02 March 2021

News Flash

चित्रपटसृष्टीचा आरसा!

भारतीय सिनेमाच्या सुरुवातीच्या काळात- म्हणजे मूकपटाच्या जमान्यात स्त्रीपात्रांच्या भूमिका पुरुष नट करायचे.

(संग्रहित छायाचित्र)

प्रकाश मगदूम

भारतीय चित्रपटांतील कलावंतांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी सर्वात प्रथम प्रकाशित झालेले आगळेवेगळे पुस्तक म्हणजे शांता आपटे यांचे ‘जाऊ मी सिनेमात?’ (१९४०) हे आत्मकथन! अवघ्या आठ वर्षांच्या कारकीर्दीपश्चात त्यांनी सिनेउद्योगाची चिकित्सा करणारे हे पुस्तक लिहिले. आज सुमारे ८० वर्षांनंतरही त्यातली त्यांची निरीक्षणे जशीच्या तशी लागू पडतात.

भारतीय सिनेमाच्या सुरुवातीच्या काळात- म्हणजे मूकपटाच्या जमान्यात स्त्रीपात्रांच्या भूमिका पुरुष नट करायचे. सिनेमात काम करणे हे त्या काळात अतिशय खालच्या दर्जाचे मानले जायचे. चित्रपटात काम करण्याला प्रतिष्ठा नव्हती. हळूहळू कालांतराने ही जाचक बंधने सल झाली. वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेल्या स्त्रिया चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी पुढे येऊ लागल्या. मुख्यत: नाटकांमध्ये काम करत असलेल्या स्त्रिया मूकपटांमध्ये अभिनय करू लागल्या. त्यानंतर नवीन तंत्रज्ञान आले आणि चित्रपट बोलका झाला. त्यामुळे ज्यांना अभिनय आणि गायन येते अशा कलाकारांना प्राधान्य मिळाले. पार्श्वगायन ही संकल्पना अजून आली नव्हती. त्यामुळे पडद्यावर अभिनय करण्याबरोबर चांगले गायला येणे हे कलाकाराच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. सिनेमा कंपन्या अशा गायक अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या शोधाकडे विशेष लक्ष द्यायच्या.

या संक्रमणकाळात महाराष्ट्राच्या विविध भागांतून अनेक गायक-नटय़ा सिनेमाच्या रूपेरी पडद्यावर नशीब आजमावण्यासाठी पुढे आल्या. कमलाबाई गोखले, दुर्गा खोटे, नलिनी तर्खड, शांता हुबळीकर, लीला चिटणीस, शांता आपटे, मीनाक्षी शिरोडकर, वनमाला, शोभना समर्थ, स्नेहप्रभा प्रधान, हंसा वाडकर आदी अनेक अभिनेत्रींनी आपल्या समर्थ अभिनयाने आणि सुंदर गायनाने रूपेरी पडद्यावर राज्य केले. त्यांच्या  चित्रपटांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. यापकी बहुतांश कलाकारांनी आपल्या आठवणी लिहून रसिकांसमोर आणल्या. ‘चंदेरी दुनियेत’ (लीला चिटणीस- १९८१), ‘मी दुर्गा खोटे’ (दुर्गा खोटे- १९८२), ‘कशाला उद्याची बात’ (शांता हुबळीकर- १९९०), ‘परतीचा प्रवास’ (वनमाला- २००७), ‘सुवासिनी’ (सीमा देव- १९९८), ‘सांगत्ये ऐका’ (हंसा वाडकर- १९७०), ‘स्नेहांकिता’ (स्नेहप्रभा प्रधान- १९७३), ‘उष:काल’ (उषा किरण- १९८९) तसंच ‘अशी मी जयश्री’ (जयश्री गडकर- १९८६) अशी अनेक आत्मकथने विविध कालखंडात प्रसिद्ध झाली. यापकी बहुतेक आत्मकथनांमध्ये या कलावंतांच्या चित्रसृष्टीतील आगमन, साकारलेल्या विविध भूमिका आणि चित्रपट कारकीर्द तसेच कौटुंबिक जीवन यावर प्रकाश टाकलेला दिसतो.

