जयंत टिळक

हिंदी चित्रपट संगीतात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रभावी वापर करणाऱ्या संगीतकार नौशाद यांची जन्मशताब्दी २५ डिसेंबर रोजी सुरू होत आहे. त्यानिमित्तानं..

Sita & Akbar: How names of two lions became the reason for a plea in Calcutta High Court
अकबराची बहीण लक्ष्मी? अकबर, सीता, तेंडुलकर आदी नावं प्राण्यांना द्यायची पद्धत कशी पडली?
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
Yash Mittal Murder Noida
व्यावसायिकाच्या मुलाची चार मित्रांकडून हत्या; वडिलांकडून मागितली सहा कोटींची खंडणी
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…

सन १९३१. लखनौमधला एक दहा-बारा वर्षांचा मुलगा. त्याच्या घराशेजारीच एक सिनेमागृह होतं. तो जमाना मूकपटांचा  होता. त्यामुळे चित्रपटांना ‘लाइव्ह’ पार्श्वसंगीत दिलं जात असे. लखनौतील या चित्रपटगृहात उस्ताद लादन व त्यांचे सहकारी विविध वाद्यांच्या साहाय्याने पडद्यावरील प्रसंगानुरूप पार्श्वसंगीत देत. हा मुलगा तहानभूक हरपून त्यांचं ते वादन ऐकत, बघत बसे. मोठेपणी आपणही या लादनसाहेबांसारखंच, किंबहुना याहूनही मोठय़ा ऑर्केस्ट्राचं संचालन करायचं, हे त्यानं तेव्हाच ठरवून टाकलं होतं. शाळेच्या पुस्तकांऐवजी वादकांच्या नोटेशन पुस्तकाचंच त्याला अधिक आकर्षण होतं.

त्याच्या शाळेच्या रस्त्यावर वाद्यांचं एक मोठं दुकान होतं. हा मुलगा रोज त्या दुकानासमोर उभा राहून शोकेसमध्ये मांडून ठेवलेल्या वाद्यांकडे मोठय़ा औत्सुक्यानं बघत बसे. एक दिवस न राहवून दुकानाच्या मालकानं त्याला बोलावून विचारलं, ‘‘बाळा, रोज तू इथं उभा राहून काय न्याहाळतोस?’’ मुलगा म्हणाला, ‘‘मला तुमची ही वाद्यं बघायला खूप आवडतात. मला तुमच्या दुकानात काम द्याल का? मी दुकान उघडीन, साफसफाई करीन.’’ मालकाला त्याच्या नजरेतलं वाद्यांबद्दलचं प्रेम, कुतूहल जाणवलं आणि त्यांनी त्याला कामावर ठेवलं. रोज तो वेळेवर दुकान उघडायचा. दुकानाची साफसफाई झाली की तो एकेक वाद्य अलगदपणे हाताळायचा. वाजवूनही बघायचा. त्याच्या हाती जणू स्वर्गच लागला होता. हळूहळू पियानोवर त्याची बोटं सराईतपणे फिरू लागली. सतारीतून मधुर स्वर उमटू लागले. तबल्यामधून ‘धाधिंधिंधा’चे बोल निघू लागले.

एक दिवस मात्र मोठा गहजब झाला. त्याची जराशी लांबलेली मैफल संपली आणि त्यानं मान वर करून पाहिलं तर समोर दुकानाचे मालक गुरबत अली उभे होते. तो कावराबावरा झाला. ‘‘किसकी इजाजत से साज बजाते हो?’’ मालक कडाडले- ‘‘तुमको सजा मिलेगी!’’ आता शंभरी भरलीच आपली. मारही खावा लागणार आणि बहुधा नोकरीही जाणार याची मनोमन खूणगाठ बांधून, रडवेला होऊन तो खाली मान घालून उभा राहिला. पण काय आश्चर्य! गुरबत अलींनी मार देण्याऐवजी त्याला जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवीत म्हणाले, ‘‘कब सिखा ये सब तुमने? संगीत और साजों से तुम्हें इतना लगाव है?’’ आश्चर्यातिरेकाने त्या मुलाच्या तोंडून शब्दही फुटेनात. खालमानेने त्यानं फक्त ‘हो’ म्हटलं. ‘सजा’ म्हणून गुरबत अलींनी तिथली एक उत्तम हार्मोनियम त्या मुलाला भेट दिली. हाच मुलगा पुढे ‘संगीतकार नौशाद अली’ म्हणून नावारूपाला आला!

