११ डिसेंबर १९६७ रोजी पहाटे पश्चिम महाराष्ट्रातील कोयना धरण परिसरात ६.७ रिश्टर क्षमतेचा तीव्र भूकंप झाला. या घटनेला उद्या, ११ डिसेंबरला ५० वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने एकूणच धरण क्षेत्रातील भूकंपप्रवणतेची चिकित्सा करणारा लेख..

११ डिसेंबर १९६७ रोजी पहाटे चार वाजून २० मिनिटांनी पश्चिम महाराष्ट्रात कोयना धरण परिसरात ६.७ रिश्टर क्षमतेचा तीव्र भूकंप जाणवला. या घटनेला उद्या ५० वर्षे होत आहेत. ५० वर्षांपूर्वी या भूकंपामुळे पाटण तालुक्यातील नजीकच्या परिसराचे खूप नुकसान झाले. मनुष्यहानीही झाली. नंतरच्या काळात बाधित गावांचे आणि प्रकल्पातील बांधकामांचे पुनर्वसन करण्याचे प्रयत्न झाले. आज ५० वर्षांनंतर त्याची फलश्रुती काय? प्रकल्पाचं आणि परिसराचं पूर्ण पुनवर्सन झालं का? की हे प्रश्न इतक्या वर्षांनंतरही लोंबकळतच आहेत? ५० वर्षांपूर्वीचा भूकंप कोयना धरण आणि जलाशयामुळे झाला का? इत्यादी मुद्दय़ांचा मागोवा घेणं आवश्यक वाटतं.

weather update marathi news, heat wave maharashtra marathi news
पावसाने माघार घेताच उकाड्यात प्रचंड वाढ, काय आहे हवामानाचा अंदाज जाणून घ्या
Increase in ST accidents 3 thousand 121 accidents in two months
‘एसटी’चे अपघात वाढले! यंदा केवळ दोन महिन्यातच तब्बल ३ हजार १२१…
Water supply to villages by tankers in Pune Satara Sangli and Solapur districts pune news
पश्चिम महाराष्ट्र टँकरग्रस्त; सर्वाधिक झळ सातारा, पुण्याला
Drought in the state but plenty of water in Koyna dam
राज्याला दुष्काळाचा झळा, कोयना धरणात मात्र मुबलक पाणी

धरण आणि जलाशय यांच्यामुळे भूकंप होतात असा काही जणांचा समज आहे. हैदराबाद येथील राष्ट्रीय भूवैज्ञानिक संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांची तशी खात्रीच आहे. याखेरीज खडकवासला येथील केंद्रीय जल आणि विद्युत अनुसंधान संस्थेतील काही संशोधकांचंही हेच मत आहे. पण जलाशयामुळे भूकंप होतात की नाही, हा अद्यापि वादाचा मुद्दा आहे. जगातील मोठय़ा धरणांपैकी केवळ दोन ते तीन टक्के धरणांच्या परिसरातच असे भूकंप जाणवतात. हे भूकंप धरणाच्या अगदी लगतच्या प्रदेशात जाणवतात आणि त्यांची क्षमता दोन ते जास्तीत जास्त तीन रिश्टर या क्षमतेपर्यंतच मर्यादित असते. १९६७ सालच्या भूकंपाचा केंद्रिबदू कोयना धरणाच्या उत्तरेला १३ कि. मी. आणि पश्चिमेला दोन कि. मी. अंतरावर होता. म्हणजेच तो धरणाच्या ईशान्येला १३.५  कि. मी. अंतरावर होता आणि त्याची भूपृष्ठापासूनची खोली १२ कि.मी. होती. या तुलनेत जलाशयाची खोली आहे केवळ ८० मीटर!  पाण्याच्या दाबाचा परिणाम हा केवळ त्याच्या खोलीवर अवलंबून असतो, पसाऱ्यावर नाही, हे येथे लक्षात घ्यायला हवे. १९९० नंतर भूकंपाचा केंद्रिबदू कोयना धरणापासून नऋत्येला २९ कि. मी. अंतरावर वारणा जलाशय परिसरात सरकत गेला. आणि त्याच्या केंद्रिबदूची खोली भूपृष्ठापासून चार ते आठ कि. मी. इतक्या खोलीवर राहिली आहे. अर्थातच कोयना जलाशयाच्या केवळ ८० मीटर खोलीमुळे हे भूकंप होतात असं समजणं हास्यास्पद आहे. १९६७ साली भूकंप झाल्यानंतर लगेच या भूकंपाच्या कारणांचा, त्याच्या परिणामांचा आणि प्रकल्पातील बांधकामाच्या क्षमतेचा अभ्यास करण्यासाठी शासनाने जागतिक स्तरावरील शास्त्रज्ञांची समिती स्थापन केली होती. या समितीनेही धरणाचा आणि भूकंपाचा काहीही संबंध नसल्याचा निर्वाळा दिला आहे. या समितीत जागतिक स्तरावरचे शास्त्रज्ञ होते हे लक्षात घ्यायला हवे.

