स्वाती घारपुरे-दिवेकर

श्री. पु. भागवत.. मौज प्रकाशन आणि  ‘सत्यकथा’चे विचक्षण साक्षेपी संपादक. त्यांचे हे रूप सर्वपरिचित आहे. मात्र, त्यांच्या नातीने रेखाटलेले ‘श्रीखंड पुरी भाजी’ तथा तात्याआजोबा यापेक्षा काहीसे वेगळे होते. कसे..?

१९८०-८१ च्या सुमारास सांगली नगर वाचनालयात मंगेश पाडगांवकर, वसंत बापट आणि विंदा करंदीकरांचा काव्यवाचनाचा कार्यक्रम झाला होता. त्या सुमारास मला प्रसिद्ध व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या जमवण्याचा छंद जडला होता. कार्यक्रम संपताच तिन्ही कविवर्याच्या सह्य घेण्यासाठी मी स्टेजकडे धावले. वसंत बापटांच्या समोर माझी सह्यंची डायरी ठेवून मी ऐटीत त्यांना म्हटलं, ‘‘मी श्रीपुंची नात. मला सही द्याल?’’ बापटांनी माझी वही हातात धरून चाळली. त्यात असलेल्या बऱ्याच मातब्बर साहित्यिकांच्या सह्य बघून ते हसले. स्वत:ची सही केली आणि मला म्हणाले, ‘‘श्रीपुंनी बऱ्याच सह्य जमवून दिल्यायत! पण तुला श्रीपुंचं संपूर्ण नाव आहे का माहीत?’’ मी पटकन् उत्तर दिलं, ‘‘हो. श्रीखंड पुरी भाजी!’’

श्रीपु म्हणजे श्रीकृष्ण पुरुषोत्तम भागवत हे माझ्या आईचे तात्याकाका. मराठी साहित्यविश्वात दबदबा असलेले, मौज प्रकाशन गृहाचे साक्षेपी संपादक श्री. पु. भागवत! माझ्या दुर्दैवाने तात्याआजोबा ‘श्रीपु’ म्हणून माझ्या आयुष्यात फारसे कधी आले नाहीत. मी त्यांच्या गाढय़ा ज्ञानाचा लाभ घेतला नाही. त्यांच्याकडून शिकण्यासारख्या गोष्टी मी शिकले नाही. तसा प्रयत्न केला असता तर माझे व्यक्तिमत्त्व नक्कीच अधिक बहरले असते.

धीरगंभीर, मितभाषी असलेल्या श्रीपुंचा आदर जितका लेखकांमध्ये होता, त्याहून कित्येक पटींनी अधिक आदरयुक्त भीती (काही अपवाद वगळता) समस्त भागवत कुटुंबीयांमध्ये होती. प्रत्यक्ष न बोलता आपल्या नजरेतून बोलणाऱ्या त्यांच्या डोळ्यांचा अंदाज घेतच त्यांच्यासमोर सगळे बोलत. पण हाच वरकरणी प्रथमदर्शनी शिष्ट वाटणारा माणूस लहान मुलांच्या संगतीत मात्र खूप खुलायचा.

आम्ही मुंबईपासून दूर सांगलीला राहत असल्यामुळे असेल कदाचित; पण तात्याआजोबा आमच्या घरी मुक्कामाला आल्याच्या कित्येक आठवणी मनात ताज्या आहेत. ते आले की आमच्या घरी वर्दळ वाढायची. सांगली आकाशवाणीचे अधिकारी किंवा आसपासच्या महाविद्यालयांतले मराठीचे प्राध्यापक, परिसरातील लेखक असे बरेच लोक त्यांना भेटायला येत.

