गेल्या सहा दशकांपासून हिंदी कथात्म साहित्यात ज्यांचे नाव सातत्याने अग्रस्थानी आहे अशा लेखिका कृष्णा सोबती यांना नुकताच ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्ताने..

‘‘साहित्य के संदर्भ में लेखक को अपनी आत्मा में उगे जन्नत और दोजख, स्वर्ग और नरक दोनों को एक दूसरे के करीब लाना है।’’  – कृष्णा सोबती

lokrang
गीतांचा भीमसागर…: चळवळीची गाणी…
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

हिंदी भाषा आणि साहित्यात अतिशय भरीव योगदान देणाऱ्या लेखिका म्हणून कृष्णा सोबती आपल्याला परिचित आहेत. पंजाबी, हिंदी, उर्दू आणि राजस्थानी या चार भाषांनी प्रभारीत झालेली घडीव आणि रसरशीत हिंदी आपल्याला त्यांच्या कथात्म साहित्यातून वाचायला मिळते. त्यांच्या या भाषेची शैलीदेखील स्वतंत्र, प्रवाही आणि वाचकाला संमोहित करून टाकणारी आहे. कृष्णा सोबती यांनी साधारण १९५० पासून लेखनाला सुरुवात केली आणि आजतागायत त्या अखंड निष्ठेने आणि उत्साहाने लेखन करीत आहेत. त्यांच्या अमूल्य आणि साहित्य- संस्कृतीजगत् समृद्ध करणाऱ्या सृजनासाठी त्यांना २०१७ सालचा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त होणे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. गेल्या सहा दशकांपासून हिंदी कथात्म साहित्यात त्यांचे नाव अग्रस्थानी आहे.

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतातल्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवनातल्या उलथापालथींचे चित्रण त्यांनी आपल्या तेजस भाषेत अतिशय संवेदनशीलतेने आणि निर्भीडपणे केले. त्यांच्या जवळजवळ प्रत्येक साहित्यकृतीने त्यांच्यापाशी प्रसिद्धी तर स्वाभाविकपणे खेचून आणलीच, पण त्याचबरोबर वादग्रस्तताही वाटय़ाला आणली. त्यांच्या अफाट प्रतिभेमुळे आणि ऊर्जासंपन्न सृजनशीलतेमुळे या दोहोंकडेही दुर्लक्ष करून नव्या उत्साहाने लेखन अखंड ठेवण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नेहमी होतेच.

कृष्णा सोबती यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२५ रोजी फाळणीपूर्व गुजरातेत झाला. आता हा गुजरातचा भाग पाकिस्तानात आहे. त्यांचे लहानपण ग्रामीण वातावरणात, जमीनदार आणि सरकारी अधिकाऱ्यांचे वैपुल्य असलेल्या संयुक्त कुटुंबात व्यतीत झाले. सिमला, लाहोर आणि दिल्लीमध्ये त्यांचे शिक्षण झाले. फाळणीनंतर दोन वर्षे त्यांनी राजस्थानातील सिरोही प्रांताचे महाराज तेजसिंह यांच्यासाठी गव्हर्नेसचे पदही सांभाळले. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी शिकवण्याचे काम केले. पुढे १९८० पर्यंत दिल्ली प्रशासनांतर्गत असलेल्या प्रौढ शिक्षण विभागात संपादक म्हणून काम केले.

आपल्या सर्जनशील लेखनाची सुरुवात सोबती यांनी कथा या साहित्यप्रकारापासून केली. अतिशय सक्षम कथाकार अशी लवकरच त्यांची ओळखही निर्माण झाली. ‘डार से बिछुडी’ ही त्यांची पहिली कादंबरी १९५८ मध्ये प्रकाशित झाली. काही वर्षांनंतर ‘मित्रो मरजानी’ (१९६६), ‘यारों के यार’ (१९६८) आणि ‘तीन पहाड’ (१९६८) या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. या तिन्ही कादंबऱ्यांनी हिंदी साहित्यविश्वात प्रचंड खळबळ उडवून दिली. या कादंबऱ्यांमधून केले गेलेले स्त्रियांच्या मानसिकतेचे, मानवी मूल्यांच्या ऱ्हासाचे, भ्रष्टाचाराचे चित्रण परंपरेला छेद देणारे, अत्यंत निर्भीडपणे आपल्या भूमिकेचा उद्घोष करणारे आणि ग्रामीण संस्कृतीत आपल्या जीवनेच्छेच्या अखंडत्वाची पाळेमुळे शोधणारे होते. त्यानंतर त्यांच्या ‘सूरजमुखी अंधेरे के’ (१९७२), ‘हम हशमत’ (१९७७), ‘जिंदगीनामा’ (१९७९) या अतिशय महत्त्वाच्या साहित्यकृती प्रकाशित झाल्या. ‘हम हशमत’ ही त्यांची स्मृतिचित्रे आहेत. त्याचा दुसरा भाग १९९९ मध्ये प्रकाशित झाला. अनेक कारणांनी सतत चर्चेत असलेली त्यांची ‘ऐ लडकी’ (१९९१) ही कादंबरी आणि ‘दिलो दानिश’ (१९९३), ‘समय सरगम’ (२०००) या कादंबऱ्या हेही त्यांचे अन्य महत्त्वाचे साहित्य आहे. ‘मित्रो मरजानी’, ‘जिंदगीनामा’ आणि ‘ऐ लडकी’ या त्यांच्या तीन कादंबऱ्या अभिजात भारतीय साहित्यकृतीच म्हणाव्या लागतील.

