08 August 2020

News Flash

वरदा :एक पत्रकल्लोळ

वरदा नायडूचं पत्र हाती घेतलं तेव्हा हात थरथरले. ९४ वर्षांपूर्वी लिहिलेलं हे पत्र.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. अंजली सोमण

आजच्या पिढीला कवी माधव जूलियन हे नाव माहीत असण्याची शक्यता अगदीच कमी. मराठी कवितेच्या प्रांतात आधुनिक आशय आणू पाहणाऱ्या ‘रविकिरण मंडळा’चे ते एक अध्वर्यु. ‘प्रेम’ आणि स्त्री-पुरुष संबंधांबाबत आधुनिक दृष्टिकोनाचा आग्रह धरणाऱ्या माधव जूलियन यांनी आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात मात्र वरदा या मैत्रिणीच्या बाबतीत तो अमलात आणला नाही असे दिसते. वरदाच्या एका दुर्मीळ पत्रातून ध्वनित झालेलं हे वास्तव (?)!

वरदा नायडूचं पत्र अचानक हाती पडलं. १९२४ सालचं. या पत्रानं मनात कल्लोळ निर्माण केला. वरदा ही मराठीतील प्रसिद्ध कवी माधव जूलियन यांची मैत्रीण. वरदाचं माधव जूलियनांच्या आयुष्यात येणं विदारक वळण देणारं ठरलं. आजच्या पिढीला माधव जूलियन हे नाव माहीत असण्याची शक्यता अगदीच कमी. जे साठीच्या आसपास आहेत त्यांना मात्र माधव जूलियनांचं कर्तृत्व व कवित्व माहीत असणार.

वरदा नायडूचं पत्र हाती घेतलं तेव्हा हात थरथरले. ९४ वर्षांपूर्वी लिहिलेलं हे पत्र. कागद पूर्ण पिवळा पडला होता. पत्राचे दोन तुकडे झालेले. तुकडे जुळवूनच पत्र वाचावं लागलं.

हे पत्र माझ्याकडे कसं आलं?

कै. ह. वि. मोटे हे मराठीतील मनस्वी आणि ख्यातनाम प्रकाशक. हरिभाऊंना पत्रं गोळा करण्याचं वेड होतं. महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तींची पत्रं हरिभाऊंनी मोठय़ा कष्टानं आणि चिकाटीनं मिळवली. १८१७ ते १९४७ या कालखंडाचा इतिहास ‘विश्रब्ध शारदा’च्या तीन खंडांतून त्यांनी पत्ररूपानं सादर केला. १९८४ मध्ये हरिभाऊचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी कृष्णाबाई मोटे यांनी हरिभाऊंचा उरलासुरला पत्रसंग्रह डॉ. द. दि. पुंडे आणि माझ्याकडे दिला. ती पत्रं चाळताना वरदाचं पत्र हाती आलं. शंकरराव कानेटकर म्हणजे ‘कवी गिरीश’ यांना ते लिहिलेलं आहे-

हनमकोंडा

ता. २३. ४. १९२४

‘‘बंधु गिरीश कवीस, माझा हात जोडून नमस्कार. आपले पत्र पोहोचले. वाचून माझी मन:स्थिती गोंधळून गेली, यांत नवल ते काय? ..माझ्या स्वप्नातदेखील अशी गोष्ट होईल असें वाटलें नव्हते. व्हायचे नाही ते झाले व ऐकायचे नाहीं तें ऐकले..’’

काकुळतीला येऊन वरदा ज्याविषयी लिहिते, असं काय झालं? कोणती घटना घडली?

‘पटवर्धन या गृहस्थांची वागणूक पूर्णपणे संशयातीत आहे असे आम्हास वाटत नाही. जोपर्यंत हे गृहस्थ संस्थेत काम करत आहेत तोपर्यंत आम्ही काम करू शकणार नाही..’ असं पत्र फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आजीव सेवकांच्या सभेत ठेवलं गेलं. पहिल्या सभेत ते नामंजूर झालं. पुढची सभा दोन महिन्यांनी झाली. या सभेत पटवर्धनांनी दोन वर्षे कॉलेजमधून निर्वेतन रजा घ्यावी असं ठरलं. वरदाशी त्यांनी या काळात कोणताही संबंध ठेवू नये, अशी सूचना देण्यात आली. २६ मे १९२४ ला ही सभा झाली. मे १९२५ मध्ये श्री. बा. रानडे या कविमित्राकडे मुंबईला बैठक झाली. या बैठकीला पटवर्धन आले होते. वरदाही आली होती. हे वृत्त संस्थेकडे पोहोचलं. पटवर्धनांना आजीव सभासदत्वाचा राजीनामा देणं भाग पडलं. जून १९१८ ला सुरू झालेलं ‘फर्ग्युसन पर्व’ ऑक्टोबर १९२५ ला पटवर्धनांच्या आयुष्यातून संपलं.

