छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘चॅलेंजिंग डेस्टिनी’ या चरित्रात्मक पुस्तकाचा ‘झुंज नियतीशी’ हा इंद्रायणी चव्हाण यांनी केलेला अनुवाद मंजूळ पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित होत आहे. लेखिका  मेधा देशमुख-भास्करन् यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील काही अंश..

भारताला त्याच्या नियतीशी झुंज देण्यासाठी अन्य कोणाची गरज का भासली असेल? १६३० साली शिवाजी महाराजांचा जन्म होण्यापूर्वीपासून इथं अस्वस्थता धुमसत होती. कट्टर मुस्लीम जिहादी आक्रमणकत्रे इथल्या जनतेच्या मनात दहशत माजवत होते. दहशतवाद निर्माण करणं हे काही आक्रमणकर्त्यांचं जिंकण्याचं साधन नव्हतं; तर दहशतवाद धगधगत ठेवणं हीच त्यांची जीत होती. भारताच्या उत्तर सीमांवर शाक्य, हूण, अफगाण, तुर्की असे परकीय आक्रमणकत्रे घिरटय़ा घालत होते. आणि तशा परिस्थितीत हिंदू राजे मात्र आपापसात फालतू लढाया (आणि बढाया) मारण्यात गुंतले होते. मुस्लीम आक्रमणापूर्वी चिनाब नदीपासून हिंदुकुश पर्वतांपर्यंत हिंदू साम्राज्य पसरलेलं होतं. या साम्राज्याचा अखेरचा राजा जयपाल हा एक शूर शिपाई आणि सक्षम राज्यकर्ता होता. त्यावेळी काश्मीरवर लोहरा राजवंशाची सत्ता होती. स्वत:ला लक्ष्मणाचे (श्रीरामाचा भाऊ) वंशज मानणारे प्रतिहार कनौजवर राज्य करत होते. तर कनौजच्या दक्षिणेला असलेलं साम्राज्य चंडेलांचं (खजुराहोसाठी प्रसिद्ध असलेले) होतं. भारताच्या हृदयस्थानी असणारी दिल्ली तोमर राजवंशाच्या हाती होती. आणि चौहान हे तोमरचे प्रतिस्पर्धी होते. गुजरातचे चालुक्य, माळव्याचे परमार, गोरखपूर आणि त्रिपुरीचे कालाचरीस आणि बंगालचे पाल हे त्या काळातले भारतातले अन्य राजवंश होते.

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड

शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी ९०० र्वष मोहम्मद बिन कासिमच्या अरब सन्यानं सिंध प्रांताच्या दाहीर या हिंदू राजाचा पराभव केला आणि सिंध प्रांत दमास्कसच्या कालिफेतमध्ये सामावून घेतला. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या ६०० र्वष आधी मूळचा तुर्क आणि गझनी या पूर्व अफगाणिस्तानमधल्या छोटय़ाशा राज्याचा सुलतान असलेला महमूद जेव्हा भारतीय उपखंडामध्ये फिरत मूर्तिपूजकांविरुद्ध धर्मयुद्धाची घोषणा करू लागला तेव्हा इथली परिस्थिती बिघडू लागली. महमूद हा प्रचंड शक्तिमान असलेला वीर योद्धा होता. त्यानं आधी हिंदुशाही राजवंशाच्या राजा जयपालला त्रास देण्यास आरंभ केला. जयपालाच्या सन्यात अगणित हत्ती होते. सुरुवातीला त्यानं आपल्यावर चालून येणाऱ्या शत्रूला हत्तीच्या पायी चिरडण्यात यश मिळवलं. त्यामुळे संतापलेला महमूद ५०,००० सन्य घेऊन चाल करून आला, तेव्हा जयपालानं युद्धबंदीची घोषणा केली आणि खूप मोठी रक्कम खंडणी म्हणून महमूदला दिली. तरीही त्यानं जयपालाच्या मुलाला आणि नातवाला ओलीस ठेवून घेतलं. त्यानंतर काही वर्षांतच महमूद त्याच्या सन्यासह वादळासारखी दाणादाण उडवत परत आला. त्यानं ७०,००० दशलक्ष मोहरा आणि गाडय़ा भरभरून सोनं-चांदीची लूट केली. त्यानं इतकी कत्तल केली, की कत्तल झालेल्या स्त्री-पुरुष-मुलांचं रक्तमिसळल्यानं काबूलमधल्या आणि आसपासच्या प्रत्येक नदीनाल्यांना, तलावांना, विहिरींना लाल रंग आला होता. ते पाहून जयपाल इतका निराश झाला की त्यानं आत्महत्या केली. जयपालच्या पराभवामुळे हिंदुस्थानाची दारं परकीयांसाठी सताड उघडली गेली!

