रॉय किणीकर.. ‘दीपावली’, ‘धरती’, ‘चिमुकली दिवाळी’ आदी दिवाळी अंकांचे सर्जनशील संपादक, रुबायाकार, कथाकार, नाटककार, ललित लेखक अशा विविधांगी प्रतिभेचं अवलिया व्यक्तिमत्त्व! येत्या ५ सप्टेंबर रोजी त्यांचा ४० वा स्मृतिदिन येत आहे. त्यानिमित्तानं त्यांचे पुत्र अनिल किणीकर यांनी रेखाटलेलं त्यांचं शब्दचित्र..

जोशी हॉस्पिटल. वॉर्ड नं. ७. पेशंट नं. ११!

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
jewellery police pune
पुणे : रिक्षा प्रवासी महिलेचे सात तोळ्यांचे दागिने गहाळ; पाेलिसांच्या प्रयत्नांमुळे दागिन्यांचा शोध
girish mahajan manoj jarange
“मनोज जरांगेंना माफी नाही, त्यांनी आता…”, गिरीश महाजनांचा टोला; म्हणाले, “त्यांच्या डोक्यात…”

दुपारचे साडेतीन वाजलेले.

सिस्टरची राऊंड.

‘‘चला, पेशंट नं. ११..’’

‘चला, हा उठलोच.’’

‘‘हां.. उठू नका. चला म्हणजे नाडी दाखवा.’’

‘‘हां.. पाहा.’’

टिक्.. टिक्.. टिक्.. टिक्..

‘‘सिस्टर, लागतेय का नाडी हातात?’’

‘‘त्याशिवाय तुम्ही बोलताय का?’’

‘‘आम्ही काय, नाडीशिवाय पण बडबडतो.. सिस्टर, डॉक्टर कधी येणार?’’

‘‘संध्याकाळी.. नेहमीप्रमाणे. का? काही काम आहे का?

‘‘हो, आहे ना. संध्याकाळी नेहमीप्रमाणे डॉक्टर आले की त्यांना मी एक गोष्ट मागणार आहे..’’

‘‘काय?’’

‘‘अजून एक वर्षांचं आयुष्य!’’

‘‘कशासाठी काका?’’

‘‘अहो, पुढचं वर्ष ‘बालक वर्ष’ आहे. लहान मुलांचा एक दणदणीत दिवाळी अंक काढायचा आहे.. ‘चिमुकली दिवाळी’चा!’’

‘‘मग त्यासाठी एकच वर्ष बास?’’

‘‘बस्स. आता पाय दमले आहेत.. थकले आहेत.. वाटतं.. पण सिस्टर, डॉक्टर आले की नक्की सांगा हं. डोन्ट फर्गेट.’’

असं वाटतंय, की चेकअप् होऊन रॉय किणीकर बाहेरगावी गेले आहेत. गेले १५-२० दिवस ते मुंबईला गेले असतील. लहान मुलांच्या दिवाळी अंकाची जमवाजमव करायला. अचानक येतील अन् डमी दाखवतील. म्हणतील, ‘‘अरे, आयडिया सर्वाना एकदम आवडली. शरद पवार, जयवंत दळवी, माधव मनोहर, अच्युत बर्वे, शंकर सारडा वगैरेंनी तर सर्व प्रकारची मदत ‘ऑफर’ केलीय. दणदणीत डिलक्स एडिशन काढायची! मराठी, इंग्रजी, हिंदीमध्ये. फर्स्ट क्लास इल्स्ट्रेशन्स गोंधळेकर देणार आहेत. तुझ्या त्या सुभाष अवचटलाही सांग.. इसापनीती, साने गुरुजी, ताम्हणकर वगैरेंपासून ते टॉम्स सॉयर, डेव्हिड कॉपरफिल्ड, हॅन्स अँडरसनपर्यंत सर्व सर्व..’’

चला.. आता फोल्डर तयार करू..

डमी तयार आहे.

चित्रं, गोष्टी.. सर्व सर्व तयार आहे.