हे सारं घडत असताना कवी म्हणून माधव जूलियन लोकप्रियता मिळवत होते. १९२० नंतर त्यांची कविता नियतकालिकांतून प्रसिद्ध होऊ लागली. ‘जूलियन’ हे टोपणनाव त्यांनी घेतलं. ‘जूलियन’ हा मारी कॉरेलीच्या ‘गॉड्स गुड मॅन’ या कादंबरीतील एक सौंदर्यपूजक, उत्कट मनोवृत्तीचा कवी. माधवरावांची कविता प्रणयप्रधान. कवितेचा बाज थेट मांडणी करणारा. धाडसी. त्यांचं कविमन स्त्रीपूजक, स्त्रीवश होतं की काय, असं वाटावं इतकी स्त्रीची व प्रणयाची आकर्षक चित्रं त्यांनी काव्यबद्ध केली आहेत. त्यांच्या काव्यातील प्रेयसी मराठी कवितेत तत्पूूर्वी कधी प्रगट झाली नव्हती. प्रेमाची आत्मनिष्ठ तडफड मराठी कवितेत माधव जूलियनांनीच सर्वप्रथम आणली. महत्त्वाचं म्हणजे प्रणयाचं एक वेगळं, आर्त, हळवं, आत्मलक्षी रूप त्यांनी कवितांमधून वाचकांसमोर ठेवलं. त्यामुळेच त्यांच्या कवितेवर त्या काळात कौतुकाचा वर्षांव झाला, तितकीच बोचरी टीकाही झाली. मराठी समीक्षकांनी तर त्यांना ‘प्रणयपंढरीचे वारकरी’ हे बिरूद बहाल करून चटोर म्हटलं.

असं का घडलं? याचं उत्तर शोधण्यासाठी तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा आढावा घ्यावा लागेल. माधवरावांच्या कवितेत प्रणयरसाची अशी मुक्त उधळण होत असताना त्या वेळचा समाज कसा होता? किती मुली शाळेत जात होत्या? त्यातील शहरी किती आणि ग्रामीण किती? केशवपन आणि विधवाविवाहाचं प्रमाण काय होतं? मुलीचं लग्न साधारणत: कितव्या वर्षी व्हायचं? आदींच्या समाजशास्त्रीय तालिका सहज उपलब्ध होतील. त्या फारशा आशादायी असणार नाहीत. पण त्या तपशिलात शिरण्याचं कारण नाही. साहित्याचं विश्लेषण करत असल्यामुळे तत्कालीन सामाजिक परिस्थितीविषयी साहित्यांतर्गत पुरावे काय मिळतात, तेवढे पाहू.

वामन मल्हार जोशी यांची ‘रागिणी’ ही कादंबरी १९१६ साली प्रसिद्ध झाली. त्यात बैठकीच्या खोलीत एकत्र बसून स्त्री-पुरुषांनी केलेल्या काव्यशास्त्रविनोदाची वर्णने आहेत. याचा अर्थ साहित्यातील स्त्री तेव्हा माजघरातून बाहेर पडली होती. परंतु १९१६ साली महर्षी कव्र्यानी महिला विद्यापीठाची स्थापना केली, तेव्हा त्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या फक्त पाच होती. म्हणजे लेखकानं प्रतिभासृष्टीत उभी केलेली ‘स्त्री-प्रतिमा’ समाजाच्या अद्याप अंगवळणी पडली नव्हती.

संपूर्ण महाराष्ट्रात वादळ उठवणारा विभावरी शिरूरकर यांचा ‘कळ्यांचे नि:श्वास’ हा कथासंग्रह १९३३ साली प्रसिद्ध झाला. स्त्री-पुरुषांना एकत्र येण्याची मोकळीक समाज देतच नाही तर तरुणींनी प्रेमविवाह कसे करावेत, असा त्यातल्या एका कथेचा विषय होता. याच्या पुढेमागेच कवी अनिल यांनी कुसुमावतींशी आणि कादंबरीकार पु. य. देशपांडे यांनी विमलाशी प्रेमविवाह केला. पण त्यांनी एकमेकांना जी पत्रं लिहिली होती, ती ‘ताई’ आणि ‘बंधू’ असं संबोधूनच!

