दिवाळीतील दीपोत्सव हा प्रकाशाचा.. तेजाचा उत्सव म्हणून आपण साजरा करतो. परंतु या अतिप्रकाशामुळे ‘प्रकाश प्रदूषण’ होते असे जर कुणी सांगितले तर..? तर आपल्याला धक्का बसेल. परंतु ही वस्तुस्थिती आहे. हल्ली शहरांतून ताऱ्यांनी खच्चून भरलेले आकाश दिसेनासेच झाले आहे. याचे कारण.. प्रकाश प्रदूषण! जगभरात या समस्येची जाणीव आता तीव्रतेनं होऊ लागली आहे. अतिप्रकाशाचे दुष्परिणामही सर्वत्र जाणवू लागले आहेत. त्यामुळे काही देशांनी प्रकाश प्रदूषण रोखण्यासाठी कायदेही केले आहेत. यंदाच्या दीपोत्सवाच्या निमित्ताने आपल्यातही ही जाणीवजागृती व्हावी याकरता हा विशेष लेख..

लहानपणी गावाला गेलो की रात्री गच्चीवर गप्पा मारत झोपण्याची मजा अनेकजणांनी अनुभवली असेल. उन्हाळ्याच्या दिवसांत हवेतील गारवा सुखकारक वाटायचा आणि त्याचबरोबर अंधाऱ्या रात्रीत आप्तस्वकियांशी मनसोक्त गप्पा मारण्याचा कार्यक्रम चालायचा. जोडीला काळेशार आकाश आणि ताऱ्यांचा खच! आयुष्यात कधीही न विसरता येण्यासारखे ते क्षण.. त्या रात्री परत अनुभवायला मिळाल्या तर कितीतरी वेळा आपण ती अनुभूती पुन:पुन्हा उपभोगू शकू. आपल्या मुलाबाळांना दाखवू शकू! पण दुर्दैवाने तसे होणार नाही! एकतर ते दिवस परत यायचे नाहीत. आणि आपल्या हाताने आपणच अति-प्रकाशाचा राक्षस उभा करून काळ्याशार रात्री जवळपास नाहीशाच करीत चाललो आहोत. आपल्या आसपासच्या प्रकाशामुळे रात्रीचे आकाश काळे न राहता लालसर.. पिवळसर होत चालले आहे. हा प्रदूषणाचा एक नवा प्रकार आहे. याला ‘प्रकाश प्रदूषण’ असे म्हणतात.
सर्वप्रथम आपण ‘अंधार’ या संकल्पनेचा विचार करू या. पूर्वापार आपल्या तसेच बहुतांश इतर संस्कृतींमध्ये अंधार हा अशुभ या अर्थे ध्वनित केला जात असे. अंधार म्हणजे ‘अशुभ’, ‘भीती’, ‘वाईट’ असा समज त्यामुळे सर्वत्र पसरला गेला. प्रकाश म्हणजे ‘ज्ञान’, ‘सत्य’ व ‘शुभ’ तसेच तो ‘उदात्त’ही मानला गेला. हा समज आपल्या संस्कृतीत तर खोलच रुजला आहे. मानवी संस्कृतीचा हा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे सणासुदीला, शुभकार्याला रोषणाई करणे सर्वार्थाने गरजेचे मानले जाते. दुसऱ्या टोकाला अंधारदेखील क्वचित् प्रसंगी अज्ञान, गूढ, अनंत, इ. मानला गेला. वैश्विक स्तरावर अज्ञाताचे आकर्षण सर्व संस्कृतींमध्ये आढळते; पण वर्णन करताना तेज:पुंज विश्व असेच केले जाते. यातून लक्षात येईल की तेज, प्रकाश हा आपल्या जीवनात सांस्कृतिकदृष्टय़ा किती खोलवर रुजलेला आहे.