यापकी सर्वात प्रथम प्रकाशित झालेले आणि आगळेवेगळे पुस्तक म्हणजे शांता आपटे यांचे ‘जाऊ मी सिनेमात?’ हे आत्मकथन! भारतीय चित्रपटांच्या इतिहासात शांता आपटे या अभिनेत्रीचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. १९३२ मध्ये आलेल्या ‘श्यामसुंदर’ या भालजी पेंढारकर यांनी दिग्दर्शीत केलेल्या चित्रपटातून शांता आपटे यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यावेळी त्यांचे वय केवळ सोळा वर्षे होते. लहानपणी संगीत शिकल्यामुळे त्यांचा गळा गोड होता. गणपती उत्सवात गायलेल्या गाण्यांमुळे चित्रपटसृष्टीतील अनेकांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले. व्ही. शांताराम यांच्या ‘अमृतमंथन’ या १९३४ मधील चित्रपटाने शांता आपटे यांना खूप लोकप्रियता मिळाली. आपल्या अभिनयाने आणि गोड गाण्यांनी चित्रपट- रसिकांची मने त्यांनी जिंकून घेतली. प्रभात कंपनीच्या या चित्रपटाने रौप्यमहोत्सव तर साजरा केलाच; पण व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही त्याचे प्रदर्शन झाले. केशवराव भोळे यांच्या कुशल संगीत दिग्दर्शनाखाली शांता आपटे यांनी गायलेली गाणी रसिकांच्या विशेष पसंतीस उतरली. १९३६ मध्ये पुन्हा एकदा व्ही. शांताराम यांनी दिग्दíशत केलेल्या ‘अमर ज्योती’मधील शांता आपटे यांचा अभिनय वाखाणला गेला. त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात उल्लेखनीय मानला जाणारा ‘दुनिया ना माने’ हा हिंदी चित्रपट १९३९ साली प्रकाशित झाला. ‘कुंकू’ ही त्या चित्रपटाची मराठी आवृत्ती त्याच वर्षी आली. प्रभात कंपनीच्या बॅनरखाली व्ही. शांताराम यांच्या या चित्रपटाने भारतीय समाजाला भेडसावणाऱ्या बालविवाहासारख्या ज्वलंत प्रश्नावर प्रखर भाष्य केले. शांता आपटे यांनी साकारलेली नायिका एका वृद्ध, विधुर पुरुषाशी झालेले लग्न नाकारते आणि पतीला स्वीकारत नाही. शेवटी त्याला त्याची चूक कळून येते आणि तो आत्महत्या करतो. त्यापूर्वी तिने दुसरे लग्न करावे अशी चिठ्ठी ठेवून जातो. त्यावेळी काळाच्या पुढे असलेल्या या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. टीकाकारांनीही त्याची प्रशंसा केली. शांता आपटे यांनी या चित्रपटामध्ये एक इंग्रजी गाणेही गायले.

‘प्रभात’ कंपनीबरोबरच्या करारातून नाटय़मयरीत्या त्यांनी स्वत:ला सोडवून घेतले आणि १९४१ मध्ये दक्षिणेतील ‘सावित्री’ या तामिळ चित्रपटामध्ये अभिनय केला. या चित्रपटात त्यांनी विख्यात गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांच्याबरोबर काम केले. तर १९४३ मध्ये आलेल्या ‘दुहाई’ या हिंदी चित्रपटात प्रख्यात गायिका नूरजहाँ या त्यांच्या सहनायिका होत्या. १९४६ मधील मास्टर विनायक यांच्या ‘सुभद्रा’ या चित्रपटात त्यांची भूमिका होती. लता मंगेशकर यांनीही या चित्रपटामध्ये अभिनय केला होता. अशा रीतीने या तीन गायिकांबरोबर अभिनय करण्याची अनोखी कामगिरी त्यांच्या नावावर नोंदवली गेली!

त्यांनी लिहिलेले आत्मचरित्र ‘जाऊ मी सिनेमात?’ हे १९४० मध्ये प्रसिद्ध झाले. म्हणजे चित्रपटसृष्टीत केवळ आठ वष्रे वावरून आलेल्या अनुभवांवर आधारित हे कथन आहे. वयाच्या २४ व्या वर्षी लिहिलेले हे पुस्तक रूढार्थाने आत्मचरित्र नाही, तर सिनेमाच्या आकर्षणाने चित्रपटसृष्टीत प्रवेश करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी या व्यवसायाची एक सांगोपांग ओळख होय.

