डॉ. अभय देशपांडे

गेल्या ६० वर्षांत ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ अर्थात ‘इस्रो’ने यशाचे अनेक टप्पे पार केले. अत्यंत विपरीत परिस्थितीचा सामना करत अवकाशाला गवसणी घातली. मात्र, येणारा काळ तीव्र स्पर्धेचा आहे आणि बदलत्या समीकरणांत जुळवून घेण्यासाठी इस्रोला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे..

वर्ष १९०३. अमेरिकेत राईट बंधूंच्या पहिल्या यशस्वी विमान उड्डाणाने सर्व शास्त्रज्ञांना एक नवे क्षितीज खुणावू लागले. पुढे अवघ्या २० वर्षांत विमानसेवा प्रवासी साधन म्हणून व्यावसायिक तत्त्वावर सहज रुजली. तेव्हा साहजिकच ‘आता यापुढे काय?’ हा प्रश्न सर्वाना भेडसावू लागला. त्याच सुमारास दुसऱ्या महायुद्धाचे ढग दाटू लागले आणि या प्रश्नाचे उत्तर लष्कराने सोपे करून मांडले. ज्याच्याकडे अधिक शक्तिशाली, अधिक वेगवान विमान असेल, अंतिम विजय त्याचाच होईल. या नव्या आव्हानाने प्रेरित होऊन लढाऊ विमान निर्मितीकरिता पाण्यासारखा पसा वाहू लागला. महायुद्धामुळे जगाचे अपरिमित नुकसान झाले असले, तरीदेखील त्या भयंकर युद्धामुळेच विमान उड्डाण क्षेत्रात प्रचंड क्षमता निर्माण झाली हे नाकारता येणार नाही. आकाशात लीलया उड्डाण करणाऱ्या मानवाने युद्धविरामानंतर अंतराळात भरारी घेण्याचे स्वप्न पाहायला सुरुवात केली, यात नवल कसले!

१९५० ते १९६० या दशकात अमेरिका व सोव्हिएत रशिया यांच्यात श्रेष्ठत्वाची स्पर्धाच लागली. यात पहिला डाव रशियाने जिंकला. ४ ऑक्टोबर १९५७ रोजी रशियाने ‘स्पुटनिक’ या नावाचा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात पाठवला आणि एका नव्या स्पर्धेला तोंड फुटले. त्यापाठोपाठ लगेचच ३१ जानेवारी १९५८ रोजी अमेरिकेने ‘एक्सप्लोरर-१’ या नावाचा उपग्रह पाठवून अंतराळ भ्रमणाला सुरुवात केली. ३ नोव्हेंबर १९५७ रोजी रशियाने ‘लाईका’ या कुत्रीला अंतराळात भटकंतीकरिता पाठवले आणि लगेचच हे दोन्ही देश अंतराळात प्रथम मनुष्य पाठवण्याच्या उद्योगाला लागले. १२ एप्रिल १९६१ रोजी पुन्हा रशियाने बाजी मारली आणि युरी गागारीन हा पहिला अंतराळवीर ठरला. अवघ्या महिन्याभरात- ५ मे रोजी अ‍ॅलन शेपहर्ड हा पहिला अमेरिकी अंतराळवीर यशस्वीपणे भटकंती करून परत आला. १९६३ मध्ये व्हॅलेन्टीना तेरेश्कोवा ही रशियन महिला प्रथम अंतराळवीरांगना ठरली आणि त्यापाठोपाठ १९६५ मध्ये अ‍ॅलेक्सी लिवोनोव हा अंतराळयानातून बाहेर पडून ‘स्पेस वॉक’ करणारा पहिला मानव ठरला. अर्थात चंद्रावर प्रथम पाऊल ठेवण्याचा मान मात्र अमेरिकी चांद्रवीर नील आर्मस्ट्राँग व एडविन अ‍ॅल्ड्रिन यांना मिळाला. ‘एका मनुष्यासाठी छोटेसे पाऊलही अखिल मानवजातीसाठी प्रचंड झेप’ असे यथार्थ वर्णन आर्मस्ट्राँगने या घटनेचे केले आहे. पुढील वर्षी चांद्रविजयाला ५० वर्षे पूर्ण होतील.

