भारतीय चित्रपटाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि सिनेचळवळीचे संयोजक सतीश जकातदार यांचे ‘हकिकत सिनेमाची’ हे पुस्तक पराग प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत आहे. पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात उद्या, २६ ऑक्टोबर रोजी त्याचे प्रकाशन होणार आहे. या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश.

मराठी माणसाचं जसं मराठी भाषेवर प्रेम.. तसंच संगीत, साहित्य, नाटक, राजकारण या साऱ्यांवर नितांत प्रेम. मात्र विनोदावर त्यांची अगदी निस्सीम भक्ती. विनोद म्हटलं की मराठी माणूस सगळं सोडून कंबर कसतो.. खरं तर जीभ कसतो!
थट्टा, मस्करी, टवाळी ही तर मराठी माणसाची रोजची दिनचर्या.. त्यात विनोदी बोलण्यात सारेच दर्दी! ‘टॅह्य़ा..’ करून आपण जन्माला येतो, पण खरंतर हसायला कधी सुरुवात केली आठवत नाही. पण विनोद कळला असं वाटू लागलं की हसायला भक्कम कारणं मिळत जातात. साहित्य, नाटक व चित्रपटातून..
अगदी बालपणापासून ते आजतागायत प्रत्येकाच्या बरोबर त्याच आठवणींची धावती मालिकाच असते.
चित्रपटातील विनोदवीर म्हटले तर प्रथम आठवतात अमेरिकन विनोदवीर.. अगदी लहानपणीच लॉरेल-हार्डीला पाहिलं.. या अफलातून जोडगोळीनं मनमुराद हसवलं. त्यांच्या अखंड धडपडीतून, गोंधळातून उगम पावणारे विनोद म्हणजे एक आनंददायी अनुभव होता. आजही ते तितकेच आवडतात. चार्ली चॅप्लिन आणि बस्टर किटन या दोघांनीही त्याच काळात वेड लागलं. ‘ट्रॅम्प’ प्रतिमेतली चॅप्लिनची ‘स्लॅपस्टीक कॉमेडी’, त्यातले उत्तमोत्तम गॅग्ज आणि भन्नाट कल्पनांभोवती सहजपणे उमलत जाणारं चॅप्लिनचं मानवी जीवनावरील भाष्य, हे सारंच अफलातून. चॅप्लिन बरोबरच बस्टर किटननेही लक्ष वेधून घेतले. निर्विकार चेहरा ठेवून सभोवतालचा संपूर्ण प्रसंगच हास्यकारक बनविणारा त्याचा बौद्धिक विनोद व चॅप्लिनचा सूक्ष्म, बोचरा आणि प्रसंगी मर्मभेदक, तर लॉरेल-हार्डीचा निरागस, साधा विनोद या साऱ्यांनी जगातल्या अनेकांना प्रेरणा दिली. आपल्याकडच्या अनेक विनोदी नटांनी व दिग्दर्शकांनी त्यांच्याकडून स्फूर्ती घेतली. त्यांना आदर्श मानलं.
चॅप्लिनचा काळ मूकपटांचा जमाना होता. मूकपट जमान्यातील या अमेरिकन विनोदवीरांनी जसं बहुरंगी दर्शन घडविलं, तसं भारतीय मूकपटात अभावानेच विनोदाचं दर्शन घडलं. चित्रपट बोलू लागला, तो मराठी बोलू लागला आणि अवघ्या एक-दोन वर्षांतच तो सवयीनं विनोदी बोलू लागला.. मराठी माणसाच्या स्वभावासारखेच उपहासाचे, गहिरे रंग व फजितीचे अनोखे ढंग दाखवू लागला. १९३५ ते १९९८ अशी ही प्रदीर्घ हास्य परंपरा..
ही परंपरा अनेक अव्वल दर्जाच्या विनोद-वीरांनी गाजविली. दामुअण्णा मालवणकर, विष्णूपंत जोग, मा. विनायक, दिनकर कामण्णा या अगदी प्रारंभीच्या काळातील विनोदवीरांपासून राजा परांजपे, राजा गोसावी, शरद तळवलकर, वसंत शिंदे, धुमाळ या मध्यंतरीच्या काळातील विनोदवीरांसह दादा कोंडके ते अशोक-लक्ष्यापर्यंत साऱ्यांनीच छान करमणूक केली.