वरदा-माधवराव प्रकरण याआधी दहा र्वष घडलं. १९२३ साली वरदा नायडू या विद्यार्थिनीनं फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तिचा प्रो. माधवराव पटवर्धनांशी परिचय झाला. माधवराव तेव्हा २९ वर्षांचे होते, तर वरदाचे वय असेल १७-१८ र्वष. या काळात स्त्री-पुरुषांनी एकत्र येण्यावर किती बंधनं असतील याची कल्पना येऊ शकते. त्या काळात माधवराव व वरदा एकमेकांना पत्रं लिहीत. एकत्र टेनिस खेळत. दोन-चार मित्र-मैत्रिणी मिळून चित्रपट पाहत. ट्रिपला जात. वरदाच्या पत्रात एका ट्रिपचा उल्लेख आहे.

रविकिरण मंडळाचा परिचय करून घेतला तर या मोकळेपणाचा उलगडा होऊ शकेल. १९२३ साली रविकिरण मंडळाची स्थापना झाली. माधव जूलियन, गिरीश, यशवंत, द. ल. गोखले, श्री. बा. रानडे, सौ. मनोरमा रानडे आणि नाटय़छटाकार दिवाकर हे सात जण या मंडळाचे सदस्य. स्त्री-पुरुष मैत्री, व्यक्तिवाद आणि सामाजिक व काव्यविषयक नवविचार या सूत्रानं मंडळ बांधलं गेलं होतं. काव्यवाचन/ काव्यगायन करून त्यांनी आपल्या कविता लोकप्रिय केल्या. रूढ मराठी कवितेची चाकोरी त्यांनी मोडून काढली. मराठी कवितेत बदल करत असताना सामाजिक बदल करण्याचीही रविकिरण मंडळाची भूमिका होती. ‘प्रेम’ या विषयाची कक्षा त्यांनी रुंदावली. प्रेमकल्पनेला उदात्तता दिली. स्त्रीला सहचरी, सखी मानून स्त्रीविषयक दृष्टिकोनात बदल करण्याचा या साऱ्यांचा प्रयत्न होता.

माधवराव रविकिरण मंडळातले मुख्य कवी. (माधवराव ‘रवि’ आणि बाकीचे सारे ‘किरण’ अशी कोटीही नंतर या मंडळावर केली गेली!) प्रागतिक विचारांचे तरुण. विशी-बावीशीत असल्यापासूनच माधव जूलियन बुरसटलेल्या मतांबद्दल तिटकारा व्यक्त करीत. रा. वि. मराठे या मित्राला  त्यांनी जी पत्रे लिहिली आहेत त्यातून हे स्पष्ट होतं. स्त्री-पुरुष संबंध, विवाहविषयक विचार, कामवासनेची स्वाभाविकता व तिच्यावरील सामाजिक बंधनं, नीतिकल्पनांची सापेक्षता व काळानुसार त्यात बदल करण्याची गरज याविषयी त्यांनी या पत्रांतून पुरोगामी आणि धीट विचार मांडले आहेत. भिन्न भिन्न जातींत बेटीव्यवहार सुरू होण्याची निकड व्यक्त केली आहे. रविकिरण मंडळातील स्नेही परिवारात हे विचार प्रत्यक्षात येण्याच्या शक्यता माधवरावांना दिसू लागल्या. त्यांना लहानपणी कौटुंबिक सुख, जिव्हाळा लाभला नाही. पोरकेपण, एकाकीपण या भावनांनी त्यांना आयुष्यभर घेरून टाकलं. कोमेजलेल्या अशा मनाला तरुण वयात सुखावणारी साथसोबत लागते. अशी मैत्री त्यांनी धीट, बुद्धिमान, हैदराबादी वातावरणात वाढलेल्या वरदाच्या रूपानं शोधली असणार. तत्कालीन पुणे मात्र या प्रकरणाच्या कंडय़ा पिकवण्यासाठी तयार होतं.

.. आज यात आक्षेपार्ह असं काही आढळणार नाही. पण हे वातावरण त्या काळाच्या खूप पुढे गेलेलं होतं. भारतीय समाज रूढी आणि परंपरा मानणारा. ही चाकोरी सोडून जो वागू बघतो, त्याला या समाजात बहिष्कृत केलं जातं. माधवरावांना डेक्कन एज्युकेशन सोसायटीतून काढून टाकणं हा त्यांच्यावर टाकलेला बहिष्कारच होता. निमित्त ठरली वरदा. वरदानं गिरिशांना लिहिलेलं हे पत्र आजीव सभासदांसमोर ठेवलं गेलं.