बेहद्द निसर्ग, ग्रामीण जीवन, संयुक्त कुटुंब, स्त्रियांची मानसिकता आणि प्रश्न, तसेच स्त्री-पुरुष संबंधांचे अनेकविध कंगोरे हे त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीतले आस्थाविषय आहेत. ‘मित्रो मरजानी’ या कादंबरीत सुमित्रावंती ऊर्फ मित्रो ही गुरुदास आणि धनवंती या वृद्ध जोडप्याच्या मधल्या मुलाची बायको आहे. इतर स्त्रियांपेक्षा जास्त असलेल्या आपल्या कामेच्छेचा उघड आणि निर्भीडपणे उच्चार करणारी ही मित्रो रूढ, पारंपरिक नैतिकतेविरुद्ध द्रोह करणारी आणि त्याचवेळी मानवी मूल्यांवर प्रगाढ श्रद्धा असलेली असामान्य स्त्री आहे. मित्रोच्या कुटुंबातल्या वागण्याचे, बोलण्याचे वर्णन करताना, तिचे संवाद लिहिताना कृष्णा सोबतींच्या भाषिक समृद्धीची आणि सामर्थ्यांची आपल्याला जाणीव होते. ‘जिंदगीनामा’ या कादंबरीत फाळणीपूर्व पंजाबचे जिवंत चित्रण आहे. १९०० ते १९१६ या काळात झालेल्या ब्रिटिशराजच्या उत्कर्षांची ही गाथा आहे. चिनाब आणि झेलम या नद्यांमधोमध देवा जट येथे राहत असलेल्या सामान्य लोकांच्या दु:खानंदाची अतिशय संवेदनशीलतेने केलेली ही अप्रतिम भाषिक रेखांकने आहेत. ग्रामीण जीवनातल्या समूहभावनेचे, कौटुंबिक प्रेमाचे आणि विशेषत: निसर्गाचे वर्णन करताना कृष्णा सोबती अप्रतिम आणि आदर्श गद्यलेखनाचा वस्तुपाठच आपल्याला देतात. ‘जिंदगीनामा’मध्ये त्या काळातले रीतिरिवाज, रूढी-परंपरा, कुटुंबजीवन इतक्या सहजसुंदर बोलीभाषेत प्रथमच चित्रित होत होते. त्या प्रदेशातली लोकगीते, सण-उत्सव, बोली असे सगळेच कवेत घेत या कादंबरीची भाषा घडलेली आहे. केवळ सामाजिक-सांस्कृतिक साहित्यकृती म्हणूनच नव्हे, तर त्यातल्या निसर्गचित्रणामुळे आणि प्रेम, करुणा, आस्था आणि आच यांनी ओतप्रोत असलेल्या अद्वितीय भाषाशैलीमुळेही ‘जिंदगीनामा’ ही कादंबरी उल्लेखनीय ठरते. यातला भाषेचा प्रवाह केवळ संमोहित करून टाकणारा आहे. ‘ऐ लडकी’ या कादंबरीत दोन विभिन्न पिढय़ांतील स्त्रियांच्या माध्यमातून परंपरा आणि आधुनिकता यांच्यामधला अटळ संघर्ष हे कठोर वास्तव विलक्षण संयम आणि करुणेने दृग्गोचर केलेले आहे. स्त्री म्हणून आपल्या अस्तिवाची स्वतंत्र ओळख आणि आपल्या ‘स्व’ची स्वतंत्र अस्मिता कमावण्याचा, स्थापित करण्याचा हा अनोखा संघर्ष आहे. मानवी अस्तित्वाचे, जगण्यातल्या अवस्थांतराचे हे चित्र कृष्णा सोबती यांनी विशिष्ट तत्त्वज्ञानात्मक बैठक आणि मानवी करुणा अशा अवघड मिश्रणातून रेखलेले आहे. ‘ऐ लडकी’ या कादंबरीला तिचे स्वत:चे सौंदर्यशास्त्र आणि तत्त्वज्ञान आहे. तसेही त्यांच्या कथा-कादंबऱ्यांमधली स्त्रीपात्रे ही मानसिक, सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्याची आस असलेली आणि ते प्राप्त करण्यासाठी झगडणारी, संघर्ष करणारी आहेत. आपल्याला वरचेवर आश्चर्यचकित करून नतमस्तक व्हायला लावणारी स्त्रीची कितीतरी रूपे कृष्णा सोबती यांनी आपल्या साहित्यातून रेखाटली. ‘डार से बिछुडी’मधली असहाय, परावलंबी पारो, ‘मित्रो मरजानी’मधली मित्रो, फुलवंती, ‘सूरजमुखी अंधेरे के’मधली लहानपणीच बलात्काराचा निर्घृण, अमानुष अनुभव वाटय़ाला आलेली स्त्री आणि ‘ऐ लडकी’मधली आई आणि मुलगी अशी कितीतरी प्रातिनिधिक उदाहरणे देता येतील.