पुस्तकाच्या सुरुवातीला आपल्या काही भूमिकांची शांता आपटे यांनी चिकित्सा केली आहे. यावेळी त्या अतिशय नेमकेपणे मूकपटाकडून बोलपटाकडे होत असलेल्या स्थित्यंतराचे वर्णन करतात. सरस्वती फिल्म कंपनीचा ‘श्यामसुंदर’ हा चित्रपट त्याच वेळी चित्रित झाला. अनेक चित्रपट दिग्दर्शकांना या स्थित्यंतराला कसे सामोरे जायचे याची नीट जाण नव्हती. याविषयी शांताबाई म्हणतात, ‘रंगभूमीवरील अभिनयाची आणि संवादतंत्रांची दिग्दर्शकांनी जाणीव ठेवावी, तर बोलपटात कॅमेरा आणि मायक्रोफोन या दोन महायंत्राच्या दृष्टिकोनातून पाहणे जरूर होते. रंगभूमीवरच्या आणि मूकपटातील अभिनयाच्या आधाराने बोलपटातील अभिनय आणि भाषणाची सजावट करून पाहिली तरी बोलपटातील गाणे कशा प्रकारचे असावे याची कोणालाच कल्पना नव्हती.’ चित्रपट बोलू लागल्यामुळे संगीत दिग्दर्शकाचे स्वतंत्र स्थान निर्माण झाले.

या चित्रपटानंतर प्रभात फिल्म कंपनीचे मॅनेजर बाबुराव पेंढारकर आणि केशवराव धायबर यांनी शांता आपटे यांना ‘अमृतमंथन’ चित्रपटासाठी करारबद्ध केले. त्याची तयारी म्हणून शांता आपटे यांनी शेगावला जाऊन त्यांचे गुरुजी नारायणराव थिटे यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेतले. अभिनयाची तयारी मात्र त्यांनी स्वनिरीक्षणाने केली. त्या म्हणतात, ‘अभिनयकलेच्या बाबतीत माणसाच्या मनाचा कल जन्मत: अभिनयाकुल पाहिजे व तसा तो असेल तर सूक्ष्म निरीक्षणाने ती कला आत्मसात करता येते असे आता मी अनुभवाने सांगू शकते.’ अर्थात ‘अमृतमंथन’ हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला आणि त्यातील शांताबाईंच्या अभिनयाची खूप वाहवा झाली.

या दोन भूमिकांची चर्चा केल्यानंतर शांताबाई पुस्तकाच्या मूळ प्रयोजनाकडे वळतात. त्यांच्या सूक्ष्म नजरेला चित्रपटसृष्टीची दुसरी बाजू दिसू लागते आणि या मायावी जगाच्या झगमगाटाला भुलून चित्रपटसृष्टीत प्रवेश करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींना त्या मोलाचा सल्ला देतात. त्यासाठी चित्रपटसृष्टीचा त्यांच्या अनुभवास आलेला काळाकुट्ट व्यवहार त्या या पुस्तकात मांडतात.

चित्रपट उद्योगाचे वर्णन करताना शांता आपटे त्याची सात भागांत विभागणी करतात. भांडवलवाले, कंपन्या, डिस्ट्रिब्युटर्स, एक्झिबिटर्स, अ‍ॅडव्हर्टायझर्स, वर्कर्स आणि शेवटी प्रेक्षक! त्यांच्या मते, पहिले पाच वर्णातील लोक एकत्र होऊन त्यांनी आपला अभेद्य गट स्थापन केला आहे. दुसरा गट म्हणजे वर्कर्स आणि जनताजनार्दन. कामगारांच्या श्रमांवर जनतेच्या खिशातून पसे ओढायचा, हा या पंचवर्णीयांचा धर्म. कामगार हा या पंचवर्णीयांचा दास.

त्यांच्या मते, भांडवलवाले म्हणजे निव्वळ नफा कमावणे हेच उद्दिष्ट असलेले लोक. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील लोकशिक्षण, लोकसेवा यांच्या गावीही नसते. काम करणे आणि करवून घेणे या दृष्टीने चित्रपटाचे यशापयश हे तंत्रकुशल लोकांवर अवलंबून असते. त्यामुळे चित्रपट धंद्यातील कंपन्या हा गट अतिशय महत्त्वाचा आहे. परंतु यांची कर्तबगारी भांडवलवाल्यांवर अवलंबून असते. त्यांचे एकमेकांशी पटले नाही अगर जुळले नाही तर काही कंपन्या स्वतंत्र संसार उभा करतात. शांता आपटे यांच्या मते, केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच कंपन्या आपल्या पायावर उभ्या आहेत आणि त्यापकी एखाद् दुसरीच कंपनी ध्येयानुरूप चालवली जात आहे. त्यांच्या मते, ‘यांच्या एका हातात भांडवलवाल्यांची शेंडी असते, तर दुसऱ्या हाताने हे आपल्या हाताखालच्या लोकांच्या माना मुरगाळून त्यांच्याकडून कामे करवून घेतात. कंपनी हे चित्रपटकलेचे हृदय म्हणता येईल. पण या हृदयाचा नमुना हा असा आहे आणि काळीज उलटे आहे!’

