दिनेश गुणे

कहॉँ गये वो लोग?

एकेकाळी प्रकाशझोतात वावरलेल्या व्यक्ती त्यातून बाहेर गेल्यावर पुढचं आयुष्य कसं व्यतीत करतात, हे जाणून घेणारे लेखांक.. कामगार चळवळीच्या धगधगत्या पर्वाचे साक्षीदार कामगार नेते दादा सामंत!

कधी कधी योगायोगानं काहीतरी घडतं. त्याचा इतका अचंबा वाटू लागतो, की योगायोगानंच समोर आलेला तो अनुभव चमत्कारासारखा वाटू लागतो. हा अनुभव मी अलीकडेच घेतला. तो योगायोग की चमत्कार, माहीत नाही. एकदा कधीतरी गिरणी कामगारांच्या एका ज्येष्ठ नेत्याबरोबर फोनवर बोलत असताना काही जुने संदर्भ आले आणि त्या गप्पांच्या ओघात डोक्यात घोळत असलेल्या लेखाचा विषय निघाला. कामगार संघटना म्हटले की डॉ. दत्ता सामंत, दादा सामंत ही नावे डोळ्यासमोर येतातच. दादा सामंत हे डॉ. दत्ता सामंतांचे मोठे भाऊ. दत्ता सामंतांच्या कामगार आघाडीच्या व्यवस्थेचा डोलारा सांभाळणारे, काहीसे पडद्याआडून काम करणारे नेते. कामगार आघाडीची प्रसिद्धी पत्रके त्यांच्याच सहीने वर्तमानपत्रांच्या कार्यालयांत यायची. संप, मोर्चे, निवडणुकांच्या काळात कधीतरी त्यांची भेट व्हायची. गेल्या २०-२५ वर्षांत त्यांचं नाव फारसं चर्चेत नाही. जागतिकीकरण सुरू झालं. मुंबईतील गिरण्याही संपल्या आणि गिरणी कामगारही संपला. गिरणगावात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. आता कामगार संघटनाही नावालाच उरल्या. एका अर्थाने दादा सामंत झोतातून काहीसे मागे पडले..

दादा सामंत बोरीवलीला कुठेतरी राहतात, एवढीच जुजबी माहिती मिळाली. त्यांना भेटणं अवघड नाही याची खात्री झाली. मी अधूनमधून सुट्टीदिवशी नॅशनल पार्क वा त्याच्या आसपास भटकंतीला जातो. तेव्हा बोरीवलीसारख्या गजबजलेल्या भागातही एवढय़ा शांततेत, निसर्गाच्या कुशीत बंगल्यांमध्ये राहणारी माणसं हे एक कुतूहल वाटतं. श्रीकृष्ण नगरातील एका वसाहतीत त्या दिवशी ही शांतता अनुभवत भटकत असताना एका टुमदार बंगल्याकडे लक्ष गेलं आणि मी चमकलो. गॅलरीत एक वयस्कर गृहस्थ उभे होते. शांतपणे रिकामा रस्ता न्याहाळणारा तो चेहरा ओळखीचा वाटला. त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि आठवणींना ताण दिला तेव्हा ओळख पटली.

हाच तो योगायोग! काही दिवसांपूर्वी ज्यांची आठवण निघाली होती ते दादा सामंत त्या बंगल्यात राहतात याची खात्री करून घेऊन मी तेथून निघालो. थोडा प्रयत्न करून त्यांचा फोन नंबर मिळवला. फोन केला. काही जुने संदर्भ सांगितल्यावर ओळख पटली आणि दादांना भेटायचं ठरलं.

भेटायचं निमित्त होतं- गप्पा मारणं! पण दादांना भेटल्यावर गप्पा मारायच्या असल्या तरी आपण फक्त त्यांना बोलतं करण्यापुरतं बोलायचं आणि नंतर फक्त ऐकत राहायचं, हे आधीच ठरवलेलं. ‘यंत्राच्या चाकासमोर उगारलेली मूठ’ हे त्यांच्या कामगार आघाडीचं बोधचिन्ह होतं. त्यांच्या लेटरहेडवर ते असे. ते बोधचिन्ह आणि लेटरहेडवरील मजकुराच्या तळाशी असलेली दादा सामंतांची सही यांच्या मधला मजकूर म्हणजे मुंबईतील कामगार चळवळीचा इतिहास होता. दादांच्या मनाच्या तळाशी असलेला हा इतिहास पुन्हा त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाला तर मजा येईल असं वाटत होतं. शिवाय ते आज त्या काळाकडे कसं पाहतात, तेही जाणून घ्यायची उत्सुकता होती. ते मी दादांना सांगितलं आणि थेट श्रोत्याच्या भूमिकेत गेलो. दादांना बोलतं करायचा प्रश्नच नव्हता. जणू ते कधीपासून माझ्यासारख्या श्रोत्याची वाटच पाहत होते.

