27 February 2021

News Flash

उजळ माथ्यानं मिरवणारं वाङ्मयचौर्य

नव्या पिढीतील कथालेखक व कादंबरीकार हृषीकेश गुप्ते यांच्यावर वाङ्मयचौर्याचा आरोप होत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

प्रतीक पुरी

नव्या पिढीतील कथालेखक व कादंबरीकार हृषीकेश गुप्ते यांच्यावर वाङ्मयचौर्याचा आरोप होत आहे. यासंबंधात दस्तुरखुद्द गुप्ते यांनी मात्र मौन बाळगले आहे. त्यांच्या लेखनाबद्दल काही प्रश्न उपस्थित करणारे टिपण..

लेखक हृषीकेश गुप्ते यांना आम्ही वाचक गेली काही र्वष ओळखतो आहोत. त्यांची ‘अंधारवारी’, ‘दैत्यालय’, ‘चौरंग’, ‘दंशकाल’ आणि ‘घनगर्द’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. भयकथा लिहिणं तसं अवघड काम नाही; पण त्याला साहित्यिक दर्जा देणं हे मात्र निश्चितच अवघड आहे. गुप्ते यांनी ते त्यांच्या पहिल्या दोन कथासंग्रहांतून साध्य केलेलं आहे. त्यांची शैली अनेकांना आवडली आणि एक दर्जेदार गूढ-भयकथाकार मराठी साहित्याला लाभला याचा वाचकांनाही आनंद झाला. मात्र, प्रत्यक्षात गुप्ते यांच्या कथा या उचलेगिरीचा प्रकार आहे हे तीन वर्षांपूर्वीच उघडकीस आलं होतं, परंतु त्यावर सोयीस्करपणे मौन पाळलं गेलं. आम्हाला या गोष्टी नुकत्याच कळल्या. त्यानंतर यासंदर्भात तपासणी केली असता हे खरं असल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे वाचक, लेखक आणि मराठी साहित्य व्यवहाराचा एक घटक म्हणून आम्हाला ही बाब वाचकांसमोर ठेवणे आवश्यक वाटते. ‘घनगर्द’ हा हृषीकेश गुप्तेंचा तिसरा भय-गूढकथासंग्रह. तो रोहन प्रकाशनाने त्यांच्या ‘मोहर’ या ललित पुस्तकांच्या मालिकेअंतर्गत ऑगस्ट, २०१८ मध्ये प्रकाशित केला आहे. या कथासंग्रहातील ‘घनगर्द’ ही कथा स्टीफन किंग यांच्या ‘द गर्ल हू लव्हड् टॉम गॉर्डन’ या लघुकादंबरीवर आधारित असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. याची खातरजमा आम्ही केली आणि दुर्दैवानं ते खरं आहे. ‘घनगर्द’ ही कथा २०१७ च्या ‘हंस’ दिवाळी अंकात आधी प्रसिद्ध झाली. तो अंक वाचनात आला नाही. त्यामुळे त्यात स्टीफन किंगचे आभार मानल्याचा काही उल्लेख आहे का, ते माहीत नाही. परंतु या कथासंग्रहात असा काहीच उल्लेख नाही.

