चंद्रकांत पाटील

कविता हा साहित्याचा विशुद्ध प्रकार आहे असे नेहमीच बोलले जाते. कवितेत भाषा पणाला लागते. कविता सूक्ष्म अनुभव प्रभावीपणे अभिव्यक्त करण्याचे आणि जगण्याचे व अज्ञाताचे आकलन करण्याचे माध्यम असते. असे असले तरी ज्या प्रकारची कविता मासिका-पुस्तकांतून वाचण्यात येते, त्यातून कसलेही आकलन होत नाही. फक्त बिनकामाची वैयक्तिक माहिती आणि भ्रष्ट व घासून घासून अर्थक्षय झालेली भाषा याशिवाय काहीच हाती लागत नाही. कवितेपेक्षाही कवितेची समीक्षा जास्तच वाईट असते. कवितेचे समीक्षण हा तर जाहिरात कलेचाच एक उपविभाग आहे की काय, असे वाटावे इतपत स्थिती खालावलेली आहे. अशा वेळी आयुष्यभर कवितेची शास्त्रशुद्ध समीक्षा करणाऱ्या एखाद्या समीक्षकाचे दीर्घकाळातील काव्यविषयक लेखन प्रकाशित झाले की कवितेच्या आकलनात मोलाची भर पडते.

प्रा. सुधीर रसाळ यांचे नुकतेच प्रसिद्ध झालेले ‘कवितानिरूपणे’ हे पुस्तक असेच अलीकडच्या काळातील कवितेच्या समीक्षेचे एक महत्त्वाचे पुस्तक आहे. सुधीर रसाळ हे गेल्या सुमारे ५५ वर्षांपासून समीक्षेच्या, त्यातही प्रामुख्याने कवितेच्या समीक्षेच्या क्षेत्रात सातत्याने लेखन करीत आहेत. ‘कविता आणि प्रतिमा’ या कवितेच्या तात्त्विक अंगाने चर्चा करणाऱ्या ग्रंथानंतर त्यांची कविता समीक्षेची एकूण पाच पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. हे त्यानंतरचे सहावे पुस्तक आहे. त्यांच्या अभ्यासाला शास्त्रीय शिस्त आहे हे त्यांच्या लेखनातून जागोजागी जाणवत असते.

‘कवितानिरूपणे’ या पुस्तकात एकूण १५ लेख आहेत. त्यांचा कालखंड हा १९६२ पासून २०१६ पर्यंतचा, म्हणजे सुमारे ५४ वर्षांचा आहे. एवढय़ा प्रदीर्घ काळापर्यंत सातत्य टिकवणे अवघड आहे. शिवाय एवढय़ा कालखंडातील बदलांचा मागोवा घेऊन अगदी अलीकडच्या समकालीन कवितांची समीक्षा करणे त्याहूनही अवघड आहे. आणखी एक कठीण बाब म्हणजे, जे वैद्यकीय वगैरे क्षेत्रांत ‘सुपरस्पेशलायझेशन’ सुरू आहे, तसेच समीक्षा क्षेत्रातही सुरू झाले आहे! जे समीक्षक मध्ययुगीन कवितेवर लिहितात ते आधुनिक कवितेबाबत अनभिज्ञ असतात आणि याच्या उलट, जे आधुनिक कवितेचे समीक्षक असतात ते मध्ययुगीन कवितेवर काहीच लिहीत नाहीत!

मात्र, रसाळांच्या प्रस्तुत पुस्तकात कवितेच्या संदर्भात एक सातत्यपूर्ण आणि र्सवकष भूमिका असून त्यात मध्ययुगीन संत कवितेवर सात संहितासमीक्षा असून आधुनिक कवितेतील महत्त्वाचे कवी बा. सी. मर्ढेकर, विंदा करंदीकर, अरुण कोलटकर आणि वसंत दत्तात्रेय गुर्जर यांच्या कवितांचेही संहितावाचन आहे (मर्ढेकरांवर तर रसाळांची तीन स्वतंत्र पुस्तके आहेत.); शिवाय भा. रा. तांबे यांच्या कवितेवर एक लेख असून ‘लावणी’ आणि ‘गझल’ या काव्यप्रकारांचे रूपविषयक विवेचन करणारे दोन लेख आहेत.

कवितेच्या समीक्षेत अशी अनागोंदी माजण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे कवितेबाबत उपयोजित प्रकारची समीक्षा बऱ्याच प्रमाणात लिहिली गेली आहे आणि आजही लिहिली जात आहे. परंतु कवितेच्या बाबत मूलभूत स्वरूपाच्या आणि सर्वसामान्यांना सहजासहजी समजेल अशा लेखनाचा अभाव आहे. श्रेष्ठ कवितेचे निकष काय आहेत आणि त्यामागची सैद्धांतिक भूमिका काय आहे हे सोपेपणाने सांगणारे लेखन मराठीत कितपत आहे, याविषयी शंकाच आहे. कवितेविषयीचे गंभीर स्वरूपाचे लेखन झालेले नाही असे नाही; परंतु अशा लेखनाचा प्रत्यक्ष कवितानिर्मितीवर आणि कवितेच्या आकलनावर काहीच प्रभाव दिसून येत नाही.

