलेलं सुख’ या संग्रहातून शब्दबद्ध झालेली आहे. गायकवाड यांचा हा तिसरा कवितासंग्रह आहे. यापूर्वी ‘जंजाळ’ (१९९९), ‘अजूनही अस्वस्थ रोहिणी’ (२००८) हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. आजच्या आत्यंतिक व्यक्तिवादाला असाधारण महत्त्व आल्याच्या काळात ‘समष्टी’बद्दल बोलणारी गायकवाड यांची कविता आजच्या काळाचेही अंगावर येणारे चित्र शब्दांत मांडते. ज्याची ताकद आडदांड त्याच्याच हाती सगळी सूत्रे, नसर्गिक साधनांसह गरिबांच्या ताटातलाही घास हिरावण्याची हाव बाळगणारी मनगटशाही, सत्तेच्या कैफात दुबळ्यांना टाचेखाली रगडणाऱ्यांची अदृश्य यंत्रणा, साऱ्या जगरहाटीलाच आलेले बाजाराचे स्वरूप, या बाजारीकरणाच्या गोंगाटात संवेदनेलाच गोठवून टाकणारे बधिरीकरण, शस्त्राच्या टोकावर भेदरलेलं वर्तमान.. असा आजचा काळ अविनाश गायकवाड यांच्या कवितेत सामावला आहे. हे जागतिकीकरणानंतरचे समाजचित्र ‘खिंडीत गोठलेलं सुख’ या संग्रहात अनेक ठिकाणी दिसते. ‘निभ्रेळ आनंद’, ‘इथपासून क्षितिजापर्यंत’, ‘खुद खाव, जान जाव’, ‘निम्ता निम्ताने’, ‘धुंद इंद्रियाच्या टोकावर’ या कवितांमधील आशय त्यादृष्टीने महत्त्वाचा आहे.

महासत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या भारतात वंचितांसमोरील वर्तमान दु:सह असताना नखरेल जाहिरातींचा बाजारही बहरास आला आहे. समाजातल्या सर्व पातळ्यांवरील विषमतेकडे पाठ फिरवणाऱ्या आणि ‘निभ्रेळ आनंद घेता आला पायजी यार’ अशी अभिलाषा बाळगणाऱ्या नवमध्यमवर्गाची जाणीव ‘निभ्रेळ आनंद’ या कवितेतून व्यक्त होते. ‘प्रभुची लेकरं भांडवलाचा भरीव बांबू/ घेऊन सडकत सुटलीत सगळ्यांना गावगन्ना’ या शब्दांत भांडवली वर्चस्ववादी मानसिकतेला कवी उजागर करतो. ‘खुद खाव, जान जाव’ या कवितेतूनही जागतिकीकरणाचा आलेख कवी मांडतो. दैनंदिन जगण्यातल्या उत्पादनामागे असलेली बाजाराची यंत्रणा, माणसातल्या संवेदनशीलतेला मारून त्याला निव्वळ एक ग्राहक ठरवू पाहणारी स्पर्धा यांचा इथे कवी निर्देश करतो.

इतका ओसंडून वाहणारा आनंद सगळीकडे असताना चेहऱ्यावर बारा वाजल्याचा काटा असणारे लोक या व्यवस्थेत जणू निरुपयोगीच आहेत. त्यामुळे चिंता करायची नाही, ताण घ्यायचा नाही हाच या जगाचा शिरस्ता ठरतो. ‘टेन्शन कायकू लेनेका, मेलडी खाव खुद जान जाव’ असे कवी म्हणतो. ‘मल्टी लुटालुटाची’ झिंग सर्वत्र स्वार असल्याचे भान गायकवाड यांची कविताही देते.

‘निम्ता निम्ताने’ या कवितेत हाच आशय आणखी परिणामकारक होतो. नसर्गिक साधनांवरील सर्वाची मालकी ही जेव्हा मूठभरांच्या हातातील गोष्ट होते तेव्हा ओरबडणारी हाव ही बहुसंख्याकांचा गळा घोटणारी असते. गायकवाड या कवितेत ‘गरज शोधाची जननी म्हणतात, तर हाव काय भोगाचा बाप?’ असा प्रश्न उपस्थित करतात. आणखी एका कवितेत ‘सारा बाजारच पसरलाय इथून तिथून/ विकणारे आणि विकत घेणाऱ्यांची उडालीय झुंबड गर्दी मिथून’ असे निरीक्षण ते नोंदवतात, तेव्हा ती एका कोलाहलाचीच नोंद असते. बाजाराची अशी अनेक रूपे काही कवितातून सामर्थ्यांने व्यक्त होतात. या व्यवस्थेचे अन्वर्थक लक्षण असलेले ‘शहराच्या माथ्यावरले होर्डिग्ज’सुद्धा कवीच्या नजरेतून सुटत नाहीत-

‘शहराच्या माथ्यावरले होर्डिग्ज

जसे नितनवऱ्याने बांधावे बाशिंग’

अशी या ‘फलक’बाजीची दुनिया कवीने उलगडली आहे. या होर्डिग्जवर झळकलेले कार्यकत्रे, सम्राट आणि त्यांच्या छायाचित्रांतूनही जाणवणारे आणि ओसंडून वाहणारे लाघवी विकार कवी या कवितेतून नोंदवतो.