थोडेसे अजून मागे जात आपण जीवनशैलीच्या बदलाचे झालेले परिणाम बघू या. साधारण दहाएक हजार वर्षांपूर्वी मनुष्य शिकारी प्राणी होता. घोळक्याने शिकार करणे व उदरनिर्वाह करणे ही त्याची जीवनशैली होती. त्यावेळचे चक्र- विशेषकरून रात्रीच्या शिकारीचे- चांद्रतेजावर अवलंबून होते. पौर्णिमेचा चंद्र शिकारीसाठी उत्तम! त्यामुळे उत्तम शिकार म्हणजे उत्सव ही परंपरा. आणि मिळेल ते खाद्य ही प्रमुख जीवनशैली. पुढे एका टप्प्यानंतर कृषीनिर्मिती शक्य झाली. पाहिजे ते उगवून खाता येऊ लागले. त्यामुळे चांद्रनिर्भरता कमी झाली. कृषीसंस्कृती ऋतूचक्रावर- म्हणजेच सूर्यावर अवलंबून होती. परिणामी सूर्य हा प्रमुख घटक ठरला. अर्थात पूर्वीच्या लाखो वर्षांच्या चांद्रश्रद्धा चटकन् जाणार नाहीत. त्यामुळेच बरेच उत्सव चांद्रचक्रावर तसेच ऋतुचक्रावरदेखील होऊ लागले. रात्रीचे, अंधाराचे आकर्षण कमी होत गेले. ‘लवकर निजे, लवकर उठे’ ही कृषीसंस्कृती रुजत गेली. सांस्कृतिक उत्क्रांतीच्या या टप्प्यानंतर रात्रीचे आकाश हे शास्त्रज्ञ आणि हौशी खगोलनिरीक्षक यांच्यापुरते मर्यादित होत गेले. इतरांसाठी आकाशदर्शन ही दोन घटकेची मौज मात्र ठरली. ‘लख लख चंदेरी तेजाची दुनिया’, ‘पिठूर चांदणे’ या कविकल्पना ठरल्या आणि त्या आल्हाददायक म्हणून केव्हातरी अनुभवायच्या गोष्टींमध्ये जमा झाल्या.
१९८५ सालापासून खगोल मंडळातर्फे आम्ही लोकांना रात्रभर आकाशदर्शनाकरिता वांगणी, नेरळ येथे घेऊन जात आहोत. गेल्या पंचवीस वर्षांत मी जवळपास चारशे रात्री अशा प्रकारे आकाश बघण्यात घालवल्या आहेत. या जागवलेल्या रात्रींत आकाशातील अनेक तारे, दीर्घिका, तेजोमेघ, ग्रह, चंद्र, धूमकेतू तसेच इतर अनेक अवकाशस्थ वस्तू आम्ही बघितल्या. २००५ सालानंतर हा आकाशगंगेचा पट्टा व आजकाल देवयानी दीर्घिका दिसणे बंद झाले आहे. पूर्वीसारखे खच्चून तारेदेखील दिसत नाहीत. पुण्या-मुंबईसारख्या मोठय़ा शहरांतून रात्री हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके कमी तारे दिसतात. मुंबईचे आकाश काळे नसून लालसर-पिवळसर तेजस्वी दिसते. मग हे तारे गेले तरी कुठे? तर- तारे कुठेही गेलेले नाहीत. ते कुठे जातही नाहीत. आपल्या आसपासच्या तीव्र प्रकाशामुळे तारे दिसेनासे होतात. यालाच ‘प्रकाश प्रदूषण’ म्हणतात.
सर्वप्रथम प्रकाश प्रदूषण कशामुळे होते, त्याचे स्रोत काय असतात, हे समजून घेऊ. ‘रात्रीच्या अंध:कारावर कृत्रिम प्रकाश- स्रोतांनी केलेले अतिक्रमण’ अशी प्रकाश प्रदूषणाची व्याख्या करता येईल. त्यामुळे चंद्राचा प्रकाश इ. या व्याप्तीबाहेरील ठरतो. आपल्या आसपास रस्त्यांवर असंख्य दिवे असतात. त्याचबरोबर घराबाहेरील आवारात, अंगणात, दुकानांबाहेर, हल्ली मॉल्सबाहेर तसेच जाहिरातबाजीचे असंख्य प्रकारचे दिवे झगमगाट निर्माण करतात. यातील बराच प्रकाश दिव्यांना समांतर तसेच दिव्यासापेक्ष वरच्या दिशेला आकाशाकडे जातो. अशा प्रकारे वर गेलेला प्रकाश आकाशातील धुलीकण, वाहन प्रदूषणाचे सूक्ष्म कण तसेच इतर कणांमुळे परावर्तित होऊन (विकीरीत होऊन) परत आपल्याकडे येतो. त्यामुळे आकाश उजळ दिसू लागते. काळेशार न दिसता पिवळसर-लालसर रंगाचे आकाशच सर्वत्र दिसते. जेवढा शहराचा झगमगाट जास्त, तेवढे त्या शहराचे प्रकाश प्रदूषण जास्त! वाहन प्रदूषण तसेच इतर वायू प्रदूषण हे या प्रकाश प्रदूषणाची व्याप्ती वाढवतात. त्यामुळे शहरांतील आकाश काळे दिसत नाहीच; तर आकाशातील अत्याधिक प्रकाशामुळे अनेक तारेदेखील आपल्याला दिसत नाहीत.