तात्याआजोबांच्या अनुपस्थितीतही त्यांची साहित्य क्षेत्रातली मित्रमंडळी काही कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगलीत आली की आजोबांच्या सांगण्यावरून आवर्जून आमच्या घरी येत. प्रा. म. द. हातकणंगलेकर लिखित ‘उघडझाप’ या मौज प्रकाशनाच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सांगलीत झाला. या समारंभासाठी मुंबईहून मौजेचे माधव भागवत (माझा माधवमामा) आणि कविवर्य मंगेश पाडगांवकर आले होते. ‘‘सांगलीला जाशील तेव्हा माझ्या पुतणीकडे अवश्य जा..’’ या आपल्या मित्राच्या प्रेमळ आग्रहामुळे कार्यक्रम संपल्यावर पाडगांवकर माधवमामाबरोबर आमच्या घरी आले. सहज गप्पांच्या ओघात त्यांनी विचारलं, ‘‘माधवराव, समारंभाच्या वेळी किती झाली विक्री ‘उघडझाप’ पुस्तकाची?’’ माधवमामा त्या दिवशी पुस्तक विक्रीला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादाने खूश होता. पण मौजच्या परंपरागत गंभीरपणाने त्याने हातकणंगलेकर सरांच्या पुस्तकाच्या दीडशे प्रती विकल्या गेल्याचे सांगितले. तेव्हा अतिशय नाटकी आणि मिश्कील लकबीने पाडगांवकर पटकन् म्हणाले, ‘‘श्रीपुला नका हे सांगू. इतका मोठा आकडा ऐकून त्याला हार्टअटॅक येईल!’’

पुस्तके प्रकाशित करताना चोखंदळपणे साहित्यकृती निवडणे आणि ती संस्कारित करणे यासाठी प्रसिद्ध असलेल्या श्रीपुंनी पुस्तकाच्या खपासाठी कोणतीच तडजोड केली नाही. खपले नाही तरी चालेल, पण उच्च दर्जाच्याच साहित्यावर मौजेची मुद्रा उमटेल, हा नियम कटाक्षाने पाळला जाई.

तात्याआजोबा निरीश्वरवादी असल्यामुळे इतर पाहुणे सांगलीला आल्यावर होणारे गणपती मंदिर, कोल्हापूर, नरसोबाची वाडी हे कार्यक्रम त्यांच्या सांगली भेटीतल्या अजेंडय़ावर नसत. ते बरोबर त्यांचं कामही घेऊन येत. शीवच्या घराप्रमाणेच आमच्या सांगलीच्या घरच्या डायनिंग टेबलावर त्यांची हस्तलिखितांची थप्पी विराजमान होई. बरोबर त्यांचा चष्मा आणि दोन-तीन रंगांची पेनं. आमचा अभ्यासाचा पसारा डायनिंग टेबलावरून आवरला नाही तर वैतागणारी आई आपल्या काकांच्या या नीटस पसाऱ्याने सुखावून जायची.

ते आले की सकाळच्या चहाच्या वेळी गप्पांची मैफल रंगत असे. साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या तात्याआजोबांकडून संगीत, नाटक, चित्रकला, छायाचित्रकला या इतर कलाक्षेत्रांतील स्वानुभवाच्या किंवा त्यांना माहिती असलेल्या देशविदेशातील अनेक गोष्टी ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक असायचो. डायनिंग टेबलाभोवती बसून विमलाआजी आणि त्यांच्याकडून ऐकलेले अमेरिकेतल्या फॉल कलर्सचे किंवा हॅलोवीनचे वर्णन आणि त्याबरोबर बघितलेले त्यांचे फोटो वा त्यांनी सांगितलेल्या अनेक आठवणी या सगळ्यामुळे आमची वास्तू समृद्ध होत असे. हे सगळं व्यक्त करताना कधी त्यांच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर मिश्कील हास्य असायचं, तर क्वचित कधीतरी ते खळखळून हसत. सॅम्युएल आणि रेचेल या नातवंडांबद्दल सांगताना त्यांच्या घाऱ्या डोळ्यांत दिसणारी माया आणि अभिमान त्यांच्या जवळच्या सगळ्यांनीच पाहिला असेल.

