भारतीय पातळीवर कवितेतून नवी दृष्टी देणारे, तसेच मराठी-हिंदी सांस्कृतिक अनुबंधाचे ममत्व असणारे ज्येष्ठ हिंदी कवी चंद्रकांत देवताले यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्या कवितेचा व मराठी साहित्यविश्वाशी त्यांनी आस्थेने जपलेल्या अनुबंधाचा वेध घेणारा लेख..

चंद्रकांत देवताले यांच्या निधनाने भारतीय साहित्याची मोठी हानी झाली आहे. आधुनिक भारतीय कवितेत त्यांच्या कवितेचे वेगळे आणि ठळक असे स्थान आहे. जवळपास बारा कवितासंग्रहांतून मानवी जीवनसृष्टीचे जे नवे ब्रह्मांड त्यांनी रचले आहे ते अपूर्व असे आहे. अर्धशतकाहून अधिक काळ ते भारतीय समाज-वाटचालीचे साक्षीदार होते. या काळातील भारतीय समाजाची बहुमुखी रूपे त्यांच्या कवितेत उपस्थित आहेत. त्याला त्यांनी स्वत:ची नीती प्राप्त करून दिली आहे. मानवी जीवनाकडे व सृष्टीकडे देवताले यांची पाहण्याची विशिष्ट दृष्टी आहे. त्यांच्या कवितेतील जाणिवांचा फलक हा विस्तृत स्वरूपाचा आहे. मानवी जीवनातील अगणित जाणिवांच्या कक्षेतून मानववादाचा विशाल स्वरूपाचा पट त्यांनी मांडला. हिंदीतील अ-कविता चळवळीशी आरंभी त्यांचा जवळून संबंध होता. सत्तरीच्या दशकानंतरचे सामाजिक जीवनातले अंतर्वरिोध, अनेक पातळ्यांवरची गुंतागुंत आणि त्याबद्दलचा करुणेचा आणि विचारांचा खास असा संदर्भ सतत देवताले यांच्या कवितेत आहे.

भूतकाळ आणि वर्तमानाच्या विरोधात्म चित्रांतून अनेकविध जाणिवा या कवितेत आहे. आदिपहाटेपासून संगणकार्पयचा प्रवास त्यामध्ये आहे. सर्वहारा वर्गाची भूक आणि त्यांची आकांक्षा, स्वप्ने त्यामध्ये आहेत. कायदा, न्याय व राज्यसंस्था यांचा विपरीत स्वभाव, प्रभुत्वसंबंध यातून हे जीवनचक्र बेहाल झाले आहे. अशा चिंताग्रस्त समूहाची दु:स्वप्ने त्यात आहेत. भारतीय समाजाच्या खोलवरच्या स्वप्नभंगाची जाणीव त्यामध्ये केंद्रीय स्वरूपात आहे. एका विराट शांततेतील काळोखी जीवनाविषयीचे दीर्घ स्वगत त्यांच्या कवितेत आढळते. हरवलेले चेहरे आणि दडलेल्या आकांक्षा यांचा कैफियतस्वर दिसतो. ईश्वराचे टेलिफोन्स कापले गेले आहेत आणि पृथ्वीच्या आतडय़ांत विषाची गाठ रुतून बसल्याची जाणीव त्यात आहे. आकाशाचा पडदा फाटून जाणारी ‘बाईची किंकाळी’ आणि इतिहासाची दालनं ओलांडून काळोख तुमच्या अंगणात आल्याच्या भयजाणिवेचे सूचन देवताले यांच्या कवितेत आहे. स्त्रीरूपाची वेगळी जाण देवताले यांनी प्रकट केली आहे. एका बाजूला मातृरूपाची अपरंपार तृष्णारूपे, स्त्रीशोषण आणि तिजबद्दलची उन्नत अशी भावरूपेही त्यात आहेत. आई आणि मुली यांच्याप्रमाणेच मुलगा व पिता या कल्पनाबंधाला देवताले यांनी नवी मिती प्राप्त करून दिली आहे. समृद्धी,आनंदमयता, तसेच दु:ख,दारिद्रय़ आणि समाजरचितातील अस्तित्वशोधाचा शाप लाभलेल्या स्त्रीत्वाच्या अत्यंत सूक्ष्म स्तरावरील जाणिवा देवताले यांनी रेखाटल्या आहेत. ‘माँ पर नहीं लिख सकता कविता’ आणि ‘सिर्फ बेटियों का पिता होने से कितनी हया भर जाती है शब्दों में’ या कवितांतून ती व्यक्त झाली आहे. आईविषयी एका कवितेत म्हटले आहे.. ‘चिपटे हुए उसके पेड का पक्षी बन जाता..’ गाव आणि हरवलेले बचपन यांना त्यांच्या कवितेत फार महत्त्वाचे स्थान आहे. ‘मेरे खून में तरती है/ पुरानी स्मृतियों कीं अनगिनत नन्ही किश्तियां’ आणि ‘नदी सुख गई बचपन की’ या भावनेने हरवलेल्या दिवसांचे व्याकूळ स्मरण त्यांच्या कवितेत आहे.