डिस्ट्रिब्युटर्सचे वर्णन त्या ‘चित्रपट धंद्यातील दलाल’ असे करतात. यांची ध्येये, तत्त्वे आणि कायदे हे सर्वच निराळे असल्यामुळे काही मर्यादेनंतर हे दलाल चित्रपट धंद्याला मारकच ठरणार! त्यांच्या मते, डिस्ट्रिब्युटर्स ही संस्था चित्रपट कंपन्यांच्या मार्गातील धोंड होऊन बसली आहे. एक्झिबिटर्स म्हणजे सिनेमा थिएटरांचे चालक आणि मालक. वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून प्रेक्षकांना थिएटरकडे खेचून आणण्याचे कसब त्यांच्या अंगी असते. ‘या चित्रपटसृष्टीत देवाची परीक्षा भक्ताने करावयाची असा उलटा न्याय चालू आहे..’ असे मार्मिक निरीक्षण शांता आपटे नोंदवतात. भांडवलवाले, कंपन्या आणि डिस्ट्रिब्युटर्स या तिन्ही वर्गाच्या कर्तबगारीचे मोल या चित्रपट मंदिरातच ठरत असल्यामुळे या मंदिरवाल्यांचे स्थान चित्रपटसृष्टीत अत्यंत महत्त्वाचे आहे असा अभिप्राय त्या देतात.

‘अ‍ॅडव्हर्टायझर्स म्हणजे जणू वाजंत्री! जो पसा देईल त्याची टिमकी हे दोन्ही हातांनी वाजवतील. परीक्षणे आणि जाहिरातीद्वारे चित्रपटांचे बेफाट व बेफाम वर्णन करून पूर्वेचे प्रेक्षक पश्चिमेकडे खेचतील. यांच्या एका चित्रपटाच्या जाहिरातीच्या खर्चातून एक नवीन चित्रपट निघेल! हे सांगतील ते चित्रपट भोळे प्रेक्षक पाहतात.’ शांता आपटे यांचे हे अचूक निरीक्षण आजच्या काळालाही तंतोतंत लागू पडते. सध्या जाहिरातींचा इतका भडिमार २४ तास सर्व माध्यमांतून चालू असतो, की प्रेक्षकाला त्याकडे दुर्लक्ष करताच येत नाही. सिनेमा बनवायच्या अगोदरपासून त्याबद्दलच्या बातम्या पद्धतशीरपणे माध्यमांतून पेरल्या जातात. शूटिंग लोकेशनवर काय घडतेय, सेटवरील घडामोडी वेळोवेळी पसरवून सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढवत ठेवली जाते. सिनेमाचे शूटिंग संपल्यानंतर तो प्रदर्शित होण्यापर्यंत पद्धतशीर कॅम्पेनच राबवले जाते. या ना त्या प्रकारे प्रेक्षक सिनेमा हॉलकडे खेचला गेला पाहिजे यासाठी ही सगळी धडपड चालू असते. कारण सध्याच्या काळात सुरुवातीच्या काही दिवसांतच सिनेमाचा धंदा अवलंबून असतो. त्यामुळे शांता आपटे यांनी १९४० सालची वर्णन केलेली स्थिती किती दूरदर्शी आणि वास्तवदर्शी होती हे समजून येते.

