प्रकाश मगदूम

वैयक्तिक वा कौटुंबिक घडामोडींचे फिल्म रिळांवर केलेले चित्रीकरण म्हणजे ‘घरगुती चित्रपट’! हे चित्रण खरेखुरे, प्रत्यक्षात घडलेले असते. ती वास्तव घटना असते. त्या काळाचे निदर्शक असते. जरी यातल्या गोष्टी या खासगी स्वरूपाच्या असल्या तरी काही काळाने त्या सामाजिक जाणिवांचा भाग बनतात. त्यामुळे त्यांच्या जतनाकडे लक्ष द्यायला हवे..

एप्रिल २०१५ मधील ही गोष्ट आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचा संचालक म्हणून मी कार्यभार स्वीकारून दोन महिने झाले होते. एक दिवस चित्रपट अभ्यासक सुरेश चांदवणकर मला भेटायला आले. १६ मि.मी.चे एक फिल्म रीळ त्यांनी सोबत आणले होते. ते रीळ प्रख्यात वैज्ञानिक डॉ. होमी भाभा यांच्या बंगल्यात मिळाले होते. चांदवणकरांनी सांगितले की, डॉ. होमी भाभा हे शास्त्रज्ञ तर होतेच, पण त्याचबरोबर त्यांना फिल्म चित्रित करण्याचीही आवड होती. डॉ. भाभांचा हा एक वेगळा, नवा पलू यानिमित्ताने समोर आला होता.

२०१४ मध्ये डॉ. भाभा यांच्या मुंबईतील मलबार हिलवरील बंगल्याचा लिलाव केला गेला. त्यावेळी एका खोलीत मोठय़ा संख्येने १६ मि.मी. फिल्म्सची रीळे सापडली. अर्थात ती खूप खराब अवस्थेत होती. मुंबईचे दमट हवामान आणि कित्येक वर्षेदुर्लक्षित अवस्थेत असल्याने त्यांची दुर्दशा झाली होती. चांदवणकर यांनी त्यातले एक रीळ मिळवले आणि माझ्याकडे आणून दिले. अतिशय खराब अवस्थेत असल्यामुळे ते पडद्यावर प्रोजेक्टरद्वारे पाहणे अशक्य होते. त्या रीळामध्ये नक्की काय होते, हेही कळावयास काही मार्ग नव्हता. एक गोष्ट मात्र नक्की होती, की ज्या अर्थी एवढय़ा मोठय़ा संख्यने रीळे सापडली होती, म्हणजे डॉ. भाभा यांनी ती स्वत: चित्रित केलेली असावीत. त्यानंतर मी बाकीची रीळे मिळवण्यासाठी खूप शोधाशोध केली. डॉ. भाभांशी संबंधित टीआयएफआर, एनसीपीए  या संस्थांशी संपर्क साधला. परंतु बाकीची रीळे काही सापडली नाहीत.

मग आम्ही ते एकमेव रीळ इटलीतील ‘ला इमॅजिन र्रिटोव्हाटा’ या बलोना शहरातील लॅबोरेटरीकडे पाठवले. फिल्म रिळांवर प्रक्रिया करणारी ही जगातील एक अग्रगण्य प्रयोगशाळा आहे. अजूनही त्या रिळावर काम सुरू आहे. त्याची डागडुजी होऊन त्यात नक्की काय चित्रित केले आहे, याविषयी खूप उत्सुकता आहे.

वैयक्तिक वा कौटुंबिक घडामोडींचे फिल्म रीळांवर केलेले चित्रीकरण म्हणजे ‘घरगुती चित्रपट’ (Home Movies)! कौटुंबिक समारंभ, सहली, भेटीगाठी, सण-समारंभ इ. प्रसंगी जसे आपण कॅमेरा घेऊन फोटो काढतो त्याप्रमाणे अशा गोष्टी फिल्मवर चित्रित केल्या तर आपल्याला त्याची चलत्चित्र फिल्म पाहायला मिळते. १९३० च्या दशकात कोडॅक कंपनीने आठ मि.मी. फिल्म शूट करणारा कॅमेरा बाजारात आणला आणि अशा प्रकारचे चित्रण करण्यास मोठी चालना मिळाली. अनेक धनिक व्यक्ती तसेच संस्थांनी अशा प्रकारचे कॅमेरे खरेदी केले. अशा पद्धतीचे चित्रीकरण घरात सर्वासोबत पाहता येत असे. परंतु त्यात आवाज नव्हता. काही वर्षांनी कोडॅकने ‘कोडॅक्रोम’ ही रंगीत फिल्म आणली. त्यामुळे चित्रीकरण रंगीत झाले. १९६५ मध्ये सुपर आठ मि.मी. रीळे आली आणि त्यासाठी सुपर आठ प्रोजेक्टरही बाजारात आला. यात आवाजाची सोय होती. म्हणजे एखादा लहान चित्रपटही बनवणे आता शक्य झाले.

