प्रख्यात स्वीडिश चित्रपट दिग्दर्शक  इंगमार बर्गमन यांच्या जन्मशताब्दी वर्षांरंभानिमित्ताने खास लेख..

१९५०-७० ही दोन दशके म्हणजे कलात्मक चित्रपटांचा एक समृद्ध कालखंड. जुन्या पिढीतील इटालियन दिग्दर्शक रॉबटरे रोझोलिनी व नव्या पिढीचे फ्रेडरिको फेलिनी, मायकेल अँजेलो अ‍ॅन्टिनिओनी हे चित्रपटाला वेगळे, आशयघन परिमाण देत होते, तर फ्रान्सचे गोदार व फ्रान्स्वा त्रुफो आणि जपानचे अकिरा कुरोसावा, नागिया ओशिमा, यासुजिरो ओझू चित्रपटांची भाषा व आशयास वेगळे वळण देत होते. भारतीय दिग्दर्शक सत्यजित राय यांची दिग्दर्शकीय कारकीर्द बहरण्याचा हाच काळ. याच काळात स्वीडिश दिग्दर्शक इंगमार बर्गमन हेही आपल्या स्वयंभू प्रतिभेने झळकत होते. व्यक्ती, वस्तू आणि काळ यांमधील चौथी मिती दर्शविण्याची प्रज्ञा लाभलेल्या इंगमार बर्गमन यांची अलौकिक प्रतिभा रूपेरी पडद्याला व्यापून दशांगुळे उरणारी होती.

१४ जुलै १९१८ रोजी इंगमारचा जन्म झाला, तेव्हा त्याचे वडील उपसाला या स्टॉकहोमच्या उत्तरेकडील गावी धर्मगुरू म्हणून नोकरी करीत होते. इंगमार सहा वर्षांचा असताना ते स्टॉकहोमला परत आले. वयाच्या पाचव्या वर्षी ‘मॅजिक लॅटर्न’च्या प्रेमात पडलेल्या आणि नाटकांकडे आकर्षित झालेल्या इंगमारचे बालपण घरातील कर्मठ धार्मिक वातावरणामुळे पार कोमेजून गेले होते. आपली बालपणात झालेली मानसिक घुसमट इंगमार बर्गमन कधीही विसरू शकला नाही. आपल्याला कठोरपणे धर्माकडे वळविण्याच्या प्रयत्नांत असलेल्या वडिलांविषयीचा मनात साचून राहिलेला राग इंगमारने नंतर काही चित्रपटांतून सूचित केला आहे. नाही तरी ‘चित्रपटनिर्मिती म्हणजे आपल्याच भूतकाळात डोकावून बालपणात उडी घेण्यासारखे असते,’  असे इंगमार बर्गमनने म्हटलेले आहेच! वडील धर्मगुरू असूनही त्याने ख्रिश्चन धर्म आणि चर्चचा त्याग केला. त्याचा धर्मत्यागाचा हा निर्णय जसा बुद्धिवादी तसाच भावनिक कारणपरत्वे होता. वयाच्या १९ व्या वर्षी बुद्धिमान, संस्कारक्षम आणि स्वप्नाळू वृत्तीच्या इंगमारला प्रेमभंगाला आणि एका जवळच्या मित्राच्या मृत्यूच्या दारुण दु:खाला सामोरे जावे लागले. त्यामुळे तो उदास व कडवट मनोवृत्तीचा झाला आणि नास्तिक बनला. अर्थात तरीही त्याची ईश्वरविषयक जिज्ञासा काही कमी झाली नाही. ‘सेवन्थ सील’ (१९५६), ‘थ्रु ए ग्लास डार्कली’(१९६१) व  ‘विंटर लाइट’(१९६३) या बर्गमनच्या चित्रपटांतून त्याची ईश्वरविषयक जिज्ञासा प्रकर्षांने प्रकटली आहे. दुसरे असे, की त्याच्या चित्रपटांत एकलकोंडय़ा मनोवृत्तीचे आणि हरवलेल्या ‘त्या’ प्रेयसीचे प्रतिबिंब दिसून येते. आपल्या या कथित प्रेयसीला तो ‘मारी’ असे संबोधतो. इंगमारची पाच लग्ने आणि असंख्य प्रेमप्रकरणे झाली. त्यातल्या नेमक्या कोणत्या स्त्रीचे चित्रण तो आपल्या प्रत्येक चित्रपटात करीत असतो, याचा उलगडा आजतागायत होऊ शकलेला नाही. एकाकीपणा, प्रेमभंग आणि उदासी यांच्या साहचर्याने वाटचाल करणाऱ्या इंगमारने आपले शिक्षण संपल्यावर लष्करात नोकरी स्वीकारली. आणि ही नोकरी आपल्या स्वातंत्र्यावर आक्रमण करते आहे, हे लक्षात आल्यावर त्याने ती सोडूनही दिली. त्यावेळी इंगमार बर्गमन सर्वार्थाने एकाकी होता. याच सुमारास तो एका नाटक कंपनीत काम करू लागला. तिथे त्याचा परिचय एल्झी फिशर या कोरिओग्राफरशी झाला. नंतर या परिचयाचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी विवाह केला. त्यांचा संसार जेमतेम पाच वर्षेच काय तो टिकला; पण या काळात तिने इंगमारला चित्रपट व नाटक या माध्यमांसाठी लेखन करण्यास प्रेरित केले. नाही म्हणायला इंगमारने तसे त्याआधी थोडेफार लेखन केले होते; पण त्या होत्या लघुकथा. इंगमारने नाटके लिहिण्यास आणि ती दिग्दर्शित करण्यास सुरुवात केली. आरंभी त्यांनी स्ट्रिंडबर्ग या स्वीडिश नाटककाराची नाटके दिग्दर्शित केली. काही काळ त्यांनी स्टॉकहोममधील ‘रॉयल ड्रॅमॅटिक थिएटर’ या प्रख्यात नाटय़संस्थेत व्यवस्थापक म्हणूनही काम केले. १९४४ साली आल्फ जोबर्ग या दिग्दर्शकासाठी ‘टॉर्मेट’ या चित्रपटाची पटकथा लिहून बर्गमन यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. ‘क्रायसिस’ (१९४५) हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. या चित्रपटाला यश मिळाल्यावर बर्गमन यांचे ‘इट रेन्स ऑन अवर लव्ह’ (१९४६), ‘ए शिप बाऊंड फॉर इंडिया’ (१९४७), ‘नाईट इज माय फ्युचर’ (१९४८), ‘पोर्ट ऑफ कॉल’ (१९४९), ‘प्रिझन’ (१९४९) आणि ‘थर्स्ट’ (१९४९) हे चित्रपट आले. १९५० मध्ये पडद्यावर झळकलेल्या ‘समर इंटरल्यूड’द्वारे इंगमार बर्गमनला अभिजात दिग्दर्शक म्हणून मान्यता लाभली. ‘समर इंटरल्यूड’ ही एका बॅले नर्तिकेची कहाणी आहे. एके दिवशी ती रंगपटात बसली असता समोरच्या आरशात पाहताना ती भूतकाळात शिरते. पूर्वस्मृतितंत्राने हे कथानक सांगितले जाते. बारीकसारीक तपशिलांसह केलेले व्यक्तिरेखाटन हे या चित्रपटाचे वैशिष्टय़. ‘समर विथ मोनिका’ (१९५३), ‘स्माइल्स ऑफ ए समर नाइट’ (१९५५), ‘सॉडस्ट अँड टिनसेल’ (१९५६) या इंगमार बर्गमनच्या नंतरच्या चित्रपटांचेही ‘भूतकालाधीन आत्ममग्नता’ हेच वैशिष्टय़ होते.

