भारतीय गणितज्ञ डॉ. शरच्चंद्र शंकर श्रीखंडे यांनी नुकतीच (१९ ऑक्टोबर) वयाची शंभर वष्रे पूर्ण केली. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा लेख..

गणित क्षेत्रात क्रांती घडवून आणणारी ‘शून्य’ ही संकल्पना जगासमोर मांडणाऱ्या आपल्या देशाला जागतिक कीर्तीचे वराहमिहिर, आर्यभट्ट, रामानुजन या आणि अशा अनेक नामांकित गणितज्ञांची थोर परंपरा लाभली आहे. याच बुद्धिवंतांचा वारसा चालवणाऱ्या भारतीय गणितज्ञांमध्ये डॉ. शरच्चंद्र शंकर श्रीखंडे यांचे नाव आवर्जून घेतले जाते.

UPSC 2023 Topper Aditya Srivastava
अडीच लाख महिना पगार सोडून UPSC ची तयारी केली आणि थेट देशात पहिला आला; आदित्य श्रीवास्तवचा अविश्वसनीय प्रवास!
Nagpur, Rain, Pm Narendra Modi,
नागपूर : मोदींच्या सभास्थळी पावसाचे पाणी, शिंदेंकडून मध्यरात्री पाहणी
Prime Minister Narendra Modi first meeting in the maharashtra state at Ramtek
पंतप्रधानांची राज्यातील पहिली सभा रामटेकमध्ये; १० एप्रिलला कन्हानमध्ये प्रचार दौरा
death of Uttar Pradesh gangster Mukhtar Ansari
अन्सारीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी, उपचारादरम्यान मृत्यू; तुरुंगात विषप्रयोग केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

डॉ. श्रीखंडे यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९१७ रोजी मध्य प्रदेशातील सागर या गावी झाला. तिथे आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या, बक्षिसं पटकावत जबलपूर आणि नागपूर येथे आपले पुढील शिक्षण घेतले. त्या वेळी त्यांनी शुद्ध व उपयोजित गणित (Pure amd Applied Mathematics) आणि भौतिकशास्त्र या विषयात सुवर्णपदक प्राप्त करीत नागपूर विद्यापीठाची बी. एस्सी. (ऑनर्स) ही पदवी संपादन केली आणि आपल्या बुद्धीची चुणूक दाखवली.

१९४१ मध्ये श्रीखंडे यांनी कोलकाता येथील ‘इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट’मध्ये संख्याशास्त्राचा अभ्यास स्वत:च सुरू केला. त्यानंतर मात्र चरितार्थासाठी जबलपूर येथील रॉबर्टसन कॉलेजात आणि नंतर नागपूर येथील सायन्स कॉलेजमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. १९४६ मध्ये त्यांच्या कारकीर्दीला कलाटणी देणारा सोनियाचा दिवस उजाडला. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेशी केलेल्या करारामुळे भारत सरकारकडे भरपूर पसा आला होता. त्याचा योग्य वापर करण्यासाठी सरकारने विविध विषयांतील कुशाग्र विद्यार्थ्यांना अमेरिकेत प्रशिक्षणासाठी पाठवण्याचे ठरवले. त्यात श्रीखंडे यांना संख्याशास्त्राच्या अभ्यासासाठी निवडण्यात आले. त्या वेळी भारतीय कृषी संशोधन मंडळातील संख्याशास्त्र सल्लागार

पां. वा. सुखात्मे यांच्या सल्ल्यानुसार ऑगस्ट, १९४७ मध्ये चॅपेलहिलच्या नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात ते दाखल झाले. त्या वेळचे तिथले प्रमुख नामवंत संख्याशास्त्रज्ञ प्रा. हॅरॉल्ड हॉटेलिंग, हर्बर्ट रॉबिन्सन, डब्लू. जी. मॅडो, आर. सी. बोस, एस. एन. रॉय  या सर्वाबरोबर ते तिथे रमले. या संपूर्ण चमूने पुढे संख्याशास्त्रात अत्यंत मोलाची कामगिरी बजावली.