शीवच्या घराच्या बैठकीच्या खोलीवर पूर्णपणे आजोबांचा ठसा होता. खोलीत शिरल्यावर डाव्या बाजूला असलेली पुस्तकांची भिंत. त्या शेकडो पुस्तकांमधून कोणतेही हवे असलेले पुस्तक ते दुसऱ्या मिनिटाला काढून देत. आणि उजव्या बाजूच्या भिंतीवर पिकासोच्या boutique of peace या नामांकित पेंटिंगचे प्रिंट. ही दोन त्या खोलीची ठळक वैशिष्टय़े! नीटनेटकेपणा हा त्यांचा खास गुणधर्म. खुर्ची बाजूला करताना ते कधीही ती सरकवून हलवत नसत, तर उचलून बाजूला ठेवत. मच्छरदाणी बांधणे हीसुद्धा एक कला आहे, हे त्यांना ज्यांनी मच्छरदाणी लावताना बघितले आहे ते मान्य करतील. या सवयी बहुधा आनुवंशिक असाव्यात. कारण भागवत कुटुंबातील इतर मंडळींच्या घरी गेले तरी ही टापटिपीची खास मौजेची मुद्रा त्याही घरांमध्ये उमटलेली आपल्याला आढळते. गादीवरचा पलंगपोस घालणे हेही तितकेच काटेकोर- जितके ते संपादकाच्या भूमिकेत शब्दनिवडीबाबत असत. ते जेव्हा जेव्हा आमच्याकडे आले, त्या प्रत्येक वेळी मी शाळेत गेल्यावर माझ्या खोलीत जात. माझ्या टेबलावर पसरलेली वह्य-पुस्तके जागच्या जागी ठेवत. माझ्या वह्यंमधील शुद्धलेखन तपासून ठेवत. अकरावीमध्ये मी कॉमर्स कॉलेजला प्रवेश घेतल्यावर मला वाटले- आता काही आजोबा आपल्या वह्य तपासणार नाहीत. आता मराठी भाषेचा संबंध नाही, ना देवनागरी लिपीचा. पण माझा अंदाज सपशेल चुकीचा ठरला. इकॉनॉमिक्सपासून अकौंटन्सीपर्यंत सर्व वह्या त्यांनी बघितल्या आणि त्यांच्या खास हस्ताक्षरात पेन्सिलने सुधारणाही सुचवल्या. मला वाटते, संपादकाची नजर त्यांना काही चुकीचे लिहिलेले दिसले की अस्वस्थ करत असेल.

आपल्या या हट्टी नातीला चांगला जोडीदार मिळावा ही त्यांची मनापासून इच्छा होती. नुस्ती इच्छाच नाही, तर त्यामध्ये त्यांचा पूर्णपणे सहभाग होता. ‘जोडीदार कसा निवडावा?’ या विषयावर आपल्या नातीला तर्कशुद्ध समुपदेशन करणारे आजोबा फारसे कोणी बघितले नसतील. मी जोडीदार निवडताना त्या मुलामध्ये मुख्यत्वेकरून कोणते गुण शोधते आहे, माझ्या स्वभावाला वा माझ्यावर झालेल्या संस्कारांसाठी कशा स्वभावधर्माचा मुलगा आणि कोणत्या प्रकारच्या विचारसरणीचे कुटुंब योग्य ठरू शकेल, या मुद्दय़ांवर मी काय विचार केला आहे; राजबिंडा दिसणारा, सगळ्यांवर छाप पाडणारा, श्रीमंत असे वरकरणी भुरळ पाडणारे गुण शोधण्याकडे माझा कल आहे की त्याच्या पुढे जाऊन मी काही विचार केला आहे; लग्नानंतर संसार करताना माझ्या स्वत:कडून आणि माझ्या सहचऱ्याकडून काय अपेक्षा आहेत, अशा गोष्टी ते माझ्याकडून जाणून घेत होते. माझ्या मनातले विचार त्यांच्यासमोर मांडत असताना आपोआपच विचारांची गल्लत असो किंवा स्पष्टता असो- दोन्हीही गोष्टी मला स्वच्छ दिसत होत्या. माझा मलाच स्वत:चा रस्ता सापडत होता. एखाद्या विषयाकडे चारही अंगांनी बघण्याची त्यांची नजर आणि मनात येणारा प्रत्येक विचार तर्काच्या तराजूत जोखण्याची त्यांची कला मी त्या काळात जवळून अनुभवली. आग्रहपूर्वक स्वत:चा मुद्दा पटवून देताना समोरच्या व्यक्तीच्या विचारस्वातंत्र्याला धक्का न लागू देण्याचे त्यांचे कसब मला माझा निर्णय ठामपणे घेण्याचा आत्मविश्वास देऊन गेले. मी चैतन्यची निवड केल्यावर त्यांनी माझ्या पाठीवर मारलेल्या थापेतून ते आपली पसंती व्यक्त करून गेले.