शांताबाई ‘वर्कर्स’ या गटाची नट आणि इतर नोकरवर्ग अशा दोन भागांत विभागणी करतात. त्यांच्या मते, मोठय़ा पगाराची माणसे म्हणजे दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, छायालेखक, ध्वनिलेखक. चित्रपटाचे यशापयश यांच्या कर्तबगारीवर अवलंबून असते. ‘यांची मालकशाहीत उत्क्रांती होण्याचाच संभव फार..’ असे निरीक्षण त्या नोंदवतात; जे पुढे जाऊन चित्रपटसृष्टीत घडलेले दिसून येते. आजच्या घडीला चित्रपट व्यवसायातील अनेक कंपन्या आणि निर्माते मंडळी ही याच गटातून पुढे आलेली दिसतात. त्या असेही म्हणतात की, या गटामध्ये चित्रपटाची कथा लिहिणाऱ्या लेखकाचा समावेश होणे जरूर आहे. पण लेखकाची चित्रपटसृष्टीतील स्थिती मोठी केविलवाणी आहे. किती अचूक निरीक्षण आहे! आजही लेखक ही चित्रपटसृष्टीतील सर्वात दुर्लक्षित जमात आहे. जिथे बरेचसे चित्रपट हे विदेशी चित्रपटांवरून उचललेले असतात तिथे स्वतंत्र कथालेखक म्हणजे किस झाड की पत्ती! त्यामुळे चित्रपटसृष्टीच्या एकूणच कारभारात लेखकाचे स्थान (सन्माननीय अपवाद वगळता) नगण्यच राहिले आहे. त्यामुळे शांता आपटे म्हणतात त्याप्रमाणे सुतार, लोहार, मजूर, पेंटर्स इ. कामगारवर्गापकीच एक म्हणजे लेखक. यापलीकडे त्याला काही किंमत नाही. हे त्यांचे निरीक्षण जितके १९४० साली खरे होते, तशीच दुर्दैवी परिस्थिती आजही बघायला मिळते.

नट आणि नटय़ा या चित्रपटसृष्टीच्या प्राण असल्या तरीही शेवटी मालकशाहीच्या बटीकच! पशाच्या जोरावर आणि जाहिरातदारांच्या मदतीने हे लोक चांगल्या नटाला खाली ढकलतील, तर वाईट नटाला वर ओढतील. पण कुणालाच वरचढ होऊ देणार नाहीत.

शेवटी ‘जनता’ या गटाचे वर्णन करताना शांता आपटे ‘ही वसिष्ठाघरची गरीब कामधेनू’ असे म्हणतात! त्यांच्या मते, चित्रपटसृष्टीच्या विश्वामित्रांनी आपले पोट भरण्याकरता या जनतेला पिळून काढण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालू ठेवला आहे. रोजच्या जीवनाचा लढा लढताना मेटाकुटीस आलेल्या जनतेला घटकाभर करमणूक हवी असते. परंतु बहुतेक वेळा त्यांची फसवणूक होते. जाहिरातीच्या भडक प्रचाराला बळी पडून जनता फसते. मात्र, फसणारा मी फसलो असे कधी सांगत नाही. अशा वेळी ‘या चित्रपट निर्मात्यांना नीतीची व सदसद्विवेकबुद्धीची काही चाड असेल तर जनतेच्या भोळेपणाचा फायदा न घेता त्यांनी उत्कृष्ट चित्रपट तयार करणे हे त्यांचे कर्तव्य ठरते,’ असे सडेतोड विचार शांताबाई मांडतात.

इथे त्या चांगल्या चित्रपटाबद्दलची आपली व्याख्या मांडतात. त्यांच्या मते, पुन्हा पुन्हा चित्रपट पाहण्याचा मोह उत्पन्न होणे हे उत्कृष्ट चित्रपटाचे गमक होऊ शकेल. किंवा एखाद्या मुलाने आपल्या आई-बाबांना न कळविता चित्रपट पाहिल्यावर शिक्षा होण्याची भीती असतानाही त्याने चित्रपटाची उघड वाहवा केली, तसा त्याला मोह झाला तर तो चित्रपट उत्तम असेही म्हणता येईल! (अर्थात हे १९४० साली मांडलेलं मत आहे!)

भारतात चित्रपटनिर्मिती सुरू होऊन २५ वष्रे झाल्यानंतर त्यानिमित्ताने रौप्यमहोत्सव साजरा केला गेला. त्यावेळी ज्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे प्रवर्तक मानले जाते त्या दादासाहेब फाळके यांचा यथोचित सन्मान केला गेला नाही याबद्दल शांता आपटे तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त करतात. त्याचबरोबर या महोत्सवाची पर्वणी साधून चित्रपटसृष्टीतल्या संधिसाधूंनी कला, लोकशिक्षण, लोकसेवा या तत्त्वांची तारस्वराने घोषणा केली व स्वत:चा डांगोरा पिटला. पण ज्यांच्या जिवावर त्यांनी तो डांगोरा पिटला ते भुकेकंगाल होऊन छात्या पिटीत आहेत, तो मूक नाद या चित्रपट ब्रह्मदेवांना ऐकू आला का, असा रास्त सवाल त्या करतात.