चित्रपटांच्या जतनाचा विचार करताना अशा घरगुती चित्रीकरणांच्या जतनाकडेही लक्ष दिले पाहिजे. घरगुती चित्रपटामध्ये झालेले चित्रीकरण हे खरेखुरे, प्रत्यक्षात घडलेले असते. ती वास्तव घटना असते. त्या काळाचे निदर्शक असते. जरी त्यातील बऱ्याच गोष्टी या खासगी स्वरूपाच्या असल्या तरी काही काळानंतर त्या सामाजिक जाणिवांचा भाग बनतात. उदा. एखाद्या नामवंत व्यक्तीचा वाढदिवस समारंभ! जरी तो वैयक्तिक व खासगी असला तरी पन्नासेक वर्षांनंतर त्याचे महत्त्व जतनीकरणाच्या दृष्टीने खूप वाढते.

जगात सिनेमाची सुरुवात झाली त्यावेळी लुमिए बंधूंनी केलेले चित्रीकरण हे एक प्रकारे घरगुती चित्रीकरणच होते. समुद्रकिनारी मुले उडय़ा मारत आहेत, घरासमोरच्या बागेतील कारंजे, लहान मुलाला त्याची आई घास भरवते आहे, आदी चित्रीकरणे ही जागतिक सिनेमातील सुरुवातीची दृश्ये होत.

चित्रपटांचे जतन हे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे प्रमुख काम आहे. शिवाय जतनीकरणाच्या माध्यमातून संग्रहित झालेल्या चित्रपटांचा आणि चित्रपटविषयक पोस्टर्स, फोटोग्राफ इत्यादींचा उपयोग चित्रपट रसिकांना व्हायला पाहिजे, हेही त्याचे एक उद्दिष्ट आहे. वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट महोत्सव तसेच पोस्टर्स आणि छायाचित्रांचे प्रदर्शन यांद्वारे हा खजिना आम्ही लोकांसमोर वेळोवेळी आणत असतो. आता आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग बनलेल्या समाज माध्यमांचा वापर या कामासाठी आम्ही करत आहोत. जगभरातील चित्रपट रसिकांपर्यंत या माध्यमाद्वारे अतिशय कमी वेळात पोहोचता येते. फेसबुकवरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे अधिकृत पेज पाहून लंडनमधील एका महिलेने आम्हाला ई-मेल केला. त्यांच्या राहत्या घरी त्यांना काही फिल्मची रीळे सापडली होती. त्या महिलेचे आजोबा १९३० च्या काळात मुंबईत सॉलिसिटर म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्या बंगल्याच्या आजूबाजूचे तसेच मुंबईच्या रस्त्यावरील रहदारीचे चित्रीकरण केले होते. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला ही रीळे हवी आहेत का, याविषयी त्या बाईंनी आम्हाला ई-मेलद्वारे विचारले. अर्थातच मी त्यांना होकारार्थी उत्तर पाठवले. काही दिवसांनी ती रीळे आम्हाला मिळाली आणि मोठय़ा उत्सुकतेने आम्ही ती पडद्यावर पाहिली. अगदी काही मिनिटांचे जरी हे चित्रीकरण असले तरी १९३० ची मुंबई पडद्यावर जिवंत झाली होती. त्या सद्गृहस्थाने आपल्या छंदाचा भाग म्हणून काही दृश्ये चित्रित केलेली असणार. परंतु आता जवळपास ८०-८५ वर्षांनंतर ते एक अमूल्य चित्रीकरण ठरले होते!

लेखाच्या सुरुवातीस उल्लेखलेली डॉ. भाभा यांच्या रीळांची कथा मी बऱ्याचदा कित्येक लोकांना ऐकवली आहे. दोनेक महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. जयंत नारळीकर संग्रहालयात आले असताना मी त्यांनाही ही कथा ऐकवली. डॉ. नारळीकर म्हणाले की, त्यांच्याकडे त्यांनी चित्रित केलेली अशी बरीच रीळे आहेत. मी त्यांना ती तात्काळ शोधून काढण्याविषयी विनंती केली. काही दिवसांनी संग्रहालयातील माझे सहकारी चित्रपट जतन अधिकारी किरण धीवर यांना सोबत घेऊन मी डॉ. नारळीकरांच्या घरी गेलो. डॉ. नारळीकर व त्यांच्या पत्नी

डॉ. मंगला नारळीकर यांनी अगत्याने आमचे स्वागत केले आणि अर्ध्या-पाऊण तासात आमच्यासमोर एकेक करत आठ मि.मी.ची छोटी छोटी रीळे बाहेर काढली. डॉ. नारळीकर केम्ब्रिज विद्यापीठात शिकत असताना त्यांनी अशा प्रकारे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली होती आणि पुढे कित्येक वर्षेते हा छंद जोपासत राहिले.