अर्थात संगीतकार होण्याचा त्याचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. घराशेजारी असणाऱ्या सिनेमागृहातील ऑर्केस्ट्रामध्ये त्याने शिरकाव केला. तिथे विविध वाद्यं तो वाजवू लागला. लखनौच्या दरबारात मुन्शी असणाऱ्या त्याच्या वडलांना मात्र हे भिकेचे डोहाळे मंजूर नव्हते. नौशादला घरी यायला रोज उशीर होई आणि रोज त्याला वडलांच्या छडीचा प्रसाद मिळे. वडलांनी दिलेल्या ‘शाळा की संगीत?’ या पर्यायातलं ‘संगीत’ निवडून वयाच्या बाराव्या वर्षी तो घराबाहेर पडला. त्यानं स्वत:चा ऑर्केस्ट्रा उभारला. दिल्ली, जयपूर, जोधपूर, सौराष्ट्र असा दौरा आखला. धडाक्याने कार्यक्रम केले. शेवटच्या कार्यक्रमात मात्र कॉन्ट्रॅक्टरने धोका दिला आणि हे महाशय दादरच्या फूटपाथवर येऊन धडकले. दिवसभर या स्टुडिओतून त्या स्टुडिओत काम मिळवण्यासाठी चकरा मारायच्या आणि रात्री ‘ब्रॉडवे’समोरच्या फूटपाथवर येऊन पथारी अंथरायची. पावसाळ्यात मात्र तिथल्या शिवाजी भवनच्या मालकांनी जिन्याखाली झोपण्याची त्यांना परवानगी दिली होती, हाच काय तो दिलासा होता.

पुढे १९५२ साली त्यांनी संगीत दिलेला ‘बैजू बावरा’ हा सुपरहिट् चित्रपट याच ‘ब्रॉडवे’मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना ‘फिल्मफेअर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासंदर्भात नौशादजी नेहमी गमतीने म्हणत, ‘‘या फूटपाथवरून त्या फूटपाथवर जायला मला तब्बल वीस वर्षे लागली!’’

हिंदी चित्रपट संगीत हा भारतीयांसाठी अनमोल ठेवा आहे. प्रत्येक गाण्यावर त्या- त्या संगीतकाराच्या शैलीची, ढंगाची अमीट छाप उमटलेली आहे. बंगाली आणि आसामी लोकधुनांचा वापर हे एस. डी. बर्मन, सलील चौधरी यांचं वैशिष्टय़, तर पंजाबी ठेका हे ओ. पी. नय्यर यांचं. साध्या-सरळ भावपूर्ण रचना हे हेमंतकुमार यांचं बलस्थान, तर सतारीच्या सुरांनी अलंकृत झालेल्या गजला ही मदनमोहन यांची ओळख. अनोखी ‘ऱ्हिदम अ‍ॅरेंजमेंट’ आणि कंगवा, पाण्याचा ग्लास अशा अनोख्या, चित्रविचित्र ‘वाद्यां’चा वापर हे पंचम अर्थात आर. डी. बर्मन यांचं वैशिष्टय़. तर प्रचंड मोठा वाद्यमेळ ही शंकर-जयकिशन आणि लक्ष्मी-प्यारे यांची खासियत. तसंच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा मोठय़ा प्रमाणावर वापर करणारे संगीतकार ही नौशाद यांची ओळख. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांवर सहज दृष्टिक्षेप टाकला तर दिसून येईल की, त्यांचे जवळपास प्रत्येक गाणे कोणत्या ना कोणत्या रागावर आधारित आहे. उदाहरणादाखल आपण ‘बैजू बावरा’मधली गाणी बघू. ‘मोहे भूल गये सावरिया..’ या गीतातील आर्त भाव आणि विरहवेदना व्यक्त करण्यासाठी त्यांनी राग भैरव वापरला. तर ‘तू गंगा की मौज मैं..’ला त्यांनी राग भैरवीची डूब दिली. ‘ओ दुनिया के रखवाले..’साठी त्यांनी भारदस्त अशा राग दरबारी कानडाचा वापर केला, तर ‘मन तडपत हरी दर्शन को आज..’मधली व्याकूळता व्यक्त करण्यासाठी राग मालकंसचे सूर वापरले. ‘दूर कोई गाये..’ हे लोकगीताचा बाज असलेले गीत त्यांनी राग देसमध्ये बांधले. ‘आज गावत मन मेरो झूम के..’ या तानसेन आणि बैजू यांच्या  जुगलबंदीसाठी देसी या गोड रागाचा वापर त्यांनी केला. ‘घनन घनन घन..’साठी राग मेघ, तर ‘बचपन की मुहब्बत को..’साठी त्यांनी      राग मांड वापरला. ‘झूले में पवन की आयी बहार..’ या युगुलगीतावर त्यांनी राग बसंत पिलू या जोडरागाचा साज चढविला.