अखेरच्या काळातील त्यांच्या कवितेतून भोवतालच्या जीवनाबद्दलचा निषेधस्वर तीव्रपणे व्यक्त झाला आहे. नव्या कालांतरणातील मूल्यऱ्हास आणि विवेकहीनतेवरचे उपरोधभाष्य त्यामध्ये आहे. हिंसा, गर्दी, मध्यमवर्गीयांचा थंडपणा, कॉर्पोरेट जगाचे प्रभुत्वसंबंध आणि सामान्याच्या जगाकडे करुणाभावाने पाहिले आहे. ‘कुछ नहीं किया जा सकता/ इस बाजारू समय में’ या भाषेत काळाचे अस्वस्थपण प्रकटलेले आहे ते ‘खुदपर निगरानी रखने का वक्त’ या सावध सूत्रात! एम. एफ. हुसेन यांच्यावरील कवितेचा शेवट त्यांनी फार अर्थपूर्णरीतीने केला आहे. तो असा- ‘अफसोस वतन में दोन गज जमीं भी/ हो न सकी नसीब तुमको/ हमेशा के लिए/  इत्मिनान से सोने के वास्ते’ या भारतीय समाजातील दुखऱ्या ठणकवास्तवाचा थेट असा उच्चार आहे.‘ सिर्फ तारीखें नहीं बदला करती समय’ अशी काळाविषयीची स्वतंत्र जाण त्यांच्या कवितेत आहे. आधुनिकीकरणाच्या काळ्या बाजूचे खोलवरचे संवेदन त्यात आहे. सामान्यजन, गाव आणि निसर्ग यावर प्रगतीच्या नावाखाली जे चौखूर आक्रमण होत आहे, त्या विध्वंसाची वेदनारूपे त्यांनी तीव्रपणे नोंदविली आहेत. ‘रौंदती धरती का गर्भ मशीनों के दांतेदार पाव ’अशा भाषेत त्या व्यक्त झाल्या आहेत. मात्र, हे सांगत असताना ‘मं उस कपट के विरुद्ध’ हा विवेकही त्यांच्यामध्ये होता. देवताले यांच्या कवितेत त्यांच्या कवी व सजग माणूस म्हणून विशिष्ट स्थलावकाशांना फार महत्त्व आहे. त्यात जौलखेडा, खांडवा, रतलाम, इंदौर, बस्तर, नागझिरा व उज्जन या परिसरजाणिवांना कमालीचे महत्त्व आहे. तसेच त्यांच्या कवितेत नदी, समुद्र, आकाश, पृथ्वी, झाडे, साप या प्रतीकांना अनेक पातळ्यांवर प्रसरणशीलतेचे अर्थ प्राप्त झालेले आहेत. त्यांनी कथनात्मकता, दीर्घकविता व भाषा सादरीकरणाच्या विशिष्ट संयोजनातून काव्यरूपाच्या अनेक शक्यता साकार केल्या आहेत. आणि आधुनिक िहदी कवितेत त्या आश्चर्यकारक आहेत.