‘वाइल्ड स्ट्रॉबेरीज’ (१९५७) या चित्रपटामुळे इंगमार बर्गमन यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली. अठ्ठय़ाहत्तर वर्षे वयाच्या इसाक बोर्ग या प्राध्यापकाने आपल्या भूतकाळात डोकावून पाहत गतायुष्याचा लावलेला अन्वयार्थ ही या चित्रपटाची सूत्रकल्पना. त्याच्या आयुष्यातील एका दिवसाचे चित्रण बर्गमनने बारीकसारीक तपशिलांनिशी या चित्रपटात केले आहे. प्रा. बोर्ग यांना त्या दिवशी पहाटेच जाग येते ती एका विचित्र स्वप्नमालिकेने. निर्मनुष्य रस्ता, काटे नसलेले घडय़ाळ, शवपेटिका घेऊन जाणारी रहस्यमय काळी बग्गी.. अशी ही मृत्यूविषयक सूचन करणारी स्वप्नमालिका. स्वत:च्या मृत्यूच्या प्रतिमा असलेले हे स्वप्न पाहून इसाक बोर्ग जागे होतात आणि भविष्यकालीन मरणसावल्यांनी आपल्या वर्तमानकाळावर आक्रमण करण्यास सुरुवात केली असल्याचे त्यांना जाणवते. आजचा दिवस त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण त्यांनी ज्या महाविद्यालयात दीर्घकाळ अध्यापन केले, तेथे त्यांचा सत्कार होणार आहे. इसाक बोर्ग आपल्या सूनबाईबरोबर मोटारीने समारंभस्थानी जाण्यास निघतात. ठिकठिकाणी थांबत केलेल्या या प्रवासात बोर्गला आपला भूतकाळ वर्तमानकालीन माणसांच्या रूपाने तसेच पूर्वस्मृतींशी निगडित असलेल्या स्थळांच्या रूपाने भेटतो. आठवणींचा प्रदेश तुडवत बोर्गचे भूतकाळातील एकेका प्रसंगात वावरणे यासाठी बर्गमनने वापरलेला आकृतिबंध चित्रभाषेला एक वेगळेच आशयसंपृक्त परिमाण प्राप्त करून देतो. बोर्गने डोळे मिटले की त्याचे अंतर्मनोपटल बालपण, तारुण्य, वैवाहिक जीवन आणि व्यावसायिक आयुष्य यांच्याशी संबद्ध असलेल्या स्वप्नप्रतिमांद्वारे उजळून निघते. शेवटी रात्री सत्कार समारंभ संपल्यावर इसाक बोर्ग घरी परत येतो तेव्हा आपल्या मुलाच्या, सुनेच्या आणि स्नेही-परिचितांच्या वागणुकीने सुखावलेला असतो. आणि त्याला वाटू लागते की, निसर्गात ठायी ठायी नजर टाकली तर सौंदर्याची एवढी उधळण चाललेली दिसून येते, तर या सौंदर्यस्रोतांचा उगम तो केवढा सुंदर असेल!’ बोर्गच्या आंतरिक भावविश्वाप्रमाणे वर्तमान व भूतकाळात मागेपुढे होणारी ही कथा आहे. एकाकीपणा, मृत्यूचे भय, असुरक्षितता यांपासून समष्टीलक्ष्यता, आश्वासकता आणि प्रसन्नता याकडे होणारा इसाक बोर्गचा हा आंतरिक प्रवास आहे. यातील ‘वाइल्ड स्ट्रॉबेरी’चे झुडूप म्हणजे प्रेमळ नातेवाईक व स्नेहीजनांच्या आस्थेने ओतप्रोत भरलेल्या इसाकच्या पौगंडावस्थेतील घराचे प्रतीक आहे. आशयघन प्रतीकात्मकता, भावनामयी व बुद्धिजन्य प्रतिमा, भूतकाळ व वर्तमानकाळाची सरमिसळ करून स्वप्नदृश्यांची केलेली रचना यामुळे हा चित्रपट आजही एक सर्वश्रेष्ठ चित्रकृती म्हणून ओळखला जातो.