याच सुमारास भारत व चीन या दोन देशांनीसुद्धा अंतराळात भराऱ्या घेण्याचे स्वप्न रंगवायला सुरुवात केली. गमतीची गोष्ट अशी की, या दोन्ही देशांनी रशियाचा हात पकडला! चीनने यात प्रगती करत ‘लाँगमार्च-१’ या उपग्रह प्रक्षेपक यानाच्या मदतीने (सॅटेलाइट लाँच वेहिकल- एसएलव्ही) ‘डोंग-फंग-हाँग’ (अर्थ- ‘पूर्व लाल आहे’) या नावाचा उपग्रह २४ एप्रिल १९७० रोजी यशस्वीपणे पृथ्वीभोवती कक्षेत टाकला. १९६२ मध्ये ‘कठउडरढअफ’ (इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च) या नावे डॉ. विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली भारताने अंतराळ कार्यक्रमाला सुरुवात केली. केरळात थिरूअनंतपुरमजवळ थुंबा या ठिकाणी आपण आपले अंतराळ केंद्र वसविले. अत्यंत वेगाने प्रगती करत अवघ्या पाच वर्षांत आपण ‘रोहिणी’ श्रेणीतील ‘आरएच-७५’, ‘आरएच-१००’ असे अत्यंत यशस्वी प्रक्षेपक तयार केले. आपला पहिला उपग्रह ‘आर्यभट’ रशियातून १९ एप्रिल १९७५ रोजी कक्षेत सोडला गेला. अर्थात आपला उपग्रह आपल्याच प्रक्षेपकाने अंतराळात पाठवण्याची जिद्द ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’तील (इस्रो) शास्त्रज्ञांमध्ये होतीच. त्याची परिणती म्हणून १० ऑगस्ट १९७९ रोजी ‘एसएलव्ही-३’ हे यान अंतराळात झेपावले. दुर्दैवाने त्या प्रयत्नात आपल्याला अपयश आले. परंतु त्याने खचून न जाता श्रीहरीकोटा अंतराळ उड्डाण केंद्रातून १८ जुल १९८० रोजी इस्रोने ‘रोहिणी’ हा उपग्रह यशस्वीपणे कक्षेत टाकला. त्यानंतर इस्रोने ‘इन्सॅट’ ही अत्यंत यशस्वी उपग्रह मालिका अवकाशात स्थिरावत या क्षेत्रात आपला ठसा उमटवला.

या टप्प्यावर इस्रोला गरज भासू लागली स्वबनावाटीच्या शक्तिशाली आणि भरोशाच्या प्रक्षेपकाची. यातूनच ‘पीएसएलव्ही’ (पोलार सॅटेलाइट लाँच वेहिकल) श्रेणीचा विकास झाला. ही गरज भागायला एक दशकभर कष्ट उपसावे लागले. २० सप्टेंबर १९९३ रोजी ८५० किलो वजनाचा उपग्रह घेऊन पीएसएलव्ही यान अंतराळात झेपावले. परंतु या मोहिमेला कुठेतरी गालबोट लागले आणि हे उड्डाण अपयशी ठरले. पुन:श्च आरंभ करत जाणवलेल्या त्रुटी दूर करून पीएसएलव्हीने १५ ऑक्टोबर १९९४ रोजी ‘आयआरएस-१’ हा उपग्रह यशस्वीपणे कक्षेत नेऊन सोडला. त्यामुळे भारताकडे सुमारे एक टन वस्तुमान अंतराळात नेण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध झाले. गेल्या २४ वर्षांत पीएसएलव्हीची ४४ उड्डाणे झालीत व त्यातील ४१ पूर्णपणे यशस्वी झाली आहेत. यावरून पीएसएलव्हीचे यश स्पष्टपणे दिसून येते. आज जगातील एक अत्यंत उपयुक्त प्रक्षेपक म्हणून हे यान ओळखले जाते.