या धक्क्यातून सावरतो नाही तोच पुस्तकप्रेमी शशिकांत सावंत यांनी ‘फेसबुक’वर लिहिलेली एक नोंद वाचनात आली; ज्याकडे अनेकांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं. याचं कारण बहुधा गुप्ते हे आता प्रसिद्ध लेखक आहेत आणि प्रतिष्ठित प्रकाशनांनी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध केली आहेत. काही मान्यवरांनी गुप्ते यांच्या ‘दंशकाल’ या कादंबरीची अफाट स्तुती केल्यामुळे सामान्य वाचक दबून गेला आहे. मात्र, एक महत्त्वाचा कथाकार आणि कादंबरीकार असं ज्यांना आज मानलं जातं, ते गुप्ते प्रत्यक्षात इतर लेखकांच्या कथांची  उचलेगिरी करून आपल्या नावावर खपवणारे  अप्रामाणिक लेखक आहेत असे दिसून येते. ‘घनगर्द’च्या आधीही हा प्रकार झालेला आहे. ‘ऐसी अक्षरे’ या चर्चात्मक संस्थळावर गुप्ते यांच्या या वाङ्मयचौर्याविषयी बरीच चर्चा झाली आहे. त्यात गुप्तेंच्या ‘अंधारवारी’ कथासंग्रहातील ‘काळ्याकपारी’ आणि अन्य कथांची चर्चा आहे. ‘काळ्याकपारी’ ही कथा स्टीफन किंग यांच्याच ‘एन’ या कथेवर आधारित आहे असा पुराव्यासहित आरोप त्यात केला गेला आहे. ही चर्चा आहे २०१५ सालातली. ‘काळ्याकपारी’ ही २०१० साली ‘नवल’ दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली. त्याविषयी गुप्ते सांगतात की, ‘त्या वेळेस ‘नवल’चे संपादक आनंद अंतरकर यांना याची माहिती मी दिली होती. परंतु त्यांनी किंग यांचा श्रेयोल्लेख केला नाही.’ अंतरकर यांना यासंबंधी विचारले असता त्यांनी ही बाब अमान्य केली. अंतरकर यांच्या म्हणण्यानुसार, गुप्तेंनी त्यांना असं काहीही सांगितलेलं नव्हतं. त्यानंतर २०११ साली ही कथा ‘अंधारवारी’ या कथासंग्रहात (मनोविकास प्रकाशन) प्रसिद्ध झाली. त्याही वेळेस गुप्तेंनी असा दावा केला की, त्यांनी प्रकाशकांना या कथेच्या मूळ स्रोताविषयी कळवले होते, पण त्यांनी तसा उल्लेख केला नाही. आम्ही संबंधित प्रकाशकांना याबद्दलची माहिती विचारली असता त्यांनीही गुप्तेंनी असं काहीही त्यांना कळवलं नसल्याचं म्हटलं आहे. पुढे २०१५ साली ‘ऐसी अक्षरे’ या संस्थळावर ‘काळ्याकपारी’विषयी माहिती आली, तेव्हाही गुप्ते यांच्या ‘रमताराम’ नामक मित्रवर्यानी तिथे गुप्तेंचा हवाला देत लिहिलंय की.. ‘सदर कथा ही ‘नवल’च्या दिवाळी अंकात प्रथम छापून आलेली आहे. तिथे ती कथा स्टीफन किंगच्या कथेवर आधारित असल्याचा स्पष्ट उल्लेख केला होता. ती कथा छापताना संपादकाने ती अन्य लेखनावर आधारित असल्याचा उल्लेख अनावश्यक समजून गाळून टाकलेला होता. परंतु ‘काळ्याकपारी’ ही हुबेहूब तीच कथा असल्याचे मात्र लेखकाला साफ अमान्य आहे. ती कथा ज्या ‘ओसीडी’ या आजारावर आधारित आहे, त्याआधारे आणि स्वत:चे अनुभव (लेखक स्वत: त्या आजाराला सामोरे गेलेला/ जात आहे.) यांची सांगड घालून ती कथा लिहिली गेली आहे.’

गुप्तेंनी स्वत: मात्र तिथे वा अन्य कोठेही हा खुलासा केलेला नाही. जेव्हा या कथासंग्रहाची दुसरी आवृत्ती २०१७ मध्ये प्रसिद्ध झाली तेव्हाही गुप्तेंनी प्रकाशकांना सांगून ही चूक सुधारली का नाही? उलट ते म्हणतात की, त्यांना वेळच मिळाला नाही आणि प्रकाशकांनी त्यांना न विचारताच कधीतरी ही आवृत्ती प्रकाशित केली. आताही एक वर्ष उलटून गेल्यानंतर गुप्तेंना खुलासा करायला वेळ मिळालेला नाही. आम्ही गुप्तेंना याबाबत विचारलं असता त्यांनी खुलासा करण्यासाठी आमच्याकडे २०१९ च्या फेब्रुवारीपर्यंतचा अवधी मागितला. शिवाय तोवर आम्ही याविषयी कुठे लिहू नये अशी विनंतीही केली. (जी अर्थातच आम्ही मान्य केली नाही. कारण त्यांचा खोटारडेपणा उघड झाला होता. ज्याचे ठोस पुरावे आमच्याकडे आहेत.)