महमूदच्या अथांग घोडदळानं युद्धासाठी तयार नसलेल्या निष्पाप जनतेची कत्तल करत शहरांमागून शहरं उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. देवळं पाडली. आणि अनेक शतकांपासून जमवलेले खजिने लुटायला सुरुवात केली. नंतर ती त्याची सवयच झाली. तो दरवर्षी भारतात येई. हल्ले चढवत, धूळधाण उडवत कनौज, ठाणेश्वर, मथुरा यांसारख्या शहरांमधली देवळं उद्ध्वस्त करून लूटमार करून नेई. भारतावर केलेल्या पहिल्या हल्ल्यानंतर सहा वर्षांनी त्यानं सोमनाथच्या मंदिराकडे मोर्चा वळवला. त्याकाळी त्या मंदिरात १०,०००  किलोची सोन्याची साखळी होती. त्या साखळीला प्रचंड मोठी सोन्याची घंटा टांगलेली होती. त्या घंटेचा टोल आसपासच्या हजारो गावांमध्ये ऐकू जात असे. महमूदनं हल्ला केला त्या दिवशी सोमनाथाच्या मंदिरात पूजेसाठी जमलेले ५०,००० पेक्षा जास्त भाविक कापले गेले. मंदिराचा खजिना फोडला गेला आणि त्यातली संपत्ती गझनीला जाऊन पोहोचली. महमूदनं केलेल्या सर्व आक्रमणांमध्ये त्यानं इथल्या हजारो स्त्री-पुरुषांना, मुलाबाळांना पकडून नेलं आणि गुलाम म्हणून विकलं.

सोमनाथच्या मंदिरावर हल्ला करण्यामागे महमूदच्या मनात व्यापारी हेतूसुद्धा होता. हे मंदिर वेरावळ या बंदराजवळ आहे. हे बंदर त्याकाळी अरबी घोडय़ांच्या आयातीसाठी प्रसिद्ध होतं. महमूदला अरबांचा व्यापार कमी करायचा होता. कारण त्यांचं नुकसान हे गझनीच्या व्यापाऱ्यांसाठी फायद्याचं ठरू शकलं असतं. त्याकाळचा एकही हिंदू राजा गझनीच्या महमूदला रोखू शकला नाही आणि त्यामुळे गझनीचा महमूद हा अन्य परकीय आक्रमकांसाठी आदर्श ठरला.

मध्य अफगाणिस्तानातल्या घोर प्रांतावर सत्ता असणारा घोरचा मुहम्मद हाही तुर्कीच होता. १२ व्या शतकात त्यानं गझनी ताब्यात घेतलं आणि हिंदुस्थानला हल्ले करण्याचं केंद्र बनवलं. घोरचा मुहम्मद (मुहम्मद घोरी) हा अतिशय महत्त्वाकांक्षी आणि व्यापारी वृत्तीचा योद्धा होता. त्यानं १,२०,०००  इतक्या बलाढय़ सन्यासह चौहान राजवंशातल्या अखेरच्या आणि महान योद्धा असलेल्या पृथ्वीराज चौहानचा पराभव केला. असं म्हणतात की, पृथ्वीराज चौहानचा पराभव बघून कनौजचा राजा जयचंद्र याला आनंद झाला होता. एक दिवस आपलीही हीच गत होणार आहे, हे तो विसरला होता.