त्या दिवशी ज्या गॅलरीत दादा उभे होते, त्याच मजल्यावरच्या दिवाणखान्यात आम्ही बसलो होतो. त्यांच्या सोफ्याशेजारी एक फायबरच्या वाघाची मूर्ती होती. सोफ्यावर दादा बसले. मी समोर बसलो. एक भूतकाळ जिवंत होत गेला..

दत्ता सामंतांच्या पश्चात कामगार आघाडीत फारसा राम राहिला नव्हता. ती जिवंत ठेवण्यातील दादांचा रसही बहुधा संपला होता. कुलकर्णी नावाच्या कामगार क्षेत्रातील एका जाणत्याला सोबत घेऊन कामगार आघाडीचा दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न दादांनी केला खरा; पण अचानक कुलकर्णीचं निधन झालं आणि दादांनी कामगार आघाडीतून अंग काढून घेतलं. आता घरबसल्या दोन-चार संघटनांचे काम दादा पाहतात, पण त्यावर ते जास्त बोलत नाहीत. दादांचा वर्तमानकाळही भूतकाळाशी जखडलेला आहे.

आणखी काही दिवसांनी दादा नव्वदीत प्रवेश करतील. पण भूतकाळानंच दादांचं मन आजही टवटवीत ठेवलं आहे. कदाचित त्यामुळेच दादांचं शरीरही टवटवीत आहे. नव्वदीची खूण त्यांच्या चेहऱ्यावर तर नाहीच, पण मनावरही दिसत नाही. लहानपणी कोकणातलं मालवणजवळचं गाव सोडून मुंबई गाठल्यापासून अगदी कालपर्यंतचं सारं तारीख-वारानिशी त्यांच्या मनात ताजं आहे.

त्यांनी ते भूतकाळाचं पुस्तक उघडलं आणि अशा खुमासदारपणे वाचायला सुरुवात केली, की ते पूर्ण झाल्याशिवाय इथून हलायचं नाही असं ठरवलं. आम्हा दोघांच्या गेल्या २०-२५ वर्षांत तुटलेल्या संपर्काच्या काळात खूप काही घडून गेलं होतं. बातमीच्या पलीकडचं!

कुल्र्यातील राहत्या घराच्या पुनर्विकासाचे काम निघाल्यानंतर दादा बोरीवलीच्या या घरात मुलीकडे राहायला आले आणि एका दुर्दैवी कौटुंबिक आघातानंतर इथंच राहायचा निर्णय त्यांनी घेतला. ज्या दोन-चार संघटनांचे वयाच्या नव्वदीतही ते नेतृत्व करतात, त्यांचं काम ते इथूनच पाहतात. मॅट्रिक झाल्यावर मालवणातून पुढच्या शिक्षणासाठी गिरगावात बहिणीकडे दाखल झाल्या दिवसापासून पुढच्या प्रवासाचा तपशील एखाद्या डायरीसारखा दादांच्या मेंदूत नोंदलेला आहे. १९५१ साली बी. एस्सी. झाल्यानंतरच्या वेगवेगळ्या नोकऱ्यांतून जमा झालेल्या अनुभवांची पोतडी उघडताना दादा सुखावतात. कोकणातील काटकसरीच्या दिवसांमुळे हाती पसा नसतानाही मुंबईत जगता आलं, हे दादा आपलं सुदैव मानतात. आठवणी सांगता सांगता दादा अचानक वर्तमानात दाखल होतात. निमित्त असतं भूतकाळाचंच. अगदी सी. डी. देशमुखांनी अर्थमंत्री असताना केलेल्या आयातबंदीमुळे सुरू झालेल्या कापड गिरण्यांची आजची अवस्था ते जागतिकीकरणानंतरच्या दोन पिढय़ांच्या मानसिकतेच्या मुद्दय़ापर्यंत! दादा गेल्या सत्तर वर्षांतील या स्थित्यंतरांचे साक्षीदार आहेत. धंद्याच्या व्यवस्थापनापासून कामगारांच्या संघर्षांपर्यंत प्रदीर्घ अनुभव गाठीशी असल्याने आजही त्यांना व्याख्यानांची अनेक निमंत्रणे येत असतात. गेल्याच महिन्यात एक दिवसाकरिता म्हणून ते एका परिषदेत भाषण देण्यासाठी बडोद्याला गेले होते आणि दोन व्याख्याने देऊन परतले. विषय होता- ‘उदारीकरणानंतरची परिस्थिती’! १९९१ पासून २८ वर्षे उलटल्यावर त्याच विषयावर काय बोलायचं? उदारीकरण हीच जीवनशैली बनलेल्या नव्या पिढीला २८ वर्षांआधीच्या परिस्थितीची माहितीही नसताना त्यांना काय सांगायचं? तेच ते उगाळण्यापेक्षा काहीएक वेगळा विषय मांडावा म्हणून दादांनी एक लेखच लिहून काढला.