उदाहरण द्यायचे झाल्यास दोन उदाहरणे देता येतील. आपल्या आकाशगंगेचा पट्टा आकाशात मनमोहक ढगासारखा पसरलेला पूर्वी दिसायचा. मुंबईजवळील वांगणी-नेरळ या भागातून नुसत्या डोळ्यांनी दिसणारा हा पट्टा आता त्या गावांमधूनदेखील अदृश्य झाला आहे. नुसत्या डोळ्यांनी दिसणारी २२ लक्ष प्रकाशर्वष अंतरावरील सुप्रसिद्ध देवयानी दीर्घिका अक्षरश: खिळवून ठेवायची. आता ही दीर्घिका नुसत्या डोळ्यांनी दिसेनाशी झाली आहे. पूर्वी दिसणारा ताऱ्यांचा खच आता क्वचितच जाणवतो. प्रकाश प्रदूषणामुळे आकाश न दिसण्याचे प्रकार वाढत चालले आहेत, हे सांगायला नकोच.
२००१ सालामध्ये जगाचा रात्रीचा नकाशा सर्वप्रथम बनवला गेला. त्यात असे दिसले की युरोप-अमेरिकाच नव्हे, तर भारतासारख्या तत्कालीन विकसनशील देशातदेखील आकाशस्थिती कालागणिक खराब होत चालली आहे. २०११ सालच्या जनगणनेनुसार, भारतातील वीस कोटी घरांपैकी सुमारे पंचावन्न टक्के घरांमध्ये वीज पोहोचली होती. त्याच सुमारास तयार केलेल्या सुधारित रात्र-नकाशानुसार, भारतातील लोकसंख्येच्या केवळ दहा टक्के लोक हे उत्तम आकाशस्थितीच्या ठिकाणी वास्तव्य करतात. केवळ याच लोकांना अत्यंत उत्तमरीत्या आपल्या आकाशगंगेचा पट्टा सहज दिसतो. विद्यमान प्रगतीच्या वेगाने २०५० सालानंतर आपल्या देशातून कुठूनही अत्युत्तम आकाश दिसणार नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. क्षणभर आकाशदर्शनाची जी मजा तुम्ही उपभोगली ती मजा, तो आनंद यानंतरच्या पिढीतील भारतीयांना मिळणार नाही. आणि त्याला आपणच कारणीभूत असू.
आता महत्त्वाचा प्रश्न असा की, नाही बघितले तारे तर काय फरक पडणार आहे? काहीही नाही! आकाशातील हे तारे, दीर्घिका, चंद्र-सूर्य या सर्वाकडे आपण ढुंकूनही नाही बघितले तर त्यांना व कदाचित थेट तुम्हालासुद्धा काहीही फरक पडणार नाही. विषयांतराचा धोका पत्करून एवढे नक्की म्हणता येईल की, आकाशातील ग्रह-ताऱ्यांच्या कुतूहलापोटी अनेक शोध लागले व त्यातूनच विज्ञानाची प्रगती होत गेली. तर मुद्दा असा की, तारे बघायला नाही मिळाले तर काय..? आम्हा निरीक्षकांपुरते म्हणायचे तर- आम्ही वर अंतराळात ज्या दुर्बिणी आहेत त्यांचा वापर करायला लागू. कदाचित २०५० सालापर्यंत आकाश पर्यटन सहज शक्य होईल. मग जसे आज आपण वांगणी-नेरळला आकाश बघायला जातो, तसे अंतराळातून आकाशदर्शन करू शकू! पण लक्षात घ्या- प्रकाश प्रदूषणाचे थेट अपाय पशु-पक्षी, कीटक व मानवावरही होत असतात.
