डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी

मोजकं, पण दर्जेदार कथालेखन करणाऱ्या सुबोध जावडेकरांचा ‘चाहूल उद्याची’ हा नवा कथासंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे. प्रस्थापित कथाकार असूनही त्यांच्या कथेविषयी वाचकाला अजून उत्सुकता आहे. कोणते नवे विषय, कोणत्या नव्या दृष्टीने वाचायला मिळणार, याचे ते कुतूहल असते. नव्या संशोधनामुळे ‘मानवी’ जगण्याची रीत कशा प्रकारे बदलण्याची शक्यता आहे, याची अभ्यासपूर्ण असूनही तशी मुळीच न भासणारी वैशिष्टय़पूर्ण कथा जावडेकर सातत्याने लिहीत आहेत. विज्ञान-तंत्रज्ञानातील माहितीच्या विराट अवकाशातून नेमके कथाबीज हेरण्याची लेखकीय नजर त्यांच्याकडे आहे. त्यामुळे एरवी जड, क्लिष्ट आणि विशिष्ट ज्ञानशाखेशीच संबंधित असे विषय ललित नेटकेपणाने कथारूप घेऊन दाखल होतात. एक प्रकारे माणसातला ‘विवेक’ जागा ठेवण्याचे कामही त्यामुळे होत असते. (हा संग्रह नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतीला अर्पण केलाय!) ‘चाहूल उद्याची’ या संग्रहातील बहुतेक कथा त्यांच्या कथेविषयीची वाचकाची अपेक्षा पूर्ण करतात. २००७ ते २०१६ या दहा वर्षांत वेगवेगळ्या दिवाळी अंकांतून प्रकाशित झालेल्या ११ कथांचा समावेश त्यात आहे. म्हणजे वर्षांकाठी एक वा दोन कथांचे लेखन झालेले दिसते.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Controversy on Ramayana
सीतेच्या हातून रावणाला गोमांस, हनुमानाचं विकृत चित्रण, विद्यापीठातील नाटकाचा वाद आहे काय?

न्यायालयात उभा राहिलेला प्रसिद्ध सिनेनटावरचा खटला (आणि त्याचा अपेक्षित निकाल), उत्तर काशी भागात पुरात अडकलेल्या यात्रेकरूंच्या सुटकेची मोहीम, प्रयोगशाळेत कृत्रिम मेंदू तयार करण्याचा प्रकल्प, कंत्राट मिळण्यासाठी काढल्या जाणाऱ्या निविदा, अल्झायमर झालेल्या रुग्णाची दैनंदिनी, जनुकीय बदलांमुळे बाळावर झालेले परिणाम, कारखान्याची रचना आणि वास्तुशात्र यांचा तिढा, काम (जॉब) मिळवण्यासाठी चालणाऱ्या उच्चपदस्थांच्या खेळी, हवी तशी स्वप्नं पडायला मदत करणारी संगणक प्रणाली, संभाव्य संगणक-युद्ध.. असे आशयसूत्रांचे कमालीचे वैविध्य या कथांत आहे.

तपशिलांचे बारकावे व अस्सलपणा आणि वातावरणनिर्मिती हे जावडेकरांच्या कथांचे लक्षणीय घटक आहेत. संबंधित अभ्यासशाखांची परिभाषा ते अशा तऱ्हेने वापरतात, की निवेदन वा संवाद क्लिष्टही होत नाहीत किंवा अगदीच ‘कॅज्युअल’ही होत नाहीत. उदा. ‘मेंदूची बाळं’ या कथेतला हा संवाद पाहा : ‘आपण डिजिटल कॅमेरा वापरू शकतो. त्यात व्हिज्युअल इनपुटस् इलेक्ट्रिकल आऊटपूटमध्ये कन्व्हर्ट होतात. तो आऊटपूट तू आपल्या ऑक्सिपेटल लोबच्या ऑर्गनॉईडला फीड करू शकशील.’ किंवा ‘वास्तुनिष्ठ विवेचन’ या कथेतील हा संवाद पाहा : ‘चांगल्या कंपनीकडून सॉईल रेस्टिंग करून घेतलंय. एकशे चाळीस बोअर मारलेत. लोड बेअिरग कपॅसिटी, कंटूर मॅप, सॉईल टेस्ट रिपोर्ट.. सारं व्यवस्थित तयार आहे.’ न बिचकता ते पारिभाषिक इंग्रजी शब्द वापरतात. आणि तरी वाचनाच्या ओघात कुठे अडथळा निर्माण होत नाही, हे त्यांच्या कथनशैलीचे वैशिष्टय़!