‘बैजू बावरा’चं संगीत प्रचंड लोकप्रिय ठरलं. १९५२ मध्ये नुकतीच ‘बिनाका गीतमाला’ सुरू झाली होती. ३ डिसेंबर १९५२ रोजी सादर झालेल्या ‘बिनाका’ कार्यक्रमात पहिलं वाजलेलं गीत होतं- ‘बैजू बावरा’मधील ‘तू गंगा की मौज मैं जमुना का धारा..’!

‘बैजू बावरा’नंतर १९६० मध्ये मोठय़ा थाटामाटात प्रदर्शित झालेल्या के. असिफच्या ‘मुघल-ए-आझम’चं संगीतही प्रचंड लोकप्रिय ठरलं. त्यातील ‘मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे..’ या ठुमरीसाठी त्यांनी राग ‘गारा’चा वापर केला. या गाण्याच्या म्युझिक पीसमध्ये केवळ एकच सतार वाजत नाही, तर अनेक सतारी झंकारतात. आणि लताबाईंच्या आवाजाबद्दल काय बोलावं! ‘कंकरिया मोहे मारी गगरिया फोर डाली..’नंतरची छोटीशी तान त्या इतकी सुरेख घेतात, की पुन:पुन्हा ती ऐकत राहावी. ‘ये दिल की लगी कम क्या होगी..’ हे ‘मुघल-ए-आझम’मधील आणखी एक वैशिष्टय़पूर्ण गाणं! जयजयवंती रागातील या गाण्याचा प्रत्येक अंतरा वेगळ्या चालीत आहे. ‘बेकस पे करम कीजिए..’मधली आर्तता त्यांनी राग केदारच्या सुरांतून साकारलीय, तर ‘खुदा मेहेरबाँ हो तुम्हारा..’साठी यमन!

नौशादजींनी संगीतबद्ध केलेल्या ‘मधुबन में राधिका नाचे..’ या ‘कोहिनूर’मधील राजदरबारातल्या गीतासाठी त्यांनी राग हमीर या जोशपूर्ण रागाचा वापर केला. ‘दिल दिया दर्द लिया’ या चित्रपटातलं ‘सावन आये या न आये..’ हे युगुलगीत त्यांनी राग वृंदावनी सारंगमध्ये बांधलं, तर ‘कोई सागर दिल को..’ या गाण्यातली उद्विग्नता व्यक्त करण्यासाठी त्यांनी राग कलावतीचा वापर केला. ‘दिल दिया दर्द लिया..’साठी सदाबहार अशा यमनची सुरावट त्यांनी वापरली. मारवा हा खरं तर हुरहूर लावणाऱ्या कातरवेळेचा राग. पण ‘साज और आवाज’मधील ‘पायलिया बावरी..’ हे सुंदर नृत्यगीत मारव्यामध्ये त्यांनी छान खुलवलंय. याच चित्रपटातलं ‘साज हो तुम आवाज हूँ..’ हे रफीसाहेबांनी गायलेलं आणखी एक सुंदर गीत पियानोच्या सुरात सुरू होतं. त्रितालात बांधलेलं हे गाणं राग पटदीपमध्ये आहे. पण ‘प्रेम तराना रंग पे आया..’ या दुसऱ्या अंतऱ्यात सुरावट बदलते आणि ती मधुवंती-काफीच्या अंगाने पुढे जात पुन्हा पटदीपमध्ये येते. चित्रपटाचे शीर्षकच ‘साज और आवाज’ असल्याने यातल्या गाण्यांत नौशादसाहेबांनी जवळजवळ सर्व वाद्यांचा बहारदार वापर केलेला आहे.