जदुनाथ सरकार लिहितात की, ‘११९३ साली तिरौरीला (किंवा तरण) झालेल्या युद्धात पृथ्वीराज चौहानचा पराभव झाल्यावर सलग पाच शतकं परकियांचे लोंढेच्या लोंढे हिंदुस्थानवर आक्रमण करत होते. तालिकोटच्या अभागी दिवसानंतर (१५६५ साली.. दक्षिणेतलं विजयनगर साम्राज्य पडलं तो दिवस!) एकाही हिंदू राजानं- अगदी सुरक्षित असलेल्या दक्षिणेकडच्याही कोणा राजानंही स्वतंत्र साम्राज्याचा कर्ता या भूमिकेतून मुस्लीम सत्ताधीशांविरुद्ध डोकं वर काढायची हिंमत केली नाही. तेव्हापासून धनाढय़ आणि बलाढय़ हिंदू राजेदेखील परकीय सत्ताधीशांकडे सन्यात चाकरी करणारे जहागीरदार किंवा पगारी सेनापती म्हणून नोकरी करू लागले.’ पुढे ते म्हणतात, ‘हे अमान्य करून चालणारच नाही की, प्राचीन ग्रीक त्यांचा उल्लेख करत त्याप्रमाणे ते (शिवाजी) बुद्धिमत्तेची दैवी देणगी लाभलेले राजांमधले राजे होते.’

मुहम्मद घोरीनंतर आलेल्या क्रूर आणि निर्दयी कुतुबुद्दीन ऐबकनं दिल्ली सल्तनतची स्थापना केली. विल डय़ुरांटनं विधान केलं आहे की, ‘त्याकाळचा विचार केला तर ऐबकमध्ये अतिरेक, क्रौर्य आणि निर्दयता हे गुण असणं नसíगकच होतं.’ इतिहासकार मोहम्मदीननं म्हटल्याप्रमाणे, ‘तो दानशूर होता. तो शेकडो लोकांना हजारो भेटी देत असे आणि त्याचे कत्तल करणारे शेकडो सनिक हजारांची कत्तल करत असत.’ या योद्धय़ानं एक लढाई जिंकल्यावर त्यानं (जो स्वत: गुलाम म्हणून विकला गेला होता.) ५०,००० पुरुषांना गुलाम बनवलं होतं. बल्बन या दुसऱ्या एका सुलतानानं बंडखोरांचं बंड मोडण्यासाठी त्यांना हत्तींच्या पायी दिलं होतं. कित्येक बंडखोरांची चामडी सोलून, त्यांत भुस्सा भरून त्यांना दिल्लीच्या प्रवेशद्वारावर लटकवलं जाई.

भारताचा दक्षिण भाग- दख्खन मात्र १३ व्या शतकापर्यंत अनाघ्रात राहिला होता. कदाचित तिथं असलेले डोंगर, दऱ्याखोऱ्या आणि नद्यांनी युक्त भौगोलिक प्रदेश यामुळे असं झालं असावं. त्यामुळे उत्तरेत झालेल्या विध्वंसाचा दख्खनला विसर पडला होता. आपण अजिंक्य आहोत या खोटय़ा कल्पनेत ते रमलेले होते. पण १३ व्या शतकाच्या अखेरीस (शिवाजी महाराजांच्या जन्माच्या तीन शतकं आधी) मुस्लीम सन्यानं विंध्य पर्वतराजी ओलांडली आणि दख्खनच्या हिंदू साम्राज्यांना धुळीस मिळवत त्यांचा अजिंक्य असण्याचा फुगा फोडला. देवगिरीचे (दौलताबाद) यादव, वारंगळचे काकतीय, मदुराईचे पांडे आणि द्वारसमुद्रचे होयसाळ फारसा संघर्ष न करता मुस्लिमांना शरण गेले.