कवितेच्या समीक्षणाची अवनत अवस्था निर्माण होण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे- या क्षेत्रात स्वातंत्र्योत्तर काळात फोफावलेली आस्वादक समीक्षा! यामुळे कुठल्याही पूर्वाभ्यासाशिवाय कवितासंग्रहांवर आणि कवींवर पानेच्या पाने लिहून समीक्षक होता येते आणि कुणालाही महाकवी म्हणून घोषित करता येते. कारण याला शिस्तीची, बौद्धिकतेची व तार्किकतेची गरज नसते. हा फक्त तात्कालिक भावनांचा आणि शब्दांचा खेळ असतो.

रसाळ यांच्या प्रस्तुत पुस्तकाची मोलाची बाजू म्हणजे त्यांचा पुस्तकाच्या सुरुवातीलाच असलेला ‘संहितासमीक्षेचे स्वरूप आणि कार्य’ हा लेख! या लेखात रसाळ – ‘आस्वादक समीक्षा ही कवितेला वा कवितासंग्रहाला दिलेली भावनात्मक प्रतिक्रिया असते आणि त्यात कवितेच्या घटकांचा शास्त्रीय स्वरूपाचा सांगोपांग विचार नसतो’ असे प्रतिपादन करतात. इथे आस्वादक समीक्षा समीक्षाच असत नाही; ती व्यक्तिगत रुची म्हणूनच रसग्रहणाच्या पातळीवर व्यक्त होते. श्याम मनोहर यांच्या शब्दांत सांगायचे, तर आस्वादक समीक्षेमुळे ‘रुचीकडून अभिरुचीकडे जाणे’ होत नाही. रसाळांनी आस्वादक समीक्षेबद्दल म्हटले आहे : ‘असे सर्व लेखन ललित गद्याच्या स्वरूपाचे असते. समीक्षा हे जर शास्त्र असेल तर तिच्यात अशा ललित स्वरूपाच्या लेखनाचा समावेश करता येणार नाही.’ हा लेख रसाळ यांच्या या संग्रहातील पुढील सर्व लेखांचा पाया आहे.

या संग्रहातील बहुतेक सर्व लेख कवितेच्या सूक्ष्म संहितावाचनावर आणि त्यावरील विवेचनावर आधारित आहेत. ‘निरूपणे’ याचा अर्थच विवेचन असा आहे. रसाळ हे संहितावाचन करताना शब्द, शब्दसंघटन आणि त्यामुळे व्यक्त होणाऱ्या अनेक अर्थपातळ्यांचे तार्किक अंगाने विवेचन करतात. एखाद्या शब्दाचे अर्थनिर्णयन करताना ते तो शब्द ज्या विशिष्ट भूभागातील समाजात प्रचलित आहे त्याचा मागोवा घेत पुढे जातात. शिवाय त्या शब्दावर आधारित म्हणी, वाक्प्रचार यांचाही ते आधार घेतात. हे त्यांनी केलेल्या ‘कानडा विठ्ठलु : ज्ञानेश्वर’ या निबंधात फार स्पष्टपणे जाणवते. इथे रसाळांची संस्कृतिकेंद्रित दृष्टी व्यक्त होते. (‘ना. घ. देशपांडे यांची कविता’ या दुसऱ्या एका पुस्तकात त्यांनी ना. घ. देशपांडे यांची एकूण कविता सांस्कृतिक अंगाने समीक्षिली आहे.) जेव्हा रसाळ एखाद्या प्राचीन कवितेचे निरूपण करतात तेव्हा ते फक्त भाषेच्याच अंगाने विचार करतात असे नाही तर कविता ज्या काव्यप्रकारात आहे, त्याची सविस्तर चर्चा करतात. उदाहरणार्थ, ‘घनु वाजे घुणुघुणा’ या ज्ञानेश्वरांच्या प्रसिद्ध कवितेची चर्चा करताना ते ‘विराणी’ या शृंगारप्रधान रूपककाव्याची वैशिष्टय़े विशद करतात. नामदेवांच्या ‘पाटोळा तिमला रे’ या अभंगाबद्दल लिहिताना ते ‘पद’ वा ‘गीत’ या काव्यप्रकाराची सविस्तर माहिती देतात. असाच आणखी एक लेख म्हणजे- ‘दादला : नाथांचे नाटय़ात्म रूपक’! या नाटय़ात्म रूपकांना ‘भारूड’ म्हणतात, असे लिहून ते पुढे ‘सांग रूपक’ आणि ‘निरंग रूपक’ यांची सविस्तर चर्चा करतात. अखेरीस ‘नाथांच्या या रूपकांनी महाराष्ट्रात रंगभूमीचा पाया घातला, हे त्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे’ असे लक्षणीय विधान करतात. तुकारामाच्या ‘जाला प्रेतरूप। शरीराचा भाव’ या अभंगाचे विवेचन करताना रसाळ तुकोबांच्या विरोधन्यासात्मक अभंगांची चर्चा करतात.