महाराष्ट्र आणि चंद्रकांत देवताले यांच्यात फार जवळिकीचे आणि सांस्कृतिक पातळीवरचे सौहार्दपूर्ण संबंध राहिले आहेत. त्यांच्या गावी व इंदौरमध्ये त्यांच्या भोवताली अनेक मराठीभाषिक कुटुंबे होती. मराठी मित्रांचा गोतावळा होता. त्यांचे अनेक नातेवाईक मराठीभाषिक आहेत. त्यांना मराठी भाषा व संस्कृतीविषयी आत्मीयता होती. एम. ए. ला असताना त्यांना मराठीचा एक पेपर होता. वि. स. खांडेकर, ह. ना. आपटे यांच्या कादंबऱ्यांचे त्यांनी आवडीने वाचन केले होते. ‘सत्यकथा’ नियतकालिक त्यांच्याकडे येत असे. ते मराठीचा ‘मावसबोली’ असा उल्लेख करत. परभणी, लातूर, नांदेड, औरंगाबाद, पठण या परिसरात फिरताना त्यांना आपल्याच परिसरात फिरल्याचा आनंद होत असे. मराठवाडा हा त्यांना माळव्याचाच भाग वाटे. तेथे त्यांना माहेरपणाचा प्रत्यय येत असे. मराठीतील ‘नंतर’ या अनियतकालिकाचे ते सल्लागारही होते. समकाळातील भालचंद्र नेमाडे, चंद्रकांत पाटील, निशिकांत ठकार, नामदेव ढसाळ, ना. धों. महानोर, सतीश काळसेकर, चंद्रकांत बांदिवडेकर यांच्या साहित्य-आवडीबरोबरच त्यांच्याशी त्यांचा व्यक्तिगत स्नेहही होता. त्याचबरोबरीने प्रफुल्ल शिलेदार, मंगेश नारायण काळे, गणेश विसपुते, बळवंत जेऊरकर ते अगदी अलीकडील जुन्नर येथील डोंगराळ भागात आश्रमशाळेवर शिक्षक असणाऱ्या अनिल साबळे या नव्या कवींशीही त्यांचा परिचय होता. विंदा करंदीकरांबरोबर ते ओरिसामध्ये सात दिवस एकत्र होते. त्यांचा सहवास फार आनंददायी होता, असे त्यांनी म्हटले होते. ‘खुद पर निगरानी का वक्त’ हा अलीकडचा कवितासंग्रह त्यांनी नामदेव ढसाळ व दि. पु. चित्रे यांना अर्पण केलेला आहे. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे त्यांना २०१३ साली कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

देवताले यांच्यासंदर्भात आणखी एका बाबीचा आवर्जून उल्लेख करायला हवा. व्यक्ती वा लेखकाच्या प्रथमभेटीतच ते आस्थाभावाने त्यांच्याशी संबंध स्थापन करीत. त्यामुळे अनोळखीपणाचे अंतर तत्काळ नाहीसे होऊन एक प्रकारे मानवी संबंधांतील जवळिकता त्यात प्रकटत असे. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर समाजमाध्यमांतून त्यांच्याबद्दल ज्या प्रतिक्रिया उमटल्या, त्या त्यांच्या मानवी आस्थाभावाच्या द्योतक होत्या. अनेक कवींनी, लेखकांनी त्यांच्या सहवासातील आठवणींना त्यात मन:पूर्वक उजाळा दिला आहे. अशा प्रकारची बाब परभाषिक साहित्यिकाच्या बाबतीत अपवादभूत म्हणावी लागेल. भारतीय पातळीवरील अन्य भाषेतील लेखकाला मराठी साहित्यविश्वाने इतक्या जवळून आपलेसे केल्याचे हे उदाहरण अपवादात्मकच आहे.