गायकवाड यांच्या कवितेत सत्तेचाही चेहरा दिसतो. ही सत्ता जशी स्वयंभू कैफाची आहे, तशीच ती उन्मादीही आहे. अशा प्रकारची सत्ता बाळगून असणाऱ्यांचे वर्तन-व्यवहार, सत्तेची भयकारी रूपे काही कवितांमधून दिसतात. ‘शिफारशींचे प्रच्छन्न तारांगण’ या कवितेतून अशाच अनियंत्रित सत्तेला कवी शब्दांत पकडतो. ‘शिफारशींचे प्रच्छन्न तारांगण, सत्तेचे शहाणपण उन्मत्त हत्तीची पाऊले’ या ओळी आणि बाहुबळ सळाळण्याचा आलेला संदर्भ सत्तेचा आडदांड विशेष सांगणारा आहे. ‘निम्ता निम्ताने’ या कवितेतही सत्तेचा संदर्भ येतो. ‘दाटून येऊ द्या उन्मत्त गर्व/ क्षणात कुणालाही देशद्रोही ठरवण्याचा/ आपसूकच मिळेल परवाना/ मग तुम्ही म्हणाल तोच छापा/ तुम्ही म्हणाल तोच काटा’ अशी सत्तेची ओळख कवी सांगतो.

वर्तमानातली भयग्रस्तता आणि तिला जन्माला घालणारी हिंसाही काही कवितांमधून येते. ‘बेरहम सत्तेच्या नाकावर टिच्चून’ या कवितेत निर्दयी आणि हिंस्र मानसिकतेचा वेध कवीने घेतला आहे –

‘बॉम्बस्फोटातला भीषण खूनखराबा

ढळढळीत समोर आल्यावर

भीतीने थरकापत असेल त्याही

आयांचा नसर्गिक पान्हा

माणसाची काय नि सतानाची काय

आई तर शेवटी आईच असते ना.’

या ओळी वाचल्यानंतर केवळ निर्दयी अशा नरभक्षकांचा हिंसाचार आपल्याला अस्वस्थ करतो असे नाही, तर त्या पलीकडे असलेल्या कारुण्याला कवी आवाहन करतो. ‘भीती’ या कवितेतही भयाण अशा अरिष्टाचा उल्लेख होतो. वर्तमान-भविष्याचा काळ अंधारताना दिसतो आहे, सर्वागाला थरथर सुटली आहे, चहूबाजूंनी भयानक भीती दाटून आलेली आहे, एक तर भाजी आणताना बाजारात स्फोटाने मारले जाऊ वा घरी भाजी पोहोचवता पोहोचवता देशद्रोही म्हणून मारले जाऊ अशी भीती या कवितेत व्यक्त होते. सर्व पातळ्यांवरची ही भीती सांगितल्यानंतर ‘मित्रांनो, ऐकताय ना तुम्ही?’ असा प्रश्न जेव्हा या कवितेत शेवटी येतो तेव्हा ती कविता या एका ओळीनेच संवादाच्या पातळीवर येते. सजग करण्याचे आणि सावधगिरीचे भान यातून सूचित होते. संवादाच्या अशा अनेक जागा या संग्रहात आहेत. ‘काळोखाचा दिवस’ या कवितेत सूर्याला साक्षी ठेवूनच काळाखोचा दिवस उजडतो. अट्टहासाने इतिहास टिच्चून जिवंत केला जाईल, निष्पापांच्या माथ्यावर बेदिक्कत पाप थोपवलं जाईल, चारित्र्यवानाला भरदिवसा चारित्र्यहीन केलं जाईल, खोटंच खऱ्याचा नकाब बेमालूमपणे घेऊन येईल.. असे सगळे वर्तमानातले संदर्भ कवी देतो. अशा वेळी सामान्यांचा निभाव कसा लागणार, हे सांगताना कवी म्हणतो- ‘किती दिवस तग धरतील गांजलेले हे मुकाट जीव, सशाहरणांची काळजं कधीही होतील बेमौत नेस्तनाबुत.’ भयग्रस्त वर्तमानात नि:शस्त्र व निरपराध माणसांची अवस्था काय आहे, हे यातून स्पष्ट होते.