सोबती यांच्या सगळ्या साहित्यकृतींचा समस्त आसमंत कवेत घेणारी स्वतंत्र भाषाशैली हा निश्चितच विशेष आहे. निखळ हिंदीचा सोस त्यांनी कधीच बाळगला नाही. उर्दू, इंग्रजी, पंजाबी, राजस्थानी या भाषांमधील कितीतरी शब्द आणि वाक्प्रचार अगदी सहजतेने त्या आपल्या लेखनात वापरतात. मात्र त्यातून त्या हिंदी भाषाच समृद्ध करीत आहेत याबद्दल आपली खात्रीच पटते. त्यांची शैली विविध भाषांना कवेत घेऊन विलक्षण आवेगाने विकसित होत माणसामाणसांतले प्रेम, वात्सल्य आणि करुणाभाव जागृत करणारी अस्सल भारतीय आहे. त्यांच्या या विशिष्ट शैलीत असलेली ‘जिंदगीनामा’ या कादंबरीची सुरुवातीची साधारण तीस पाने वाचली की आपल्याला आपण इतक्या निकोप, निसर्गसमृद्ध, आस्था, प्रेम  आणि वात्सल्यपूर्ण वातावरणातले पात्र नाही आहोत असा खेद वाटतो.

गेल्या सहा दशकांपासून आपल्या ओघवत्या, स्वतंत्र भाषाशैलीने, अखंड सृजनशीलतेने कृष्णा सोबती हिंदी आणि एकूणच भारतीय साहित्यविश्व समृद्ध करीत आल्या आहेत. तसेच आपल्या प्रत्येक नव्या साहित्यकृतीतून मानवी जगण्याचे नवे संदर्भ, नवे आयाम वाचकांसमोर आणत आहेत. निसर्ग, ग्रामजीवन, स्त्री-मानसिकता, भाषा, बोली हीच त्यांच्या सृजनऊर्जेची मुळे आहेत आणि या सगळ्यांच्या एकत्रित येण्यामुळे त्यांच्या गद्यलेखनानेही कवितेची उंची गाठली आहे.

२०१७ च्या ज्ञानपीठ पुरस्काराआधी कृष्णा सोबती यांना साहित्य अकादमी फेलोशिप, पद्मभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (‘जिंदगीनामा’साठी), व्यास पुरस्कार, मैथिलीशरण गुप्त पुरस्कार, पंजाबी विद्यापीठ आणि पतियाळा अकादमीची फेलोशिप असे कितीतरी सन्मान प्राप्त झालेले आहेत. कृष्णा सोबती यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त होणे हा जीवनावरील अविचल निष्ठेचा, सृजनशीलतेत अनुस्यूत असलेल्या करुणा, प्रेम, वात्सल्यभावाचा आणि सृजनशील, निर्भीड अभिव्यक्तीचा गौरव आहे.

कृष्णा किंबहुने krishnakimbahune@gmail.com