अ. भा. मराठी नाटय़ परिषदेचे पहिले बालनाटय़ संमेलन सोलापुरात २७, २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी होत आहे.
या संमेलनाच्या अध्यक्षपदी विशेष मुलांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये नाटकाद्वारे सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या कांचनताई सोनटक्के यांची निवड झाली आहे. या पहिल्यावहिल्या बालनाटय़ संमेलनाच्या निमित्ताने कांचनताईंचं कार्य आणि अध्यक्ष या नात्याने त्यांच्याकडे सोपविल्या गेलेल्या जबाबदारीसंदर्भात त्यांच्याशी केलेल्या गप्पा..
ल्ल
भा. मराठी नाटय़ परिषदेतर्फे भरविण्यात येणाऱ्या नाटय़संमेलनाची शतकी वेस दृष्टीच्या टप्प्यात आलेली असतानाच परिषदेला स्वतंत्र बालनाटय़ संमेलन भरवण्याची सुबुद्धी व्हावी, ही निश्चितपणे आश्चर्याचा सुखद धक्का देणारी गोष्ट आहे. ‘नाटकाला प्रेक्षक नाही’ अशी जी सार्वत्रिक बोंब आज ऐकू येते, त्याचं कारणच मुळी कोणे एकेकाळी ऐन बहरात असलेली बालनाटय़ चळवळ नष्ट झाली, हे आहे. (तशी अनेक कारणं आहेत. त्यांची प्रसंगोपात चर्चाही होत असते.) सुधा करमरकर, सुलभा देशपांडे, रत्नाकर आणि प्रतिभा मतकरी आदींनी जाणतेपणानं मराठीत बालनाटय़ चळवळ सुरू केली, रुजवली आणि त्याची रसाळ गोमटी फळं नाटय़सृष्टीने बराच काळ चाखली. त्यातून अनेक उत्तम कलाकार, तंत्रज्ञ, लेखक, दिग्दर्शक आणि मुख्य म्हणजे मराठी रंगभूमीचा प्राणवायू असलेला रसिक प्रेक्षक घडला.. किंबहुना, हेतुत: घडवला गेला. त्या मजबूत पायावर मराठी रंगभूमी आजही टिकून राहिली आहे. मात्र, यापुढच्या काळात प्रेक्षकांअभावी ती अस्ताला जाणार की काय, असा घोर अनेकांना लागलेला आहे. आताही सुट्टीच्या मोसमात अनेक बालनाटय़ं होतात. परंतु त्यांचा दर्जा काय असतो, हा खरा कळीचा मुद्दा आहे. मुलांना चतुरस्र बनविण्याच्या पालकांच्या निकडीतून आज नाटय़शिबिरांचं पेव फुटलं आहे. शिबिरार्थी मुलांना थातुरमातुर व्यासपीठ देण्याच्या गरजेतून यातल्या बऱ्याच बालनाटय़ांची निर्मिती झालेली असते. या शिबिरांतून आपल्या मुलांना नाटकाचं नेमकं काय प्रशिक्षण मिळालं, त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात काय भर पडली, याचा मात्र कुणीच खोलात जाऊन विचार करीत नाही. शासनाच्याही दरवर्षी बालनाटय़ स्पर्धा होत असतात. परंतु तिथंही काय प्रकारची, कोणत्या दर्जाची बालनाटय़ं सादर होतात, हाही संशोधनाचा विषय आहे. ज्यांच्यासाठी या स्पर्धा घेतल्या जातात, त्या शालेय मुलांपर्यंत तरी त्या पोहोचतात का, हाही प्रश्न आहेच.