दामुअण्णांनी तिरळ्या डोळ्याचा कॉमेडीसाठी वापर केला तर काही वेळा तो आपोआप झाला. त्या फिरलेल्या डोळ्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आपसूक भाबडा भाव उमटत असे! एक डोळा सभोवतालच्या परिस्थितीकडे बघत असे. तर त्यांचा दुसरा डोळा तिसरीकडे पाहात असायचा. जणू एक डोळा वर्तमानातल्या आपत्तीकडे लक्ष ठेवून, तर दुसरा भविष्यात शोधत असल्यासारखा, म्हणजे तिथे तरी परिस्थिती सुधारतेय का? या डोळ्यांच्या व्यंगाचा त्यांनी काही वेळा जसा सुरेख उपयोग केला तसा अनेक पटकथाकार-दिग्दर्शकांनी त्यांच्या या व्यंगाचा विनोदनिर्मितीसाठी उत्तम वापर केला.
अशा या दामुअण्णांच्या डोळा फिरविण्यासारख्याच अनेक लकबी होत्या. गुदगुल्या झाल्यासारखे अंग घुसळणं, निरागस बालकाप्रमाणे हसणं, मध्येच जीभ काढून चावणं.. प्रसंगानुरूप केलेल्या अशा अनेक लकबीतून ते हमखास हास्याची खसखस पिकवित असत.
‘ब्रह्मचारी’, ‘सरकारी पाहुणे’, ‘लग्न पहावं करून’, ‘ब्रॅन्डीची बाटली’, ‘देव पावला’ ते अगदी ‘अवघाची संसार’पर्यंत दामुअण्णांनी विनोदी करामतींचे अनेक नमुने सादर केले.. दामुअण्णांच्या या बहारीच्या काळात मराठी विनोदी चित्रपटांवर मराठी साहित्याचा बराच प्रभाव होता.
विनोदाचे आद्य प्रवर्तक श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांची सुदामा, पांडुतात्या, बंडूनाना ही मानसपुत्र मंडळी नवजात विनोदी निर्मिती करून मराठी वाचकांची मने रिझवत होती.. ‘सुदाम्याचे पोहे’ पचविणाऱ्या मराठी वाचकांना आणखी एका प्रतिभावंताने मोहिनी घातली होती.. तो प्रतिभावंत म्हणजे राम गणेश गडकरी!
कोल्हटकर-गडकऱ्यांच्या प्रभावाच्या काळात चित्रपटासारख्या नव्या माध्यमात साहित्यिकांची ये-जा असे. त्या काळात एकुणातच साहित्य-नाटक-चित्रपट हातात हात घालून हिंडत होते. मराठी चित्रपटांचे पहिले दशक गाजविणाऱ्या ‘प्रभात’ संस्थेत तर अनेक साहित्यिक नियमित हजेरी लावत असत. आपल्या सामाजिक-ऐतिहासिक चित्रपटांनी मराठी चित्रपटाचा प्रारंभिक इतिहास अजरामर करणाऱ्या ‘प्रभात’च्या चित्रपटात विनोद मात्र अभावानेच आढळत असे.
‘प्रभात’च्या शाळेतच उदयास आलेला विनोदवीर म्हणजे मा. विनायक. त्यांच्या नावााबरोबर मराठी चित्रपटाचे सुवर्णयुग आठवते. ‘धर्मवीर’, ‘प्रेमवीर’, ‘ब्रह्मचारी’, ‘ब्रॅन्डीची बाटली’ यासारखे अजरामर विनोदी बोलपट आठवतात. ‘कॉमेडियन’ म्हणून मा. विनायकांच्या अभिनयात अकृत्रिम साधेपणा होता. स्वभाव विसंगतीतून व अनपेक्षित प्रसंगातून त्यांच्या सिनेमात विनोद फुलायचे. मराठी सिनेमात ‘नॅचरल अ‍ॅक्टिंग’चे ‘सहजतेनं हसविणारं स्कूल’ त्याच्यापासूनच सुरू झालं. तरी अभिनेत्यापेक्षा मा. विनायक फिल्ममेकर म्हणून ग्रेट होते.
चिं. वि. जोशी हे मा. विनायकांचे एक प्रमुख प्रेरणास्थान. आचार्य अत्रे चिं. वि. जोशींना ‘कोमल विनोदाचे फुलमाळी’ म्हणत असत. चिं. विं.च्या विनोद बागेतले दोन अफलातून नमुने म्हणजे ‘चिमणराव-गुंडय़ाभाऊ’. या दुकलीची लोकप्रियता आता आतापर्यंत टिकून होती. दामुअण्णा आणि विष्णुपंत जोग यांचा ‘सरकारी पाहुणे’ हा चित्रपट १९४२ मधला. त्यानंतर ३५ वर्षांनी ‘चिमणराव-गुंडय़ाभाऊ’ हा चित्रपट १९७९ मध्ये आला. त्यात दुकलीची भूमिका केली होती दिलीप प्रभावळकर-बाळ कर्वे या जोडीने.