‘दि डेव्हिल्स आय’ (१९६०) या विनोदी चित्रपटानंतर इंगमार बर्गमनचे चित्रपट अधिकाधिक गूढ-गंभीर होत गेले. ‘द व्हर्जिन स्प्रिंग’ (१९६१) हा चित्रपट स्वीडनमध्ये शतकानुशतके सांगितल्या गेलेल्या लोककथेवर आधारित होता. एका निष्पाप मुलीवर बलात्कार होतो आणि त्या मुलीचा बाप चुकून त्यांच्याच घरी आश्रयाला आलेल्या बलात्कार करणाऱ्या नराधमांना यमसदनी धाडतो. या साध्या-सरळ वाटणाऱ्या लोककथानकात बर्गमन निष्पाप आणि क्रूर, प्रेमळ आणि निर्दय, सुंदर आणि ओंगळ अशा परस्परविरोधी प्रतिमा एकासमोर एक अशा रीतीने मांडतो, की या चित्रपटाला एक विशाल परिप्रेक्ष्य प्राप्त होतो. ‘व्हर्जिन स्प्रिंग’नंतर बर्गमनने ‘थ्रू ए ग्लास डार्कली’ (१९६१), ‘विंटर लाइट’ (१९६२) आणि ‘सायलेन्स’ (१९६३) ही त्रिपदी सादर केली. ती ‘हिवाळी मालिका’ म्हणूनही ओळखली जाते. ईश्वरावर विश्वास नाही, बौद्धिक उपायांनी प्रश्न सुटत नाहीत, आणि जिव्हाळा तर कोठेच दिसत नाही- अशा निराशाजनक चक्रव्यूहात या व्यक्तिरेखा अपरिहार्यपणे अडकलेल्या आहेत. आणि तेथून त्यांची सुटका होत नाही. आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रकटीकरणाचे माध्यम म्हणून इंगमार बर्गमन चित्रपटांकडे पाहतात. सामाजिक संकल्पनांची रूढ चौकट नाकारून वास्तव जीवनाला थेट सामोरे जाणाऱ्या या व्यक्तिरेखांची नीती-अनीतीचा निर्णय करताना होणारी मानसिक घुसमट आणि त्यामुळे उद्ध्वस्ततेच्या सीमारेषेवर उभे असलेले त्यांचे भावविश्व याचे चित्रण ते अतिशय पारदर्शीपणे व समरसून करतात. धार्मिक व नैतिक संकल्पना, पुरुषप्रधान समाजव्यवस्था आणि अर्थमूलक जीवनप्रणाली यामुळे स्त्रियांची होणारी भावनिक घुसमट हा इंगमार बर्गमन यांच्या बहुतेक चित्रपटांचा विषय असल्याचे स्पष्टपणे जाणवते. या मानसिक संघर्षरत स्त्रियांचे  चित्रण बर्गमन यांनी अतिशय सहानुभूतीने केलेले आहे. त्यांनी ना कधी नीतीची बाजू घेतली, की अनीतीची! त्यामुळे शरीरसुखासाठी गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या त्यांच्या चित्रपटातील नायिका रूढ अर्थाने वाईट चालीच्या वाटत नाहीत. ‘पसरेना’ (नटाचा मुखवटा) या चित्रपटात इंगमार बर्गमन यांनी अतिशय गुंतागुंतीचा विषय हाताळला होता. एलिझाबेथ व्हॉग्लर (लिव उल्मन) ही अभिनेत्री  आत्यंतिक मानसिक ताणामुळे मूक होते. अनेक डॉक्टरांच्या उपचारांनंतरही तिची वाचा परत येत नाही. शेवटी मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार  एलिझाबेथची रवानगी एका परिचारिकेसमवेत (बिबी अँडरसन) एका निर्मनुष्य बेटावर करण्यात येते. दिवसाचे चोवीस तास त्या एकमेकींच्या सहवासात असतात. त्या अभिनेत्रीचे तोंड उघडावे, तिने काहीतरी बोलावे म्हणून ती परिचारिका बरेच प्रयत्न करते; पण ते सर्व व्यर्थ जातात. त्या दोघींमध्ये मृदू स्पर्श-संभाषणापासून उन्मादक आक्रस्ताळेपणापर्यंत अनेक प्रसंग घडतात. शेवटी परस्परांशी सर्वार्थाने घट्टपणे निगडित  झालेली ही व्यक्तिमत्त्वे  एकरूप