वाट पाहतोय ती संपादक रॉय किणीकर यांची

त्यांच्या चित्रकार मित्राने- दीनानाथ

दलालांनी त्यांना शपथ घातली आहे :

अशाच एका उत्तररात्री

इथून जाताना

लक्षात ठेव.. विसरू नकोस

दर दिवाळीला काळोखाचे वादळ

घेऊन येते अमावस्या

त्या वेळी जळू दे

तुझीही लहानशी पणती!

वाट चुकलेल्यांना नव्हे, तर

तुझ्याच थकलेल्या पायांना मिळेल

त्या मिणमिणत्या प्रकाशाची

काठी आधाराला!

जाणे आहे असेच पुढे पुढे

तुला वेडय़ा

वाहून पायात न संपणाऱ्या

स्वप्नांच्या आणि न तुटणाऱ्या ध्येयांच्या बेडय़ा!

त्यांची ही दिवाळी ‘तशी’ जाणार नाही. तेथेही त्यांनी तयारी सुरू केली असेल. तिथे असतील मर्ढेकर, पु. शि. रेगे, ग. दि. माडगूळकर, वि. स. खांडेकर, चिं. त्र्यं. खानोलकर आणि कुणी कुणी.. आणि चित्रकार दलाल व संपादक रॉय किणीकर. दिवाळी अंकाचे नाव असेल- ‘स्वप्नयात्रा’!

या प्रचंड विश्वाच्या पसाऱ्यात नियती नावाची एक शक्ती आहे. आणि ती पृथ्वीवरच्या मानवांना सतत एक प्रकारचं कोडं घालत असते. अशा काही गूढ, रहस्यमय गोष्टी ती समोर मांडून ठेवते, की त्यामुळे जीवनाचं अस्तित्वच अर्धवट, स्वप्नवत वाटू लागतं.

वास्तव कुठं संपतं? स्वप्न कुठं सुरू होतं? स्वप्न विकत घेणारे अन् स्वप्न विकत देणारे ते एक स्वप्नयात्री होते.

दिवाळी आली की लहानपण आठवतं..

आजूबाजूला दिवाळीचं वातावरण तयार व्हायचं. चकल्या-लाडूंचे वास यायचे. फटाके पाहायला मिळायचे. नव्या कपडय़ांच्या गोष्टी ऐकायला यायच्या.

आम्ही भावंडं मात्र बाबासाहेबांची वाट पाहत घरात बसायचो. अगदी उत्सुकतेनं. सारखं कुणीतरी बसस्टॉपवर जाईल, कुणी खिडकीत बसून वाट पाहील.. वाट पाहून पाहून निराशा व्हायची.. अन् नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे बाबासाहेब अचानक येणार.. आणि मग बाबा आलेत- या आनंदानं आमची दिवाळी सुरू व्हायची.

पहाटे उठल्या उठल्या आम्ही सर्व भावंडं त्यांच्याभोवती जमणार अन् जादूगाराची पोतडी उघडावी तसं ते बॅग उघडून १०-१२ दिवाळी अंक काढणार, समोर मांडणार आणि म्हणणार, ‘‘हे घ्या लाडू-चकल्या. चला, आपली दिवाळी सुरू!’’ ..आणि नंतर स्वत: काढलेल्या दिवाळी अंकाचा कोपऱ्यातील गठ्ठा दाखवणार. तो गठ्ठा कधी ‘दीपावली’चा, तर कधी ‘धरती’चा किंवा कधी ‘यामिनी’चा असणार. नंतर मग ढुंगणावर फाटलेल्या चड्डय़ा अन् बाह्य़ांवर विरलेले फ्रॉक जाऊन नव्या कपडय़ांचा वास आनंदित करणार.

रॉय किणीकर माझे जन्मानं वडील होते. पण त्याहून अधिक म्हणजे मनानं ते माझे जिवलग मित्र होते.

