गेल्या काही दशकांमध्ये जगभरात जे कॉम्प्युटर युग अवतरले, त्याची काही सोनेरी पाने चितारणारे ‘सहावं महाभूत आणि मी’हे सतीश जोशी यांचे पुस्तक मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत आहे. त्यातील काही अंश. 

आजच्या जगातल्या सहाव्या महाभूताचं- कॉम्प्युटरचं- पहिलं दर्शन झालं तो क्षण आणि तो दिवस आजही मला लख्ख आठवतो. साल १९७४. मुंबईच्या आय. आय. टी. कॅम्पसमध्ये कॉम्प्युटर सेंटरच्या बाहेर रांगेत ताटकळत वाट पाहणारी आम्ही काही मुलं. सर्व जण इंजिनीअिरग विभागातले दुसऱ्या वर्षांचे विद्यार्थी.

आत जाण्याआधी एकेक जण चपला-बूट बाहेर काढून ठेवत होता. देवळात शिरण्याआधी भाविक पादत्राणं काढतो, तीच पद्धत इथेही! इतरांप्रमाणे मीही चपला बाहेर काढून ठेवल्या आणि कॉम्प्युटर सेंटर नामक देवळात प्रवेश केला. आम्हाला पुढची सूचना मिळाली होती, ती म्हणजे हात मागे बांधून उभे राहणे. हात इथे-तिथे लागू नयेत म्हणून ही खबरदारी घ्यायची.

तर हात मागे बांधून मी नम्रपणे उभा राहिलो आणि उत्सुकतेने आजूबाजूचं निरीक्षण करायला लागलो. देवळातल्या गाभाऱ्यासारखीच आत सुमारे वीस फूट बाय वीस फूट अशा आकाराची एक प्रचंड मोठी खोली होती. खोलीची एक भिंत म्हणजे एकासमोर एक अशा दोन जाडजूड काचा! काचेला जवळपास नाक चिकटेल इतकं पुढे वाकून मी खोलीत काय आहे ते पाहिलं. आतमधल्या वातानुकूलित सुखद वातावरणात साधारणपणे कपाटासारखं दिसणारं, एक सात फुटी अजस्र यंत्र स्थानापन्न झालं होतं. त्याच्यावरचे लाल, पिवळे, निळे दिवे झगमग झगमग करीत होते.

‘ओ हो! कॉम्प्युटर-कॉम्प्युटर म्हणतात तो हाच का?’ मी विस्मयाने टक लावून बघत राहिलो.

‘कार्ड्स पंच करून आणली आहेत?’

‘त्यावर नाव, रोल नंबर लिहिला आहे?’

खरखरीत आवाजातल्या या दोन प्रश्नांनी मी भानावर आलो.

रबर बँडनं घट्ट बांधलेला, पंच केलेल्या कार्डाचा माझ्या हातातला गठ्ठा मी प्रश्नकर्त्यांसमोर सरकवला. एका खिडकीतून झालेली कार्डाची देवघेव- ही एवढीच माझी आणि कॉम्प्युटरची पहिली थेट (?) भेट! याचं नाव- ‘ई सी १०३०’.

त्यावेळी विद्यार्थ्यांला कॉम्प्युटर फक्तदिसत असे. बाकी त्याच्याशी संवाद साधणारा, त्याच्याकरवी काम करून घेणारा एकच ज्ञानी माणूस- तो म्हणजे मघाशी उल्लेख झाला तो प्रश्नकर्ता. याला ‘सिस्टम्स प्रोग्रामर’ असं म्हटलं जायचं. विद्यार्थी आणि कॉम्प्युटर यांच्यामधला दुवा- ही सिस्टम्स प्रोग्रामरची भूमिका. गाभाऱ्यातल्या महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक करायचा असेल तर त्यासाठी जसा भटजीच हवा, तसाच हा कॉम्प्युटर सेंटरमधला प्रमुख भटजी.

मी खिडकीतून आत सरकवलेली कार्ड्स घेऊन तो एका की-बोर्डसमोर बसला आणि ‘खडखट्ट.. खडखट्ट..’ असा आवाज करीत आपलं काम करायला लागला. भीतीयुक्त आदराने त्याच्याकडे पाहत मी काही क्षण थांबलो आणि मग कॉम्प्युटर सेंटरच्या बाहेर पडलो.

कार्डावरून आतमध्ये पाठवलेला प्रोग्रॅम बरोबर आहे की चूक आहे, हे पाहायला दुसऱ्या दिवशी परत एकदा मी कॉम्प्युटर सेंटरमध्ये खिडकीपाशी उभा राहिलो. चुका सुधारून परत एकदा गठ्ठा सादर केला. अशा अनेक फेऱ्या मारल्यानंतर मी पहिला प्रोग्रॅम बनविण्यात यशस्वी झालो. सर्वात गमतीची गोष्ट म्हणजे कॉम्प्युटरचा नेमका उपयोग काय? आणि त्याचा वापर कशासाठी होतो? या कोडय़ांची उत्तरं मला त्यावेळी ठाऊक नव्हती.