वरदा त्यात लिहिते : ‘‘मी माधवरावांशी फ्रेंड या नात्याने राहात होते आणि मी कोठल्याहिं तऱ्हेनें त्यांच्याशी जास्त फाजिल बोलले नाही हे त्यांना व तुम्हा सर्वास ठाऊक आहे.. मीहि सर्वसाक्षी ईश्वराला स्मरून सांगते कीं माधवरावांनी माझे फ्लर्टिग करण्याचा कधीं प्रयत्न केला नाहीं व कधी ते बोलून दाखविलें नाही. मी त्यांच्याशीं लग्न अथवा दुसरा कसलाहि संबंध ठेवूं नये, हें मी, माझी जात व समाजकारणानें पूर्ण जाणून होते. मात्र मी त्यांच्याशी ‘पवित्र स्नेह’ ठेविला होता यात शंका नाही..’’

९४ वर्षांनंतर वरदाचं पत्र वाचताना मनात काही प्रश्न उभे राहतात. हे पत्र कशासाठी मागवलं आहे, हे वरदाला माहीत होतं. पटवर्धनांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी तर तिनं हे सारं लिहिलं नसेल ना? ‘स्वप्नभूमी’ या माधवरावांच्या चरित्रात गिरीश प्रस्तृत प्रकरणात वरदा व माधवराव पूर्णपणे निर्दोष असल्याची ग्वाही देतात. पण रविकिरण मंडळातील अन्य सदस्यांचं असं मत नव्हतं. ‘‘माझ्याशी माधवरावांची मैत्री माझ्या ‘बॉयिश’ स्वभावामुळे झाली..’’ असं पत्रात वरदा म्हणत असली, तरी पटवर्धनांच्या मोकळ्या वागण्यामुळे वरदाच्या मनात पुढे स्त्रीसुलभ निराळ्या भावना निर्माण झाल्या असाव्यात. ‘‘माझे लग्न श्री. माधवराव पटवर्धन यांच्याशी व्हावे; तुम्ही दोघे पुन: प्रयत्न करून पहा!’’ अशा आशयाचं पत्र वरदेनं मुंबईला मनोरमाबाई रानडे यांना लिहिलं होतं. पण माधवरावांनी लग्नास नकार दिला.

पुण्याला आल्यानंतर माधवरावांच्या आयुष्यात स्थिरता येत होती, तेव्हाच जीवन उधळून टाकणारा हा मोठा आघात झाला. मनुष्याच्या चांगुलपणावरचा त्यांचा विश्वास उडाला. बाह्य़ आघात सोसता येतात, पण आंतरविश्वावरील आघात सोसणं त्यांना कठीण झालं. बदनामीनं तर पुढची अनेक र्वष त्यांची पाठ सोडली नाही. ३४ व्या वर्षी माधवरावांनी रूढ पद्धतीनं विवाह केला. तडजोड स्वीकारली. पण त्यांची काव्यवृत्ती कोमेजलेली आणि स्वप्नसृष्टी भंग पावलेली होती.

माधवरावांचं चरित्र लक्षात न घेता त्यांचा फक्त वाङ्मयीन अभ्यास करण्याचे प्रयत्न नंतर झाले. पण तसं खऱ्या अर्थानं होऊ शकलं नाही. त्यांच्या कवितांचा त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी संबंध जोडला गेला. ‘सुधारक’ या खंडकाव्यात वरदाला शोधलं गेलं.

माधवरावांनी वरदाशी प्रीतिविवाह का केला नाही? शांताबाई हेर्लेकर या बडोद्याच्या मैत्रिणीने तरुण वयाच्या माधवरावांना प्रेमाच्या काव्यात्म, अशारीर, वासनाविरहित, विशुद्ध संकल्पनेचा परिचय करून दिला होता. वरदा पत्रात ज्याला ‘पवित्र स्नेह’ म्हणते ती हीच संकल्पना. माधवरावांनीच तिला याविषयी सांगितलं असावं. ‘मॅरेज इज प्रिझन’ हे शेलेचं विधान. ‘लग्नविधी जेथ न जीवैक्य निशाणी, तेथे चल राणी’ ही खुद्द माधवरावांची कविता. ‘प्लेटॉनिक लव्ह’ या नावानं ही संकल्पना पुढे समाजावर काही काळ प्रभाव टाकून होती. अशा पवित्र, विशुद्ध, अशारीर प्रेमाची कल्पना माधवरावांच्या मनाच्या तळाशी घट्ट रुतून बसली होती का? म्हणून त्यांनी वरदाशी विवाह केला नाही? की पुन्हा वेगळ्या जातीच्या, आंध्रप्रांतीय मुलीशी लग्न करताना वाटणारी समाजाची भीती आड आली?

