डॉ. प्रतिभा कणेकर

ज्येष्ठ समीक्षक डॉ.  म. सु. पाटील यांच्या ‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध’ या समीक्षाग्रंथाला यंदाचा सवरेत्कृष्ट मराठी साहित्यकृतीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने..

Ranajagjitsinha Patil - Om Rajenimbalkar
“…तर राजकारण सोडून देईन”, ओमराजेंनी तेरणा महाविद्यालयावरून केलेल्या आरोपांवर राणा पाटलाचं उत्तर
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
teacher built a democratic gudhi for Public awareness and to increase voter turnout
शिक्षकाने उभारली चक्क लोकशाही गुढी! मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पती-पत्नीकडून जनजागृती
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान

डॉ. म. सु. पाटील यांच्या ‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध’ या समीक्षाग्रंथाला यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी समजली तेव्हा पहिली प्रतिक्रिया स्वाभाविकच उत्कट आनंदाची होती. दुसऱ्या क्षणी मनात आले की, मराठी साहित्य, भाषा आणि साहित्यव्यवहार यांविषयीच्या आस्थेतून गेली चाळीस वष्रे व्रतस्थपणे समीक्षालेखन करीत मराठी समीक्षाविश्वाला समृद्ध करणाऱ्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या डॉ. पाटील यांच्या कार्याला साहित्य अकादमीने ही सन्मानवंदना देणे अपरिहार्यच होते.

डॉ. म. सु. पाटील म्हणजे आम्हा विद्यार्थ्यांचे बाबा! ते आम्हाला मालेगावच्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात शिकवायला होते. पुढे कधीतरी समजले की, महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून येण्यापूर्वी १९४६ ते १९६४ पर्यंत त्यांनी गिरणी कामगार, कारकून आणि शिक्षक म्हणूनही काम केले आहे. अलीकडे प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘लांबा उगवे आगरी’ या आत्मकथनातून त्यांचा शून्य ते शिखर हा प्रवास किती खडतर होता, याची सर्वाना कल्पना आली. त्यांच्याकडून मात्र त्यासंबंधी फारच क्वचित बोलले जाई. १९६९ नंतर ते मनमाडच्या महाविद्यालयात प्राचार्य झाले. तिथल्या त्यांच्या वीस वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी रेल्वेचे जंक्शन अशी ओळख असलेल्या मनमाडला साहित्याच्या नकाशावर आणले. महाविद्यालयात अनेक नामवंत कवी, समीक्षकांना आमंत्रित करणे, चर्चासत्रे आयोजित करणे, नाशिक जिल्ह्य़ातील मराठीच्या प्राध्यापकांचे एक अभ्यासमंडळ स्थापन करणे या व अशा अनेक साहित्यविषयक उपक्रमांतून त्यांनी त्या परिसरातील साहित्यप्रेमींमध्ये साहित्यजाण रुजवली. रमेशच्या (डॉ. रमेश वरखेडे) उत्साही, कृतिशील वृत्तीला बाबांकडून मिळालेल्या प्रतिसादातून ‘अनुष्टुभ’ या द्वैमासिकाचा जन्म झाला. बाबांनी तन-मन-धन ओतून ‘अनुष्टुभ’चे लालन-पालन केले.

मालेगावपासूनच्या आम्हा विद्यार्थ्यांचे त्यांच्याशी आणि त्यांच्या सर्वच कुटुंबाशी घट्ट, जिव्हाळ्याचे कायमचे नाते जडून गेले आहे. आम्हा प्रत्येकांत कोणते गुण आहेत, ते जाणून त्याला बाबा नेहमीच आस्थापूर्वक मार्गदर्शन करत आले आहेत. आपण ‘म. सु. पाटील गुरुकुला’चे सदस्य आहोत याचा आम्हाला नेहमीच अभिमान वाटत आला आहे. बाबांचे आणि आमचे गुरू-शिष्य नाते हा स्वतंत्र लेखनाचा विषय होईल; त्याविषयी पुन्हा कधीतरी.