चि. विं. नंतर मराठी माणसाला मनसोक्त हसविणारं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे आचार्य प्र. के. अत्रे. उत्स्फूर्त आणि मुक्त विनोदाचा बहुरंगी आविष्कार. ‘साष्टांग नमस्कार’सारखे नाटक, ‘झेंडूची फुले’सारखी विडंबन गीते आणि ‘ब्रह्मचारी’सारख्या बोलपटातून आचार्य अत्र्यांनी मराठी माणसाच्या सभोवतालच्या जीवनातील व्यंगांची आणि ढोंगांची खरपूस टिंगल केली. अत्र्यांनी ‘ब्रह्मचारी’, ‘ब्रॅन्डीची बाटली’, ‘अर्धागी’, ‘लपंडाव’, ‘धर्मवीर’, ‘मोरूची मावशी’ व ‘ब्रह्मघोटाळा’ अशा अनेक चित्रपटातून स्वभावनिष्ठ आणि प्रसंगनिष्ठ विनोदाचे प्रसन्न दर्शन घडविले. दुर्दैवाने यातील बहुतेक चित्रपट आज उपलब्ध नाहीत.
१९३८ सालच्या अत्रे-विनायक जोडीच्या ‘ब्रह्मचारी’ या सदाबहार विनोदी चित्रपटानेच खऱ्या अर्थाने मराठीत लोकप्रिय विनोदी चित्रपटांची परंपरा सुरू झाली. ‘ब्रह्मचारी’ या सिनेमाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रौप्यमहोत्सवी यश मिळविले. पुण्याला ‘आर्यन’मध्ये वर्षभरापेक्षा जास्त चालला. मुंबईला ‘मॅजेस्टिक’मध्ये तुडुंब गर्दी खेचत राहिला. मा. विनायक, दामुअण्णा, मीनाक्षी, दादा साळवी आणि विष्णुपंत जोग या साऱ्या अभिजात चमूनं या चित्रपटात एकच धमाल उडविली आहे. ब्रह्मचर्याची शपथ घेतलेला आणि ती कसोशीने पाळू पाहणारा भोळासांब औदुंबर, त्याला अडचणीत आणणारी फटाकडी किशोरी यांच्यातील हास्यस्फोटक प्रसंगांनी या चिपटात कमाल केली आहे. साठ वर्षे उलटून गेली तरी त्यातला ताजेपणा टिकून आहे.
अत्रे-विनायक युगांनंतरचं दशक गाजविणारे दिग्दर्शक-अभिनेते राजा परांजपे. मा. विनायकांच्याच परंपरेशी त्याचं नातं. मात्र मराठीतील शब्दनिष्ठ, उपहास प्रधान विनोदाला राजाभाऊंनी अधिक उन्नत, सहज व त्याहून अधिक प्रसंगनिष्ठ केलं.
‘जिवाचा सखा’ या पहिल्या रौप्यमहोत्सवी चित्रपटाने मराठीत चैतन्य निर्माण करणारी चित्रत्रयी जन्माला आली. राजाभाऊ, सुधीर फडके आणि ग. दि. माडगूळकर. या त्रयीने कधी एकत्रितपणे तर कधी स्वतंत्रपणे अनेक अजरामर चित्रपट, चित्रगीते बहाल केली. त्याची टवटवी मराठी मनावर आजही टिकून आहे.