निशाचर कीटक व प्राणी हे प्रकाश प्रदूषणाचे पहिले बळी ठरतात. जंगलात अचानक अत्यंत तेजस्वी प्रकाशस्रोत उगवतो. साहजिकच कीटक त्याकडे आकर्षित होतात व त्यांच्यामागे त्यांचे भक्षकदेखील. त्या ठिकाणी एक नवे अनैसर्गिक (‘मानवनिर्मित’ या अर्थी!) चक्र सुरू होते. यात कित्येक भक्ष्य-भक्षकांचा नाश होतो. त्याने नैसर्गिक संतुलन ढळू शकते आणि कालांतराने या ऱ्हासचक्राचा अंत एखाद्या घटकाच्या नामशेष होण्याने होऊ शकतो. कॅनडा-अमेरिका यादरम्यान स्थलांतरण करणारे अनेक पक्षी आहेत.ोछअढ या संस्थेच्या अहवालानुसार, स्थलांतरादरम्यान एका वर्षांत कोटय़वधी पक्षी उंच इमारतींवर आपटून मरतात.ोछअढ च्या चळवळीनंतर आता कॅनडात इमारतींवरून परावíतत प्रकाश उत्सर्जित करणे व पर्यायाने पक्ष्यांच्या मृत्यूला कारणीभूत होणे हा कायद्याने गुन्हा आहे.
किनाऱ्यावर येऊन अंडी घालणारी कासवंदेखील या प्रदूषणामुळे विचलित झालेली आढळली आहेत. अंडी फोडून पिल्लं बाहेर येतात व चंद्र-तारे यावरून दिशा ठरवत समुद्राकडे जातात. ही त्यांची नैसर्गिक कृती किनाऱ्यावरच्या दिव्यांमुळे बिघडते. ती पिल्लं दिवे बघून समुद्राकडे न जाता जमिनीकडे येतात व मरून जातात. त्यामुळे अनेक देशांमध्ये कासव प्रजननाच्या वेळी वा पक्षी-स्थलांतराच्या काळादरम्यान रात्रीचे दिवे बंद ठेवले जातात.
मानवावरसुद्धा प्रकाशाचा विपरित परिणाम होऊ शकतो. आपल्या डोळ्यांत कृष्णधवल दृष्टीसाठी ‘दंडपेशी’ (१२ि) व रंगीत दृष्टीसाठी ‘शंकूपेशी’ (ूल्ली२) असतात. त्याव्यतिरिक्त प्रकाशसंवेदी गुच्छिकापेशी (स्र्ँ३२ील्ल२्र३्र५ी ॠंल्लॠ’्रल्ल ूी’’२) असतात. गुच्छिकापेशी या दिवस-रात्रीचे चक्र राखण्यास मदत करतात. कृत्रिम प्रकाशामुळे हे चक्र ढळू शकते व त्यामुळे कमी झोपेमुळे संभवणारे विविध विकार बळावू शकतात. प्रकाश प्रदूषणामुळे हे चक्र ढळते हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न पाश्चात्य देशांत सुरू आहे. इस्रायल व अमेरिकन शास्त्रज्ञांनी नुकतेच असेही दाखवले आहे की, प्रकाश प्रदूषणामुळे स्त्रियांना स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त होऊ शकते. अर्थात् या विषयावर अजून संशोधन सुरू असून येत्या काही वर्षांत ते परिपूर्ण होईल.
आपल्या घराबाहेरील प्रकाश दुसऱ्याच्या घरात जाऊन त्या लोकांना अपाय होऊ शकतो. प्रदूषणाच्या या प्रकाराला ‘प्रकाश अतिक्रमण’ म्हणतात. याकरिता २००१ साली इंग्लंड येथे प्रकाश प्रदूषणाला ध्वनि प्रदूषणासमान करून कायद्याने असे प्रदूषण करणे दंडनीय गुन्हा ठरवला गेला आहे. अशा एका प्रकारात वेल्सच्या ज्येष्ठ नागरिकाने केलेल्या तक्रारीवर आधारीत त्यांच्या शेजारच्यांना प्रकाश प्रदूषण केल्याबद्दल दंड केला गेला.