माधवराव आत्मचरित्र लिहिणार होते. त्यांनी तसं लिहिलं असतं तर कदाचित यातील काही प्रश्नांची उत्तरं मिळाली असती. लेखकाची कुंडली मांडता येत नाही. पण माधवरावांचं सारं आयुष्य आपल्यासमोर उलगडल्यानंतर काही अंदाज बांधता येतात. त्यांचे ‘छंदोरचना’ किंवा ‘भाषाशुद्धि विवेक’ हे गद्य ग्रंथ बाजूला ठेवू. कवितेचा विचार करू. त्यांच्या काव्यात विविधता आहे, पण ते पुरेसं समाधान देऊ शकत नाही. जीवनाच्या वरवरच्या स्तरात ते अडकून पडतं. जाणिवेच्या तळापर्यंत जात नाही. त्यांनी मनात स्पंदने उमटतात. पण मनाला आणि विश्वाला कवेत घेऊन जगाच्या लीला पाहणारा महाकवी त्यांच्यात निर्माण होत नाही. वरदा प्रकरणाचा तडाखा बसला नसता तर ‘महाकवी’च्या दिशेनं माधव जूलियनांच्या कवितेनं प्रवास केला असता का?

वरदा प्रकरण आता जुनं झालं. काळ पुढे गेला. मध्यंतरी विद्यार्थिनीबरोबर गैरवर्तनाचं आणखी एक प्रकरण डे. ए. सोसायटीत उद्भवलं. पण ते ‘वरदा’इतकं वादळी ठरलं नाही. त्या संबंधित प्राध्यापकांची न बदली झाली, ना त्यांना नोकरी सोडावी लागली.

वरदा प्रकरण घडलं तेव्हा भोवतालचा समाज फार नीतिमान होता असं समजण्याचं कारण नाही. नाटय़-चित्रपटसृष्टी ही तर गंधर्वनगरी. तिला समाजाचे कोणतेच संकेत तेव्हाही मान्य नव्हते. बहुपत्नीकत्वाच्या, अंगवस्त्र ठेवण्याच्या चाली तेव्हा पुरुषवर्गात रूढ होत्या. काहींचे विधवा भावजयीशी संबंध होते. स्त्री-पुरुषांची समानता आणि स्त्री-पुरुष मैत्री या समाजाच्या आकलनापलीकडील गोष्टी होत्या. माधवरावांनी यापेक्षा वेगळी भूमिका घेतली. स्त्री-पुरुषांमध्ये मित्रत्वाचं नातं आणण्यासाठी पुढाकार घेतला. आज स्त्री-पुरुषांमधील संबंधांत (विशेषत: शहरात) खूपच मोकळेपणा आला आहे. माधवरावांनी जे साहस दाखवलं, जी किंमत दिली त्यावर आजचा मोकळेपणा उभा आहे हे तरुणाईनं लक्षात घ्यायला हवं.

वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी २९ नोव्हेंबर १९३९ ला माधव जूलियनांचं देहावसान झालं. त्याचं स्मरण झालं आणि मनातला पत्रकल्लोळ आणखीनच गडद झाला. गिरीशांनी आपली सारी पत्रं हरिभाऊ मोटय़ांच्या ताब्यात दिली. ‘विश्रब्ध शारदा’च्या खंडात वापरण्यासाठी. त्यात हेही पत्र हरिभाऊंकडे आलं. हरिभाऊंनी गिरीशांची बाकीची पत्रं एका गठ्ठय़ात बांधून ठेवली. वरदाचं पत्र मात्र वेगळं ठेवलं. एका पाकिटात घालून. एखादा अलंकार जपावा तसं. कारण या पत्राला वाङ्मयीन आणि सामाजिक महत्त्व होतं!

anjalisoman@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2018 1:53 am

Web Title: article about madhav julian letter
Next Stories
1 ‘राजहंसी’
2 २६/११ नंतरची जागरूकता..
3 मैफील अशी जमावी..
Just Now!
X