या त्रयींचा सर्वात गाजलेला विनोदी बोलपट ‘लाखाची गोष्ट’. १९५२ सालच्या या बोलपटाने अवघ्या महाराष्ट्राला हास्याच्या धबधब्यात भिजवून टाकलं. राजाभाऊंना जशी विनोदाची उत्तम जाण होती तशी तल्लख विनोदबुद्धीही होती. त्यांच्या ‘पेडगावचे शहाणे’ या चित्रपटाने तर इतिहासच निर्माण केला. त्यातील वेडय़ाच्या इस्पितळातील ‘झांजीबार झांजीबार’ या गाण्यानं शहाण्या-सुरत्यांनाही वेडं केलं. राजा परांजपे युगातला विनोदी नायक म्हणजे राजा गोसावी! त्यांच्या कॉमेडीने प्रभावळकरांसारख्या अनेकांना प्रभावित केलं. राजा गोसावींच्या अभिनयातील सहजता, मुद्रेवरील भाव व संवादफेकीचं अचूक टायिमग अगदी दाद देण्यासारखं होतं. त्यांच्या या गुणांमुळेच लोकांनी त्यांना भरघोस दाद दिली. त्यांच्या शंभराहून अधिक विनोदी चित्रपटात फार विविधता नसली तरी त्यांनी लोकप्रियता अफाट मिळविली. त्या काळी हॉलिवूडच्या डॅनी केसोबत त्यांची तुलना होत असे. त्यांची ही लोकप्रियता पाहून १९५९ मध्ये वसंत पिक्चर्सने ‘राजा गोसावींची गोष्ट’ या नावाचा चित्रपटच निर्माण केला होता. या गोष्टींची सुरुवात झाली ‘लाखाची गोष्ट’ने. गोसावी नसलेल्या राजाभाऊंचे हे प्रथम पदार्पण. ‘लाखाची गोष्ट’ प्रदर्शित झाला त्या वेळी राजा गोसावी ‘भानुविलास टॉकीज’मध्ये बुकिंग क्लार्क होते. स्वत:च्या सिनेमाची तिकिटे स्वत:च विकत असत आणि काही वेळा त्यांनी ब्लॅकमध्ये विकली. जागतिक सिनेमा इतिहासातला हा अचाट प्रकार. ‘लाखाच्या गोष्टी’ची ही गोष्ट राजाभाऊ पुढे अनेक काळ रंगवून सांगत असत.
मा. विनायकांचं ‘सहजतेचे हास्य स्कूल’चा खरा वारसदार असणाऱ्या राजा गोसावींना पदरी वाक्य पेरण्याचं अगदी व्यसन होतं. आचार्य अत्र्यांच्या अनेक नाटकातही त्यांना हा मोह आवरला नाही, तर चित्रपटात कॅमेऱ्यासमोर अशा शेकडो ऑडिशन्स राजाभाऊंच्या नावावर आहेत.
या निष्णात हजरजबाबी अभिनेत्याला त्या काळात त्यांना साथ देणारा जातिवंत अभिनेता म्हणजे शरद तळवलकर. राजा गोसावी आणि शरद तळवलकर या दुकलीने मराठी विनोदी चित्र इतिहासातील काही संस्मरणीय विनोदी प्रसंग सादर केले आहेत. ‘याला जीवन ऐसे नाव’ या चित्रपटापासून ही दुक्कल गाजू लागली आणि त्यानंतर तब्बल १३-१४ चित्रपटात या दुकलीनं हास्य-स्फोट घडविले.
१९५०-६० या दशकातला विनोद हा आधीच्या दशकापेक्षा वेगळा होता. उपहासप्रधान उपरोध त्यात कमी होता. मध्यमवर्गीय पांढरपेशा समाजातील युवकांना नोकरी, जागा व लग्नासाठी मुलगी मिळविण्यासाठी कराव्या लगाणाऱ्या खटपटी-लटपटींभोवती हा विनोद उमलत होता. नायक विवाहित असेल तर जागा किंवा नोकरी मिळविण्यासाठी त्याला अविवाहित असल्याचा बहाणा करावा लागत असे किंवा विवाहित असेल तर अविवाहितपणाचं नाटक करावं लागेल.. आणि मग यातून निर्माण होणाऱ्या घोटाळ्याभोवती विनोद उभारी धरत असे.
