29 May 2020

News Flash

आभाळमेरी..

बॉक्सर मेरी कोमने विक्रमी सहावे जागतिक अजिंक्यपद जिंकून देशातील महिला खेळाडूंच्या विजिगीषु वृत्तीला चालना दिली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सिद्धार्थ खांडेकर

बॉक्सर मेरी कोमने विक्रमी सहावे जागतिक अजिंक्यपद जिंकून देशातील महिला खेळाडूंच्या विजिगीषु वृत्तीला चालना दिली आहे. त्याचे फलित येत्या काळात पाहायला मिळेलच. परंतु आपल्या क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठून त्यावर दीर्घकाळ विराजमान होता येते, हेही मेरीने सिद्ध केले आहे. भारतीय क्रीडाक्षितिजावर सध्या ‘महिलाराज’ सुरू आहे असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरू नये.

बॉक्सर मेरी कोमच्या विक्रमी सहाव्या जागतिक अजिंक्यपदामुळे एका महत्त्वाच्या, परंतु आजपर्यंत काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या विषयावर नव्याने प्रकाशझोत टाकलेला आहे. हा विषय म्हणजे भारतीय क्रीडाक्षेत्रात महिलांचे योगदान! २०१६ मधील रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिक (कुस्ती) आणि पी. व्ही. सिंधू (बॅडिमटन) या महिलांनीच भारतीय तिरंगा फडकवला. १९९६ च्या अटलांटा ऑलिम्पिकनंतर भारतीय खेळाडू सातत्याने पदक-तालिकेत दिसत आहेत. ते किती कमी संख्येने झळकतात आणि किती अधिक संख्येने त्यांनी पदके मिळवली पाहिजेत, ही चर्चा जरा बाजूला ठेवू. परंतु ज्या मोजक्या खेळाडूंनी ऑलिम्पिक पदक जिंकले, त्यांत महिलांची संख्या लक्षणीय आहे. उदा. कर्णाम मल्लेश्वरी (सिडनी- २०००), सायना नेहवाल (लंडन- २०१२), मेरी कोम (लंडन- २०१२), पी. व्ही. सिंधू (रिओ- २०१६), साक्षी मलिक (रिओ- २०१६)! १९८० च्या दशकात ज्यावेळी हॉकीपलीकडे इतर खेळांकडे आशेने पाहावे अशी स्थिती नव्हती, त्यावेळी पी. टी. उषा हिच्याकडेच पदकांची आशा म्हणून पाहिले जायचे. नवीन सहस्रकात सानिया मिर्झाने काही काळ टेनिस एकेरीमध्ये चमक दाखवली आणि दुहेरी टेनिस विश्वही गाजवले. अंजली भागवतने नेमबाजीत पहिल्यांदा सर्वोच्च पातळीवर चमक दाखवायला सुरुवात केली. सायना नेहवालने बॅडमिंटनमध्ये प्रकाश पडुकोण, पुलेला गोपीचंद यांच्या तोडीची कामगिरी करून दाखवली आणि तिच्यापासून स्फूर्ती घेऊन पी. व्ही. सिंधूने जागतिक कांस्य आणि ऑलिम्पिक रौप्यपदकापर्यंत मजल मारली. या दोघींची वाटचाल अजूनही सुरू आहे. जिम्नॅस्टिक्समध्ये एशियाड, राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक अशा बहुविध स्पर्धामध्ये आशा वाटावी अशी कामगिरी सध्या दीपा कर्मकार करून दाखवीत आहे. रानी रामपालच्या नेतृत्वाखाली हॉकी संघाने गेल्या वर्षी आपल्यापेक्षा वरचढ चीनला हरवून आशिया कप जिंकून दाखवला. क्रिकेटमध्ये महिला विश्वचषक स्पर्धामध्ये चमक दाखवत आहेत. अंजली भागवतपासून सुरू झालेली नेमबाजीतली यशोगाथा सुमा शिरूर, राही सरनोबत, हीना सिद्धू अशांनी सुरू ठेवली आहे. कुस्तीमध्ये फोगट भगिनी चमकत आहेत आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन साक्षी मलिकसारख्या उदयोन्मुख कुस्तीपटू ऑलिम्पिकसारख्या मोठय़ा स्पर्धामध्ये हुन्नर दाखवीत आहेत. या क्रीडापटू देशाच्या विविध भागांमधून येत आहेत. मोठय़ा शहरांप्रमाणेच, किंबहुना त्यापेक्षाही अधिक प्रमाणात निमशहरी आणि ग्रामीण भागांतून क्रीडाक्षेत्रात उतरणाऱ्या मुलींची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढलेली दिसते. महिला सक्षमीकरण आणि महिलांचे शोषण यांविषयी सारख्याच उच्चारवात चर्चा होत असताना गेल्या २५ वर्षांमध्ये क्रीडाक्षेत्रातील भारताच्या प्रगतीमध्ये महिलांचे वाढते योगदान या महत्त्वपूर्ण घडामोडीची दखल फारशी घेतली गेलेली नाही. मेरी कोमच्या निमित्ताने याची र्सवकष दखल घेणे भाग पडते.