अध्यापनासाठी आपल्या विषयाची सखोल आणि परिपूर्ण तयारी करण्याच्या धारणेतून सरांचे लेखन सुरू झाले. १९८० नंतरच्या मराठी समीक्षाविश्वात त्यांच्या समीक्षेचा अमीट ठसा उमटलेला आहे. १९८१ मध्ये त्यांचे ‘दलित कविता’ प्रसिद्ध झाले. पुढच्याच वर्षी ‘अक्षरवाटा’, मग १९८९ मध्ये ‘आदिबंधात्मक समीक्षा’, ‘सदानंद रेगे यांचे काव्यविश्व’, ‘बालकवींचे काव्यविश्व’, १९९० साली ‘भारतीयांचा साहित्यविचार’, १९९९ साली ‘कवितेचा रूपशोध’, २००१ साली ‘साहित्याचे सामाजिक व सांस्कृतिक अनुबंध’ आणि ‘इंदिरा यांचे काव्यविश्व’, २००४ साली ‘ज्ञानेश्वरीचा तृष्णाबंध’, ‘तुकाराम : अंतर्बाह्य़ संघर्षांची अनुभवरूपे’, २००६ साली ‘ज्ञानेश्वरीचा काव्यबंध’, तर ‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध’ (२०१३) आणि यंदा प्रसिद्ध झालेले ‘बदलते कविसंवेदन’ या त्यांच्या समीक्षाग्रंथांतून त्यांची समीक्षादृष्टी आणि त्यांचा साहित्यविचार व्यक्त झाला आहे. २००८ मध्ये त्यांनी गणेश देवींच्या ‘After Amnesia’ या पुस्तकाचा केलेला ‘स्मृतिभ्रंशानंतर’ हा अनुवाद प्रसिद्ध झाला. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्यांनी – ‘देशीवाद ही राजकीय प्रणाली जातिवर्णादी असणाऱ्यांचे हितसंबंध सुरक्षित करण्यासाठी रूढ केली जात आहे’ अशी आपली देशीवादाविषयीची भूमिका कारणमीमांसेसह स्पष्टपणे मांडली आहे.

१९७० पूर्वी मराठी समीक्षाविश्वात साहित्याचा रूपविचार प्रभावी होता. सरांच्या लेखनाला सुरुवात झाली तेव्हा समीक्षेचा ध्रुव लौकिकतावादाकडे झुकला होता. सरांनी भारतीय साहित्यशास्त्र, पाश्चात्त्य साहित्यविचार आणि त्यांच्यापूर्वीची मराठी समीक्षा यांचा चिकित्सक अभ्यास करून व प्रत्यक्ष साहित्यकृतींच्या निकट वाचनातून आपली आशयनिष्ठ रूपवादी भूमिका निश्चित केली. कथनात्मक साहित्य, आत्मचरित्र, नाटक या साहित्यप्रकारांची त्यांनी समीक्षा केली असली, तरी त्यांनी केलेली सर्वाधिक समीक्षा काव्य या साहित्यप्रकाराची आहे. तीतून ते कवितेविषयी बोलतात; तसेच एकूण साहित्याविषयीही बोलतात.

म. सु. पाटील यांची समीक्षा संहिताकेंद्री असते. संहिताबाह्य़ निकषांनी कवितेचे मूल्यांकन करणे त्यांनी नेहमीच नाकारले आहे. १९६० च्या दशकाच्या अखेरीस सुरू झालेल्या दलित साहित्यचळवळीचे मन:पूर्वक स्वागत करतानाच, ‘दलित सौंदर्यशास्त्रा’ची मागणी त्यांनी याच भूमिकेतून फेटाळून लावली आणि कवीची प्रतीतीनिष्ठा हा कवितापणाचा महत्त्वाचा निकष असल्याचे नि:संदिग्धपणे सांगितले. कवीच्या प्रतीतीनिष्ठेचा व संवेदनशीलतेचा शोध घेताना सरांनी विविध ज्ञानव्यूहांचे गंभीरपणे उपयोजन केले. त्यात त्यांना कार्ल युंगची मानवी मनाची संकल्पना अधिक रुचली. युंगच्या आदिबंधाचा सिद्धांत मराठी परिभाषेत रुजविण्याचे व त्याचे संगोपन करण्याचे महत्त्वाचे कार्य सरांनी केले. ज्ञानदेवांपासून वसंत आबाजी डहाके यांच्यापर्यंतच्या भिन्न भिन्न काळातील, भिन्न प्रवृत्तींच्या कवींच्या काव्याची त्यांनी आदिबंधात्मक दृष्टीने समीक्षा केली आणि भिन्न काव्यप्रवाहांचे याच दृष्टीने व्यवस्थापन केले.