अशा सगळ्या नकारात्मक वातावरणात ‘नाटय़शाला, मुंबई’ या संस्थेमार्फत कांचनताई सोनटक्के या ‘विशेष’ मुलांसाठी गेल्या तीस-बत्तीस वर्षांहून अधिक काळ बालनाटय़ हे एक ‘थेरपी’ म्हणून उपयोगात आणत आहेत. अंध, अपंग, अस्थिव्यंगपीडित, मूक-बधीर, मतिमंद अशा सगळ्या विशेष मुलांना नाटकाच्या माध्यमातून व्यवहारी जगात उभं करण्याचं, त्यांचा हरवलेला आत्मविश्वास मिळवून देण्याचं व्रत त्यांनी पत्करलं आहे आणि कितीही अडचणी आल्या तरी त्यांनी त्यात आजवर खंड पडू दिलेला नाही. नाटय़ परिषदेच्या या पहिल्यावहिल्या बालनाटय़ संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करून नाटय़ परिषदेने एक सकारात्मक संदेशही प्रसृत केला आहे. विशेष मुलांना घेऊन बालनाटय़ चळवळ राबविणाऱ्या कांचनताईंचं हे कार्य यानिमित्तानं सर्वदूर पोहोचेल, त्यास अनेकांचं पाठबळ लाभेल, हे तर होईलच; परंतु कांचनताईंच्या कामावर मोठय़ा समाजसमूहाच्या मान्यतेची मोहोर उमटेल, हे जास्त महत्त्वाचं. अर्थात कांचनताई इतक्या संकुचित दृष्टिकोनातून याकडे पाहत नाहीत, ही गोष्ट अलाहिदा. पहिल्यावहिल्या बालनाटय़ संमेलनाच्या अध्यक्ष या नात्याने त्यांच्यासमोर कोणती उद्दिष्टे आहेत, हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी केलेली ही बातचीत..
कांचनताईंना विशेष मुलांसाठी.. तेही नाटय़माध्यमातून- काम करण्याची प्रेरणा कशी मिळाली, हा प्रश्न अनेक वर्षे त्यांचं काम जवळून पाहताना पडला होता. त्याचं निराकरण करताना त्या म्हणाल्या, ‘तशी अचानक ठिणगी वगैरे काही पडली नाही. ना कुठल्या घटनेनं मला तशी प्रेरणा मिळाली. मी कॉलेजमध्ये नाटकांतून कामं केली होती. साहित्य संघातील ‘अमृत नाटय़भारती’ संस्थेत दोन र्वष नाटकाचं प्रशिक्षण घेत असताना कमलाकर सोनटक्केंकडून मी नाटकाची खरी एबीसीडी शिकले. नाटक या माध्यमाची ताकद मला तिथं प्रथमच जाणवली. सोनटक्केंचं डायरेक्टर, लीडर घडवण्याचं तंत्र मी जवळून पाहिलं. पुढं लग्नानंतर औरंगाबाद विद्यापीठात सोनटक्के नाटय़विभागाचे प्रमुख असताना आमचे दिवसाचे २४ तास नाटकमयच असत. माणसांत बदल घडवून आणण्याची या माध्यमाची ताकद मला तेव्हा अधिक खोलात जाऊन कळली. लहानपणापासूनच मला आपण समाजासाठी काहीतरी करावं असं सतत वाटत आलेलं होतं. माझ्या आईची स्वत:पलीकडे जाऊन दुसऱ्यांना कसा आनंद देता येईल, ही शिकवणही मनात रुजली होती. त्यातून समाजातील दुर्बल, उपेक्षित घटकांसाठी मला काय करता येऊ शकेल, हा विचार मी करत होते. नाटक या माध्यमाचा निरनिराळ्या माणसांना कसा उपयोग होतो हे मी प्रत्यक्षात अनुभवत होतेच. मी मूळात नृत्यनिपुण. तेव्हा ‘नृत्यभारती’ या संस्थेद्वारे मी औरंगाबादला मुलांमध्ये काम करत होते. बालकवींच्या ‘फुलराणी’वर मी मुलांचं नृत्यनाटय़ बसवलं होतं. त्यातल्या मुलांच्या पालकांनी या नाटकानं त्यांच्या मुलांमध्ये झालेले अनेक सकारात्मक बदल त्यानंतर येऊन मला सांगितले आणि या माध्यमाच्या ताकदीचा मला प्रत्यय आला. त्यातून मग विशेष मुलांसाठी हे माध्यम का वापरू नये, हा विचार माझ्या डोक्यात आला. आणि मग त्यानुसार मी विशेष मुलांसाठी काम सुरू केलं. त्यातून हळूहळू जे रिझल्ट्स मिळत गेले त्याने मी अक्षरश: भारावून गेले. मुलांच्या पालकांनी, माध्यमांनीही विशेष मुलांमध्ये नाटकातून होणाऱ्या सकारात्मक बदलांची दखल घेतली. आणि इथून मला माझ्या कामाची दिशा सापडली.’