पश्चिम महाराष्ट्रात भूकंपाचा इतिहास हे धरण बांधण्यापूर्वीपासूनच आहे. अधिकृत नोंद नसली तरी इ. स. १५९४ सालापासून पश्चिम महाराष्ट्रात भूकंप होत असल्याची नोंद आहे. खरं म्हणजे माहीमच्या खाडीपासून ते केरळातील कोशीपर्यंत पश्चिम घाटाच्या १२०० कि. मी. लांबीच्या पट्टय़ात गेल्या पाचशे वर्षांत खूप भूकंप नोंदले गेले आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर १५९४ साली ज्येष्ठ महिन्याच्या अमावास्येला रात्री १२ वाजता वसई परिसरात जाणवलेल्या भूकंपाची नोंद सापडते. तेव्हापासून अनेक भूकंपांची नोंद सापडते. २६ मे १६१८ रोजी मुंबई परिसरात झालेल्या भूकंपात ६० नौका बेपत्ता आणि २००० व्यक्ती मृत झाल्याची नोंद आहे. १६७८ साली माघ महिन्यात वसई आणि आगाशी परिसरात सलग पाच दिवस भूकंपाचे धक्के जाणवले. १७०२ साली उत्तर कोकणात, तर ९ डिसेंबर १७५१ रोजी पुन्हा वसई परिसरात भूकंप झाले. ५ फेब्रुवारी १७५२ रोजी लोहगडजवळ, तर ३१ ऑक्टोबर १७५७ रोजी टोक आणि धोम या परिसरात भूकंप झाल्याची नोंद आहे. १७६४ साली नाशिक, पठण, पंढरपूर आणि मुक्केरी एवढय़ा विस्तीर्ण प्रदेशात भूकंप जाणवला. परिसराच्या केंद्रभागी धोम, वाई आणि कराड होते. २९ मे १७९२ रोजी रेवदंडा परिसरात भूकंप होऊन घरे आणि देवळांच्या पायाचे, जोत्याचे दगड हलल्याची नोंद आहे. २३ फेब्रुवारी १८१२ रोजी पुण्यात भूकंप झाला. २० मार्च १८२६ रोजी कोकण परिसरात मोठय़ा तीव्रतेचा भूकंप झाला. त्याची तीव्रता मोरावडे गावाजवळ सर्वात अधिक होती. त्यानंतरही २२ ऑगस्ट १८२८ रोजी वेंगुर्ला, ४ ऑक्टोबर १८३२ रोजी आगटे आणि १९५१ साली जयगड येथे भूकंपाचे धक्के जाणवले. १९६२ च्या सप्टेंबर महिन्यात रत्नागिरीजवळ ६० कि. मी.च्या परिघात भूकंप जाणवला. १९६५ पासून २५ एप्रिल १९६७ पर्यंत पश्चिम किनाऱ्यावर पाच धक्क्यांची मापन यंत्रावर नोंद झाली. त्यातील दोन धक्क्यांचा केंद्रबिंदू रेवदंडा हा होता आणि अन्य दोन धक्क्यांचा केंद्रबिंदू मुंबईजवळ होता.

दख्खन पठाराच्या किनाऱ्यावरील कर्नाटक आणि केरळ या राज्यांतही या काळात भूकंपाची नोंद झाली. ११ ते २५ ऑगस्ट १८५६ या काळात त्रिवेंद्रमजवळ अनेक धक्क्यांची नोंद झाली असून गडगडाटाचा आवाज झाल्याचीही नोंद आहे. ८ फेब्रुवारी १९०० रोजी कोईम्बतूरजवळ ६.५ रिश्टर क्षमतेचा भूकंप सलग अडीच मिनिटे जाणवला. २५ जुलै १९५३ रोजी कोशीजवळ ५.५ रिश्टरचा भूकंप झाला. ऑक्टोबर १९६४ मध्ये कालिकतजवळ भूकंपाच्या मालिकांची नोंद आहे.