सांगली आणि त्यांच्या मालतीच्या कुटुंबाबद्दल त्यांना असलेला कमालीचा जिव्हाळा त्यांच्या वागण्यातून कधी लपून राहत नसे. सांगलीमध्ये आलेल्या पुराची, वादळाची अथवा दंगलीची बातमी वाचून, ऐकून ते जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी लगेच आमची विचारपूस करण्यासाठी फोन करत. एखाद्याविषयीचा त्यांना असलेला आपलेपणा जसा स्पष्ट दिसायचा, तशीच कोणाविषयीची नाराजी, नापसंतीही त्यांच्या आविर्भावातून नजरअंदाज होत नसे. अशी व्यक्ती समोर आली की त्यांचा चेहरा कठोर होई, आवाजात करकरीत कोरडेपण दिसू लागे. आवडत्या व्यक्तींबाबत ते अतिशय हळवेही होत. बेळगावला राहणाऱ्या इंदिराबाई संत जेव्हा शेवटच्या आजारी पडल्या तेव्हा योगायोगाने ते सांगलीत होते. नुकतेच डॉ. बावडेकरांचे ‘कॅन्सर माझा सांगाती’ हे पुस्तक मौजेने प्रकाशित केले होते. डॉक्टरांच्या लिखाणात गोंदवलेकर महाराजांच्या प्रभावाचा आणि डॉक्टरांच्या स्वत:च्या गोंदवल्यातील कार्याचा वारंवार उल्लेख आहे. आजोबांच्या वस्तुनिष्ठ विचारसरणीला महाराज, साधू वगैरे आध्यात्मिक पंथ मानवणारे नव्हते. माझे बाबा स्थापत्यविशारद या नात्याने गोंदवल्याच्या आश्रमाशी निगडित होते. त्यामुळे त्यांच्या सांगलीतल्या त्या मुक्कामात गोंदवल्याविषयी खूप गप्पा झाल्या. त्यांनी बाबांजवळ गोंदवल्याला जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि दिवसही ठरला. तशातच एक दिवस इंदिराबाई अत्यवस्थ असल्याचा फोन आला. तात्याआजोबांनी तातडीने बेळगावला इंदिराबाईंना भेटायला जायचे ठरवले. त्या कोणाला ओळखण्याच्या परिस्थितीत नव्हत्या. शिवाय अशा अवस्थेतील इंदिराबाईंना बघून त्यांना मानसिक क्लेश होतील, या कारणाने सगळे जण त्यांना बेळगावला जाण्याच्या विचारापासून परावृत्त करायचा प्रयत्न करत होते. पण त्यांना ते पटत नव्हते. इंदिराबाईंबरोबरचा इतक्या वर्षांचा स्नेह असताना, केवळ त्या आता कोणाला ओळखू शकत नाहीत या कारणास्तव बेळगावला न जाणे त्यांच्या मनाला पटणारे नव्हते. ते बेळगावला गेले. इंदिराबाईंना भेटले. आणि काही मिनिटांतच इंदिराबाईंनी शेवटचा श्वास घेतला. इतक्या श्रेष्ठ कवयित्रीला त्या अवस्थेत पाहणे त्यांच्या मनाला वेदनादायक झालेच. अंत्यविधी उरकल्यावर अतिशय उदास मनाने ते बेळगावहून सांगलीला परतले. दुसऱ्याच दिवशी सकाळी बाबांना म्हणाले, ‘‘अशोक, नको जायला गोंदवल्याला या वेळेस!’’ त्यानंतर त्यांचा सांगलीला येण्याचा योग काही आला नाही.