प्रश्न असा आहे की, आक्रमकांना वारंवार यश कसं लाभलं?

याची अनेक कारणं आहेत. त्यांतलं एक म्हणजे तुर्काचं सर्वोत्तम युद्धतंत्र. ते घोडय़ावरची बठक पक्की करण्यासाठी आणि घोडय़ांची चपळता वाढवण्यासाठी त्यांच्या घोडय़ांसाठी लोखंडी रिकिबी आणि नाल वापरत असत.हिंदू राजे मंद गतीच्या अवाढव्य हत्तींवरून पारंपरिक पद्धतीनं युद्ध करत असत. स्थानिक योद्धे हत्तींवर असत आणि तलवारी-भाल्यांनी युद्ध करत असत, तर मुस्लीम धनुर्धर चपळ घोडय़ांवरून त्यांच्यावर अचूक नेम साधू शकत. ऐतिहासिक दाखल्यांनुसार,हिंदू राजांच्या पराभवाचं आणखी एक कारण म्हणजे त्यांचे सनिकी अधिकारी राजाच्या थेट पदरी नसत, तर जमीनदारांच्या आणि वतनदारांच्या पदरी नोकरी करत असत. त्यामुळे एकतर त्यांच्यात एकी नसे आणि त्यांना जिंकायला मदत करेल अशा कोणातरी एकाच सन्याधिकाऱ्याच्या आदेशांचं पालन करण्याची सवयही त्यांना नसे. काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की, मुस्लीम सत्ता प्रस्थापित होण्यापूर्वी भारतातली राजकीय स्थिती खालावलेली होती आणि देशप्रेम नष्ट झालेलं होतं. परकीय आक्रमकांना विरोध करण्याची दृढता नव्हती. त्यांना केवळ आपले राजवंश टिकवून ठेवण्यातच धन्यता वाटत होती. सर्व हिंदू राज्यकत्रे ‘खानदान की इज्जत का सवाल’मध्ये अडकले होते. देशाची कुणालाच पर्वा नव्हती. हिंदू योद्धे धर्यवान होते, पण ते शांतपणे व्यावहारिक विचार करू शकत नसत. सारे सरदार ऐषोआरामात व्यग्र होते. बायकांशिवाय राहणं त्यांना जमत नसे. आणि म्हणून युद्धाला जातानासुद्धा ते आपला जनानखाना बरोबर घेऊन जात असत.

तोपर्यंत भारताच्या उत्तरेनं बरंच काही सोसलं होतं. पण त्यासाठी केवळ परकीय आक्रमकांनाच दोष द्यायचा का? मेहेंदळ्यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘भारताच्या उत्तरेचं दुर्भाग्य दक्षिणेच्याही वाटय़ाला येणार होतं, हे भाकित कोणीही करू शकलं असतं. कारण आपला शत्रू एकच आहे, हे ओळखून त्याच्याशी लढण्यासाठी आपापली राजघराणी एकत्र करून मोठं सन्य उभारावं हे तिथल्या राज्यकर्त्यांच्या लक्षात येत नव्हतं.’