१३ सप्टेंबर १९६७ रोजी कोयना परिसरात पहिला मोठा भूकंप जाणवला. त्याची क्षमता पाच रिश्टर एवढी होती. त्यानंतर कोयना येथे अधिकृत भूकंप नोंदीची मापन यंत्रे बसवली गेली आणि भूकंपाची सविस्तर आणि अचूक माहिती उपलब्ध होऊ लागली. पर्यायाने भूकंप आणि कोयना अशी सांगड घातली गेली आणि कोयना प्रकल्प मात्र नाहक बदनाम झाला.

आजपर्यंत कोयनेच्या परिसरात एक लाख चाळीस हजार भूकंपाचे धक्क बसल्याची नोंद आढळते. त्यामुळे आसपासचे डोंगर खिळखिळे झाले आहेत अशी गैरसमजूत अनेकांच्या मनात आहे. प्रत्यक्षात तीन रिश्टर क्षमतेपेक्षा कमी भूकंपाचे धक्के सर्वत्र नेहमीच बसत असतात आणि त्यापासून कोणतेही नुकसान होत नाही. तीन-साडेतीन रिश्टर क्षमतेच्या वर जो भूकंपाचा धक्का आहे तो फक्त जाणवतो. आणि प्रत्यक्षात साडेचार रिश्टर क्षमतेच्या वर जर भूकंप झाला तर बांधकामावर थोडा ताण निर्माण होतो. सर्वसाधारण बांधकामे आणि भूगर्भातला खडक हा स्थितीस्थापक असल्याने असे ताण तात्काळ नाहीसे होतात. त्यामुळे भूकंपामुळे डोंगर खिळखिळे होतात, ही गैरसमजूत आहे.

खरे पाहता या परिसरातील भूकंपांचे कारण कोयना धरण हे नसून दख्खनच्या पठाराचा सगळा पश्चिम किनाराच आधीपासून भूकंपप्रवण आहे. शिवाय भूकंपाच्या केंद्रबिंदूचा उत्तरेकडून दक्षिणेकडे होणारा प्रवास हाही पूर्वेतिहासानुसारच आहे. या काळ्या ढगाला शुभ्र किनार एवढीच आहे, की येथे भूकंपाची तीव्रता सहा ते सात रिश्टरपेक्षा जास्त असणार नाही. कारण हे भूकंप अंतर्खन्डीय आहेत. भूकंपांचं वर्गीकरण दोन प्रकारांत करतात : आंतर्खन्डीय (Interplate) आणि अंतर्खन्डीय (Intraplate)! पृथ्वीवरची सारी खंडं ही पृथ्वीच्या वितळलेल्या गाभ्यावर तरंगणारे भूखंड आहेत. दुधावरच्या साईसारखे ते तरंगत असतात. आफ्रिका खंडाचा तुकडा तरंगत येऊन आशिया खंडाला धडकला आणि आल्प्स पर्वत निर्माण झाला. आफ्रिका खंडापासून सुटून निघालेला भरतखंडाचा तुकडा आशिया खंडाला धडकला आणि हिमालय पर्वत निर्माण झाला. धडकेच्या अशा भागात निर्माण झालेले पर्वतीय भाग हे अतितीव्र भूकंपप्रवण असतात. भारतात हा पट्टा कच्छ-काठेवाडपासून निघून काश्मीरला वळसा घालून हिमालयामाग्रे म्यानमार येथे दक्षिणेकडे सरकून इंडोनेशियापर्यंत पोहोचतो. यामुळेच कच्छपासून पाकिस्तान सरहद्द, हिमालय, इंडोनेशिया आदी भागांत नेहमीच तीव्र भूकंप होत असतात. दख्खनच्या पठारावर मात्र अशी धडकसीमा नसली तरी भरतखंड उत्तरेकडे सरकताना हिमालयाच्या आलेल्या अडथळ्यामुळे दक्षिणेकडून उत्तरेकडे जो रेटा निर्माण होतो त्यामुळे भूकंप होत असावा. मात्र, अशा भूकंपाची जगभरातील जास्तीत जास्त तीव्रता ६.५ ते ७ रिश्टर इतकीच नोंदली गेली आहे.