डॉ. नारळीकर दाम्पत्याबरोबर संग्रहालयाच्या थिएटरमध्ये बसून मी त्यांनी चित्रित केलेले फुटेज पाहिले. त्यात पंचविशीतले तरुण जयंत नारळीकर दिसतात, तसेच त्यांचे आई-वडीलही दिसतात. १९६० च्या दशकातले केम्ब्रिज विद्यापीठ आपल्याला त्यात पाहायला मिळते. जेथे जेथे डॉ. नारळीकर गेले तेथील दृश्ये त्यांनी फिल्म कॅमेऱ्यात टिपून ठेवली. कोल्हापूर, वाराणसी, अजमेर, नागपूर, पुणे, मुंबई, महाबलीपूरम् ही स्थळे आणि त्याबरोबर ज्या संस्थांमध्ये त्यांनी काम केले तेथील दृश्यमालिकाही या फुटेजमध्ये आहे. मुख्य म्हणजे त्यांचे गुरू फ्रेड हॉयल यांच्याबरोबर काम करत असतानाची क्षणचित्रे यामध्ये समाविष्ट आहेत. मला आवडलेली दोन दृश्ये म्हणजे- अजमेरच्या त्यांच्या घरात अगदी विनासायास येऊन हत्ती आणि त्यावरचा माहूत दक्षिणा घेऊन जातात ते आणि दुसरे- डॉ. नारळीकरांच्या मातोश्री सुमती ‘एसराज’ नावाचे वाद्य वाजवत असतानाचे दृश्य! तसे बघायला गेले तर या वैयक्तिक व खासगी स्वरूपाच्या आठवणी आहेत. परंतु आज २०१८ मध्ये त्यांना जतनीकरणाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. एक तर १९६० च्या दशकात अजमेरसारख्या शहरात भरवस्तीत एका घरात हत्ती येतो, ही शंभर वर्षांनंतर एक अशक्यप्राय गोष्ट वाटू शकेल! एका मध्यमवर्गीय कुटुंबातील स्त्री ‘एसराज’सारखे तंतुवाद्य वाजवते- यालाही खूप महत्त्व आहे. सध्या हे भारतीय तंतुवाद्य आणि त्याचे वादन ही दुर्मीळ गोष्ट झाली आहे. म्हणूनच अशी चित्रीकरणे जपून ठेवण्याला महत्त्व आहे.

परदेशात अशा घरगुती चित्रीकरणाला जतनीकरणाच्या दृष्टीने खूप महत्त्व दिले जाते. अर्थात त्याकाळी आर्थिकदृष्टय़ा सक्षम आणि नामवंत व्यक्तीच असा छंद जोपासू शकत. भारतातही अनेक संस्थानिकांनी परदेशातील ‘पाथे’सारख्या त्याकाळी फिल्म बनवणाऱ्या कंपन्यांना खास बोलावून घेऊन नामकरण समारंभ, दत्तक विधान सोहळा, राज्याभिषेक सोहळा आदी प्रसंगांचे चित्रीकरण करून घेतले होते. अशाच काही छािंदष्ट लोकांनी एकत्र येऊन २२ एप्रिल १९३७ रोजी ‘Amature Cine Society of India’ची स्थापना केली. ‘द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’चे संपादक स्टॅन्ली जेप्सन, भारतातील लघुपट चळवळीचे अध्वर्यु डॉ. पी. व्ही. पाथे, फाझलबॉय, अंबालाल आदींनी त्यात प्रमुख भूमिका बजावली. फिल्म डिव्हिजनच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या इझरा मीर आणि मोहन भवनानी यांचाही या संस्थेच्या कार्यात सहभाग होता. हौशी कॅमेरामनना एकत्र करून त्याद्वारे चित्रीकरण करायचे.. ज्याचा उपयोग केवळ वैयक्तिक न राहता समाज आणि देशालाही होईल- हा उद्देश या संघटनेच्या उभारणीमागे होता.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या माध्यमातून अशा प्रकारचे घरगुती चित्रपट जतन करण्यात आम्ही विशेष लक्ष देत आहोत. ज्या व्यक्तींकडे अशी आठ मि.मी. किंवा १६ मि.मी. रीळे असतील त्यांनी ती संग्रहालयाकडे आणून द्यावीत. आपल्या घरात वा नातेवाईकांकडे असे चित्रीकरण असल्यास आम्हाला अवश्य कळवावे. देशाचा सामाजिक आणि सांस्कृतिक ठेवा जपण्यात आणि पुढच्या कित्येक पिढय़ांसाठी ते जतन करण्यात आपण अशा प्रकारे सहभागी होऊ शकता.