त्यांनी संगीत दिलेल्या ‘रतन’, ‘अंदाज’, ‘दीदार’, ‘उडन खटोला’, ‘गंगा जमुना’, ‘कोहिनूर’, ‘मेरे मेहबूब’, ‘साज और आवाज’, ‘बैजू बावरा’, ‘मदर इंडिया’ आणि ‘मुघल-ए-आझम’ या चित्रपटांतली सगळीच्या सगळी गाणी हिट् झाली. उस्ताद बडे गुलाम अली खाँ, उस्ताद आमीर खाँ आणि पं. डी. व्ही. पलुस्कर या शास्त्रीय संगीतातल्या दिग्गज गायकांकडून चित्रपटांसाठी गाऊन घेण्याची किमया नौशादजींनी ‘बैजू बावरा’ आणि ‘मुघल-ए-आझम’मध्ये करून दाखविली. नौशादजींनी चित्रपट संगीतकारास  प्रतिष्ठा मिळवून दिली.

नौशाद उत्कृष्ट पियानिस्ट होते. पाश्चात्य स्वरांचंही त्यांना उत्तम ज्ञान होतं. ते वापरत असलेल्या प्रत्येक वाद्याची त्यांना सखोल माहिती होती. कोणत्या म्युझिक पीससाठी कोणतं वाद्य उचित ठरेल, हे त्यांना अचूक समजे. १९४९ मध्ये पडद्यावर आलेल्या ‘अंदाज’ या चित्रपटातील नायक दिलीपकुमार ‘तू कहे अगर जीवनभर..’, ‘हम आज कहीं दिल खो बैठे..’, ‘झूम झूम के नाचों आज..’ आणि ‘टूटे ना दिल टूटे ना..’ ही चारही गाणी पियानोवर बसून म्हणतो.

‘अंदाज’ या चित्रपटातील ‘तू कहे अगर जीवनभर..’ या गाण्याच्या तालमीसाठी नौशादनी गायक मुकेशना तब्बल २३ वेळा बोलावलं होतं! तेव्हा नौशादजी वांद्रय़ाला, तर मुकेश मुंबईच्या दुसऱ्या टोकाला- मलबार हिलला राहायचे. लतादीदींच्या बाबतीतही त्यांचा तोच खाक्या असे. ते म्हणत, ‘शिष्टाचार म्हणून मी तिच्या घरी हव्या तितक्या वेळा जाईन; पण रिहर्सलसाठी तिनं माझ्याच घरी आलं पाहिजे!’

नौशादजींनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत त्यांच्या लाडक्या रफीचा आवाज दिलीपकुमारसाठी वापरला. दिलीपकुमारसाठी सुरुवातीला तलत महमूद यांचा आवाज वापरला जाई. ‘अंदाज’मध्ये मात्र त्यांनी दिलीपकुमारसाठी मुकेश यांचा आवाज वापरला. (जो पुढे ‘राज कपूरचा आवाज’ ठरला!) गंमत म्हणजे ‘अंदाज’मध्ये राज कपूरसाठी नौशादजींनी चक्क रफीसाहेबांचा आवाज वापरला आणि पुढे ‘दास्तान’मध्येही! ‘अंदाज’नंतरच्या ‘बाबूल’साठी मात्र नौशादजींनी दिलीपकुमारसाठी तलत महमूद यांचा आवाज वापरला. परंतु याच ‘बाबूल’मधील एका गाण्याच्या रेकॉर्डिगच्या वेळी त्यांनी तलत यांच्या धूम्रपानाचं निमित्त करून त्यांच्या नावावर कायमची काट मारली. तर तिकडे लतादीदींच्या झंझावातामुळे काहीशा अडगळीत पडलेल्या शमशादला त्यांनी ‘बाबूल’मधील गाणी गाण्यासाठी पुन्हा एकदा पाचारण केलं. शमशादनेही ‘छोड बाबूल का घर..’, ‘ना सोचा था दिल लगाने से पहले..’, ‘धडके मेरा दिल..’ ही सोलो, तर ‘दुनिया बदल गयी..’ आणि ‘मिलते ही आंखे दिल हुआ दीवाना..’ ही युगुलगीते तलत महमूद यांच्यासोबत ठसक्यात म्हटली. परंतु १९५१ मधील ‘दीदार’ व पुढच्याच वर्षी ‘बैजू बावरा’नंतर त्यांनी गायिकांत लतादीदी व गायकांत रफी यांनाच प्राधान्य दिलं. १९५७ मधील ‘मदर इंडिया’ आणि १९६० च्या ‘मुघल-ए-आझम’मधील काही गाण्यांत त्यांनी शमशादचा आवाज वापरला खरा; पण तो नायिकांसाठी नाही. त्यांच्या नायिकांसाठी केवळ लतादीदींचाच आवाज असे. त्यांनी तलत महमूद, मुकेश, मन्ना डे, महेन्द्र कपूर या पार्श्वगायकांचा नाममात्रच वापर केला. किशोरकुमार तर त्यांना जणू वज्र्यच असावा. योगायोगाने म्हणा वा कसं, त्यांचं संगीत ज्या चित्रपटांना आहे, त्यात नायक बहुतेक दिलीपकुमारच असे. (‘अंदाज’, ‘बाबूल’, ‘दीदार’, ‘आन’, ‘उडन खटोला’, ‘कोहिनूर’, ‘मुघल-ए-आझम’, ‘गंगा जमुना’, ‘लीडर’, ‘राम और शाम’, ‘आदमी’, ‘संघर्ष’, ‘दिल दिया दर्द लिया’ इत्यादी.) जसं नौशादजींनी रफी-लता यांना गायनाच्या बाबतीत झुकतं माप दिलं, तसंच गीतकारांमध्ये शकील बदायुनीला! तसं पाहिलं तर हिंदी चित्रपटसृष्टीत गीतकाराचं एखाद्या संगीतकाराशी किंवा संगीतकाराचं गीतकाराशी विशेष ‘टय़ूनिंग’ जमलेलं दिसतं. उदाहरणंच द्यायची झाली तर शैलेन्द्र- शंकर-जयकिशन, साहिर- रवी, राजा मेहंदी अली खाँ- मदनमोहन, एस. एच. बिहारी- ओ. पी नय्यर, वर्मा मलिक- सोनिक ओमी, आनंद बक्षी- लक्ष्मीकांत-प्यारेलाल, इंदिवर- कल्याणजी- आनंदजी या जोडय़ांचा उल्लेख करावा लागेल. या जोडय़ांहून अभेद्य जोडी होती, ती म्हणजे शकील बदायुनी- नौशाद यांची!

नौशादजींनी संगीतबद्ध केलेल्या सुमारे ६७ चित्रपटांपैकी सुमारे ५० चित्रपटांची गाणी एकटय़ा शकील बदायुनींनी लिहिली आहेत. शाहजहाँ’मधील (१९४६) सैगलने गायलेलं ‘जब दिल ही टूट गया..’, ‘अंदाज’मधली (१९४९) ‘झूम झूम के नाचों आज..’, ‘उठाये जा उन के सितम..’, त्यानंतर थेट १९६८ मधील ‘साथी’ या चित्रपटातील ‘मेरा प्यार भी तू है..’ अशा काही अपवादात्मक गाण्यांसाठी नौशाद यांनी मजरुह सुलतानपुरी यांची लेखणी वापरली. तसंच ‘साज और आवाज’मधील ‘साज हो तुम आवाज हूँ मैं..’ या गाण्यासाठी कुमार बाराबंक्वी यांना संधी मिळाली. बाकीच्या जवळजवळ सर्वच चित्रपटांसाठी शकील एके शकील बदायुनी!

नौशादजींच्या परफेक्शनच्या ध्यासाबद्दल लतादीदी म्हणतात- ‘नौशादजींचे समकालीन गुलाम हैदर, शामसुंदर, खेमचंद प्रकाश, अनिल विश्वास ही मंडळी अतिशय झटपट संगीतरचना करत. कधी कधी अक्षरश: दहा मिनिटांतही त्यांची धून तयार होई. नौशादजी मात्र प्रत्येक संगीतरचनेसाठी खूप परिश्रम घेत. प्रत्येक स्टेपवर तपशिलाचा बारकाईने अभ्यास करत. बोलांबद्दल अत्यंत जागरूक असत. एखाद्या गाण्याचं संगीत संयोजन करायला त्यांना १५ दिवसही लागत. एखाद्या शब्दरचनेविषयी त्यांना असमाधान वाटलं तर गीतकाराला संपूर्ण ओळसुद्धा ते बदलायला लावीत.’

म्हणूनच तर आज ५०-६० वर्षांनीसुद्धा नौशादजींनी संगीतबद्ध केलेली गाणी आवर्जून ऐकली जातात. आजची गाणी पुढल्या वर्षी तरी ऐकली जातात का?