१९६७ च्या भूकंपानंतर कोयना धरणाच्या भिंतीला अगदी थोडय़ा ठिकाणी सूक्ष्म तडे गेले होते. तातडीचे उपाय म्हणून १९६९ पर्यंत हे तडे इपोक्सी रेझिनने भरून काढण्यात आले आणि धरणाचा सांडव्याजवळचा उंच भाग पोलादाच्या तारा माथ्यापासून ते पायापर्यंत ओवून, त्यांना ताण देऊन त्या प्रतीबलित करून धरणाचा हा भाग शिवल्यासारखा एकसंध करण्यात आला. यास ‘प्राथमिक स्थिरीकरण’ असे म्हटले गेले. पुढे १९६९ ते १९७२ या काळात धरणाच्या सांडव्याखेरीजच्या भागाला खालून जोडस्तंभ बांधून हा भागही पूर्णपणे मजबूत करण्यात आला. १९९२ च्या किल्लारीच्या भूकंपापर्यंत कोयना धरणाचा सांडवा पुरेसा मजबूत आहे आणि त्याला कोणत्याही आधाराची गरज नाही असे समजण्यात येत होते. पण किल्लारीच्या भूकंपानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या साऱ्याच धरणांचा आढावा देऊसकर समितीने घेतला आणि आवश्यक त्या धरणांच्या मजबुतीकरणाची शिफारस केली. यात कोयना धरणाचा समावेश होता. १९९६ साली महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली आणि टेंबू, ताकारी, म्हैशाळ या योजनांसाठी कोयना जलाशयातून अतिरिक्त २० अब्ज घनफूट पाण्याची मागणी आली. या वाढीव मागणीच्या काही भागाची पूर्तता म्हणून धरणाच्या सांडव्याच्या दारांना पाच फुटी झडपा बसवून पाणीपातळी पाच फुटांनी वाढविणे आणि त्यायोगे अतिरिक्त ६.४७ अब्ज घनफूट पाणी साठविणे अशी योजना आखली गेली. या वाढीव पाण्याच्या उंचीसंदर्भाने सांडव्याचे स्थर्य पुन्हा तपासले गेले आणि त्याच्या तातडीच्या मजबुतीकरणाची आवश्यकता भासू लागली. म्हणून सांडवा मजबुतीचे काम २००५ आणि २००६ अशी सलग दोन वर्षे करून कोयना धरणाचा सांडवादेखील सर्वार्थाने मजबूत करण्यात आला. दरम्यानच्या काळात कोयना प्रकल्पात बांधली गेलेली वीजगृहे आणि आनुषंगिक स्थापत्य आणि यांत्रिकी कामे मोठय़ात मोठय़ा भूकंपाचा विचार करूनच केली गेली. अशा तऱ्हेने कोयना प्रकल्पाच्या बांधकामांचे भूकंपाच्या दृष्टीने पुनर्वसन करण्यात आले.

दरम्यान, राष्ट्रीय भूभौतिकीय अनुसंधान संस्थान, हैदराबाद येथील शास्त्रज्ञांनी कोयना-वारणा परिसरातील भूकंप धरण आणि जलाशय यांच्यामुळेच होतो, या हट्टी गृहीतानुसार कोयना परिसरात सात ते आठ कि. मी. खोलीचं विंधन घ्यायचा कार्यक्रम आखला असून त्याची कार्यवाही सुरू आहे. या कामाची प्रत्यक्षात प्रगती आणि त्यातून निघालेले निष्कर्ष याबाबत अद्याप बाहेर कुठेही माहिती उपलब्ध नाही. कारण प्रत्यक्षात हे काम म्हणजे भूभौतिकीय अनुसंधान संस्थानच्या संशोधनाचा भाग आहे. त्यातून भूपृष्ठाखालील खडकांचे स्तर, खडकांत उत्पन्न झालेले ताण आणि विकृती याबाबतची माहिती मिळेल. पण त्या माहितीचा सर्वसामान्यांना काही उपयोग नाही. भूकंपाचा केंद्रिबदू गोषटवाडीपासून वारणा जलाशयापर्यंत २५ कि. मी.मध्ये फिरतो आहे आणि त्याची खोलीही चार ते १३ कि. मी. इतक्या विस्तृत प्रमाणात बदलत आहे. या एवढय़ा क्षेत्रात टाचणीच्या टोकाएवढय़ा जागेत कुठेतरी तीन ते चार कि. मी. खोलीतील विंधन नमुने काढून भूकंपाच्या प्रक्रियेवर काहीही प्रकाश पडणार नाही. तसेच या विवरात काही उपकरणे बसवून त्यांच्यातील ताण मोजून भूकंपाचे भाकीतही करता येणार नाही. जगात आजतागायत कोणत्याही मार्गाने भूकंपाचं भाकीत करणं शक्य झालेलं नाही. तेव्हा या कामाच्या प्रगतीचा सामान्यांनी आढावा घेण्याचं काही कारण नाही. त्याद्वारे भूकंपाबाबतचे भाकीत जाणून घेऊन सुरक्षित राहता येईल अशी समजूत करून घेण्याचंही कारण नाही.

दीपक मोडक

(लेखक महाराष्ट्र शासनातील निवृत्त मुख्य स्थापत्य अभियंते आहेत.)

dnmodak@gmail.com