होतात. अभिनेत्री आणि परिचारिका यांच्या चेहऱ्याचा अर्धा- अर्धा भाग जुळवून एक नवाच चेहरा बर्गमनने पडद्यावर साकारला आहे. ही केवळ दृश्यचमत्कृती नाही;  तर अनेक आशय सुचवणारी अर्थवाही प्रतिमा आहे. ‘पर्सोना’मध्ये बर्गमन प्रेक्षकाला कथानकातून बाहेर काढून हा चित्रपट असल्याची जाणीव करून देतो. ‘पसरेना’(१९६६) या चित्रपटाचे चित्रीकरण फॅरो या निर्मनुष्य, एकांतमय, निसर्गसौंदर्याचा पूर्णपणे अभाव असलेल्या आणि जेमतेम ४० चौ. कि. मी. क्षेत्रफळ असलेल्या बेटावर चालू असताना या चित्रपटात भूमिका करणारी नार्वेजिअन अभिनेत्री लिव उल्मन इंगमारच्या प्रेमात पडली आणि त्यांना संततीही झाली. त्यांचे संबंध पाच वर्षांनंतर कोणतीही कटुता न येता संपले. परस्परांतील प्रेमसंबंध संपल्यानंतरही लिव उल्मनने बर्गमनच्या ‘शेम’ (१९६८), ‘क्राइज अँड व्हिस्पर’ (१९७२), ‘सीन्स फ्रॉम मॅरेज’ (१९७३), ‘फेस टू फेस’ (१९७८) आणि ‘ऑटम सोनाटा’ (१९७८) या चित्रपटांतून भूमिका केल्या व ‘फेथलेस’ आणि ‘प्रायव्हेट कन्फेशन्स’ या बर्गमनच्या पटकथांवरील चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. पैकी ‘प्रायव्हेट कन्फेशन्स’मध्ये इंगमार बर्गमनने आपल्या आई- वडिलांच्या संसाराची कहाणी सांगितली आहे, तर ‘फेथलेस’मध्ये त्यांनी आपल्या व्यभिचारी वृत्तीविषयी खंत व्यक्त केलेली दिसते.

‘क्राइज अँड व्हिस्पर’ या चित्रपटाला निश्चित असे कथानक नाही. हा चित्रपट म्हणजे विविध भावनांचा गुच्छ आहे असे मत काही समीक्षक व्यक्त करतात. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या अ‍ॅग्नेस या अविवाहित मध्यमवयीन स्त्रीची ही कहाणी आहे.

‘ऑटम सोनाटा’ हा इंगमार बर्गमनचा अतिशय महत्त्वपूर्ण चित्रपट समजला जातो. महत्त्वपूर्ण  अशासाठी, की बर्गमनच्या दिग्दर्शनातील अभिजातता त्यात प्रकर्षांने प्रकटली आहे. १९७८ मध्ये पडद्यावर झळकलेल्या या चित्रपटात इनग्रिड बर्गमन, लिव उल्मन, लेना नायमन, हॉल्वर बिजॉर्क यांच्या भूमिका होत्या. ‘ऑटम सोनाटा’ ही जागतिक कीर्तीच्या शार्लट नावाच्या पियानोवादक स्त्रीची कथा आहे. आत्यंतिक आत्मकेंद्रित व्यक्तिमत्त्वाच्या या शार्लटला दोन मुली आहेत. पैकी थोरल्या मुलीने गावातील पाद्य््रााशी विवाह केला आहे, तर धाकटी अपंग आहे. स्वत:चे करिअर करण्यासाठी दीर्घकाळ घराबाहेर व आपल्या मुलींपासून दूर राहिलेली ही शार्लट नॉर्वेत परत येते आणि आपल्या मुलींना भेटते. या भेटीत त्यांच्या अंतर्मनातील परस्परविषयक भावनांचे सूक्ष्म पदर बर्गमनने थेट काव्याच्या पातळीवर जाऊन चित्रित केले आहेत. समीक्षकांनी बर्गमनला ‘रूपेरी पडद्याचा कवी’ म्हणून गौरवले ते या चित्रपटासाठीच! ‘ऑटम सोनाटा’तील भूमिकांसाठी इनग्रिड बर्गमन आणि लिव उल्मन  यांना ‘न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक अ‍ॅवॉर्ड’ मिळाले होते. तर इंगमार बर्गमनला इटलीच्या ‘डोनॅटेलो’ या सर्वात प्रतिष्ठेच्या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.