त्यानंतर ‘जीएसएलव्ही’ (जीओसिन्क्रॉनस सॅटेलाइट लाँच वेहिकल) हे प्रक्षेपक कार्यरत झाले. या प्रक्षेपकाची भारवाहन क्षमता आठ टनापर्यंत आहे. २०१६ पासून जीएसएलव्ही यानात भारतीय बनावटीचे निम्नतापी किंवा क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात येत आहे. २००१ पासून या यानाची १२ पकी नऊ उड्डाणे यशस्वी झाली आहेत.

जागतिक स्पर्धेत इस्रोचे स्थान आणि त्यापुढील महत्त्वाची आव्हाने कोणती, याविषयी जाणून घेऊ या.

भारवहन क्षमता : आज जगात अमेरिका, रशिया, चीन, भारत, युरोप व जपान ही राष्ट्रे सातत्याने उड्डाणे करत आहेत. प्रक्षेपकाची तुलना करताना तो किती वस्तुमान कोणत्या कक्षेत नेऊन टाकू शकतो, हे बघितले जाते. आपण प्रामुख्याने पृथ्वीसमीप कक्षा (लोअर अर्थ ऑर्बिट), भू-स्थिर कक्षा (जीओस्टेशनरी ऑर्बिट) या उपग्रहांकरिता असलेल्या कक्षा अधिक महत्त्वाच्या मानतो. त्याशिवाय ग्रहांतर्गत प्रवासासाठी पृथ्वी-मंगळ क्षमतादेखील तपासता येते. मुख्य भर हा किती जास्त वजन वाहून नेता येईल, यावर दिला जातो.

रशियन बनावटीचे ‘प्रोटॉन’ हे यान अत्यंत यशस्वी मानले जाते. २००१ पासून २०१८ पर्यंत ‘प्रोटॉन’ने १०३ उड्डाणे केली आणि त्यातील केवळ सहा अयशस्वी, तर दोन अंशत: यशस्वी झाली आहेत. हे यान पृथ्वीसमीप कक्षेत २३ टन वस्तुमान, तर भू-स्थिर स्थानांतरण कक्षेत सात टन वस्तुमान नेऊ शकते. युरोपिय समूहाचे ‘एरियन’ हे यान पृथ्वीसमीप कक्षेत २१ टन वस्तुमान, तर भू-स्थिर स्थानांतरण कक्षेत दहा टन वस्तुमान नेण्याची क्षमता बाळगते. अमेरिकी ‘डेल्टा’ हे यान पृथ्वीसमीप कक्षेत २८ टन, तर भू-स्थिर स्थानांतरण कक्षेत १४ टन वस्तुमान नेऊ शकते. तर चिनी बनावटीचे ‘लाँग मार्च’ १४ टन वस्तुमान आतापर्यंत दोन वेळा यशस्वीपणे घेऊन गेले आहे. या तुलनेत आपले सर्वात शक्तिशाली ‘जीएसएलव्ही’ यान आठ टन भार वाहू शकते. यावरून सहज लक्षात येते, की आज भारवाहन क्षमतेमध्ये आपण थोडे मागे पडलो आहोत.