‘सुरुवातीच्या काळात वामन आणि गौरी केंद्रे, भालचंद्र झा यांची मला याकामी खूपच मदत झाली. परंतु नाटय़क्षेत्रातली ही व्यग्र मंडळी आपल्याला सातत्याने उपलब्ध होऊ शकणार नाहीत हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळे या विशेष मुलांच्या शिक्षकांनाच नाटय़प्रशिक्षण देऊन त्यांच्यातूनच नवे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ तयार करायचं मी ठरवलं आणि त्यांच्यासाठी प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन करू लागले. या प्रशिक्षण वर्गात डॉ. आनंद नाडकर्णी, अशोक रानडेंसारख्या मंडळींचं मला मोलाचं सहकार्य लाभलं. हळूहळू हे शिक्षकही नाटय़तंत्रात प्रगती करू लागले. तसं मग त्यांच्यातल्या हुन्नरला वाव देण्यासाठी विशेष मुलांच्या नाटय़स्पर्धा घेण्यास आम्ही सुरुवात केली. सुरुवातीला मुंबई-पुण्यापुरताच सीमित असलेला हा उपक्रम त्याच्या वाढत्या मागणीनुसार मग महाराष्ट्रव्यापी करावा लागला. जसजशी गरज निर्माण होईल तसतसं एकेक पाऊल पुढे जात आम्ही हे काम पुढं नेत गेलो. नाटय़शालेशी संबंधित माझ्या सर्व सहकाऱ्यांची याकामी मला अतोनात मदत होत असते. माझ्या एकटय़ाच्यानं हे काम पुढं नेणं शक्यच नव्हतं. या सगळ्यांच्या एकत्रित समर्पित कामाचं फलित म्हणूनच मी त्यांची प्रतिनिधी या नात्यानं हा बहुमान स्वीकारते आहे.’
नाटय़शालेच्या निरंतरपणे चालणाऱ्या विविध उपक्रमांसाठी आर्थिक पाठबळ उभं करणं ही मोठीच कठीण गोष्ट होती. कांचनताईंना त्याबद्दल विचारलं असता त्या म्हणाल्या, ‘तुम्ही म्हणताय ते खरंच आहे. या कामासाठी सुरुवातीला माझ्या कुटुंबातूनच मला आर्थिक पाठबळ मिळालं. परंतु त्यातून ही अ‍ॅक्टिव्हिटी चालू ठेवणं अशक्य होतं. मग आम्ही तिकिटं लावून बालनाटय़ाचे प्रयोग केले. परंतु ते साफ अयशस्वी ठरले. मग मी शाळा-शाळांतून बालनाटय़ाचे प्रयोग करायचं ठरवलं. अशोक पाटोळेंचं ‘हाताची घडी तोंडावर बोट’चे प्रयोग अशा तऱ्हेनं मुलांना प्रत्येकी एक रुपया तिकीट लावून आम्ही केले. हे तंत्र मात्र यशस्वी झालं. पण त्यासाठी नाटकाचा सेट वगैरेंना फाटा देऊन केवळ उत्तम स्क्रिप्ट आणि म्युझिक एवढय़ाचाच वापर आम्ही करत असू. या ‘प्रयोगा’तून आम्हाला नाटकाचा खर्च निघू शकतो हे कळून आलं. पुढे हळूहळू ‘नाटय़शाला’ प्रस्थापित होत गेली. शासनाचं थोडं का होईना, अनुदान मिळू लागलं. काही खासगी पुरस्कर्तेही आम्हाला साहाय्य करू लागले. या सगळ्यांना आमचं काम दाखवून आम्ही आर्थिक साहाय्याची विनंती करत असतो. काही वर्षांच्या अथक संघर्षांनंतर संस्थेला हळूहळू स्थैर्य येत गेलं. गेली दोन वर्षे आम्हाला रेपर्टरीची ग्रॅंट मिळालेली नाही. परंतु तरीही आम्ही आशा सोडलेली नाही.  त्या- त्या वेळी नवनवी शक्कल लढवून आम्ही आमचे उपक्रम करत असतो. आमच्या कामावर विश्वास टाकून लोक आमच्या पाठीशी उभे राहतात.’