मृत्यूविषयक चिंतन हाही इंगमार बर्गमन यांच्या काही चित्रपटांचा विषय होता. साक्षात् मृत्यूशी बुद्धिबळ खेळणारा मध्ययुगीन सरदार ही चमत्कृतीजन्य प्रतिमा ‘द सेवन्थ सील’ला असलेले वैचारिकतेचे अंगभूत परिमाण गडद करीत जाते. ईश्वरी अस्तित्वाचा प्रामाणिक शोध घेणाऱ्या बर्गमनच्या ‘विंटर लाइट’, ‘थ्रू ए ग्लास डार्कली’, ‘सायलेन्स’ या चित्रपटांतून ईश्वरावरील श्रद्धेचा

अंत झाल्याचे सूचित होते आणि मग चित्रपटाची कथा पुढे सरकण्याऐवजी हे सूत्रच विस्तार पावते. त्यामुळे मर्यादित व्यक्तिरेखा आणि त्यांचा अवकाश यावरच इंगमार बर्गमन यांचे सर्व लक्ष केंद्रित होते आणि या व्यक्तिरेखांची मानसिकता हाच त्यांचा कथाविषय होतो. त्यामुळे चित्रपटाचे कथानक काय आहे, यापेक्षा बर्गमन ते कसे मांडतो, याकडेच प्रेक्षक लक्ष देतात.

आपल्याकडे सत्यजित राय यांनी भारतीय चित्रपट जसा जागतिक पातळीवर पोहोचवला, त्याप्रमाणे इंगमार बर्गमन यांनी स्वीडिश चित्रपट सर्वदूर नेला. ‘दि व्हर्जिन स्प्रिंग’, ‘थ्रू ए ग्लास डार्कली’ आणि ‘फॅनी अँड अलेक्झांडर’ या चित्रपटांना ऑस्कर पारितोषिके मिळाल्यावरही ते हॉलिवूडला गेले नव्हते. त्यांच्या आधीचे अनेक दिग्दर्शक, अभिनेते- अगदी गेट्रा गाबरेसह- हॉलिवूडला गेले, पण इंगमार बर्गमन मात्र एकांडय़ा शिलेदारप्रमाणे स्वीडनमध्येच चित्रपटनिर्मिती करीत राहिले. मॅक्स व्हॅन सिडो, लिव उल्मन, व्हिक्टर सीस्ट्रोम, बिबी अँडरसन या आपल्या तालमीतील कलाकारांसोबत, तसेच गुन्नार फिशर, स्वेन निक्विस्ट या छायाचित्रकारांच्या समवेत वर्षांनुवर्षे काम करून बर्गमनची कार्यप्रणाली बदलली नव्हती. आपल्या अभिनेत्यांकडून आत्मशोध भासणारा अभिनय करून घेणारा हा प्रतिभावंत आपले जवळजवळ संपूर्ण आयुष्यच स्वीडनमध्ये व्यतित करता झाला. जर्मनीमध्ये वास्तव्य करत असताना एका अमेरिकन कसरतपटूच्या जीवनावर आधारित त्यांनी ‘दि र्सपट एग’ (१९७१) हा चित्रपट केला. त्यानंतर ‘फ्रॉम दि लाइफ ऑफ मेरिओनट्स’ आणि ‘सीन्स फ्रॉम ए मॅरेज’ हे दोन चित्रपट करून ते मायभूमीला परतले आणि स्वीडिश फिल्म इन्स्टिटय़ूटसाठी त्यांनी ‘फनी अँड अलेक्झांडर’ हा चित्रपट तयार केला.

१९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फनी अँड अलेक्झांडर’नंतर मात्र इंगमार बर्गमन यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. आयुष्याचा बराच काळ चित्रपटांच्या प्रकाशझोतात व्यतित केल्यावर ते स्वीडनमधील एका लहानशा खेडय़ात वास्तव्याला आले आणि शांतपणे लेखन, वाचन करीत राहिले. या काळात त्यांनी काही नाटके लिहिली आणि दिग्दर्शितही केली. ‘एक वेळ मी चित्रपटांशिवाय जगू शकेन; नाटकांशिवाय नाही,’ असे त्यांनी म्हटले होतेच! पुन्हा म्हणून बर्गमन चित्रपटांकडे काही वळले नाहीत. ‘साराबंद’ (२००३) चा अपवाद वगळता! ३० जुलै २००७ रोजी त्यांचे निधन झाले. एकांत आणि वेदनेचा अवकाश आपल्या चित्रपटांतून व्यक्त करणारे इंगमार हे आपल्या आयुष्याच्या उत्तरायणात शांततेच्या  लांबलचक सावलीत तृप्तपणे उभे होते!