अमेरिकी खासगी कंपनी ‘स्पेस-एक्स’ने यंदा ६ फेब्रुवारी रोजी ‘फॅल्कन-हेवी’ हे यान यशस्वीपणे प्रक्षेपित केले. २००२ मध्ये सुरू झालेल्या ‘स्पेस-एक्स’ने सुरुवातीला ‘फॅल्कन-९’ श्रेणीचे शक्तिशाली रॉकेट बनवले. ७० मीटर उंचीचे व सुमारे ५५० टन वजनाचे ‘फॅल्कन-९’ प्रक्षेपक यान अ‍ॅल्युमिनियम व लिथिअम यांच्या संमिश्रणातून बनलेले आहे. नऊ इंजिनांच्या आधारे हे यान पृथ्वीसमीप कक्षेत २३ टन, तर भू-स्थिर स्थानांतरण कक्षेत सुमारे ८.५ टन वस्तुमान नेऊन टाकू शकते. ‘फॅल्कन-हेवी’ ही ‘फॅल्कन-९’ ची सुधारित आवृत्ती आहे. आकाराने सारखेच असलेले हे यान तीन इंजिनाचा वापर करत पृथ्वीसमीप कक्षेत ६४ टन, तर भू-स्थिर स्थानांतरण कक्षेत २७ टन एवढे प्रचंड वस्तुमान नेऊन टाकू शकते. हे यान मंगळावर १७ टन भार नेऊ शकते. आजच्या घडीला ‘फॅल्कन-हेवी’ जगातील सर्वात शक्तिशाली प्रक्षेपक मानले जाते. त्यामुळे यापुढे इस्रोच नव्हे, तर जगातील सर्व शासकीय संस्थांना खासगी कंपन्यांशी कमालीची स्पर्धा करावी लागणार आहे.

उपग्रह उड्डाण व्यवसाय : गेल्या काही वर्षांत अनेक छोटय़ा-मोठय़ा देशांना स्वत:चे उपग्रह अवकाशात असावे असे वाटू लागले आहे. किंबहुना असा उपग्रह असणे हे राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा मानला जाऊ लागला आहे. परंतु प्रत्यक्षात प्रक्षेपक तंत्रज्ञान फारच कमी देशांकडे आहे. त्यामुळे उपग्रह उड्डाण व्यवसाय फोफावेल असे मानले गेले. अर्थात ‘पीएसएलव्ही’सारखे सक्षम तंत्रज्ञान असल्याने इस्रोकरिता हा व्यवसाय उत्तम संधी मानली जाते. गेल्या ६० वर्षांत सुमारे सहा हजार उपग्रह सोडले गेले. पकी भारताने ८८ उपग्रह सोडले आहेत. गतवर्षी इस्रोने तीन उड्डाणे केली (पकी एक अपयशी ठरले), तर याच कालावधीत रशियाने २०, चीनने १३ आणि ‘स्पेस-एक्स’ने १९ उड्डाणे केली. यंदा आतापर्यंत आपण तीन, चीनने २३, तर ‘स्पेस-एक्स’ने १६ उड्डाणे केली आहेत. अर्थात आपल्याकडे केवळ एकाच ठिकाणावरून उड्डाण करणे शक्य आहे. ही त्रुटी भरून काढण्याकरिता इस्रोला लवकरच नवे अंतराळ उड्डाण स्थान शोधावे लागणार आहे. अन्यथा वर्षभर श्रीहरिकोटा येथून महिन्याला ३-४ या प्रमाणात उड्डाण क्षमता वाढवावी लागणार आहे. तसे न केल्यास उपग्रह उड्डाण व्यवसायात आपण मागे पडत जाण्याचा धोका आहे.

खासगी कंपन्यांचा धोका : १९०३ मध्ये पहिल्या विमान उड्डाणानंतर अवघ्या दहा वर्षांत विमान वाहतुकीत खासगी क्षेत्र उतरले. अंतराळ उड्डाण क्षेत्रात पहिल्या उड्डाणानंतर जवळपास ४० वर्षांनी खासगी कंपन्या येऊ लागल्या. १९५७ च्या ‘स्पुटनिक’नंतर आजपर्यंत सुमारे पाच हजार उड्डाणांद्वारे मानवाने सहा हजार उपग्रह अवकाशात पाठवले आहेत. याच कालावधीत अनेक चांद्र, मंगळ व इतर ग्रहमोहिमा पार पडल्या. चंद्र, मंगळ, धूमकेतू व लघुग्रहांवर याने पाठवून त्यांचा अभ्यास केला गेला. चंद्रावर १२ अंतराळवीरांनी पाऊल ठेवले आहे. सौरमाला भेदून याने दूर निघून गेलेली आहेत. प्रगतीचे हे सर्व टप्पे राष्ट्रीय संशोधन प्रकल्पांतर्गत पार पाडण्यात आले. खासगी कंपन्यांना या क्षेत्रात उतरायला त्या मानाने बराच अवधी लागला.