मेरी कोमची कामगिरी अभूतपूर्व आणि पुनरावृत्ती होण्यास जवळपास अशक्यकोटीतली आहे. तिची तुलनाच करायची झाल्यास भारतीय क्रीडाक्षेत्रातील त्रिमूर्तीबरोबर करावी लागेल. नव्हे, मेरी कोमची कामगिरी सचिन तेंडुलकर, लिअँडर पेस आणि विश्वनाथन आनंद या त्रिमूर्तीच्या कामगिरीइतकीच अढळपदप्राप्त ठरते. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात सचिन, लिअँडर आणि आनंद यांची कारकीर्द सुरू झाली. नव्वदच्या दशकात ती फुलली. नवीन सहस्रकाच्या पहिल्या दशकात त्यांचा आलेख एका वेगळ्या उंचीवर गेला. केवळ चांगले खेळत राहणे हे या तिघांचे वैशिष्टय़ नव्हते. त्यांनी किमान दोन पिढय़ा तो दर्जा टिकवून धरला. आज सचिन निवृत्त झाला आहे. लिअँडर पेस अस्ताला निघाला आहे. तर आनंद अजूनही खेळतो आहे. बुद्धिबळात टेनिस आणि क्रिकेटप्रमाणे शारीरिक कस लागत नसल्यामुळे आनंदची कारकीर्द इतर दोघांच्या तुलनेत अधिक प्रदीर्घ ठरणार, हे स्वाभाविकच आहे. पण या तिघांचे केवळ क्रीडाक्षेत्रात नव्हे, तर एका अर्थाने राष्ट्रघडणीतही अप्रत्यक्ष योगदान राहिले आहे. कसे, ते तपासणे महत्त्वाचे आहे. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीस भारतीय अर्थव्यवस्था खुली झाली आणि खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या लाटेवर आपण स्वार झालो. देश बंदिस्त अर्थव्यवस्थेतून संक्रमण करत असताना आपल्या क्षमतेचीही कवाडेही खुली झाली होती. केवळ मोठी बाजारपेठ म्हणून नव्हे, तर त्या तोडीचे कुशल मनुष्यबळ पुरवू शकणारा देश म्हणून भारताकडे पाहिले जाऊ लागले. या क्षमतेचे प्रतिबिंब लोकांना सचिनच्या सुरुवातीच्या परदेशी मैदानांवर झळकवलेल्या चार शतकांमध्ये दिसू लागले. पहिल्यांदा ज्युनियर बुद्धिबळ जगज्जेता बनल्यानंतर विश्वनाथन आनंद नव्वदच्या सुरुवातीपासूनच कास्पारॉव, कारपॉव, कोर्चनॉय या दिग्गजांशी बुद्धिबळाच्या पटावर दोन हात करू लागला आणि जिंकू लागला तेव्हा तो बदलत्या भारताच्या असीम प्रतिभेची प्रचीती देऊ लागला. लिअँडर पेसने अमेरिकन ओपन आणि विम्बल्डन ज्युनियर अजिंक्यपदे मिळवल्यानंतर त्याच्याकडूनही अपेक्षा वाढल्या. १९९६ मध्ये अटलांटात पेसने भारतासाठी कांस्यपदक जिंकले तेव्हा परिस्थिती बदलू लागल्याची भावना सार्वत्रिक होती. कारण खाशाबा जाधवांच्या पदकानंतर (१९५२ : हेलसिंकी ऑलिम्पिक : कुस्ती : कांस्य) ४४ वर्षांनी भारताच्या नावासमोर वैयक्तिक ऑलिम्पिक पदकाची नोंद झाली होती. त्यानंतर आजवरच्या प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये भारताची पाटी कधीही कोरी राहिलेली नाही. या तिघांनी अनेक अविस्मरणीय क्षण दिले. काही वेळा निराशाही केली. मात्र, तिघेही जवळपास २५ वर्षे आपापल्या खेळांमध्ये सर्वोच्च स्थानावर राहिले. खेळण्याची आणि जिंकण्याची त्यांची भूक कधी शमली नाही. खेळांमध्ये केवळ सहभागातच समाधान मानणाऱ्या (किंवा मानून घेणाऱ्या) भारतीय क्रीडाप्रेमींसाठीही हा कालखंड त्यांची यशाची व विजयाची भूक, अपेक्षा वाढवणारा, चेतवणारा ठरला. मेरी कोमला या तिघांच्या बरोबरीचा दर्जा द्यावासा वाटतो, कारण २००२ पासून सुरू झालेली तिची वाटचाल उत्तरोत्तर बहरतेच आहे. पण वरील तिघांना मिळालेले प्रोत्साहन आणि पाठबळ मेरीला किमान सुरुवातीला तरी मिळाले नव्हते. अशा प्रकारे प्रोत्साहन व पाठबळाअभावी खेळत राहणे आणि जिंकत राहणे अधिक आव्हानात्मक ठरते.

