News Flash

उदारहृदयी पुरातत्त्वज्ञ!

पुरातत्त्व म्हणजे सामान्यत: जमिनीच्या पोटात दडलेले सांस्कृतिक वैभव शोधणारे शास्त्र.

पुरातत्त्वशास्त्रातील संशोधनाने आंतरराष्ट्रीय मान्यता मिळविणारे ज्येष्ठ संशोधक-पुरातत्त्वज्ञ डॉ. मधुकर केशव ढवळीकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या संशोधनकार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ज्येष्ठ अभ्यासक गो. बं. देगलूरकर यांनी घेतलेला वेध..

प्रा. मधुकर केशव ढवळीकर यांच्या जाण्याने पुरातत्त्वाच्या जगात एक पोकळी निर्माण झाली आहे. त्याचे कारण ते केवळ या शास्त्राचे अभ्यासक आणि प्राध्यापक होते हे नव्हे, तर त्या विषयात त्यांचा दबदबा होता. त्यातच त्यांना जागतिक स्तरावर मान्यताही मिळाली, कीर्ती प्राप्त झाली. पुरातत्त्व म्हणजे सामान्यत: जमिनीच्या पोटात दडलेले सांस्कृतिक वैभव शोधणारे शास्त्र. या शास्त्रज्ञाचे पाय मात्र जमिनीवर असायचे.

त्यांचा-माझा संबंध सुमारे ४०-५० वर्षांचा. १९५६ च्या सुमारास पुण्याहून भारतीय सर्वेक्षण खात्याचे कार्यालय औरंगाबाद येथे हलवले गेले, तेव्हा तेथे कार्यरत असलेले ढवळीकरही औरंगाबादेस गेले. त्यांची पुरातत्त्वातली रुची तेथे असताना निर्माण झाली. एवढेच नव्हे तर तेथील आणि जवळच्या वेरुळ-अजिंठय़ाची लेणी वारंवार पाहता आल्यामुळे प्राचीन भारतीय कला आणि स्थापत्य यासंबंधीची त्यांच्यातील जिज्ञासा वाढत गेली. या बाबींचा खोलवर जाऊन मागोवा घ्यावा असा ध्यास वाढला. त्याची परिणती झाली ती त्यांच्या अजिंठय़ाच्या चित्रांतून गोचर होणाऱ्या तत्कालीन वस्त्रे, अलंकार इत्यादीवर बेतलेल्या त्यांच्या पीएच.डी.साठीच्या ‘अजिंठा : ए कल्चरल स्टडी’ या प्रबंधात. विशेष म्हणजे तो पुणे विद्यापीठाने त्या वर्षांचा उत्कृष्ट प्रबंध म्हणून प्रकाशितही केला. बंगलोर येथे मिथिक सोसायटीने भरविलेल्या राष्ट्रकूट राजकुलासंबंधात योजिलेल्या परिषदेत त्या विषयाचे अभ्यासक म्हणून सी. शिवराममूर्ती, सौंदरराजन, शां. भा. देव, म. न. देशपांडे आदी थोर मंडळी जमली होती. त्या परिषदेत डॉ. ढवळीकर यांनी कैलासलेणीवर जो शोधनिबंध वाचला त्याचेच पुढे ‘मास्टरपीस ऑफ द राष्ट्रकूट आर्ट’ या ग्रंथात रूपांतर झाले. मुंबईच्या तारापोरवाला पब्लिशर्सने तो प्रकाशित केला. डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, पुणे या संस्थेच्या वार्षिक अंकात मी त्यावर परीक्षण लिहिले होते.

औरंगाबादेहून ते बढतीवर दिल्लीला गेले. तिथे ज्ञानाच्या क्षेत्राचे आकाश त्यांच्यासाठी मोकळे झाले. त्यांच्या वाचनाच्या अफाट सवयीमुळे जाणकारांच्या बैठकांत त्यांचा सहजगत्या संचार होऊ लागला आणि समवयस्कांच्या गप्पा-मंडळातील त्यांनी सांगितलेल्या चुटक्यांना दाद मिळत गेली. दिल्लीकरांचे अनुभवही गाठीस आले. कार्यालयीन कामातून उसंत मिळाली, की ते सापडत कार्यालयातील ग्रंथालयात. तेथे त्यांची भेट होई भारतरत्न पा. वा. काणे यांच्याशी. ते त्या वेळी धर्मशास्त्राचा इतिहास लिहिण्याची तयारी करीत होते. ते बसने हातात शाईची दौत घेऊन पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या ग्रंथालयात येत. एकदा बसच्या धक्क्याने शाई त्यांच्या कोटावर सांडल्याचे कळल्यावर ढवळीकरांनी त्यांना सुचविले, की दौत ग्रंथालयात ठेवत जावी. मोठय़ांच्या अशा छोटय़ा गोष्टींचे भांडारच ढवळीकरांकडे होते आणि त्या मोठय़ा चवीने मित्रमंडळीस ते सांगत असत. गप्पा रंगवण्याची हातोटी त्यांना साधली होती आणि जे सांगू ते खरेच असावे असे बंधन त्यांनी घालून घेतले नव्हते! त्यामुळे काही वेळा प्रसंगोचित बदलही त्यात होत, तेही ते वेल्हाळपणे खुलवण्याची त्यांची न्यारी पद्धत असे.