‘दिल्ली दरवाजा’ मासिकाचं काम सुरू करायच्या वेळी मी त्यांना म्हणालो, ‘‘बाबासाहेब, आता आपणच काहीतरी सुरू करू. दुसऱ्यांसाठी किती दिवस अशी धावपळ करायची?’’

मिश्कीलपणे हसत ते म्हणाले, ‘‘धावपळ कसली? अरे, एकदा आचाऱ्याचा धंदा स्वीकारल्यानंतर बोलावणं येईल तिथे झारा-कढई घेऊन जायचं.. अंऽऽ..’’

क्षणभर गंभीर व्हायचे आणि शांतपणे म्हणायचे, ‘‘तुला म्हणून सांगतो.. दिवाळी अंक हे ‘थ्रिल’ असतं बघ! वर्षभरात काही करायला मिळालं नाही तरी चालेल; पण एक दिवाळी अंक हवाच! आणि संपादन करणं इज नॉट अ जोक. एडिटिंग इज अ क्रिएटिव्ह प्रोसेस. एखाद्या ऑर्केस्ट्राचा कम्पोजर जसा असतो तसा एडिटर असतो. विविध सूर-तालांतून जी एक सिम्फनी निर्माण होत असते ती त्याची स्वत:ची असते. दिवाळी अंकाचंही तसंच असतं. मागवलेल्या विविध प्रकारच्या लेखनातून एक प्रकारची हार्मनी निर्माण व्हायला पाहिजे. त्यासाठी इल्स्ट्रेशन्स, ले-आऊट्स, टेल पीसेस.. प्रत्येक पान न् पान फ्रॉम स्टार्ट टू एण्ड संपादन करणं म्हणजे एक क्रिएटिव्ह प्रोसेस असते. चार कथा, कविता, लेख एकत्र करून छापणं म्हणजे संपादक होणं नव्हे, किंवा दिवाळी अंक काढणं नव्हे. असे संपादक गल्लीबोळांतून असल्यामुळे दुर्दैवानं वाचकांना संपादकाची जाणीवच होत नसते. संपादकाला स्वत:ची अशी एक आयडेन्टिटी असावी लागते.

दुसरं म्हणजे वर्षांतलं सवरेत्कृष्ट लेखन आपल्या दिवाळी अंकाकडे पाठविण्याची इच्छा लेखकांना झाली पाहिजे. मराठी जाणणाऱ्या एखाद्या परभाषिकानं मराठी साहित्याविषयी जर विचारलं तर दिवाळी अंकाकडे बोट दाखवावं असं त्याचं स्वरूप असलं पाहिजे. शिवाय.. तर, ते जाऊ दे.. या सगळ्या अनुभवायच्या गोष्टी आहेत.’’

१९६८ ते १९७२ या काळात रॉयसाहेब ‘धरती’ दिवाळी अंक काढत असताना ती क्रिएटिव्ह प्रोसेस मी अनुभवली आणि मी मोहरलो.

महिन्यापूर्वीच मी त्यांना म्हणालो, ‘‘बाबासाहेब, दिवाळी आली. या वेळेस चार-पाच अंकांत लिहू किंवा या वेळेस तुमच्या आठवणीच सांगा.’’

किंचित हसून ते म्हणाले, ‘‘अरे, माणूस संपला किंवा सांगण्यासारखं नवीन काही नसलं की तो आठवणी सांगतो. आणि मी माझ्या आठवणी सांगणं म्हणजे केवळ अपयशाची कहाणी सांगणं. अपयशाची कहाणी आरोपीच्या बचावासारखी असते.. ते जाऊ दे.. मला अजून खूप वाचायचंय, लिहायचंय- ते निराळंच. मला ज्ञानेश्वरीचा अर्थ लिहायचा आहे तो ऑन द लाइन्स ऑफ डायलॉग्ज ऑफ प्लेटो. शिवाय थिएटर ऑफ दी अ‍ॅब्सर्डविषयी लिहायचंय.. ‘खजिन्याची विहीर’च्या (नाटकाच्या) प्रस्तावनेसाठी.. झालंच तर फोनेटिक्स आणि नवी भारतीय लिपी यावरचा प्रबंध लिहायचाय.. जयवंत दळवींच्या ‘सूर्यास्त’चा स्क्रीन-प्ले करायचा आहे. फार अप्रतिम पिक्चर होईल बघ. अगदी ‘अ‍ॅगनी अ‍ॅण्ड एस्टकसी’सारखं.. अनिल, दहाजणांच्या रांगेत जाऊन अकरावा म्हणून उभं राहण्यापेक्षा स्वत: एकटं उभं राहून स्वत:पुरतीच रांग करणं चांगलं..’’