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी भारतात गिरण्या, कारखाने सुरू होऊ दिले नाहीत. त्यांच्या तयार मालासाठी त्यांना भारताची फक्त बाजारपेठ हवी होती. दुसऱ्या महायुद्धानंतर सारं जग बेचिराख झाल्यावर त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी भारतात गिरण्या-कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली. त्यांनीच गिरण्या काढल्या आणि देशात उत्पादनाला सुरुवात झाली. १९५१ मध्ये मे महिन्याच्या नऊ तारखेला अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी एक आदेश काढून आयातीवर बंदी आणली आणि आयातीवर अवलंबून असलेले धंदे अडचणीत आले. त्यामुळे मग इकडे उत्पादन करण्यावाचून पर्यायच उरला नाही.

आयात बंद झाल्यामुळे इथले उद्योग सुरक्षित झाले. जे १९५१ मध्ये झालं त्याच्या बरोब्बर उलटं उदारीकरणामुळे १९९१ मध्ये झालं होतं. आयात सुरू झाली. १९५१ ते ९१ ही चाळीस र्वष निराळी होती. या काळात कारखाने आले, कामगार कायदे झाले, ते कामगारांच्या हिताचेही होते. ही ४० वर्षे हा कामगारविश्वाच्या दृष्टीने खरा सुखाचा काळ होता. त्यामुळे या सुखाचाही थोडासा अतिरेकच झाला. कामगार संघटित होऊ लागले. ‘कंत्राटी कामगार’ हा शब्दच तेव्हा अस्तित्वात नसल्याने झाडूवाला कामगारही सेवेत कायम असायचा. त्यालाही सेवाकाळानुसार बढती मिळायची. तो कुशल कामगारासारखा पगार घेऊन झाडूच मारतो, मग त्याला पगारवाढ का द्यायची, असा विचार बळावत चालला. त्याचवेळी उत्तर भारतातील अकुशल मजुरांची पावलं मुंबईकडे वळू लागली आणि कामगार स्वस्तात मिळू लागला. शहरं वाढू लागली, खेडी रिकामी होऊ लागली. याचे साक्षीदार असलेले दादा लांबवर कुठंतरी नजर लावून भूतकाळाचं पुस्तक वाचत राहिले..

उदारीकरणानंतर- म्हणजे १९९१ नंतर बाजारातल्या प्रत्येक वस्तूशी चीनच्या उत्पादनांची स्पर्धा सुरू झाली. चीनचा माल भारतातल्या मालापेक्षा स्वस्तात मिळू लागला आणि आपली निर्यात संकटात आली. मग भारताने निर्यातीवर अनुदान देण्यास सुरुवात केली. उत्पादनखर्च कमी करण्यासाठी कामगारांवरील खर्चात कपात करणे भाग पडू लागले आणि कंत्राटी कामगार प्रथा सुरू झाली. त्यातून कामगार संपला. पण ते अपरिहार्यच होतं. कंत्राटी कामगारांमुळे संघटितपणाच्या जोरावर ‘पर्मनंट’ असलेल्या कामगारांचा ऐदीपणा संपला.