या उदाहरणावरून लक्षात येईल की पाश्चात्य देशांमध्ये प्रकाश प्रदूषणाबद्दल जागरूकता मोठय़ा प्रमाणावर झालेली आहे. भारतात मात्र अजून हा प्रश्न म्हणावा तेवढा चर्चेला आलेला नाही. खगोल मंडळातील उत्साही निरीक्षकांना सर्वदूर निरीक्षण करताना असे जाणवले की, २००५ सालानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आकाशाची प्रत घसरू लागली आहे. नुसत्या डोळ्यांनी दिसणाऱ्या आकाशाची पट्टी ठरवण्यात आली आहे. ‘बॉरटलची (इ१३’ी) पट्टी’ असे या मोजमापाला म्हणतात. त्यानुसार ‘प्रत १’ चे आकाश सर्वोत्तम असते. त्या ठिकाणी अत्यंत अंधुक तारेही दिसू शकतात. आकाशगंगेचा पट्टा, देवयानी दीर्घिका अगदी सहज दिसते. ग्रामीण भागातील आकाश सुमारे तीन प्रतीचे असते, तर शहरातील आकाश चार ते पाच प्रतीच्या दरम्यान असते. मुंबईसारखे मोठे महानगर सहा ते सात प्रतीच्या दरम्यान येते. त्यामुळे येथे प्रमुख तेजस्वी तारे व माथ्यावरील काही तारेच फक्त दिसतात. या प्रतीचे आकाश असल्यास अत्यंत कमी तारे व ग्रह दिसतात. यावरून सहज दिसते की, भारतात येत्या काही वर्षांत प्रकाशाची व्याप्ती वाढत जाईल आणि प्रकाशाचे प्रदूषण हळूहळू हाताबाहेर जाऊ शकेल. याकरिता आतापासूनच उपाययोजना अमलात आणाव्या लागतील. काय केल्याने या प्रदूषणाची व्याप्ती आटोक्यात ठेवता येईल, हे बघू या.
सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, सर्वत्र प्रकाशाचा वापर हा होणारच आहे. त्यावर नियंत्रण ठेवता येणार नाही. पण रस्त्यांवरचे दिवे जर योग्य प्रकारे बनवले तर त्यांचा जास्तीत जास्त उपयुक्त प्रकाश जमिनीकडे व कमीत कमी प्रकाश आकाशाकडे जाऊ शकेल. सध्या सर्वत्र सोडियमचे पिवळे दिवे आहेत. येत्या पाच-दहा वर्षांत सर्वत्र सफेद छएऊ दिवे येणार आहेत. आकाश निरीक्षकांच्या दृष्टीने पिवळे दिवे अर्थातच उत्तम आहेत. एका कीटक अभ्यासगटाने असे सिद्ध केले की छएऊ दिव्यांकडे कीटक जास्त प्रमाणात आकर्षित होतात. त्यामुळे सफेद छएऊ दिवे आले की या प्रदूषणाची व्याप्ती कैकपटीने वाढू शकते. भारतात प्रकाश प्रदूषणाविरुद्ध कायदा असावा का, असाही प्रश्न लवकरच विचारार्थ येणार आहे. कालांतराने कायदा येईलच; पण त्या कायद्याची परिपूर्ण अंमलबजावणी आपण करणार का? ‘इतरांना व स्वत:ला अपायकारक गोष्टी टाळा’ हे सांगण्यासाठी कायदाच हवा कशाला? लोकांनी जर या प्रश्नाची व्याप्ती ओळखली व विनाकारण दिव्यांचा वापर टाळला तर हा प्रश्न कित्येक पटीने कमी होऊ शकतो.
अंतराळातील अनेक गूढ गोष्टी उकलण्याचे शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेतच. त्या गूढाचे कुतूहल व आकर्षण सर्वाना असते. तारे बघताना मिळणारा आनंद पुढील पिढय़ांनादेखील मिळाला पाहिजे. त्याचबरोबर प्रकाश प्रदूषणामुळे आपल्या परिसरातील जीवसृष्टीवर किंवा आपल्यावर विपरित परिणाम होता कामा नये. हे साधणे बऱ्याच प्रमाणात आपल्यावर अवलंबून आहे. गरजेपेक्षा जास्त दिवे वापरणे टाळल्यास आपण प्रकाश प्रदूषण रोखण्यात मदत करू शकतो. आज हा प्रश्न मर्यादित असतानाच त्यावर नियंत्रण आले तर तो चिघळणार नाही. त्यामुळे यंदाचा आणि यापुढील काळात येणारा प्रत्येक दीपोत्सव आपण पारंपरिक पणत्या लावून, प्रकाशाचे प्रदूषण टाळून साजरा करू या.

– डॉ. अभय देशपांडे
abhay@khagolmandal.com