एकटं उभं राहणं

आणि स्वत:पुरती रांग करणं

या प्रचंड कोलाहलात

आयुष्यभर जीवघेणा एकाकीपणा

आणि त्यातच

आर्थिक अपयशानं होरपळलेपणा..

दारिद्रय़ानं दैना केली, घायाळ झाले,

पण खचले नाहीत

कधी अपयशानं पाठ दाखवली, आनंदी राहिले,

पण थकले नाहीत मनानं कधी

कीर्ती, पैसा वगैरेंची कधी जाणीवच नाही

तरीही वृत्तीनं स्व-तंत्र

भूतकाळाचं स्मरण नाही

भविष्याची चिंता नाही

वर्तमानाचं भान नाही

– आहे तो केवळ धुंदपणा, कलंदरपणा!

आज इथं

उद्या तिथं

पायाला सतत भिंगरी

मैलोगणती चालत राहणारा

असा हा तरुण म्हातारा

रॉय किणीकर नावाचा

– एक आनंदयात्री!

शेवटच्या आठ दिवसांत त्यांना त्या ‘अज्ञात’ हाकेची चाहूल लागली असावी. आयुष्याच्या ‘उत्तररात्री’ची जाणीव झाली असावी. बहिणीला म्हणाले, ‘‘ मला थोडं ‘थकलेलं पाणी’ पाज.. इस्पितळात ‘उत्तररात्र’ खंडकाव्याचं लेखन चालू होतं..

‘घरटय़ात फडफडे

गडद निळे आकाश

फांदीवर झुलते हिरवी पाऊलधूळ

कानावर आली अनंतातून हाक

विसरून पंख पाखरू उडाले एक

 

फिरतसे काळजावर करवत धार

पंखात घेत आकाश फिरतसे घार

गातसे गीत ही माती पायतळीची

दाखवा वाट गर्भात परत जायाची

 

छे, तुटला पतंग, तुटला मांज्यादोरा

अंधार उतरला, सुटला वादळवारा

तो पहा फाटला पतंग खाऊन गोते

चिमुकले पिस बघ घरटे शोधित फिरे

 

हा देह तुझा, पण देहाविन तू कोण

हा देह तुझा, पण देहातील तू कोण

हा देह जन्मतो, वाढत जातो, सरतो

ना जन्म-मरण मज देहातील ‘तो’ म्हणतो

पाहिले, परंतु ओळख पटली नाही

ऐकले, परंतु अर्थ न कळला काही

चाललो कुठे पायांना माहीत नव्हते

झोपलो, परंतु स्वप्न न माझे होते

कोरून शिळेवर जन्म-मृत्युची वार्ता

जा ठेव पणती त्या जागेवर आता

वाचिल  कुणीतरी होताना उत्खनन

म्हणतील, कोण हा, कशास त्याचे स्मरण?’

‘एकनाथी भागवत’चं वाचन चालू होतं. वाचन थांबलं होतं त्या ओळीवर पेन्सिलीची खूण होती. त्या ओळी म्हणत होत्या..

‘तुटला आशेचा जिव्हाळा।

सुकले वोठ वाळला गळा।

कळा उतरली मुखंकमळा।

खेदु आगळा चिंतेचा।।’

आणि जाकिटाच्या खिशातील डायरीत पहिल्याच पानावर लिहिलं होतं-

‘कावळे गुरुजी,

आम्ही गेल्यावर आमच्या पिंडाला शिवाल ना?’