बायोलॅब असो की हेलिकॉप्टर उडवणं असो, बोर्डरूममध्ये चालणाऱ्या मिटिंग्ज असोत की तरुण मुलांचं कॉम्प्युटर सर्फिग असो, अल्झायमरसारखा आजार असो की कोर्टात चाललेली केस असो, अत्यावश्यक, अस्सल तपशील भरत त्यांची कथारचना आकारते. खरे म्हणजे कथाबीजाचे स्फुरणे हातात नसले तरी सुचलेल्या कथाबीजातून कथेची उभारणी करणे बरेचसे ‘हातात’ असते. ही रचना करताना लेखकाची दृष्टी म्हणा वा भूमिका म्हणा, मोलाची ठरत असते. गर्भित लेखकाला काय सांगायचेय, काय सुचवायचेय मानवी नात्यांबद्दल, कोणते नवे जीवनदर्शन घडवायचेय, लेखकाला नवे काय उमगलेय- हे जाणून घेण्यासाठी तर वाचक वाचत असतो. जावडेकरांच्या कथांमधली गर्भित लेखकाची दृष्टी मानवतावादी आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सातत्याने नवनवी संशोधने होतायत. त्यांचे निष्कर्ष मानवी समाजाला उपकारक ठरणार की अपकारक, त्यांनी मानवसमूहाचे कल्याण होणार की अकल्याण, याची चाहूल त्यांच्या या कथा देतात. कुतूहलपूर्ती करत असतानाच माणसाचा सारासारविचार सतत जागा राहायला हवा याची जाणीव त्या देतात. कारण विज्ञान-तंत्रज्ञान वस्तुनिष्ठ असले तरी ते वापरणाऱ्या माणसाची दृष्टी कशी असायला हवी, याचे मार्गदर्शन या कथा करतात.

या संग्रहातल्या ‘ऑपरेशन राहत’, ‘धरलं तर चावतं’, ‘नको विसरू..’, ‘वास्तुनिष्ठ विवेचन’ या कथा ‘आजच्या कथा आहेत. त्या वर्तमान वास्तवावर आधारित आहेत. ‘ऑपरेशन राहत’ सन्यातील पायलटच्या आतल्या माणसाचं दर्शन घडवते. स्टिवन डिसूझा पुरात अडकलेल्या यात्रिकांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालून धडपडतो. सुरक्षित स्थळी पोचताच यात्रेकरू निवाऱ्याकडे धाव घेतात. ज्याने स्वतचा जीव धोक्यात घालून आपल्याला मृत्यूच्या दाढेतून वाचवले त्याच्याविषयी साधी शाब्दिक कृतज्ञताही कुणी व्यक्त करत नाही. एका बाईच्या कडेवरचे छोटे मूल मात्र डिसूझाला ‘टाटा’ करते! आशेचा तो चिमुकला हात त्याला मोठा दिलासा देऊन जातो. इतरांना ‘राहत’ देताना त्याला स्वतलाही अशी ‘राहत’ मिळते! सन्यातली कार्यपद्धती, कामावरची निष्ठा, सन्याधिकाऱ्यांची ‘रफटफ’ भाषा याचबरोबर त्यातला हा मानवी ‘स्पर्श’ आद्र्रता कायम ठेवतो. आणि तीच मोलाची आहे याची जाणीव देणारी ही सुंदर कथा देते.

‘मेंदूची बाळं’ ही कथा स्त्री आणि पुरुष यांच्यातील मूलभूत फरक फार सूक्ष्मपणे आणि सूचकपणे दाखवते. कृत्रिम मेंदू तयार करण्याच्या प्रकल्पातले पुरुष शास्त्रज्ञ, त्यांच्या महत्त्वाकांक्षा, त्यांच्यातील सुप्त स्पर्धा एकीकडे आणि दुसरीकडे त्या प्रकल्पात एका स्त्रीचा समावेश झाल्यावर तिच्या असामान्य बुद्धिमत्तेबरोबरच तिच्या इनक्युबेटरमध्ये द्रावणात तरंगणाऱ्या मेंदूच्या विविध भागांना त्यांच्या कार्यानुसार ती नयन, विवेक, कानसेन अशी नावे देऊन त्यांना ‘अस्तित्व’ बहाल करते. कथेचा शेवट काहीसा ‘घडीव’ असला तरी ही कथा माणसाच्या बौद्धिक क्षमतेविषयी कौतुक व अभिमान वाटायला लावणारी आणि म्हणून वेगळाच आनंद देणारी आहे.