आम्ही रोहन प्रकाशनाला ‘घनगर्द’विषयी सांगितले आणि किंग यांची मूळ कथाही पाठवून दिली. त्यांनी आम्हाला सांगितले की, गुप्तेंनी त्यांना ‘काळ्याकपारी’विषयी माहिती दिली होती. आमचा प्रश्न आता रोहन प्रकाशनाला असा आहे की, अशा अप्रामाणिक लेखकाचा कथासंग्रह (‘घनगर्द’) त्यांनी का प्रकाशित केला? दुसरं म्हणजे आम्ही किंग यांची मूळ कथा त्यांना पाठवून दिल्यानंतरही त्यांनी आमच्याशी संपर्क का केला नाही? त्यांची ही भूमिका संशयास्पद आहे. आणि त्याचं कारण हे आहे की, ‘घनगर्द’ ही खरोखरीच किंग यांच्या कथेवर आधारित आहे! त्यांना दोन्ही कथा वाचताच ते समजायला हरकत नव्हती. गुप्ते मात्र ‘घनगर्द’चा किंग यांच्या कथेशी काही संबंध नसून ती स्वत:ची कथा असल्याचे म्हणतात. मात्र, कोणीही या दोन्ही कथा वाचाव्यात आणि आम्हाला खोटं ठरवावं; आम्ही जाहीर माफी मागायला तयार आहोत.

रोहन प्रकाशनाने गुप्तेंना झालेली चूक आधी कबूल करण्यास आणि सुधारण्यास का सांगितले नाही? गुप्तेंच्या कथा या इतरांच्या कथांवर बेतलेल्या असतात आणि त्या ते आपल्या कथा म्हणून वाचकांसमोर सादर करतात, ही वाचकांची फसवणूक नाही का? गुप्तेंच्या पुस्तकांची स्तुती करणाऱ्या समीक्षकांना या गोष्टी कशा काय समजल्या नाहीत? त्यांचंही याबाबतीत अज्ञान असेल तर ती त्यांचीही चूक आहे. एक वेळ ‘घनगर्द’ची कथा गुप्ते यांची स्वत:ची आहे हे मान्य करू; पण ‘काळ्याकपारी’संदर्भात जे घडलंय ते अक्षम्य आहे. यात मराठीतील दोन नियतकालिकांच्या संपादकांवर हलगर्जीपणाचा आरोप होऊ शकतो. तीच गोष्ट गुप्तेंची पुस्तकं प्रकाशित करणाऱ्यांच्या बाबतीतही घडली आहे. या कथासंग्रहाला काही पुरस्कारही लाभले असतील. पण या सर्व काळात गुप्ते सोयीस्करपणे मौन बाळगून होते आणि इतर अनेकांनीही तेच केलं. कदाचित स्टीफन किंग त्यांच्यावर दावा ठोकणार नाहीत, पण म्हणून हा गुन्हा क्षम्य होत नाही. कारण ही वाचकांची फसवणूक आहे. याकडे मराठी साहित्य- जगताकडून नेहमीप्रमाणे दुर्लक्ष होईल याची आम्हास भीती आहे. कारण बऱ्याचदा लेखक अशा वेळी प्रकाशकांवर अशा गोष्टी ढकलून स्वत: निरपराध असल्याचं भासवतात. त्यामुळे या विषयावर जाहीर चर्चा होणं गरजेचं आहे.

लेखक मंडळी, विशेषत: नवोदित लेखक सर्रास प्रकाशकांना दोष देत असतात. परंतु एखादा लेखक जर प्रकाशकांची अशी फसवणूक करत असेल तर एक लेखक, वाचक आणि साहित्य व्यवहाराचा घटक म्हणून ही गोष्ट उजेडात आणणं आम्हाला आमची नैतिक जबाबदारी वाटते. अन्यथा उद्या प्रकाशकांचा लेखकांवर, विशेषत: नवोदित लेखकांवर विश्वास उरणार नाही. इतरांची कथावस्तू आपलीच मूळ रचना आहे असं सांगणं हे एकूणच लेखकीय नीतिमत्तेला धरून नाही. त्यामुळे ‘अंधारवारी’ व ‘घनगर्द’ या कथासंग्रहांशी संबंधित सर्वानी याचा योग्य तो खुलासा करायला हवा. गुप्ते यांनीही याबाबत आपली बाजू मांडावी.

चूक क्षम्य असते, परंतु हेतुत: केलेल्या अपराधाला क्षमा नाही. पहिली चूक घडल्यानंतर तिची कबुली न देता प्रचंड वेळ मिळूनही, लोकांनी त्यांच्यावर पुराव्यासहित आक्षेप घेऊनही त्यांत सुधारणा न करता तीच चूक पुन्हा करणे हा तर अक्षम्य अपराध ठरतो.

pratikpuri22@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2018 1:25 am

Web Title: article about literature theft charges against novelist hrishikesh gupte
Next Stories
1 संघर्षरत आंबेडकरवाद
2 कहॉँ गये वो लोग? : स्वप्नात आणि जागेपणीही नाटक सुरूच!
3 उत्कट भावमय गजल
Just Now!
X