परवा दिल्लीत जिंकले ते मेरी कोमचे बॉक्सिंगमधले सहावे जागतिक अजिंक्यपद! पण तिच्या बॉक्सिंग कारकीर्दीची सुरुवात २००१ मध्ये झाली. त्यावेळी अमेरिकेत झालेल्या स्पर्धेत तिने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. पण अंतिम फेरीत तिला पराभव पत्करावा लागला होता. तिच्या नंतरच्या प्रवासाची चर्चा होते, पण या टप्प्यापर्यंतच्या तिच्या प्रवासाची फारशी चर्चा होत नाही. तो प्रवासही तितकाच आव्हानात्मक होता. मणिपूरमधील चुरचंदपूर जिल्ह्य़ातील एका खेडय़ात मेरीचा जन्म झाला. तिचे वडील शेतमजूर होते. तीन भावंडांमध्ये मेरी सर्वात मोठी. ती जन्माला आली तो कोम समुदाय मणिपुरातही अल्पसंख्य. अवघ्या ४० हजार लोकसंख्येचा. गरिबी असली तरी ईशान्येकडील बहुतेक राज्यांप्रमाणे मेरीलाही शिक्षणापासून वंचित राहावे लागले नाही. अ‍ॅथलेटिक्स, व्हॉलिबॉल, फुटबॉल आणि भालाफेक या खेळांमध्ये तिने सुरुवातीला चमक दाखवली. तिचे वडील हौशी कुस्तीपटू होते. पण मेरी बॉक्सिंगकडे कशी वळली याबाबत तिनेच एका मुलाखतीत सांगितले आहे. १९९८ मध्ये बँकॉक एशियाडमध्ये डिंकोसिंग या बॉक्सरने सुवर्णपदक जिंकले. डिंकोसिंग मणिपूरचा. तो भारतात आल्यानंतर मणिपूरमध्ये त्याचा मोठा सत्कार झाला. त्यावेळी मणिपूरच्या युवावर्गात डिंकोसिंग हिरो ठरला होता. त्याच्या प्रभावामुळे एक पिढीच बॉक्सिंगकडे वळली. त्यात मेरी कोमही होती. दहावी आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी मेरी कोम इम्फाळला आली. पण शाळा-महाविद्यालयाऐवजी इम्फाळमधील स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीत प्रवेश हे तिचे प्रमुख उद्दिष्ट होते. अ‍ॅथलेटिक्सऐवजी बॉक्सिंग खेळण्याचा निश्चय तिने केला. प्रशिक्षक के. कोसाना मैकेल यांच्या मार्गदर्शनाखाली मेरीने बॉक्सिंगचे धडे गिरवले. ‘तिने साऱ्या क्लृप्त्या चटकन् आत्मसात केल्या,’ असे मैतेल यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. पुढे मणिपूरचे बॉक्सिंग प्रशिक्षक एम. नरजित सिंह यांचे मार्गदर्शन तिला मिळाले. वयाच्या १५ व्या वर्षी ती इम्फाळला आली आणि वयाच्या १८ व्या वर्षी ती जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत खेळण्यासाठी सिद्धही झाली. वयाच्या १९ व्या वर्षी तिने पहिल्यांदा जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. सचिन- लिअँडर-आनंदप्रमाणेच वयाची विशी ओलांडण्यापूर्वीच मेरी कोम जागतिक दर्जाची खेळाडू बनली होती.