‘अखेरची साक्ष’, ‘मन में है विश्वास’, ‘नियतीशी करार’, ‘पडघम’ या कथा ‘उद्याची चाहूल’ देणाऱ्या आहेत. मेंदूतील विशिष्ट आठवण नष्ट करता आली तर.., एखाद्याच्या मनात विश्वास निर्माण करणारे रसायन उत्पन्न झाले तर.., जनुकीय आराखडय़ात बदल करून इच्छित गुणांनी युक्त बाळ जन्माला घालता आले तर.., शत्रुराष्ट्राचे सर्व संगणक हॅक करता आले तर.. अशा कुतूहलातून निर्माण झालेल्या या कथा. ‘धरलं तर चावतं’, ‘वास्तुनिष्ठ विवेचन’ या कथा उद्योगविश्वाशी संबंधित घडामोडी, कुरघोडी, डाव-प्रतिडाव रंगवणाऱ्या. ‘पडघम’ ही संभाव्य संगणक युद्धाचे भयावह सूचन करणारी आहे. ‘रिसेट बटन’ ही कॉम्प्युटर गेमचे व्यसन माणसाला कोणत्या थराला नेऊ शकते, ते दाखवणारी. तर ‘नको विसरू..’ ही अल्झायमरच्या रुग्णाची दैनंदिनी आहे. क्रमाक्रमाने वाढणाऱ्या विस्मरणाच्या आलेखाबरोबर त्याची हतबलता, भीती, चिडचिड, चिंता, अगतिकता या सर्व करडय़ा छटांचा कॅनव्हास ही प्रयोगशील कथा उभा करते. त्याच्या दैनंदिनीची अखेरची पाने सुन्न करून सोडतात. या सर्व कथांतून नाना स्वभावांची, वृत्तींची माणसे आणि त्यांच्यातील नाती यांवर लेखकाची नजर आहे. तो वेध घेतो तो या नात्यांच्या गुंतागुंतीचा!

या संग्रहाचे मुखपृष्ठ रविमुकुल यांचे आहे. वेगवेगळ्या प्रतलांची सरमिसळ, रंगांची मिसळण आणि अक्षरांची प्रतिबिंबे यांमधून काहीसा अनिच्छित भाव प्रकटला आहे. संग्रहाचे आणि कथांचीही शीर्षके दाद द्यावी अशी आहेत. सहसा कथासंग्रहाला एखाद्या कथेचेच शीर्षक योजून लेखक-प्रकाशक ‘शीर्षक देण्याच्या कर्मकटकटी’तून सोडवणूक करून घेतात! ‘चाहूल उद्याची’ हे शीर्षक या संग्रहातील कोणत्याही कथेचे नाही; परंतु सूचकपणे ते सर्व कथांच्या गाभ्याशी नाते सांगते. ‘नियतीशी करार’, ‘मन में है विश्वास’, ‘पडघम’, ‘नको विसरू..’ ही कथांची शीर्षके वाचकाच्या मनात काही जुनी ‘असोसिएशन्स’ जागी करतात. कथा वाचताच शीर्षकाचे आणि आशयाचे बहुविध नाते तात्काळ जाणवते.

जावडेकरांची भाषा साधी, पारदर्शक आणि प्रवाही आहे. गरजेनुसार ती खटय़ाळ, मिस्किल रूप घेते. क्वचित कधी काव्यात्मही होते. परंतु ते आवश्यक तेवढेच. त्यामुळे ती आशयाची विनाव्यत्यय वाहक होते. एकूणच वाचकांना निसंशय वैशिष्टय़पूर्ण कथांची भेट देणारा हा संग्रह आहे.

‘चाहूल उद्याची’ – सुबोध जावडेकर,

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई,

पृष्ठे – २३८, मूल्य – २५० रुपये.