लावणी आणि गझल या काव्यप्रकारांचे त्यांनी केलेले सविस्तर विवेचन नुसतेच अभ्यासपूर्ण नसून ते दिशादर्शकही आहे. लावणीबद्दल लिहिताना ते- ‘केवळ प्रेक्षकाधीन, वाचकाधीन असलेल्या साहित्याचे रूप कसे असते, याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे मराठीतील हे लावणी वाङ्मय’ असा काहीसा धीट निष्कर्ष काढतात. गझलबाबत त्यांचे- ‘मराठी संस्कृतीने दिलेल्या संवेदनशीलतेशी जर या काव्यप्रकाराचे नाते प्रस्थापित झाले तरच हा काव्यप्रकार मराठीत रुजू शकेल. नाही तर केवळ टूम म्हणून काही कवी गझला लिहितील’ हे विधान गझलकारांना आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे.

समीक्षकाच्या ठायी विश्लेषण आणि संश्लेषण अशा दोन्ही क्षमता असणे आवश्यक असते. बौद्धिक क्षमतेने विश्लेषण शक्य होते, तर संश्लेषणासाठी अंतबरेधनाची, अंत:प्रज्ञेची नितांत गरज असते. विशेषत: आधुनिक आणि आधुनिकोत्तर कवितांच्या समीक्षेसाठी तर त्यांशिवाय अर्थनिर्णयनच होऊ  शकत नाही. रसाळांजवळ या दोन्ही क्षमता आहेत हे त्यांनी केलेल्या विंदा करंदीकरांच्या ‘वेडी’ या समजण्यास अतिशय अवघड कवितेवर लिहिलेल्या लेखात दिसून येते. यामुळेच अरुण कोलटकर यांच्या ‘इराणी’ या प्रसिद्ध कवितेचे त्यांनी केलेले समीक्षण भालचंद्र नेमाडे यांच्या समीक्षणापासून वेगळे होते! ते करंदीकरांची ‘वेडी’ कविता भूत-वर्तमान-भविष्य अशा तिन्ही काळात हिंडते, तर अरुण कोलटकर ‘इराणी’मध्ये ‘केवळ वर्तमान मानसिक घटना शब्दबद्ध करतात’ असे अस्तित्ववादी निरीक्षण नोंदवतात. मर्ढेकरांच्या ‘असेल हिम्मत’ या असंकलित कवितेचे आणि वसंत दत्तात्रेय गुर्जर यांच्या ‘गांधी मला भेटला’ या कवितेचे निरूपण करताना ते मधल्या काळात साहित्यबाह्य़ कारणांसाठी मुद्दाम वापर करण्यात आलेल्या अश्लीलतेचीही सविस्तर चर्चा करतात.

रसाळांचे कवितेच्या संहितेचे वाचन आदर्श ठरावे असे आहे. ते कवितेवर प्रेम करणाऱ्या सर्वानाच उपयुक्त ठरणारे आहे. यामुळे कवितेच्या वेगवेगळ्या अंगोपांगांविषयीची जाणीव समृद्ध होण्यास मदत होते. रसाळ वाङ्मयीन संज्ञा वापरताना काटेकोर असतात. मात्र क्वचित एखादा शब्द ढोबळपणे वापरला जातो. उदाहरणार्थ, त्यांच्या ‘भाववैचारिक’ या शब्दाचा नेमका अर्थ कळणे कठीण होऊन बसते. आणखी एक म्हणजे, कवितांच्या संहिता समीक्षेनंतर त्यांची काव्यविषयक भूमिका निखळ रूपवादाकडून सरकलेली आणि काहीशी रूपवादी, काहीशी संस्कृतीवादी झालेली दिसते. रसाळ यांच्याकडून कविता म्हणजे काय, याची पायाभूत चर्चा करणाऱ्या आणि कवितेच्या श्रेष्ठत्वाचे निकष नेमकेपणाने सांगणाऱ्या स्वतंत्र पुस्तकाची गरज होती. यासाठी दीर्घकालीन चिंतन व सैद्धांतिक आकलन आवश्यक असते. आणि त्याच्या सर्व खाणाखुणा रसाळांच्या या पुस्तकात आहेत, हे निश्चित!

‘कवितानिरूपणे’ – सुधीर रसाळ,

विजय प्रकाशन, नागपूर</p>

पृष्ठे – २०१, मूल्य – ३५० रुपये.

patilcn43@gmail.com