तीन पिढय़ांतील परिवर्तनाचं एक सहज चित्र दादांच्या बोलण्यातून उभं राहिलं होतं. बोलता बोलता वर्तमानकाळात आलेले दादा पुन्हा एकदा मागे गेले. मुंबईत आल्यानंतरचे दिवस, गिरगावातून वांद्रय़ाला हलवलेलं वास्तव्य, पदवीनंतरची पहिली नोकरी, नोकऱ्यांसाठी दिलेल्या असंख्य मुलाखती, रेल्वेतील नोकरी, गिरणीधंद्यातील श्रीगणेशा, ग्वाल्हेरमधील गिरणीतली साडेपाच वर्षांची नोकरी, तिथली अनुभवांची शिदोरी आणि डॉ. दत्ता सामंतांच्या कामगार आघाडीच्या कार्यालयातील कामाची सुरुवात.. संघर्षांचे व संपाचे दिवस.. अशा अनेक अनुभवांची पोतडी उघडताना दादांना काही किस्सेही आठवत होते. ते सांगतानाचं त्यांचं दिलखुलास हसू आणि टाळीसाठी पुढे होणारा हात.. वयाचं अंतर विसरून दादा मोकळे झाले होते, हे लक्षात येत होतं.

मधेच खिडकीबाहेर चिमण्यांचा जोरदार चिवचिवाट सुरू झाला. दादांनी बोलणं थांबवलं आणि ते हलक्या पावलांनी खिडकीजवळ गेले. स्तब्धपणे त्या किलबिलाटाकडे कान लावले. काही वेळानं चिमण्या उडून गेल्या. दादा पुन्हा खुर्चीत येऊन बसले.

‘‘रोजच यावेळी या चिमण्या खिडकीशी येतात. थोडा वेळ त्यांचा किलबिलाट ऐकत बसतो. मजा वाटते..’’ दादा म्हणाले. आणि अगोदर संपलेल्या वाक्याचा धागा पकडून पुन्हा पुढे बोलू लागले..

ग्वाल्हेरहून मुंबईत परतल्यानंतर पुन्हा ग्वाल्हेरमध्ये बडोदा रेयॉनच्या मालकांनी दादांना बोलावून घेतलं. त्यांनी तेव्हा मुंबईतल्या ज्या गिरणीत दादा काम करीत होते, त्या गिरणीच्या जनरल मॅनेजरएवढय़ाच पगाराचं अपॉइंटमेंट लेटर त्यांच्या हातावर ठेवलं. दादा मुंबईहून पुन्हा ग्वाल्हेरला गेले.

जवळपास अडीच वर्षांनंतर- १९८१ च्या दिवाळीसाठी दादा आठवडय़ाची रजा घेऊन बडोद्याहून मुंबईला आले. दत्ता सामंत यांचा एव्हाना कामगार नेते म्हणून दबदबा निर्माण झाला होता. त्याच दिवशी- १८ ऑक्टोबरला- दत्ता सामंतांनी श्रीनिवास मिलच्या गेटवर गिरणी कामगारांची सभा घेतली व गिरणी कामगारांची युनियन मी हाती घेतोय असं जाहीर केलं. आणि ते दादांना भेटायला बहिणीच्या वांद्रय़ाच्या घरी आले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, चहापाणी झालं आणि दत्ता सामंतांनी थेट मुद्दय़ालाच हात घातला. ‘‘दादा, मी असं ठरवलंय, की आता तुम्ही नोकरी सोडायची आणि युनियनमध्ये माझ्यासोबत यायचं!’’ २२ तारखेला भाऊबीज झाली आणि दत्ता सामंतांना भेटायला दादा युनियनच्या कार्यालयात गेले तेव्हा कामगारांनी त्यांच्या गळ्यात हार घालून त्यांचं स्वागत केलं. त्या दिवशी त्यांनी आपली भविष्याची दिशा नक्की करून टाकली. त्या दिवशी कार्यालयातच त्यांनी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी घरी जाऊन कपडे आणले आणि युनियनचे कार्यालय हेच दादांचे घर झाले. काही दिवसांनी त्यांनी ग्वाल्हेरला नोकरीचा राजीनामा पाठवून दिला आणि तिकडून ९९ हजार व काहीशे रुपयांचा चेक दादांच्या नावे आला.