१९९१ मध्ये सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर अत्यंत निष्णात असे अनेक रशियन तज्ज्ञ उपजीविकेसाठी वेगवेगळ्या वाटा शोधू लागले. कुणा एका हरहुन्नरी तज्ज्ञाने डेनिस टिटो या अब्जाधीश अमेरिकी उद्योगपतीला अंतराळात आठ दिवस मुक्कामाला नेण्याची योजना बनवली. टिटोने याकरिता २० दशलक्ष डॉलर्स (तेव्हाचे सुमारे ६५ कोटी रुपये) मोजले. यामुळे व्यावसायिक अंतराळ कंपन्यांच्या स्थापनेला बळ मिळू लागले. त्यानंतर सहाजण अशा प्रकारे भटकंती करून आले आहेत. प्रत्येक व्यक्तीला एकदा तरी अंतराळात भटकण्याचे स्वप्न पडते. ते पूर्ण करण्यासाठी या कंपन्यांचा उगम झाला. २००२ मध्ये ‘टेस्ला’ उद्योग समूहाच्या एलॉन मस्क यांची ‘स्पेस-एक्स’, ‘अ‍ॅमेझॉन’ समूहाच्या जेफ बेझोसची ‘ब्ल्यू ओरिजिन’ आणि ‘व्हर्जिन एअरलाइन्स’च्या रिचर्ड ब्रॅन्सनची ‘व्हर्जिन गॅलेटीक’ अशा तीन मोठय़ा कंपन्या अस्तित्वात आल्या.

२०१० पासून ‘स्पेस-एक्स’च्या ‘फॅल्कन-९’ यानाने ४९ उड्डाणे केली आणि त्यातील ४७ यशस्वी झाली. गतवर्षी ‘स्पेस-एक्स’ने १९ याने उडवली, तर यंदा २५ यानांचा संकल्प केलेला आहे. यावरून या कंपनीचा धडाका व यशाचा अंदाज येतो. आजच्या घडीला ‘फॅल्कन-हेवी’ जगातील सर्वात शक्तिशाली प्रक्षेपक मानले जाते. काही दिवसांपूर्वीच २०२३ पर्यंत जपानी अब्जाधीश युसाका माएसावा यांना चंद्रावर पहिला पर्यटक म्हणून पाठवण्याची घोषणा ‘स्पेस-एक्स’ने केली आहे. ‘स्पेस-एक्स’चे मुख्य लक्ष्य मंगळ वसाहत हे आहे. त्यामुळे ही सर्व त्याची पूर्वतयारी आहे. २०२० पर्यंत मंगळावर मोहीम पाठवायची आणि २०२५ पर्यंत मंगळावर मनुष्य पाठवायचा असे उद्दिष्ट ‘स्पेस-एक्स’च्या एलॉन मस्क यांनी जाहीर केलेले आहे.

‘अ‍ॅमेझॉन’च्या ‘ब्ल्यू ओरिजिन’ या कंपनीने ‘न्यू शेपहर्ड’ हे यान गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये यशस्वीपणे प्रक्षेपित केले. या यानाची उड्डाण क्षमता वाढवत ‘न्यू ग्लेन’ नावाने नवे यान नुकतेच त्यांनी जाहीर केले आहे. प्रसिद्ध अंतराळवीर जॉन ग्लेन याच्या नावे असलेल्या या प्रक्षेपकाची पृथ्वीसमीप कक्षेत ७० टन वस्तुमान टाकण्याची क्षमता असेल असे सांगितले जात आहे. ‘स्पेस-एक्स’शी तुलना करता ‘ब्ल्यू ओरिजिन’ मुख्यत्वे उड्डाण क्षमता वाढवण्यामागे धावत आहे. या कंपनीचे एक महत्त्वाचे ग्राहक हौशी अंतराळयात्री असतील. याच दिशेने ‘व्हर्जिन गॅलेटीक’चा प्रवास सुरू आहे आणि त्यांचा केंद्रबिंदू केवळ अंतराळ पर्यटन हा आहे.