यानिमित्ताने शांता आपटे एक मोठा विचार मांडताना म्हणतात की,  सिनेमाधंद्याकडे राष्ट्रीय दृष्टीने पाहण्याची आज वेळ आली आहे. अशा पद्धतीची मांडणी करणाऱ्या नटवर्गापकी शांता आपटे या कदाचित एकमेव असतील. तेही चित्रपटसृष्टीची सुरुवात होऊन अवघी २५-२६ वष्रे झालेली असताना आणि त्या स्वत: केवळ आठ वष्रे या उद्योगात असताना अशा प्रकारे मूलगामी मत त्यांनी मांडावे ही आश्यर्यचकित करणारी गोष्ट आहे. त्या म्हणतात, गरीब हिंदुस्थानची अफाट संपत्ती या धंद्यात गुंतली आहे. कित्येक लोकांच्या उदरनिर्वाहाचे एक नवीन साधन यामुळे उपलब्ध झाले आहे. अशा वेळी या निर्माण होणाऱ्या संपत्तीचा विनियोग राष्ट्रीय दृष्टीने व्हायला पाहिजे. विचारवंतांनी यावर विचार करावा असे आवाहनही त्या करतात. सिनेमा माध्यमाचे दूरगामी परिणाम करणारे महत्त्व शांता आपटे यांच्या लक्षात आले होते. म्हणूनच प्रेक्षकांची मनोभूमिका एका विशिष्ट हेतूने करावयाची असेल आणि तिला राष्ट्रीय वळण लावायचे असेल तर चित्रपटनिर्मितीत गुंतलेल्या लोकांपुढेही राष्ट्रीय ध्येय असायला हवे, असे त्यांचे ठाम मत होते.

चित्रपट उद्योगाच्या वाढत्या झगमगाटाला भुलून आणि पोटाची आग शांत करण्यासाठी अनेक तरुण बेकार या सृष्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी धडपडू लागले. अशांना सल्ला देताना त्या म्हणतात की, जीवनाच्या झगडय़ात लायक तेवढेच जगतात. त्यामुळे सहानुभूती असूनही अशा बेकार लोकांना चित्रपटसृष्टीतील कठोर आणि निर्दयी व्यवहाराची त्या कर्तव्यभावनेने जाणीव करून देतात.

त्यांचा विशेष सल्ला चित्रपटसृष्टीत येऊ इच्छिणाऱ्या लहान मुला-मुलींसाठी आहे. अशा मुलांसाठी त्यांचा जीव तुटतो. त्यांच्या मते, या कोवळ्या जिवांची आहुती इथल्या स्वार्थी जगाच्या आगीत दिली जाते. हुशार आणि बुद्धिमान मुले चित्रपटसृष्टीत घेतली जातात आणि काही कालावधीनंतर त्यांची गरज संपल्यानंतर ती ‘निर्माल्यवत’ होतात! अशा वेळी केवळ व्यवहाराच्या नावाखाली चाललेल्या या अध:पातावर त्या कडक शब्दांत ताशेरे ओढतात. त्या एवढय़ावरच गप्प बसत नाहीत, तर उपायही सुचवतात. ‘चित्रपटसृष्टीत गेलेल्या व घेतल्या जाणाऱ्या मुलांच्या बाबतीत त्यांच्या भावी आयुष्याच्या दृष्टीने व्यवस्था करण्याबद्दलचा कायदा व्हावयास पाहिजे अशी वेळ आता आली आहे,’ असे मत त्या मांडतात. चित्रपटसृष्टीतून बाहेर पडल्यानंतरची काही मुलांची दारुण अवस्था शांता आपटे यांनी पाहिली आहे. त्यामुळेच चित्रपट निर्मात्यांनी आणि समाजातील प्रबुद्ध पुढाऱ्यांनी अशा मुलांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी तळमळ त्या व्यक्त करतात.