५ फूट २ इंच उंचीची आणि ४५ किलोच्या आसपास वजन असलेली मेरी कोम कित्येकांना बॉक्सर वाटायचीच नाही. पण तिच्यात खास ईशान्येकडील महिलांमध्ये विशेषत्वाने दिसतो तसा निर्धार आणि चिवटपणा होता. बॉक्सिंगसारख्या खेळात करीअर करत असल्याचे तिने वडिलांना खूप नंतर सांगितले. सांगितले म्हणजे एके दिवशी वृत्तपत्रात फोटोच छापून आल्यामुळे त्यांना समजले! जवळपास तीन वर्षे त्यांनी मेरीच्या या निर्णयाला पाठिंबा दिला नव्हता. बॉक्सिंग खेळून चेहरा विद्रुप झाल्यावर हिच्याशी लग्न कोण करणार, ही त्या पित्याला चिंता! विवाहबद्ध होईपर्यंत तिने तीन वेळा जागतिक अजिंक्यपद पटकावले होते. विवाह आणि मातृत्वात काही वर्षे व्यतीत करून मेरी कोम पुन्हा बॉक्सिंगकडे वळली. दोन आशियाई स्पर्धा आणि चौथ्यांदा जागतिक स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले. चालू दशकात मेरीने ऑलिम्पिक, एशियाड आणि राष्ट्रकुल या प्रमुख स्पर्धावर लक्ष केंद्रित केले. हे आव्हान तसे सोपे नव्हते. वजनी गट बदलण्याचे प्रमुख आव्हान तिच्यासमोर होते. एशियाड आणि राष्ट्रकुल स्पर्धासाठी ४८ किलोची मर्यादा, जागतिक स्पर्धेसाठी ४६ किलोची मर्यादा आणि ऑलिम्पिकसाठी मात्र ५१ किलो वजनी गट अशी कसरत मेरीला करावी लागते. तरीही या दशकात एशियाड स्पर्धेत एक सुवर्ण (२०१४) आणि एक कांस्य (२०१०), राष्ट्रकुल स्पर्धेत एक सुवर्ण (२०१८) आणि ऑलिम्पिक स्पर्धेत (२०१२) एक कांस्य पदक अशी भरीव कामगिरी तिने करून दाखवली. याच्या जोडीला २०१० आणि २०१८ मध्ये जागतिक अजिंक्यपदही तिने जिंकले. प्रत्येक स्पर्धेसाठी तिला एकतर वजन घटवावे लागते किंवा वाढवावे तरी लागते. त्यासाठी सतत बदलणारा सराव व खुराक योजावा लागतो. हे सर्व करत असताना तीन मुलांचे मातृत्वही ती निभावते. त्यात आणखी आता राज्यसभा सदस्यत्व तसेच भारतीय बॉक्सिंग संघटनेकडून मिळालेले सल्लागारपद!

या व्यापांतूनही मेरीने २०२० मध्ये टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा ध्यास घेतला आहे. गेल्या खेपेला- २०१६ मधील रिओ ऑलिम्पिकमध्ये ती पात्रता फेरीतच गारद झाली होती. त्यामुळे ऑलिम्पिकसारख्या खडतर आव्हानाची तिला पूर्ण कल्पना आहे.  सतत अथक सराव आणि फिटनेसच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करणे हे हे तिच्या आजवरच्या वाटचालीचे रहस्य असल्याचे ती सांगते. ‘फ्लायवेट’, ‘लाइट फ्लायवेट’, ‘पिनवेट’ अशा नावांनी बॉक्सिंगमधील तिचे ‘चिमुकले’ वजनी गट ओळखले जातात. तिच्यापासून स्फूर्ती घेत आज देशाच्या विविध भागांतील कितीतरी मुली निरनिराळ्या खेळांमध्ये उतरत आहेत नि चमकतही आहेत. मेरीसमोर तिच्यापेक्षा दहा-पंधरा वर्षांनी तरुण असलेल्या मुली प्रतिस्पर्धी म्हणून उतरत आहेत. त्या मेरीपेक्षा काही वेळा उंच व दणकट असतात. तंत्रात त्या मेरीला हार जात नाहीत. पण मेरीची जिंकण्याची प्रचंड भूक त्यांना खुजे करून जाते. मेरीने भारतीयांना जिंकायला नव्हे, जिंकत राहायला शिकवले. हे करत असताना पाय जमिनीवर कसे राहतील याचीही शिकवण दिली. चिमुकल्या चणीची मेरी त्यामुळेच या देशात आभाळाएवढी उंच ठरते.

g@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2018 2:08 am

Web Title: article about womens reign on indian sports horizon
Next Stories
1 संन्यस्त अटलजी!
2 वरदा :एक पत्रकल्लोळ
3 ‘राजहंसी’
Just Now!
X