या कंपन्या फोफावण्याचे मुख्य कारण ‘नासा’चे नवीन धोरण आहे. गेल्या काही वर्षांत नासाने उड्डयन प्रक्रियेचे ‘आऊटसोर्सिग’ सुरू केले आहे. त्यामुळे या कंपन्यांना व्यवसाय मिळतो आणि स्पर्धेत टिकणे शक्य होते.

भारतातदेखील अशा प्रकारच्या कंपन्या येऊ लागल्या आहेत. इस्रोने स्वत:ची ‘अंतरिक्ष’ ही व्यावसायिक शाखा सुरू केली आहे. त्याशिवाय ‘टीम इंडस’ व नुकतीच सुरू झालेली ‘अ‍ॅस्ट्रोम’ अशा स्टार्टअप् आता रुजू लागल्या आहेत. परंतु यांचा मुख्य भर हा उपग्रह व त्याची साधने बनवणे असा आहे. त्यामुळे प्रत्यक्ष उड्डाणाचे काम मात्र येणारी अनेक वर्षे इस्रोलाच करावे लागणार असे दिसते.

खासगी व्यावसायिकांशी स्पर्धा करण्याचे कठीण काम इस्रोच नव्हे, तर चीन, जपान आणि इतर देशांनासुद्धा करावे लागत आहे. अंतराळाशी निगडित अनेक तहांचे पालन करीत अशा स्पर्धेत राष्ट्रीय संस्था थोडय़ा मागे पडतात असे चित्र आता दिसत आहे.

पुनर्वापर तंत्रज्ञान : वर्षांला ५० याने या पटीने उड्डाण करायचे आणि तेदेखील स्वस्तात, तर रॉकेटचे शक्य असतील तितके भाग पुन्हा वापरण्याचे तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. यशस्वी उड्डाणानंतर रॉकेटचा पहिला टप्पा सुखरूप परत आला पाहिजे आणि अत्यंत हळुवारपणे नियोजित स्थानावर (बहुतांशवेळी जहाजावर) उतरला पाहिजे. त्यासाठी या टप्प्याला माशासारखे कल्ले असतात, ज्याचा वापर परत येताना दिशादर्शन करत योग्य ठिकाणी पोहोचण्यास केला जातो. त्याशिवाय सुखरूप उतरण्याकरता विशेष पायदेखील असतात, जे उतरताना पसरवले जातात. अशा प्रकारची योजना करून या यानाचे यशस्वी उड्डाण करण्याची करामत ‘स्पेस-एक्स’ने करून दाखवली आहे.

अंतराळ कॅप्सुल : भारतीय अंतराळयात्रींना अंतराळात न्यायचे आणि सुखरूप परत आणायचे, तर त्यासाठी इस्रोला भ्रमणाकरिता विशेष यान तयार करावे लागेल. ‘पीएसएलव्ही’चा वापर करून आपले यात्री या कॅप्सुलमध्ये बसून अंतराळात जातील आणि अंतिम टप्प्यात सुरक्षितरीत्या कॅप्सुलसकट परत येतील. हे छोटेखानी यान इस्रोने तयार केलेले आहे. उड्डाण करून हे कॅप्सुल परत मिळवण्याचे तंत्र आपण २०१४ मध्ये अवगत केले आहे.

अंतराळ स्थानक : आजमितीला आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. भविष्यातील अंतराळ मोहिमा असो वा कोणताही संशोधन उपक्रम असो, या स्थानकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या स्थानकात अजून भारताने आपले पाऊल ठेवलेले नाही. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अमेरिका, रशिया, कॅनडा, युरोपिय समुदाय व जपान भागीदार आहेत. चिनी संस्थेचे स्वतंत्र ‘चिनी अंतराळ स्थानक’ टप्प्या-टप्प्याने बांधले जात आहे. २०२३-२५ पर्यंत ते पूर्णत्वाला येईल. त्यामुळे भारताचे स्थानक असणे गरजेचे आहे.