विमलाआजीच्या आजारपणापासून आजोबा अधिकच हळवे झाले होते. थकलेही होते. तिच्यावरचे ओतप्रोत प्रेम त्यांच्या वागण्यातून जाणवे. रोज संध्याकाळी ते आजीचा हात हातात घेऊन बराच वेळ बसत. तिच्या कपाळावरून हात फिरवत राहत. त्यांच्या या बोलक्या स्पर्शामधून ते आजीकडे आपले मन मोकळे करत असतील कदाचित. आपल्यानंतर आजारी आजीचे कसे होणार, ही काळजी त्यांना सतत बोचत होती. त्याही परिस्थितीत २००६ साली आम्हा सर्व २५-३० भावंडांची राखीपौर्णिमा तात्याआजोबांच्या घरी साजरी झाली. आजीच्या आजारपणापायी त्यांना आलेल्या एकटेपणामुळे असेल कदाचित; पण आयुष्यभर शिस्तप्रिय राहणी स्वीकारलेल्या आजोबांना नातवंडांचा धुमाकूळ हवासा वाटत होता. खुशीत होते त्या दिवशी ते खूप.

वर्षभरातच ११ मे २००७ रोजी आजी वारली. आजोबांना भेटायला जेव्हा मी आणि चैतन्य गेलो तेव्हा त्यांनी मला जवळ बसवून घेतले. माझा मुलगा ध्रुव माझ्या मांडीवर बसला होता. आतून आणून एक चांदीचा ग्लास त्यांनी ध्रुवच्या हातात ठेवला आणि माझ्या पाठीवरून हात फिरवत क्षीण झालेल्या आवाजात म्हणाले, ‘‘आजीचा लहानपणचा ग्लास आहे हा!’’

त्या दिवशीची आमची भेट ही शेवटची भेट ठरली होती.

ध्रुव जेव्हा जेव्हा तो ग्लास हातात घेतो, तेव्हा प्रेमाचा धागा मजबूत करून नाते पुढच्या पिढीपर्यंत रुजवण्याची त्यांची त्या दिवशीची तळमळ मला त्या ग्लासच्या रूपात दिसते. २१ ऑगस्ट २००७ नंतर आज अकरा वर्षे लोटली, पण अजून इतक्या वर्षांनीही ठाण्याहून मुंबईकडे जाताना  शीवच्या वाटेवरून गाडी जात असली आणि पेट्रोल पंपापर्यंत पोहोचली की डावीकडे वळावेसे वाटते. पण न कळवता गेल्यामुळे पाठीत गुद्दा मारणारे तात्याआजोबा मात्र आता नाहीत.

त्यांच्या प्रत्येक पत्राच्या वरच्या बाजूला लिहिला जाणारा ‘४, मातृस्मृती’ हा पत्ता काळाच्या पडद्याआड विरून गेला. तसाच नुकताच खटाववाडीतला त्यांच्या कर्मभूमीचा पत्ताही! काही गोष्टी अपरिहार्य असतात याची जाणीव जरी असली, तरी मन त्या गोष्टी मानायला तयार होत नाही, हेच खरे.

श्रीपु माझ्या जीवनात जे आले ते गोऱ्या मुलायम कांतीचे, घाऱ्या डोळ्यांचे आणि प्रेमळ नजरेचे तात्याआजोबा म्हणून. पण मी मोठी होत होते तसे हळूहळू माझ्या मनाने टिपले, की कुटुंबातल्या बहुतेक सगळ्यांवर  तात्याआजोबांचा मनोवैज्ञानिक दबाव येतो. ते काहीतरी वेगळे आहेत.. सामाजिक कार्यक्रमांप्रमाणेच आमच्या घरगुती कार्यक्रमांमध्येही त्यांना खास वागणूक मिळते. वरवर त्यांना ‘तात्या’ अशी प्रेमाची हाक मारणाऱ्या घरातल्या बऱ्याच जणांनाही त्यांचं ते ‘श्रीपु’ असणं बाजूला सारता आलेलं नाही. त्यांनाही त्यांच्या आणि कुटुंबीयांमध्ये तयार झालेला हा अदृश्य पडदा बाजूला सारता आला नाही. पण मला आवर्जून वाटतं, की कौटुंबिक आघाडीवर घरातल्या सगळ्यांना ते ‘तात्या’ म्हणून अधिक मिळायला हवे होते. त्यांच्या आणि सगळ्या कुटुंबीयांच्या हातून नात्यातला तो अनौपचारिकतेचा गोडवा थोडासा निसटून गेला का? याला कारण होते ते आजोबांच्या व्यक्तिमत्त्वातले कंगोरे की घरातल्यांचे त्यांच्या प्रतिभेने दिपून जाणे?

divekar@gmail.com