आणखी एका बाबतीत त्यांचा मराठीतील वाङ्मयीन पर्यावरणाशी जवळून संबंध होता, तो म्हणजे अनुवादकार्याच्या निमित्ताने. तोही दुहेरी स्वरूपाचा. त्यांच्या कवितांचे मराठीत अनेक अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी ‘भूखण्ड तप रहा है’ व अन्य एका कवितासंग्रहाचा मराठीत अनुवाद केला आहे. चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचा फार जवळचा स्नेह होता. ‘प्रिय कविमित्र’ असा त्यांनी त्यांचा उल्लेख केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी देवताले यांचे साहित्य मराठीत पोहोचविण्याचे महत्त्वाचे सांस्कृतिक कार्य केले आहे. त्यांच्या दोन कवितासंग्रहांचा व एका संपादित गद्य ग्रंथाचा अनुवाद त्यांनी केला आहे. या अनुवादानिमित्ताने त्यांचा त्यांच्याशी अनेकदा संबंध आला. अनुवाद प्रक्रियेतील बारकावे आणि भाषांतरातील अंतरंगाचे भाव यासंबंधी त्यांच्यातील चर्चाही महत्त्वपूर्ण ठरली असावी. याबद्दलचा कृतज्ञतेने उल्लेख देवताले यांनी केला आहे. उभयंतांनी केलेले अनुवादकार्य हे दोन्ही भाषासंस्कृतीचे वैभव वाढविणारे आहे. चंद्रकांत बांदिवडेकर यांनी देवताले यांच्या कवितेचा परामर्ष घेणारा ‘कविता-स्वभाव’ या शीर्षकाचा ग्रंथ लिहिला आहे. सतीश काळसेकर, अनुराधा पाटील यांनीही त्यांच्या काही कवितांचे अनुवाद केले होते. त्यामुळे देवताले मराठी संस्कृतीचेच लेखक वाटत राहतात.

चंद्रकांत देवताले यांनी केलेले अनुवादकार्य हे सांस्कृतिकदृष्टय़ा तितकेच महत्त्वाचे आहे. दिलीप चित्रे यांच्या कवितांचा त्यांनी केलेला अनुवाद ‘पिसाटी का बुर्ज’ (१९८७) या नावाने प्रसिद्ध आहे. तसेच  ‘संत तुकाराम : कुछ चुने हुए अभंग’ (२०११) या नावाने तुकारामांच्या अभंगांचा त्यांचा अनुवाद प्रसिद्ध आहे. गंगाधर गाडगीळांच्या ‘बिनचेहऱ्याची संध्याकाळ’ या कथेचा त्यांनी िहदीत अनुवाद केला आहे. मराठी भक्तिसाहित्य हा त्यांचा एक सांस्कृतिक दुवा होता. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आदी संतांवर त्यांच्या कविता आहेत. अमृतानुभावातील अद्वैती तत्त्व आणि शक्तीच्या एकमेळी तत्त्वाचे त्यांना आकर्षण होते. एका कवितेत नामदेव आणि तुकाराम भेटायला येतात असा नाटय़संवाद आहे. ‘जनकवी, लोककवी’ असा तुकारामांचा ते उल्लेख करतात. देहू आणि इंद्रायणी नदीडोहास त्यांनी भेट दिली होती व त्यावेळी ते भारावून गेले होते. आजच्या अस्वस्थ वर्तमानाबद्दल तुकारामाचे शब्द त्यांना आधार वाटत. ‘पता नहीं, मं तुका या तुका मुझ में। पर आसमान तुका है। मं उस में उडा जैसे एक पतंग और डोर भी थी तुका ही के हाथों में।’ असे त्यांनी म्हटले आहे. २०१५ सालच्या त्यांच्या ‘खुद पर निगरानी का वक्त’ या संग्रहात स्मिता पाटील व एम. एफ. हुसेन अशा व्यक्तिविषयक दोन कविता आहेत. एम. एफ. हुसेन यांच्यावरील चरित्रात्मक संदर्भ देताना त्यात पंढरपूर आणि इंदौरचा उल्लेख आहे.