ज्या सुस्वरूप शरीराचा आणि सुंदर आवाजाचा विचार नट निवडताना केला जातो त्याची काळजी घेण्याबद्दल मात्र बेफिकिरी दाखवली जाते. नटांचे व्यावसायिक आयुष्य घडवण्याची आणि ते टिकवण्याची जितकी जबाबदारी नटांची आहे, तितकीच ती चित्रपट निर्मात्यांचीही आहे. पण चित्रपटसृष्टीत स्पर्धा तीव्र असल्यामुळे माणुसकीवर हक्क सांगणारी माणसे निकामी झाल्यावर त्यांना सहज लाथ मारून हाकलून देता येते, हे जळजळीत वास्तव त्या अधोरेखित करतात. ‘आम्ही सांगू त्याप्रमाणे अभिनय केला पाहिजे’ अशा माजोरीपणाचे एक उदाहरण त्या देतात आणि ‘नटाला अजिबात बुद्धी नसते’ या चित्रपटसृष्टीतील गृहितकावर हल्ला करतात. ‘असलीच बुद्धी तर ती चालवू नये,’ असा गíभत दमही दिला जातो. या सगळ्या प्रकारात नटाने हुकमानुसार काम केले आणि त्याची प्रेक्षकांवर छाप पडली नाही तर मात्र त्या नटाची लायकी बाहेर पडते आणि दिग्दर्शक मात्र पडद्याआडच राहतो, असं त्या म्हणतात.

उत्तम अभिनयाचे मर्म सांगताना शांताबाई म्हणतात की, कुशल दिग्दर्शक, जोरदार कथानक, उत्तम ध्वनीकरण व स्वच्छ चित्रीकरण या गोष्टींची साथ नटाला मिळाली पाहिजे. चित्रपटाची निर्मिती ही सांघिक प्रयत्नाने होते हे त्यांनी ठसवून सांगितले आहे. गुणग्राहकता आणि दिलदारपणा यांची सांगड असलेले निर्माते मुळात कमी असल्यामुळे आणि नटांना डोईजड होऊ न देण्याच्या स्वार्थी वृत्तीमुळे अनेक बुद्धिमान आणि होतकरू नट-नटींच्या आयुष्याचे मातेरे झाले आहे, अशी स्वतच्या डोळ्याने पाहिलेली चार-पाच उदाहरणे शांताबाई देतात. त्यासाठी ‘मालकशाहीच्या फुफाटय़ात’ असे स्वतंत्र प्रकरणच त्यांनी लिहिले आहे. ‘उफराटी अंधेरनगरी’ या प्रकरणात निर्मात्यांच्या अशा स्वार्थी वृत्तीवर आणि त्यामुळे झालेल्या नटांच्या शोचनीय स्थितीवर शांताबाई प्रकाश टाकतात. ‘नट आणि नटी म्हणजे बुद्धिमान, बोलणारे, हसणारे, गाणारे जनावर! बस्स! यापेक्षा या चित्रपटसृष्टीत त्यांना जास्त किंमत नाही..’ अशा माणुसकीहीन व्यवस्थेकडे त्या लक्ष वेधतात. अशा व्यवस्थेवर कायद्याचे नियंत्रण असले पाहिजे, असे प्रतिपादन त्या करतात. नटवर्गाची कार्यक्षमता वाढावी, त्यांच्या अभिनयाची, गायनाची व अन्य हिताची पद्धतशीर व्यवस्था उभी राहावी याची नितांत गरज असल्याचे शांताबाई सांगतात.

अर्थात चित्रपटसृष्टीची केवळ काळी आणि एकांगी बाजू सांगण्याचा शांताबाईंचा हेतू नाही. ‘टाळी एका हाताने वाजत नाही’ या प्रकरणात नटवर्गाने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे त्या सांगतात. अभिनयाचा गुण असला, गायनाचे अंग असले आणि व्यवहार समजत असला तरी फाजील आत्मविश्वास आणि आपल्याला सर्व काही समजते अशी घमेंड बाळगून बरेच जण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात. यशस्वी नट म्हणून आवश्यक असलेल्या स्वरूप, शरीरसौष्ठव, आवाज आणि अभिनय या गुणांची चिकाटीने जोपासना आणि संवर्धन करणे आवश्यक असल्याचे त्या सांगतात. पण क्षणिक स्तुतीला भुलून बरेच जण आपले कर्तव्य विसरतात आणि मग अपयश आले की पस्तावतात. त्यावेळी स्वतच्या दोषांचे खापर मालकांच्या डोक्यावर मारून यशस्वी नट-नटींचा हेवा करत बसतात.’ अभ्यासपूर्वक व कर्तव्यबुद्धीने काम केल्यास व त्याला परिश्रमांची जोड दिल्यास कोणत्याही व कसल्याही परिस्थितीवर मात करता येते व आपला उत्कर्ष साधता येतो. ज्या भूमिकेचे आपल्याला काम करावयाचे त्या भूमिकेशी समरस व्हायला पाहिजे,’ असे सांगून शांताबाई त्यांच्या गाजलेल्या ‘कुंकू’ चित्रपटातील आपल्या अभिनयाचे उदाहरण देतात. पाहावयाला आलेल्या तरुणापुढे कुमारिकेने जाऊन बसायचे, हा एवढाच प्रसंग होता. तो प्रसंग त्यांच्या मनाप्रमाणे झाला नाही. मग घरी येऊन आपल्या आईपुढे तो त्यांनी वठवला आणि मग तो प्रसंग स्टुडिओमध्ये चित्रित करण्यात आला. स्वतचे हे उदाहरण सांगून शांताबाई म्हणतात की, आपले कर्तव्य चोख केले, कसून अभ्यास केला आणि कठोर कार्यनिष्ठा नट-नटीने दाखवली तर त्यांच्या मार्गात कोणालाच अडथळा आणता येणार नाही.