या वाटचालीत कांचनताईंना काही वेळा काटेही बोचले असतील. त्यांना कांचनताई कशा सामोऱ्या गेल्या?
‘अडचणी, समस्या हरघडी उभ्या राहत असतातच. त्या- त्या वेळी त्यांचा साधकबाधक विचार करून त्यातून आम्ही योग्य तो मार्ग काढत आलो आहोत. कधी कधी त्यानं त्रासायलाही होतं. परंतु असं असलं तरी विशेष मुलांच्या व्यक्तिमत्त्वात होणारे अनेक सकारात्मक बदल मला हा सगळा त्रास विसरायला लावतात. त्यांच्यात होणारी प्रगती आपल्या कष्टांचं चीज झाल्याचं अतीव समाधान देते. त्यांच्या पालकांचे विलक्षण आनंदानं उजळलेले चेहरे माझा सगळा थकवा.. मरगळ घालवून टाकतात. आणि मग मी पुन्हा नव्या उमेदीनं, उभारीनं कामाला लागते.’
पहिल्या बालनाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाल्याबद्दल काय वाटतं, असं विचारलं असता त्या म्हणाल्या, ‘आपल्याला आणखी व्यापक पातळीवर काम करण्याची संधी यानिमित्ताने मिळते आहे असं वाटलं. बालनाटय़ाच्या अस्तित्वाच्या प्रश्नासह अनेक समस्या आज सर्वाना भेडसावत आहेत. त्यावर काय मार्ग काढता येतील याचा सर्वाच्या सहकार्यानं मी विचार करणार आहे. त्याकरता स्वत: जातीनं पुढाकार घेऊन मी काम करणार आहे. बालनाटय़ाद्वारे मुलांचा होणारा व्यक्तिमत्त्व विकास, त्यांच्या विस्तारणाऱ्या जाणिवा महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी शालेय अभ्यासक्रमात ‘नाटक’ या विषयाचा फक्त समावेश करून चालणार नाही, तर त्याकरता आधी हा विषय शिकवू शकणारे शिक्षक तयार करावे लागतील. कारण नाटय़क्षेत्रातली मंडळी यासाठी सदैव उपलब्ध होतील आणि त्यासाठी पुरेसा वेळ देऊ शकतील असं मला वाटत नाही. त्यांना ते शक्यही नाही याची जाणीव मला आहे. त्यामुळे शिक्षकांनाच प्रशिक्षित करून त्यांच्याकरवी बालनाटय़ चळवळ उभारावी लागेल. आज बालनाटय़ क्षेत्राला आलेली मरगळही झटकावी लागेल. त्यातील अपप्रवृत्तींमागची कारणं हुडकून त्यावर उपाय शोधावे लागतील. सर्वाना सोबत घेऊनच हे काम करणं शक्य आहे. मी त्यासाठी माझ्या परीनं जातीनं वेळ देणार आहे. याकामी नाटय़ परिषदेची मला मदत मिळेल अशी अपेक्षा आहे.’
कांचनताईंना बालरंगभूमीचा विचार करताना अनेक विषय आज खुणावताहेत. त्यांचा परामर्ष त्या आपल्या अध्यक्षीय भाषणात आणि त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकालात निश्चितपणे घेतील यात कोणतीच शंका नाही.

रवींद्र पाथरे
ravindra.pathare@expressindia.com