‘‘माझ्या जिंदगीचं सेव्हिंग! ते पसे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाकून त्यावर मी आजपर्यंत जगतोय!’’ हसत हसत दादा म्हणाले.

दत्ता सामंतांनी संघर्ष करायचा आणि दादांनी कार्यालय सांभाळायचं, तिथलं व्यवस्थापन करायचं असं ठरलं. हे त्यांच्या आयुष्याला मिळालेलं मोठं वळण होतं. २१ वर्षांचा मिलमधील कामाचा अनुभव संघटनेला शिस्त लावण्यासाठी त्यांच्या कामी आला. या काळात काही जणांशी त्यांचं पटलं नाही. काही जण संघटना सोडून गेले.

या आठवणी सांगता सांगता एकदम काहीतरी आठवल्यासारखी दादांनी चुटकी वाजवली. मिश्कील डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि ते गालात हसले. आता काहीतरी किस्सा ते सांगणार, याची पूर्वकल्पना आली..

कामगार आघाडीचं एक पाक्षिक हाऊस मॅगझिन होतं- ‘श्रमिक योद्धा’ नावाचं! ठाण्याचा एक मुक्त पत्रकार ते मजकुरासकट तयार करायचा. त्यात फक्त दत्ता सामंत हेच केंद्रस्थानी असायचे. युनियनविषयी काहीच नाही. कुणीच ते वाचत नसे. तो पत्रकार अंकाचे गठ्ठे युनियनच्या कार्यालयात आणून टाकायचा आणि टॅक्सीचं बिल व ठरलेली रक्कम घेऊन निघून जायचा. गठ्ठे तसेच पडून राहायचे. दादांनी ते पाक्षिक स्वत:कडे घेतलं. मग कामगार कायद्यांची माहिती, नवे करार, कामगार संघर्षांच्या कथा, मालक-कामगार नातेसंबंध, कामगारांसंबंधीच्या वर्तमानपत्रांतील बातम्या, सरकारचे निर्णय असा मजकूर त्यात दिसू लागला. कामगारच नव्हे, तर गिरणी मालक आणि व्यवस्थापनांनीही ते विकत घेणं सुरू केले. ‘श्रमिक योद्धा’ हे कामगार जगताचं मुखपत्र बनलं.

१९९१ मध्ये दत्ता सामंत खासदारकीची निवडणूक हरले. तोवर पराभव माहीत नसलेले दत्ता सामंत त्यामुळे काहीसे नाराज झाले. ‘‘मग मी अंकात एक लेख लिहिला- ‘जिएंगे तो और भी लडेंगे’ अशा आशयाचा. पण दत्ता सामंतांना तो पटला नाही. मग मी अंकासाठी लिहिणं बंद केलं आणि ‘श्रमिक योद्धा’ बंद झाला. अकरा वर्षांनी ते प्रकाशन बंद पडलं. पण आजही त्यातला मजकूर संदर्भ म्हणून मौल्यवान आहे,’’ एक सुस्कारा टाकत दादा म्हणाले.

दादांच्या घरी ‘श्रमिक योद्धा’चे जुने अंक आजही नीट सांभाळून ठेवलेले आहेत. रिकामा वेळ मिळाला, की दादा ते जुने अंक काढतात, वाचतात, पुढच्या व्याख्यानाचे संदर्भ म्हणून त्यातून काही नोंदी करून घेतात. पुन्हा तो भूतकाळ त्यांच्या डोळ्यासमोरून सरकू लागतो. रिकामपणाचा वेळ तो भूतकाळाचा पट न्याहाळण्यात आणि त्याची मजा घेण्यात कसा संपतो तेच कळत नाही. पण आताशा त्यांना काम नसेल तर आळस येतो. कामाची भूक अस्वस्थ करते. टीव्ही बघण्यात त्यांना मजा वाटत नाही. एकटेपणा खायला उठतो. दादांच्या बोलण्यात मधेच ही खंतही येते. तरीही एकंदरीत त्यांच्या जगात भूतकाळाच्या फुलांचे ताटवे फुललेले आहेत. त्याच्या टवटवीतपणामुळे दादांचं मनही टवटवीत होतं. नव्वदीतला हा टवटवीतपणा दादा सामंत जिवापाड जपतायत!

dineshgune@gmail.com