शिवाजी महाराजांच्या जन्माच्या ३३५ र्वष आधी- २६ फेब्रुवारी १२९५ या दिवशी- अल्लाउद्दीन खिलजीनं औरंगाबादजवळच्या दौलताबादकडे कूच केलं. अल्लाउद्दीन महाभयंकर होता. दिल्लीमध्ये वसलेल्या आणि मुस्लीम धर्मातर करायला भाग पाडलेल्या मंगोलियन रहिवाशांनी जेव्हा बंड पुकारायचा प्रयत्न केला, तेव्हा अल्लाउद्दीननं (चितौड जिंकणारा) एका दिवसात १५,००० ते ३०,००० पुरुषांची कत्तल केली होती. आणि असा क्रूरकर्मा दौलताबादकडे निघाला होता. दौलताबादला तेव्हा देवगिरी अर्थात देवांचा पर्वत असं म्हटलं जात असे. देवगिरी ही यादवांची राजधानी होती. दक्षिणेतलं हे साम्राज्य सर्वात आधी नामशेष झालं. देवगिरीच्या यादवांनी किल्ल्यात प्रचंड मोठा खजिना दडवलेला होता. पण आपल्यावर चालून येणाऱ्या शत्रूचा विचार करण्याऐवजी ते सतत होमहवन, अभिषेक आणि यज्ञ यांसारख्या कर्मकांडांमध्ये व्यग्र होते. कदाचित त्यांचं सन्यही यज्ञासाठी लागणारी समिधा गोळा करण्यात गुंतलेलं असेल. खिलजीचं सन्य त्यांच्याजवळ येऊन थडकेपर्यंत त्यांना त्याची काहीच खबरबात नव्हती याचं आश्चर्य वाटतं. कारण काही का असेना, पण अल्लाउद्दीननं महिन्याच्या आत बलशाली यादवांवर विजय मिळवला आणि दख्खनेतल्या बलाढय़ किल्ल्यांमधला एक असलेला देवगिरी किल्ला काबीज केला आणि दक्षिणेत पहिल्यांदाच पाऊल टाकणाऱ्या या आक्रमकानं दख्खनच्या श्रीमंतीची चव चाखली. खिलजीनं तिथून रेशमाचे ४००० तागे, ७० किलो हिरे, २०,००० किलोहून जास्त मोती, ३५,००० किलो चांदी आणि शेकडो राजवंशी स्त्रिया आपल्या ताब्यात घेतल्या. एच. एस. सरदेसाईंनी अतिशय स्पष्टपणे याचं वर्णन केलं आहे- ‘उत्तरेतल्या आपल्या सहधर्मीयांची दुरवस्था पाहून दक्षिणेतले हिंदू काहीच शिकले नाहीत असं दिसतं. तेही तितकेच श्रीमंत होते, त्यांच्यातही तशीच फूट होती, दूरदृष्टीचा अभाव होता.हिंदू राजे आक्रमणकर्त्यांना धीरोदात्तपणे आणि विचारपूर्वक तोंड न देता वेडेपिसे होऊन बेशिस्तपणे लढायला जात. हीच त्यांची सवय होती.’

पुढचा दाखला डय़ुरांटकडून मिळतो. तो लिहितो की एक मुस्लीम इतिहासकार खिलजीबद्दल म्हणतो, ‘जर एखाद्याच्या घरात सोन्या-चांदीचा तुकडा किंवा एकही मूल्यवान चीजवस्तू नसेल तर त्याला स्वत:चं मस्तकच पुढे करावं लागे. त्याच्याकडून वसुली करून घेण्यासाठी फटके, काळकोठडी, कैद, साखळदंड असं सगळं वापरलं जात असे.’ त्याच्याच एका सल्लागारानं त्याच्या या पद्धतीला विरोध केला तेव्हा अल्लाउद्दीन म्हणाला होता, ‘वैद्यबुवा, तुम्ही खूप शिकलेले आहात, पण तुम्हाला अनुभव नाही. मी अशिक्षित आहे, पण मी जग पाहिलेलं आहे. तेव्हा लक्षात ठेवा, की जोपर्यंत हिंदूंना दरिद्री केलं जात नाही, तोपर्यंत ते शरणही येणार नाहीत आणि आपली आज्ञाही पाळणार नाहीत.’ हे सत्ताधीश सक्षम असत आणि त्यांचे अनुयायी अत्यंत धाडसी आणि उद्योगशील असत. म्हणूनच शत्रूच्या राज्यातही ते आपला आब राखून राहू शकत असत.