केशवसुतांनी मराठी कवितेत क्रांती केली असे नेहमीच म्हटले जाते. केशवसुतांच्या क्रांतिकारकत्वाचा शोध घेताना सरांनी ‘कवीची संकरदृष्टी व काव्यातील युगांतर’ हा एक वेगळाच विचार समीक्षेला दिला. ज्ञानदेवांच्या काव्यात अभिजात- रोमँटिक, तुकारामांच्या काव्यात रोमँटिक- वास्तववादी, केशवसुतांच्या कवितेत वास्तववादी- रोमँटिक, तर मर्ढेकरांच्या कवितेत वास्तववादी- अस्तित्ववादी या काव्यदृष्टींचा संकर असल्याचे त्यांनी सोदाहरण दाखवून दिले. या संकरदृष्टीच्या कवींनी मराठी कवितेत युगांतर घडविल्याचे प्रतिपादन केले. संकरदृष्टीचे कवी आत्मसाधक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. कवीच्या संपूर्ण रचनेचे सौंदर्य उलगडत, कवीच्या काव्यात्म क्लृप्त्यांचा मागोवा घेत कवीच्या काव्यविश्वाचे कानेकोपरे ते आपल्या सर्जनशील संज्ञेने उजळून टाकतात.

सरांनी मांडलेला ‘तृष्णामूलकतेचा सिद्धांत’ ही त्यांनी मराठी समीक्षेला दिलेली देणगी आहे. कामना, एषणा, इच्छा, कांक्षा, स्पृहा, वांच्छा, लिप्सा, अभिलाषा, मनोरथ, वासना ही सर्व तृष्णेची रूपे आहेत. जाणीव-नेणिवेतील या तृष्णा शमल्या नाहीत, तर त्या आभासाचा पाठलाग करतात. त्यातून कलासृष्टीची निर्मिती होते. काव्यात या तृष्णा वक्रोक्ती, लक्षणा, व्यंजना यांतून व्यक्त होत नसत्याला असतेपण देतात. ज्या साहित्यकृतीच्या शब्दार्थरूपांत कमीअधिक समृद्ध अनुभव देण्याची, तृष्णांचे शमन करण्याची क्षमता असते ती साहित्यकृती मूल्यवान असते. ती रसिकाला समधाततेचा, तृष्णाक्षयसुखाचा अनुभव देते, असे त्यांचे प्रतिपादन आहे.

‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध’ या त्यांच्या छोटेखानी ग्रंथाला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. सरांना नेहमीच काव्याविषयी आत्मीयता, कविमनाविषयी कुतूहल आणि काव्यनिर्मितीविषयी उत्सुकता वाटत आली आहे. प्रदीर्घकाळ त्याविषयी केलेल्या व्यासंगाच्या आणि चिंतनाच्या मंथनातून प्रस्तुत ग्रंथ सिद्ध झाला आहे. भारतीय साहित्यशास्त्र आणि भारतीय तत्त्वविचार, पाश्चात्त्य साहित्यविचार आणि सौंदर्यशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, पाश्चात्त्य व मराठीतील कवींच्या काव्यातून व्यक्त झालेला काव्यनिर्मितीविषयक विचार.. या साऱ्या अभ्यासातून काव्यनिर्मितीमागील प्रेरणा, काव्यात्म अनुभवाचे स्वरूप, कविमनाच्या संवेदनशीलतेचे विशेष, कवीने घेतलेला वास्तवातील अनुभव, गूढानुभव, स्वप्नानुभव आणि त्यांचे काव्यानुभवात रूपांतर होताना कवी अनुभवत असलेले सर्जनप्रक्रियेतील द्वंद्व व ताण, कलाकृतीतील विविध घटकांमधून तिला येणारे सेंद्रिय रूप, काव्यात्म अनुभवाला प्राप्त होणारी विश्वात्मकता अशा अनेक अंगांनी त्यांनी सर्जनप्रेरणांचा व कविमनाचा शोध घेतला आहे. काव्यनिर्मितीमागील प्रेरणा आणि कवीच्या संवेदनशीलतेच्या विशेषांविषयी पूर्वसुरींनी मांडलेल्या सर्व सिद्धांतांना ते यात स्पर्श करतात. सरांच्या समीक्षेचा विशेष असा की, ते कधी आवेशाने खंडन-मंडनात्मक भूमिका घेत नाहीत. परंतु आधी मांडल्या गेलेला विचार सर्वागांनी तपासून घेतात. त्याचे अन्वयार्थ जाणून घेतात. त्यात अपुरेपणा वाटल्यास त्यात भर घालतात आणि एखादा विचार सौम्यपणे, परंतु ठामपणे नाकारतात. प्रस्तुत पुस्तक वाचत असताना असे मनात येते की, या विषयावरील त्यांचा आयुष्यभराचा अभ्यास व चिंतन येथे जणू ‘कॅप्सुल’च्या रूपात आले आहे.

एवढे खरे की, सरांची समीक्षा व साहित्यविचार समजून घेण्यासाठी अभ्यासकालाही आपल्यातील ज्ञानक्षमता वाढविण्याची नितांत गरज आहे.

pratibhakanekar@gmail.com