नंदिनी बसोले

इस्तंबूल शहराला अद्भुतहेच विशेषण योग्य वाटतं. युरोप आणि रशिया यांच्यामध्ये पसरलेलं, नव्या-जुन्याचा उत्तम मेळ साधलेलं हे शहर पर्यटकांनी कायम फुललेलं असतं..

‘हुक्का’ या विषयावर वृत्तपत्रांतून वाचत असताना इस्तंबूल भेटीत पाहिलेली हुक्का गल्ली आठवली. पदपथावरून सहज फिरत असताना एका फरसबंद गल्लीच्या टोकाशी दारावर ‘ह. उ.’ ही अक्षरं पाहिली आणि गल्लीत घुसलो. लक्षात आलं, की ती हुक्का पिणाऱ्यांची गल्ली होती. दोन्ही बाजूला लहान लहान आस्थापनांमध्ये लोक हुक्क्याचा आनंद घेत होते. त्या गल्लीत आम्हाला एक सुंदर खडे लावलेली आयताकार वस्तू जमिनीवर दिसली. ते गटाराचं झाकण होतं. सुंदर शहराचं सगळंच सुंदर!

इस्तंबूल शहराला ‘अद्भुत’ हेच विशेषण योग्य वाटतं. युरोप आणि रशिया दोन्हीमध्ये पसरलेलं, नव्या-जुन्याचा उत्तम मेळ साधलेलं हे शहर पर्यटकांनी फुललेलं असतं. माझा मुलगा अफगाणी टोपी घालतो आणि उर्दू वाचू शकतो. त्यामुळे अनेक ठिकाणी त्याला पाकिस्तानी समजत. पण माझ्या कुंकवाकडे पाहून मात्र ‘इंडियन?’ अशी पृच्छा होई आणि ‘हो’ म्हटल्यावर शाहरूख खान, सलमान खान, करिना कपूर अशी नावांची जंत्री पेश केली जाई!

जवळजवळ मुंबईइतक्याच आकारमानाच्या आणि तेवढीच लोकसंख्या असलेल्या या शहरात ठिकठिकाणी स्वच्छ स्वच्छतागृहांची सोय वाखाणण्यासारखी आहे. अगदी लहान लहान उपाहारगृहंही याला अपवाद नाहीत.

सर्वात प्रेक्षणीय स्थळं म्हणजे इथल्या भव्य मशिदी! ‘ब्ल्यू मॉस्क्यू’, ‘हेजिया सोफिया म्युझियम’, ‘तोपकापी पॅलेस’ ही सारी महत्त्वाची स्थळं जवळ जवळ असल्यामुळे हा परिसर पर्यटकांनी गजबजलेला असतो. सर्वात लक्ष वेधून घेते ती सोळाव्या शतकात बांधलेली  ‘सुलेमानी मस्जिद’! हिची भव्यता आणि आतली कलाकुसर डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. कुठे बघू आणि किती छायाचित्रं काढू, असं होऊन जातं. सर्व मशिदींच्या बाहेर स्कार्फ ठेवलेले असतात. आत जाताना ते डोक्याला बांधायचे, एवढंच काय ते धर्माचं अवडंबर! तोपकापी पॅलेस पाहताना पायांचे अक्षरश: तुकडे पडतात. निरनिराळ्या राजा-राण्यांचे महाल, दरबार, हम्माम, मुदपाकखाना सगळं आवर्जून बघावं असंच. एकंदरच या शहरात आल्यावर तुमची भरपूर चालायची, चढायची, उतरायची तयारी हवी. एका रस्त्यावरून दुसऱ्या रस्त्यावर जातानाही कित्येकदा ४०-५० पायऱ्या चढाव्या लागतात. नदीतून नौकाविहार करताना मशिदींचे उंच मनोरे आपलं लक्ष वेधून घेतात.

संपूर्ण शहराचं विहंगम दृश्य बघायचं असेल तर ‘गलाटा टॉवर’ला पर्याय नाही. त्याच्या सातव्या मजल्यापर्यंत उद्वाहनाची सुविधा आहे. त्यानंतर जवळपास ७० पायऱ्या चढून गेल्यावर उपाहारगृह आणि गोल गॅलरी आहे. इथून नदी, समुद्र आणि दाटीवाटीने वसलेलं शहर दिसतं. युरोप-अमेरिकेप्रमाणेच पर्यटक भेट देतात अशा ठिकाणी ‘सुव्हेनिर शॉप्स’ आहेत. भूलभुलैय्याप्रमाणे असणाऱ्या ग्रॅण्ड बाजारमध्ये अनेक प्रकारच्या भेटवस्तू, दिवे, झुंबर, कपडे, सिरॅमिकचे विविध आकार, डिझाइन आणि रंगांचे बोल्स आपलं लक्ष वेधून घेतात. दुकानदार खरेदीचा आग्रह करत राहतात. इथे खरेदी केल्यावर बाहेरच्या छोटय़ा दुकानांमध्ये गेल्यावर जाणवलं, की आपण ग्रॅण्ड बाजारमध्ये ‘घासाघीस’ करायला हवं होतं!