‘छायाप्रकाश या प्रकरणात शांताबाई होतकरू नट-नटींना आणि त्यांच्या पालकांना स्वतच्या खासगी जीवनाबद्दल सावध करतात. नटाचे व्यावसायिक जीवन आणि खासगी जीवन हे भिन्न ठेवायला हवे आणि त्यांची सरमिसळ होता कामा नये, असे त्या आग्रहाने सांगतात. मनाला भुरळ पाडणारे अनेक मोह या मायावी दुनियेत असतात आणि जर योग्य ती काळजी घेतली नाही तर घराला आणि समाजाला पारखे व्हावे लागते असा सावधानतेचा इशारा त्या देतात.

शेवटच्या ‘सत्यकथनाचे कारण’ या प्रकरणात शांताबाई या पुस्तकाचे प्रयोजन सांगतात. त्यांच्या मते, त्यांचे हे कथन कोणत्याही वृत्तपत्राने छापले नसते. या चित्रपटसृष्टीत जवळपास ४०,००० लोकांचे जीवन २०० हून अधिक छोटय़ा-मोठय़ा धंद्यांवर अवलंबून आहे. शांताबाई म्हणतात की, या सृष्टीचे दाखवायचे आणि खायचे दात निराळे आहेत आणि हे लक्षात घेऊनच तरुण-तरुणींनी या व्यवसायात यावे!

आपल्या अवघ्या आठ वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत आलेल्या अनुभवांचे सार शांताबाईंनी या पुस्तकात मांडले आहे. ज्या स्पष्टवक्तेपणाने त्यांनी चित्रपटसृष्टीची आणि या व्यवसायातील विविध हितसंबंधांची चिरफाड केली आहे ती त्या काळात खूपच खळबळजनक होती. रूढार्थाने आत्मचरित्र न लिहिता चित्रपट व्यवसायाचे आलेले अनुभव चिकित्सक पद्धतीने, कोणताही आडपडदा न ठेवता शांताबाईंनी मांडले आहेत.

केवळ १०३ पानांच्या या कथनातून त्यांनी चित्रपटसृष्टीच्या मायाबाजारातील अनेक मिथके नष्ट करून सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी १९४० साली ‘शांता आपटे कन्सर्न्‍स’ या स्वतच्याच प्रकाशन संस्थेद्वारे ‘जाऊ मी सिनेमात?’ हे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील ही एक अभूतपूर्व घटना होती. एका नामांकित अभिनेत्रीने लोकप्रियतेच्या शिखरावर असताना स्वतच्या प्रतिष्ठेची पर्वा न करता चित्रपट उद्योगातील अनेक गरप्रकारांना वाचा फोडली होती. या पुस्तकातील त्यांनी मांडलेली अनेक निरीक्षणे आजही जवळपास ८० वर्षांनंतरही तितकीच खरी आहेत! चित्रपटाचे उद्योगात रूपांतर करण्याच्या अनेक घोषणा झाल्या आणि कित्येक अहवाल लिहिले गेले तरी या उद्योगाची आजची स्थिती शांताबाईंनी वर्णन केलेल्यापेक्षा जास्त काही वेगळी नाही. आणि हेच या पुस्तकाचे सामथ्र्य आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2018 1:33 am

Web Title: article about shanta apte autobiography their observations
Next Stories
1 महिलाविषयक कायद्यांचा ‘अराजकीय’ आढावा
2 उजळ माथ्यानं मिरवणारं वाङ्मयचौर्य
3 संघर्षरत आंबेडकरवाद
Just Now!
X