अंतराळात भारतीय : इस्रोने अनेक वर्षांपासून ‘आपल्या यानाने आपल्या अंतराळवीराने/वीरांगनेने भ्रमण करावे’ अशी योजना आखली आहे. त्याकरिता आवश्यक असलेले तंत्रज्ञान विकसित करण्याचे कार्य जोमात सुरू आहे. परंतु दुर्दैवाने आपण सातत्याने हा कार्यक्रम पुढे ढकलत आहोत. आता सरकारने २०२२ पर्यंत भारतीय मनुष्य अंतराळात गेलेला असेल असे जाहीर केल्यानंतर, लवकरच हा कार्यक्रम अमलात येईल असे वाटते.

पुनर्वापर उड्डाणयान तंत्रज्ञान (आरएलव्हीटी) : समजा, आपल्याला सतत अंतराळात मानवाला पाठवायचे आहे. तर विमानासारखी वापरता येणारी उड्डाणयाने आपल्याला बनवावी लागतील. नासाच्या स्पेस ट्रान्सपोर्ट वेहिकल अर्थात अंतराळ प्रवास वाहनासारखे पुन:पुन्हा वापरता येणारे पुनर्वापर उड्डाणयान तंत्रज्ञान आपल्याकडे असावे या हेतूने तयारी करत अथक परिश्रमाने २३ मे २०१६ रोजी इस्रोने अशा यानाची चाचणी यशस्वीपणे पार पाडली. पीएसएलव्ही/जीएसएलव्हीसारखे प्रक्षेपक आहेतच, शिवाय आता पुनर्वापर उड्डाणयान तंत्रज्ञान व अंतराळ कॅप्सुल तंत्रज्ञानदेखील उपलब्ध आहे. त्यामुळे लगेचच इस्रो मानवीय अंतराळमोहीम राबवेल असे वाटले होते. परंतु तसे न होता, अज्ञात कारणांसाठी ही मोहीम पुढे ढकलली जात २०२२ पर्यंत लांबविली गेली आहे.

वरील चच्रेतून स्पष्ट दिसते की, आपला अंतराळ कार्यक्रम अनेक प्रकारे वाढत चालला आहे. ‘चांद्रयान-१’ व २०१९ मध्ये ‘चांद्रयान-२’, ‘मंगळयान-१’, सूर्यावर स्वारीकरिता ‘आदित्य’ सौरयान, तसेच ‘अ‍ॅस्ट्रोसॅट’ ही अंतराळातील निरीक्षण शाळा अशा अनेक मोहिमा आपण राबवत आहोत. त्याच जोडीला अंतराळात भटकंतीची तयारी सुरू आहे. हे करत असताना उपग्रह उड्डाण सुरू आहेतच. इस्रोच्या यशाचा आलेख चढता आहेच यात शंका नाही. तरीदेखील वर सांगितल्याप्रमाणे नित्य नव्या येणाऱ्या खाजगी कंपन्यासुद्धा याच दिशेने वेगाने धावत आहेत. पूर्वी आपली स्पर्धा अमेरिका, रशिया, चीन या देशांशी होती, तर आता त्या जोडीला हे व्यावसायिक उगवले आहेत.

भीषण स्पर्धेचे दुष्परिणाम : जाता जाता एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे वळू या. गेल्या ६० वर्षांत सर्व देशांनी सुमारे पाच हजार उड्डाणं केली. प्रतिवर्ष सरासरी ८३ उड्डाणे झाली असे मानू या. याद्वारे आपण अंतराळात सुमारे साडेसहा हजार टन ‘अंतरिक्ष कचरा’ तयार केलेला आहे. आता ‘स्पेस-एक्स’सारखी कंपनी प्रतिवर्ष ५० उड्डाणांचे मनसुबे आखत आहे. या कंपनीने २०२५ पर्यंत २५ हजार उपग्रह अंतराळात असतील असे जाहीर केले आहे. याचा अर्थ अंतराळ उड्डाणाच्या या स्पर्धेत अंतराळातील कचरा कैक पटीने वाढणार आहे.