माझ्या आजूबाजूच्या बहुतेक लोकांना कॉम्प्युटर म्हणजे काय, हेही माहिती नव्हतं आणि आय. आय. टी.मध्ये मी कॉम्प्युटरचं रोज दर्शन घेत असलो तरी माझ्या रोजच्या जगण्याशी त्याचा शून्य संबंध होता.

आता आपण काळाचं चक्र तीस र्वष ‘फास्ट फॉरवर्ड’ करू या.

साल २००७.

नेहमीप्रमाणेच माझी जपानमधली एक बिझनेस ट्रिप. माझा एक जपानी मित्र दाइकी आणि मी टोकियोमध्ये टॅक्सीतून जात होतो. बोलता बोलता कॉम्प्युटर्सचा विषय निघाला आणि ‘आज कॉम्प्युटरने जग कसं व्यापून टाकलं आहे..’ या मुद्दय़ावर आमची चर्चा सुरू झाली.

दाइकी म्हणाला, ‘लांबची उदाहरणं कशाला? आत्ता इथे कारमध्ये केवळ हाताच्या अंतरावर किती कॉम्प्युटर्स काम करत आहेत, ते पाहू या.’

‘ठीक आहे.’ मी म्हणालो आणि मग उत्साहाने आम्ही दोघं आजूबाजूचे दृश्य आणि अदृश्य कॉम्प्युटर्स शोधायला लागलो.

आमच्या दोघांच्या मधल्या सीटवर आमचे दोघांचे लॅपटॉप्स होते. आमच्या शर्टाच्या खिशात आमचे स्मार्ट फोन्स होते. माझ्याकडे एक होता, त्याच्या खिशात दोन होते. दाइकीच्या मनगटावर डिजिटल घडय़ाळ होतं. त्यातला चिमुकला कॉम्प्युटर उपग्रहावरून आलेला सिग्नल पकडायचा आणि जगातल्या पन्नास शहरांमधले दिनांक आणि वेळ अचूक सांगायचा. आम्ही ज्या टॅक्सीतून प्रवास करीत होतो, तिच्यात जीपीएस यंत्रणा होती. या यंत्रणेमुळे परत एकदा उपग्रहावरचा सिग्नल पकडून टॅक्सीला दिशादर्शक माहिती पुरवली जायची. ड्रायव्हरने फक्त गिअर बदलायचे आणि अ‍ॅक्सेलरेटर दाबून वेग वाढवायचा किंवा कमी करायचा. बाकी टॅक्सीने डावं वळण घ्यायचं की उजवं, हेही एक कॉम्प्युटर ठरवणार. या टॅक्सीला हायब्रिड इंजिन बसवलेलं होतं. म्हणजे गरजेनुसार ती इलेक्ट्रिक बॅटरीवर किंवा पेट्रोलवर चालत होती. या कामगिरीसाठी अर्थातच एका कॉम्प्युटरची नेमणूक केलेली होती. टॅक्सीच्या आतल्या भागात मनोरंजनासाठी जी यंत्रणा होती- म्हणजे रेडिओ, म्युझिक सिस्टम- तीही एका कॉम्प्युटरच्या इशाऱ्यानुसार चालत होती. टॅक्सी ड्रायव्हरच्या मनगटावर एक डिजिटल घडय़ाळ होतं आणि शर्टच्या खिशात अर्थातच एक मोबाइल. याशिवाय टॅक्सी थांबवून खाली उतरून आम्ही जर टॅक्सीचं बॉनेट उघडलं असतं तर किमान सात-आठ तरी कॉम्प्युटर्स आम्ही शोधून काढले असते. फ्यूएल इंजेक्शन कंट्रोल, ब्रेक कंट्रोल सिस्टम, सस्पेन्शन िस्प्रग्जवरचा ताण गरजेनुसार कमी-जास्त करणारा कंट्रोल.. ही सगळी कामं वेगवेगळे कॉम्प्युटर्स करीत होते. आणि या सर्व कॉम्प्युटर्सच्या कामावर लक्ष ठेवणारा असा अजून एक कॉम्प्युटर होता.

याचाच अर्थ टॅक्सीमध्ये आमचे हात पोहोचू शकतील इतक्या अंतरावर किमान बारा ते पंधरा कॉम्प्युटर्स आपापलं नेमून दिलेलं काम करीत होते. आमच्या आजूबाजूला, वरती-खालती, खिशात आणि मनगटावर जिकडे तिकडे कॉम्प्युटर्स आणि कॉम्प्युटर्स!