ग्रॅण्ड बाजारसारखंच इथलं ‘स्पाइस बाजार’ आहे. इथे असंख्य प्रकारच्या मसाल्यांची आणि सुक्या मेव्याची दुकानं मांडीला मांडी लावून बसली आहेत. एका मसाल्याच्या पाकिटावर ‘मदर-इन- लॉ’ असं लिहिलं होतं. कारण विचारल्यावर, ‘तो खूप तिखट आहे’ असं मिश्किल उत्तर आलं! संपूर्ण शहरात मिठायांच्या दुकानांची तर रेलचेलच आहे. इथलं प्रसिद्ध ‘टर्किश डिलाइट’ आपल्या ‘माहीम हलव्या’सारखं आहे आणि ‘बकलावा’ खरंच स्वादिष्ट व ‘रिच’ आहे. सुक्या मेव्याच्या मिठायांचे भरपूर प्रकार येथे आढळतात. विशेष म्हणजे विक्रेत्यांना इंग्रजीचा गंधही नसताना सगळे व्यवहार सुरळीत सुरू असतात.

इस्तंबूलच्या उत्तरेकडे असलेल्या काळ्या समुद्राकाठचा दीपस्तंभ आणि ‘शीले’ हे सुबक शहर फारच सुंदर आहे. इथला आमचा तरुण गाइड याह्य़ा हा सीरियाचा होता. तिथल्या राजकीय उलथापालथींमुळे तो टर्कीला निघून आला होता. त्याच्या उत्तम इंग्रजीविषयी विचारल्यावर, सीरियात लहान वर्गापासूनच इंग्रजी शिकवतात असं कळलं.

पावलोपावली मिळणारे फळांचे ताजे रस हेही इथलं एक वैशिष्टय़. संत्री, गाजर, सफरचंद, अननस, डाळिंब, ग्रेपफ्रूट अशा सगळ्या फळांचे रस आपल्यासमोर काढून देतात. डाळिंब आपल्याकडच्या नारळाएवढं. आणि भाज्यांच्या दुकानात दिसणारे बटाटे, कांदे, आलं हे सगळंच अवाढव्य आकाराचं!

सीरियाचा याह्य़ा आणि कराचीची आम्हाला भेटलेली एक विद्यार्थिनी आपापल्या देशांवर नाराज आणि टर्कीवर खूश होते. त्याचं एक महत्त्वाचं कारण- इथली उत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था! आम्हीही तिथे ट्रामनीच हिंडलो सगळीकडे.

उपाहारगृहं तर पॅरिससारखीच पदपथाच्या बाजूला पावलोपावली आहेत. आमच्यासारख्या शाकाहारींची इथे जरा पंचाईत होते खरी, मात्र आपल्या स्वादाचं नसलं तरी काहीतरी शाकाहारी सगळीकडे मिळत होतं. अनेक प्रकारचं सॅलड, दह्यतल्या कोशिंबिरी, चवळीची उसळ आणि एका ठिकाणी राजमा-चावलसदृश काहीतरी मिळालं. बऱ्याच ठिकाणी मेन्यूकार्ड घेऊन माणूस बाहेरच उभा असे. ‘शाकाहारी’ सांगितल्यावर तो काही पदार्थावर बोट ठेवून दाखवी. बराचसा व्यवहार खाणाखुणांनीच. इथे जेवणानंतर बहुसंख्य लोक चहा घेतात. काचेच्या नाजूक पेल्यांमध्ये हा कोरा चहा येतो. चव काहीशी वेगळीच; पण घ्यावी अशी!

तिथल्या मांजरांचा उल्लेख केल्याशिवाय इस्तंबूलचं वर्णन पूर्ण होऊ शकत नाही. अक्षरश: दहा-बारा पावलं चाललं की एखादं तरी गुबगुबीत, लाघवी मांजर भेटतंच. पांढरी,

काळी, सोनेरी अशा विविध रंगांची गलेलठ्ठ मांजरंच मांजरं. इथे त्यांचे किती लाड होत असावेत, हे त्यांच्या गबदुल आकारमानावरूनच लक्षात येतं. उपाहारगृहं, दुकानं सगळीकडे

त्यांना मुक्त प्रवेश. कुठेही मज्जाव नाही.

आपण फिरता फिरता दमून एखाद्या बाकावर बसावं, तर एखादं लाडावलेलं मांजर आपल्या मांडीवर येऊन हमखास बसतं. मार्जारप्रेमींसाठी तर ही पर्वणीच!

प्राचीनता आणि नावीन्य यांचं यथायोग्य, सुंदर मिश्रण असणाऱ्या या शहराला भटकंतीची आवड असणाऱ्यांनी एकदा तरी आवर्जून भेट द्यायलाच हवी.

nandiniab48@gmail.com