डॉ. ढवळीकरांच्या स्वभावातला उमदेपणाचा अनुभव अनेकांना आला असणार. अभ्यासू मंडळींकडे त्यांचे विशेष लक्ष असे. एका कलाकार विद्यार्थ्यांला एका मंदिराच्या अभ्यासासाठी हरिश्चंद्रगडावर जायचे होते म्हणून त्याने रजा मागितली, तर हे म्हणाले, ‘सगळा खर्च कॉलेज करील. रजेचीही गरज नाही.’ त्यांच्या विद्यार्थ्यांना ते एखादवेळेस प्राध्यापकापेक्षाही अधिक निधी उपलब्ध करून देत. आणखी एक म्हणजे त्यांच्या लिखाणावर केलेली टीका ते खिलाडूपणे घेत. म्हणत, त्यामुळे सुधारणा होऊ शकते. प्रत्येकाला त्याचे असे मत असते, हे त्यांना मान्य असे.

डॉ. ढवळीकर केवळ लेखक व पुरातत्त्वज्ञ होते असे नव्हे, तर ते चतुर आणि चलाखही होते. प्रसंगी कार्यसिद्धीसाठी ‘नरो वा कुंजरो वा’ त्यांना करावे लागल्याचे प्रस्तुत लेखकास माहीत आहे. डेक्कन कॉलेजचे संचालक असताना त्यांनी काहींना दुखावलेही होते. असे असूनही त्यांना आणि इतरांनाही डॉ. ढवळीकरांच्या संबंधातील ही माहिती मान्य होईल यात शंका नाही. डॉ. ढवळीकरांचे वेगळेपण यातच होते.

डॉ. ढवळीकर आता आपल्यात नाहीत. पण भारतभरातील पुरातत्त्वाच्या मंडळींजवळ त्यांच्या आठवणी राहणारच आहेत. त्या सगळय़ा गोडच असतील, असे नाहीच. त्यात काही बोधप्रद असतील, तर काही जागं करणाऱ्या असतील. ते निवृत्त झाले १९९० च्या सुमारास. तेव्हापासून आमच्या भेटी कमी झाल्या. तरी त्यांचे परममित्र डॉ. शरद राजगुरू यांच्याकडून त्यांची खुशाली कळे. क्वचित त्यांची थोरली कन्या प्रा. बीना इनामदार हिचीही भेट होई. तीन-चार महिन्यांपूर्वी नाणकशास्त्र संस्थेच्या एका कार्यक्रमात ते आणि मी मंचावर होतो. म्हणालो, ‘‘थकलेले दिसता.’’ तर म्हणे, ‘‘अहो, आता ८८ चालू आहे. वयाचा परिणाम होणारच.’’ पण कार्यक्रमात बोलताना, त्यांच्या अफाट वाचनाचा आणि तल्लख स्मरणशक्तीचा प्रत्यय विस्मयकारक होता.

ज्ञानक्षेत्रातील कर्तृत्वामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. पद्मश्री वाकणकरांच्या नावे मध्य प्रदेश शासनाकडून दिला जाणारा मोठा पुरस्कार मिळाल्याचा त्यांना विलक्षण आनंद झाला. ते दोघे मित्र होते. योगायोगाने पॅरिसमध्ये दोघांची भेट झाली तेव्हा काही दिवस एकत्रच राहता आले होते. स्वयंपाकात मदत करता आली एवढेच नव्हे, तर वाकणकरांनी काढलेली चित्रे विकण्यासही साहाय्य करता आले, असे पुरस्कार स्वीकारल्यावरच्या कृतज्ञ भाषणात त्यांनी सांगितले. या प्रसंगी मीही उपस्थित होतो. पुण्यातील सारसबाग गणपतीच्या संस्थेने त्यांना दिलेला ‘धार्मिक व आध्यात्मिक पुरस्कार’ तर मजहस्तेच देण्यात आला होता.

त्यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने गतवर्षीच डी.लिट. ही मानद उपाधी दिली होती आणि सगळय़ा पुरस्कारावर कडी म्हणजे भारत सरकारने त्यांना दिलेली पद्मश्री ही उपाधी. त्यांच्या कामाचा झपाटा सांगायचा तर एक घटना पुरेशी ठरेल. भारत शासनाच्या एका विभागाने काही संशोधकांना मानाची टागोर फेलोशिप दिली, त्यात यांनाही दिली गेली. विशेष म्हणजे इतरांनी ठरलेल्या क्षेत्रातलं काम अटीप्रमाणे वेळेत पुरे केले नाही, तर काही जणांकडून पुरे होण्याच्या आशा मावळून गेल्या. यांनी मात्र ते ठरलेल्या अवधीत पुरे तर केलेच, पण त्यावरील ग्रंथाचे प्रकाशनही केले.

त्यांची एकूण ३० पुस्तके (त्यात काही ग्रंथही) आज उपलब्ध आहेत. शिवाय दोनशेच्या वर लेखही आहेत. त्यांच्या काही पुस्तकांवर आणि लेखांवर टीकाही झालेली आहे. याचा अर्थ ते लिखाण सजगपणे वाचले जात असणार. सांची, अजिंठा, वेरुळ, घारापुरी, आशियाचे दैवत श्रीगणेश, महाराष्ट्राची कुळकथा, भारताची कुळकथा, इनाम गाव, पवनार, कवठे, अपेगाव येथील उत्खननांचे वृत्तान्त, पुरातत्त्वशास्त्रावरील अनेक ग्रंथ यांचा यात समावेश करता येईल. ते लेखक होते, वक्ते होते. इंग्रजी व मराठीवर त्यांचे प्रभुत्व होते. सर्वाच्या आठवणीत राहील असे हे व्यक्तिमत्त्व होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2018 4:37 am

Web Title: article on historian and archaeologist dr madhukar keshav dhavalikar
Next Stories
1 दलित साहित्य चळवळीचे ध्यासपर्व
2 आवाक्यातली ‘वारी’
3 टूरटूर
Just Now!
X