आणि गंमत म्हणजे या क्षणापर्यंत तरी आमचे दोघांचे लॅपटॉप्स हेच दोन कॉम्प्युटर्स आम्ही ‘कॉम्प्युटर्स’ म्हणून ओळखत होतो. टॅक्सीच्या या छोटय़ा जगात इतर अनेक कॉम्प्युटर्स दडलेले आहेत, हे आम्ही कधी लक्षातही घेतलं नव्हतं.

टॅक्सीमध्ये दाइकीबरोबर जे संभाषण झालं ते नंतरही माझ्या मनात घोळत राहिलं. केवळ तीस वर्षांपूर्वी इथे भारतात तरी कॉम्प्युटरशी कोणाही सामान्य माणसाचा रोजचा संबंध नव्हता. आय. आय. टी.मध्ये माझा कॉम्प्युटरशी परिचय झाला असला तरी मी हा विषय घेऊन पुढे नक्की काय करणार आहे, हे मलाही माहिती नव्हतं.

तेच आज तीस वर्षांनंतर इथे भारतातही सर्वसामान्य माणसाची सकाळ उजाडते, ती कॉम्प्युटर चिप बसवलेल्या मोबाइल फोनच्या गजराने. मग मायक्रोवेव्हमध्ये सकाळचं खाणं गरम करून घेणे, आंघोळीला जाताना वॉिशग मशीनमध्ये कपडे भिरकावणे, ऑफिसला जाताना कार, बस किंवा ट्रेन ही वाहनं वापरणे आणि ऑफिसमध्ये पोहोचल्यावर लिफ्टचं बटण दाबणे अशी आपली रोजची कामं सुरू होतात. ही सर्व कामं सुविहितपणे पार पडण्यासाठी कॉम्प्युटरचा अदृश्य हात मदत करतो आहे, हे आपल्या कोणाच्या गावीही नसतं.

यंत्रं पूर्वीही होती, पुढेही असतील. जे- ते यंत्र नेमलेलं ठरावीक काम ठरावीक पद्धतीने पार पाडतं. पण नियमांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण जगाला व्यापून टाकण्याची अद्भुत किमया करणारा जादूगार एकच- कॉम्प्युटर!

बरं, ही त्याची जादू केवळ पुढारलेल्या शहरी भागातच चालते असं अजिबात नाही. जिथे घरात वीज नाही, जिथे लोक आंघोळीला किंवा कपडे धुवायला नदीवर जातात, अशा मागासलेल्या ग्रामीण भागातही आज एकमेव मदतीचा हात धावून येतो, तो कॉम्प्युटरचा.

भारतासकट जगातल्या अनेक देशांनी पृथ्वीभोवती जे कृत्रिम उपग्रह फिरत ठेवले आहेत, त्यावरचे महाशक्तिशाली कॉम्प्युटर्स आपल्या दिव्यदृष्टीने पृथ्वीचा इंच न् इंच न्याहाळत असतात. त्यांच्याच मदतीने अत्यंत मागासलेल्या आणि दुर्गम भागात टेलिव्हिजन, रेडिओ आणि मोबाइल फोन असं नेटवर्कचं जाळं पोहोचवलं जातं. त्यामुळे जगातल्या बातम्यांपासून शेतीविषयक सल्ला, बँकेची सेवा, डिस्टन्स लìनगसारखी शाळेची सोय अशा अनेक सुविधा उपलब्ध होऊ शकतात. जगन्मित्र होऊन कॉम्प्युटर माणसा-माणसांपर्यंत पोहोचतो आणि माणसा-माणसांना जोडतो.

मला आठवली पुराणातली वामनाची गोष्ट! बटु वामनाने अजस्र रूप धारण करून तीन पावलांमध्ये संपूर्ण विश्व व्यापून टाकलं आणि बळीराजाला पाताळात ढकललं. आज कॉम्प्युटरची गोष्ट मात्र अगदी उलट दिशेची! देवळातल्या वातानुकूलित गाभाऱ्यात सुखेनव उभा असलेला महाकाय कॉम्प्युटरदेव काचेच्या अभेद्य भिंतींमधून बाहेर केव्हा आला? आपला वेश आणि रूप बदलून सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म रूपात जगभर कसा पोहोचला? पाहता पाहता ज्याच्या त्याच्या कार्यालयात, वाहनात, घरात आणि खिशातही कधी जाऊन बसला.. आणि सर्वगामी, सर्वज्ञानी, सुखकारी, संकटहारी असं सहावं महाभूत केव्हा बनला?

या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मला परत एकदा वळायला हवं- १९७३ सालातल्या मुंबईच्या आय. आय. टी. कॅम्पसकडे!