२०१४ च्या डिसेंबर महिन्यात त्यांच्याशी माझी भेट झाली होती. आधल्या रात्री त्यांनी उज्जनमध्ये माझ्या राहण्याची चौकशी केली होती. सकाळी मी लवकरच त्यांच्या भेटीला गेलो. त्यांच्या मुलीकडे शासकीय अध्यापक कॉलनीत ते राहत होते. हिरव्यागार झाडांचा, छोटय़ा छोटय़ा फुलवेलींचा तो प्रशस्त असा बंगला होता. फाटकातील एका झाडावर फांदीला ‘चंद्रकांत देवताले’ नावाची पाटी व घंटी लटकवलेली होती. फाटकाचा आवाज ऐकताच ते बाहेर आले आणि ओळखीच्या स्वरात त्यांनी माझे स्वागत केले. या काळात ते तुकारामांच्या अभंगांचा िहदीत अनुवाद करत होते. आणि पुरते ‘तुकाराममय’ झाले होते. अतिशय आत्मीयतेने त्यांनी स्वागत केले. बाईर्ंना ‘पोहा’ (पोहे) करायला सांगितले. प्रशस्त बंगल्यात हिरवीगार झाडे, भाजीचे वाफे, मुळा- वांग्यांची तरारलेली रोपे, पिवळ्याधम्मक िलबांनी लदबदलेले झाड, पेरू, छोटी छोटी फुलरोपे, हिरवेगार लॉन, पक्ष्यांना पिण्यासाठी भांडी ठेवलेली.. असे त्या घराचे चित्र होते. त्यांच्या एकून जीवनप्रवासाबद्दल, कवितानिर्मिती, सद्य:स्थिती आणि मराठी साहित्य-संस्कृतीविश्वाविषयीचे त्यांचे प्रेम या संवादचर्चेत आले होते. दोनेक तासानंतर ते मला बाहेर दूरवर पोचवायला आले होते. वाटेत सबंध डांबरी रस्त्यावर ठिकठिकाणी लिंबू आणि लाल मिरच्या दोरा बांधून पडल्या होत्या. त्यांनी सांगितले, याला ‘तोटका’ म्हणतात. या अंधश्रद्धेबद्दल खंतावल्या स्वरात ते बोलत होते. त्यांनी मला रिक्षात बसवले आणि हात उंचावून निरोप दिला. त्यांच्या या सद्भावाचा आणि मृदू स्वभावाच्या सुजनत्वाचा अनेकांना लाभ झालेला आहे. त्यामुळेच प्रदेश, काळ व वयाचे अंतर कापून निर्मळ जिव्हाळ्याच्या, ममत्वभावाच्या आंतरसंबंधाने ते इतरांशी स्वत:ला जोडून घेत. मत्रभाव व साहित्यातून त्यांचे दोन्ही संस्कृतींतले  पसरलेपण कोणालाही अप्रूप वाटावे असेच होते.

भारतीय पातळीवर कवितेतून नवी दृष्टी देणारा तसेच मराठी-िहदी सांस्कृतिक अनुबंधाचे ममत्व असणारा आणि गुंतागुंतीच्या समाजवास्तवाच्या बहुमुखी परी  तितक्याच समर्थ भाषेत सांगणारा हा कवी नव्या कालांतरणाबद्दल ‘गुंटर ग्रास को पत्र’ या कवितेत म्हणतो..

‘यहाँ डाकूओं के मरणोत्तर स्मारक।

हत्यारों के जीते जी अभिनंदन ।

पाखण्ड का रंगीन उत्सव ।

और भूख बेबसी के बारे में।

धूर्त चेहरों के बेशर्म उद्गार..।’

या भयसावलीचे स्मरण सतत करून देणारा हा कवी आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.

डॉ. रणधीर शिंदे randhirshinde76@gmail.com