‘कवी’ ही गायकवाड यांची कविता अत्यंत महत्त्वाची आहे. चांगल्या जगाची आस या कवितेत कवी बाळगतो. ‘वातीला मिळावं तेल, हाताला काम/ कष्टाला मिळावी भाजीभाकरी/ साऱ्यांच्या पदरी शिदोरी असावी मायेची’ हे सारे असावे असे कवीला वाटते. पण असे घडत नाही तेव्हा त्याचे स्वास्थ्य हरवते, अस्वस्थता खदखदते. स्वत:ला सृष्टीसमष्टीचे देणे मानणारा कवी दु:खी होतो.

‘कवी देऊही शकतो उत्तरं

एका वाक्यात, एका शब्दात, मौनातदेखील

शोधू लागतो माणसांच्या हृदयात जागा उजेडलक्षी’

या ओळींद्वारे कवीची बांधिलकी प्रतीत होते. कारण ‘दु:खानं भारलंय जग, त्याचा करावा निरोध’ या भावनेतून ही कविता दु:खाचे निराकरण करायला निघाली आहे –

‘माणसाने जपून ठेवाव्यात

छातीच्या तिजोरीत

काही सुंदर गोष्टी

पाहिजे तेव्हा देण्यासाठी’

असे मानवी जगण्याचे प्राणतत्त्व या कवितेत आढळते. शोषणमुक्त जगाची आस आणखीही काही कवितांमधून व्यक्त होते. कविता ही दुकानाच्या पाटय़ा वाचल्या जाव्यात तसे वाचण्याची गोष्ट नाही, याचे कवीचे भान लख्ख आहे. म्हणूनच ‘अशी कविता वाचू नकोस/ ज्यामुळे केवळ कवितेचाच नव्हे / तर माणूस असण्याचा अपमान होईल’ असे कवी बजावतो. ‘खिंडीत गोठलेलं सुख’ या संग्रहातील कविता माणसाच्या बाजूने सतत उभी राहते. त्याचे माणूसपण टिकण्या-टिकविण्याची भाषा करते.

गायकवाड यांच्या कवितेला जनसामान्यांच्या बोलीचा स्पर्श झाला आहे. प्रमाण भाषेतून व्यक्त होणारी ही कविता अनेकदा बोलीचा समर्पक वापर करताना दिसते. अनुभवांतून आणि जनरीतीतून समृद्ध झालेली ही बोली आहे. असंख्य म्हणी आणि वाक्प्रचार या कवितेतून बोलीच्या रस-गंधासह येतात. ही रोकडी लोकभाषा जीवनाचे तत्त्वज्ञान कवितेच्या अंगाने मांडताना आणखीच रोखठोक होते. बोली भाषेतील अनेक शब्द या कवितेत बेमालूमपणे मिसळून जातात. ‘बाप नाय नीट घरात नि आई नाय पोरात’, ‘घास घासून चव पळाली, तास तासून रेती गळाली’ अशी बोलीची असंख्य रूपे या कवितेत पाहायला मिळतात.

लोकभावना अभिव्यक्त करणारी बोली ते प्रमाणभाषा किंवा प्रमाणभाषा ते थेट ओबडधोबड अशी बोली असे भाषेचे अवस्थांतर गायकवाड यांच्या कवितेत सहजपणे दिसते. ‘आवाज’, ‘गोष्टी’ या दोन कविता तर मौखिक कथन परंपरेशी नाते सांगणाऱ्या आहेत. गायकवाड यांच्या कवितेत आढळणारे कथ्यवैविध्य ही खास त्यांच्या कवितेची ओळख सांगता येईल. जगण्याचे सार सांगताना ते जेव्हा बोलीतून येते तेव्हा त्यातला रसरशीत जिवंतपणा वाचकालाही प्रभावित करतो-

‘कित्ती कित्ती सोपं

श्वास हाय म्हून कुडीला अर्थ

मी हाय म्हून तुला

तू हाय म्हून मला

आम्ही हाय म्हून आपल्याला

आपुन हाय म्हून समष्टीला

प्रिथवी हाय म्हून अर्थ सव्र्याला’

या कवितेत बोलीद्वारे व्यक्त झालेली प्रगल्भ जाणिवेची समूहभावना ही खरे तर या संग्रहातल्या कवितांचेच सार आहे. कोणताही अभिनिवेश धारण न करताही ‘समष्टी’विषयीचा या कवितेचा सूर अतिशय सच्चा आहे. म्हणूनच तिचे कवितापणही अबाधित राहते आणि कवितेतला आशयही रोकडय़ा शब्दांमधून व्यक्त होतो.

‘खिंडीत गोठलेलं सुख’- अविनाश गायकवाड,

पोएट्रीवाला, पृष्ठे – ११२, मूल्य – २५० रुपये.

asaramlomte@gmail.com