या काळातील चित्रपटांचे नायक शिक्षक, ड्रायव्हर, कंडक्टर किंवा फोटोग्राफर, गॅरेज मेकॅनिक अथवा विमा एजंट होते, तर नायिका बहुधा पोस्टात किंवा आकाशवाणीवर गायिका होत्या. तर चरित्र नायक जागा भाडय़ाने देणारे मालक किंवा मुलीचे बाप होते. विनोदी सिनेमातील मध्यमवर्गीय मराठी माणसाची परिस्थिती १९६०-६५ नंतर बदलत गेली. ‘बटाटय़ाच्या चाळी’चं ‘बटाटा अपार्टमेंट’ होऊ लागलं. ‘गुळाचा गणपती’ हा सबकुछ पु. ल. असा चित्रपट. मराठी माणसाला तब्बल पन्नास वर्षे हसविणारे पु.लं. चित्रपट क्षेत्रात मात्र अल्प काळ रमले. पु.लं. ज्या काळात चित्रपटसृष्टीतून बाहेर पडले त्या राजा परांजपे युगात आणखी दोन विनोदी नट.. छोटय़ा-मोठय़ा भूमिकेत लक्ष वेधत असत. ते म्हणजे धुमाळ आणि वसंत शिंदे. धुमाळांनी ‘पेडगावचे शहाणे’ या चित्रपटात मद्राशाची भूमिका केली होती. १९६६ साली ‘गुरुकिल्ली’ या चित्रपटानंतर राजा परांजपे यांनी चित्रसंन्यास जाहीर केला आणि त्यानंतर अवघ्या चार वर्षांत दादा कोंडके या मराठीतील सर्वात लोकप्रिय विनोदी नटाचे आगमन झाले आणि पुढील दोन दशके दादांच्या चित्रपटांनी लोकप्रियतेचे जागतिक विक्रम प्रस्थापित केले. हुकमी यशाच्या या दादांच्या स्वयंभू फॉम्प्र्युलाने मराठी विनोदी चित्रपटाला एका वेगळ्या वळणावर नेऊन ठेवलं.
दादा कोंडकेंची विनोदबुद्धी अत्यंत तल्लख होती. समयसुचकता व हजरजबाबीपणा बिनतोड होता. विनोदात सहजता, कडक व नर्म उपहास व खोल अर्थाची पेरणी यांची भट्टी उत्तम जमली होती. मात्र सरत्या यशाबरोबर त्यांच्या विनोदाची पातळी मात्र घसरली हेही तितकेच खरे. दादा कोंडकेंच्या ‘पांडू हवालदार’ने आणखी एक विनोदी अभिनेता मराठीला दिला, तो म्हणजे अशोक सराफ. सचिन, अशोक सराफ व लक्ष्या यांनीच दादा कोंडकेंनंतर मराठी विनोदी सिनेमा गाजविला. खरं तर १९८० नंतरच्या विनोदाचा नायक होता लक्ष्या बेर्डे! लक्ष्याची कॉमेडी बरीचशी दादा कोंडके स्टाईलची. मुक्त, स्वैर अभिनय, सतत हलणारा चेहरा आणि सभोवतालच्या घटनांचा वेध घेत प्रसंगानुरूप केलेली अखंड बडबड किंवा शेरेबाजी.
दामुअण्णांपासून लक्ष्यापर्यंतच्या विनोदवीरांच्या कर्तबगारीचा हा ‘कॅलिडोस्कोप’ पाहिला की प्रश्न पडतो आता पुढे काय? पुढले विनोदी चित्रपट कसे असतील? जग झपाटय़ानं बदलत चाललंय. आजूबाजूची परिस्थिती बदललीय. आता पुढच्या शतकात लोकांना हसण्याची आणखी गरज भासणार.. त्यावेळी पुन्हा एकदा मराठी मातीत अस्सल विनोद बहरेल.. त्यातूनच एखादे दामुअण्णा किंवा राजा गोसावी किंवा दादा कोंडके पुन्हा जन्माला येतील.. जीवनातले नवे संदर्भ घेऊन खळखळून हसवतील.. मराठी विनोदांवर प्रेम करणारे रसिक त्यावेळीही असतील. त्यावेळी पुन्हा एकदा मराठी माणसाला आपल्या या विनोदवीरांची आठवण होईल..!

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
success story of ias saumya sharma
परीक्षेच्या दिवशीच बिघडली तब्येत, तरीही मानली नाही हार, वाचा IAS सौम्या शर्माचा प्रेरणादायी प्रवास
Yash Mittal Murder Noida
व्यावसायिकाच्या मुलाची चार मित्रांकडून हत्या; वडिलांकडून मागितली सहा कोटींची खंडणी
Taapsee Pannu reacts on wedding with Mathias Boe
तापसी पन्नू विदेशी बॉयफ्रेंडशी मार्चमध्ये लग्न करणार? अभिनेत्रीने चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली, “मी कधीही…”

(‘चित्रकथा विनोदवीरांची’ या लोकप्रभा आयोजित दृक-श्राव्य कार्यक्रमाचे हे निवेदन. आशय फिल्म क्लबतर्फे सादर होणारा हा
कार्यक्रम दिलीप प्रभावळकर सादर करीत असत.)