आज आपल्या पृथ्वीभोवती छोटे-मोठे उपग्रह, यान आदींचे तुटकेफुटके भाग भटकत असतात. असे हजारो तुकडे आसमंतात विखुरलेले आहेत. पकी सुमारे २५ हजार तुकडे एक ते दहा मीटर आकाराचे आहेत. असे मोठे तुकडे जर पृथ्वीवर पडले, तर त्या ठिकाणाचा संपूर्ण नि:पात होऊ शकतो. प्रचंड प्रमाणात जीवितहानीदेखील होऊ शकते. अर्थात पृथ्वीच्या वातावरणामुळे आपोआपच थोडे तरी संरक्षक कवच मिळते. अंतराळात भ्रमंती करणाऱ्या उपग्रहांना मात्र अशा भटक्या तुकडय़ांपासून थेट धोका संभवतो. छोटय़ा तुकडय़ांची अशा उपग्रहांशी टक्कर झाल्यास त्याचा पूर्ण नाश होऊ शकतो. या विषयावरील ‘ग्रॅव्हिटी’ हा चित्रपट अशा धोक्याची संपूर्ण कल्पना देतो. १९७९ मध्ये नासाचे ‘स्कायलॅब’ हे यान भारतावर येऊन पडेल अशी अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण झाली होती. अखेर ते यान हिंदी महासागरात कोसळले.

अभ्यासाअंती असे सिद्ध झाले आहे की, अशा धोकादायक तुकडय़ांच्या अत्यंत जवळ येण्याच्या घटनांचे प्रमाण आज सुमारे १३ हजार घटना प्रति आठवडा इतके आहे. हेच प्रमाण २०५० पर्यंत ५० हजार घटना प्रति आठवडा एवढे होईल. त्यामुळे भविष्यात उड्डाण करण्यापूर्वी यानाच्या मार्गात कुठे कचरा आहे का, ते बघावे लागणार आहे. ‘रस्ता साफ’ केल्याशिवाय उड्डाण करता न येण्यासारखी परिस्थिती भविष्यात उद्भवेल. याबाबतीत कदाचित शासकीय अवकाश संस्था जास्त भरोशाच्या मानता येतील. किमानपक्षी त्यांच्यावर विविध आंतरराष्ट्रीय संबंधांचे तसेच कायद्याचे बंधन असेल. परंतु असे बंधन खासगी कंपन्या पाळतील याची हमी कोण देणार?

संशोधकांनी आजवर मानवजातीच्या कल्याणाकरता अनेक गोष्टी शोधल्या. यथावकाश व्यावसायिकांनी त्याचा अतिरेकी वापर करत अखेर पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास केला. ही साखळी आपल्याला सर्वत्र दिसते. त्यामुळे अंतराळ उड्डाण क्षेत्रात वेगळे काही घडेल असे मानायची सोय नाही.

गेल्या ६० वर्षांत इस्रोने यशाचे अनेक टप्पे पार केले. अत्यंत विपरीत परिस्थितीचा सामना करत आपल्या शास्त्रज्ञांनी अवकाशाला गवसणी घातली. मात्र, येणारा काळ तीव्र स्पर्धेचा आहे आणि बदलत्या समीकरणात जुळवून घेण्यासाठी इस्रोला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. त्यासाठी इस्रो नव्या पिढीतील हरहुन्नरी व हुशार भारतीयांकडे बघते आहे. अनेक नवउद्यमींनी स्टार्ट-अप सुरू केले तर या स्पर्धेत आपण अग्रक्रमावर येऊ शकू. आपल्या लोकांच्या गरजा, आपल्या लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याचे सामथ्र्य आपल्याच लोकांनी उभे केले, तर त्यासम दुसरे यश कुठलेही नसेल. या निभ्रेळ यशात आपलाही वाटा असावा असे अनेक भारतीय तरुणांना वाटते, यात शंका नाही!

abhaypd@gmail.com