१९४८ मध्ये श्रीखंडे यांनी आर. सी. बोस यांच्याकडे ‘लिनिअर एस्टिमेशन’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि ‘मल्टिव्हेरिएट अ‍ॅनालिसिस’ या विषयात पीएच.डी. करण्याचे ठरवले. संशोधनाच्या निमित्ताने या काळात त्यांना बोस यांच्याबरोबर जास्तीत जास्त काळ घालवण्याची संधी उपलब्ध झाली. त्यांच्या बुद्धीला चालना मिळाली. संशोधनासाठी योग्य दिशा मिळाली आणि बोस यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली श्रीखंडे यांची पीएच.डी. अवघ्या एका वर्षांत पूर्णत्वाला आली. पीएच.डी.च्या या प्रबंधातील काही निष्कर्षांवर श्रीखंडे यांनी पुढेही संशोधन सुरू ठेवलं.

पीएच.डी. पूर्ण झाल्यानंतर १९५१ साली श्रीखंडे यांनी लॉरेन्स येथील कॅनासा विद्यापीठात ‘Non existence of an afine resolvable incomplete block designs’ (ARBIBD) वरील पहिला ज्ञात निष्कर्ष काढला. त्यानंतर त्यांनी १९५८ पर्यंत नागपूरला सायन्स कॉलेजमध्ये विविध पदांवर कार्यभार सांभाळला. मात्र संशोधनासाठी योग्य त्या सोयी उपलब्ध नसल्याने त्यांनी पुन्हा नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात परत जाण्याचा निर्णय घेतला.

नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातल्या वास्तव्यात पुढील दोन वर्षांत श्रीखंडे यांनी बोस यांच्याबरोबर अनेक शोधनिबंध लिहिले. त्या वेळी स्विस गणितज्ञ लिओनार्द ऑयलर याने १७८२ साली केलेल्या एका तार्किकेच्या असिद्धतेवर श्रीखंडे यांनी आर. सी. बोस आणि ई. टी. पार्कर यांच्यासमवेत संशोधन केले आणि १७६ वष्रे कोडय़ात टाकणाऱ्या लॅटिन चौरसावरील प्रश्नांची उकल शोधून काढली. यावर लिहिलेला शोधनिबंध न्यूयॉर्क येथील अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीत सादर करण्यात आला. २६ एप्रिल १९५९ रोजी ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने या बातमीला पहिल्या पानावर स्थान दिले आणि श्रीखंडे जगभर प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांच्या कारकीर्दीतला हा महत्त्वाचा मलाचा दगड ठरला.

१९६० मध्ये डॉ. श्रीखंडे भारतात परत आले. बनारस हिंदू विद्यापीठात पाच वष्रे संख्याशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठात नव्याने सुरू करण्यात आलेल्या गणित विभागाचे प्रमुख या नात्याने कार्यभार सांभाळला. या पदावरील तेरा वर्षांच्या काळात त्यांनी एम. सिंधी, वासंती भट नायक, भगवान दास या आणि अशा अनेक हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना संशोधन करण्यास प्रवृत्त केले आणि खऱ्या अर्थाने ते त्यांचे मार्गदर्शक झाले.

डॉ. श्रीखंडे यांनी गणिती जगतातील ‘चयन गणित’ (Combinatorics) या विषयात अत्यंत मोलाची कामगिरी बजावली आहे. चयन गणित ही शाखा गणनीय पृथक रचना (Countable Discrete Structure) याच्याशी संबंधित आहे. याचा उपयोग बीजगणित, भूमिती, प्रोबॅबिलिटी, टोपॉलॉजी, ऑप्टिमायझेशन, संगणकशास्त्र, रसायनशास्त्र अशा अनेक विषयांत केला जातो. चयन गणितातील आलेख उपपत्ती (Graph Theory) या अत्यंत महत्त्वाच्या विषयात डॉ. श्रीखंडे यांनी स्वत:चा असा आगळावेगळा ठसा उमटवला आहे. १६ शिरोबिंदू (Vertices), ४८ कडा (Edges) आणि ६ डिग्री असलेला ‘स्ट्राँगली रेग्युलर ग्राफ’ त्यांनी शोधून काढला. तो ‘श्रीखंडे ग्राफ’ या नावाने ओळखला जातो. त्यांच्या विद्यार्थ्यांनीही या क्षेत्रात संशोधन केले आहे. कॅनडातल्या विनिपेग येथील चार्ल्स बॅबेज् संशोधन केंद्राने ‘सीलेक्टेड पेपर्स ऑफ एस. एस. श्रीखंडे’ या नावाने त्यांचे निवडक शोधनिबंध प्रसिद्ध केले. १९८२ साली कोलकात्याच्या आय. एस. आय. संस्थेत डॉ. श्रीखंडे यांच्या सन्मानार्थ एक आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. अमेरिकेत बोस्टन येथे सायन्स म्युझियममध्ये गणित विभागात बोस आणि श्रीखंडे या जोडगोळीने ऑयलरच्या समस्येची केलेली उकल मोठय़ा दिमाखात मिरवताना दिसते.

इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी, दिल्ली; इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस, बंगलोर आणि इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स, यू. एस. ए. या संस्थांचे ते सन्माननीय सभासद आहेत.

अशा पद्धतीने जागतिक पातळीवर डॉ. श्रीखंडे यांचा केलेला सन्मान आपल्याला आढळतो. इतके नावारूपाला आलेले डॉ. श्रीखंडे मुळात अतिशय साधे, लाजाळू आणि मितभाषी आहेत. आपले गणिती क्लिष्ट विचार, ते कमीत कमी शब्दांत समर्थपणे मांडतात. आपल्या कामावर संपूर्ण लक्ष केंद्रित करून अतिशय योग्य पद्धतीने ते आपल्या प्रश्नांवर तोडगा काढतात. त्यांची राहणी अत्यंत साधी आहे, आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची त्यांची हातोटी आपल्याला थक्क करून सोडते.

डॉ. श्रीखंडे यांचे सुपुत्र मोहन श्रीखंडे हेही सेंट्रल मिशिगन विद्यापीठात Combinatorial Mathematics चे प्राध्यापक आहेत. डॉ. श्रीखंडे यांच्या विषयी त्यांचे विद्यार्थी बोलत असताना त्यांचे ज्ञान, त्यांची बुद्धिमत्ता, परिश्रम घेण्याची तयारी, याबरोबरीनेच त्यांच्यातील साधेपणाचाही प्रत्यय वारंवार येतो. विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहित करणं, सर्वतोपरी मदत करणं हा त्यांचा स्थायीभाव होता. ‘या सर्व कामांच्या धबडग्यात डॉ. श्रीखंडे सरांबरोबर Combinatorics च्या प्रश्नांवर काम करणं म्हणजे थंडगार वाऱ्याची झुळूक,’ असे डॉ. श्रीखंडेंचे विद्यार्थी डॉ. नवीन एम. सिंधी म्हणतात. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्याबरोबर काम करताना विद्यार्थ्यांना किती आनंद मिळत असेल याची कल्पना येते.

विभागाच्या प्रमुख पदावर कार्यरत असल्याने त्यांना मोठय़ा प्रमाणावर पत्रव्यवहार सांभाळावा लागत असे. अनेक कागदपत्रांवर सहय़ा कराव्या लागत असत. त्यात त्यांचा खूप वेळ मोडत असे. परंतु अशा कामाची वेळ येताच आपले हातातले संशोधनकार्य बाजूला ठेवून ते अशी कामे शांतपणे पूर्ण करीत आणि काहीच न घडल्यासारखे पुन्हा आपल्या संशोधनाकडे वळत. विशेष म्हणजे, ते कागद वापरण्याच्या बाबतीत खूपच जागरूक होते. आपल्याला आलेल्या पत्रव्यवहाराचे लिफाफे ते काळजीपूर्वक उघडीत आणि त्यातील कोरा भाग लेखनासाठी वापरीत. त्यांच्या बऱ्याचशा शोधनिबंधांची कच्ची टिपणं याच कागदावर लिहिली गेली आहेत.

डॉ. श्रीखंडे यांची संपूर्ण कारकीर्द, त्यांना मिळालेलं यश भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. त्यांची तरल बुद्धिमत्ता, आपल्या कामावर असलेलं निस्सीम प्रेम, चिकाटी, जिद्द नवीन पिढीला सतत प्रेरणा देत राहील. असा हा साधासुधा, आपल्या कामात रमणारा, त्यावर नितांत प्रेम करणाऱ्या बुद्धिमान गणितीने नुकतीच वयाची शंभरी पूर्ण केली.

cspinge@gmail.com