गायक, कवी, संगीतकार अशा विविध आघाडय़ा लीलया पेलणारे संगीतकार यशवंत देव नोव्हेंबरला वयाची नव्वदी पार करीत आहेत. मराठी चित्रपट भावसंगीताच्या प्रदीर्घ कालखंडाचे कर्तेधर्ते असलेल्या यशवंत देवांनी शब्दप्रधान गायकी रुजवली, वाढवली. त्यांच्या नव्वदीनिमित्ताने गायकसंगीतकार श्रीधर फडके यांनी यशवंतआठवणींना दिलेला उजाळा..

देवकाका हे अतिशय गुणी आणि प्रतिभावान संगीतकार आहेत. त्याचं कारण म्हणजे संगीतकाराला नेहमी काव्याची जाण असली पाहिजे असं मला वाटतं. काव्य संगीतकारासाठी फार महत्त्वाचं असतं. ते काव्य काय आहे, त्यातून कवीला काय सांगायचं आहे, हे त्यांना नेमकं समजलं पाहिजे. देवकाकांना हे सहज साध्य झालं आहे. शब्दप्रधान गायकी ही त्यांनी मराठी भावसंगीताला दिलेली देणगी आहे. त्यांची कुठलीही गाणी घ्या.. त्या गाण्यातील भाव योग्यरीत्या पकडणारा सुंदर स्वरसाज त्यांनी त्या गाण्याला चढवलेला आहे. आणि ते फोर महत्त्वाचं आहे. बाबूजींनीही (सुधीर फडके) त्यांच्यासाठी पाच-सहा गाणी गायली होती. त्या गाण्यांना देवकाकांनी जी चाल दिली आहे ती इतकी अप्रतिम आहे, की त्यातून त्यांनी अचूक त्या काव्यातला भाव पकडला आहे. शब्दांवरच्या प्रेमातून जन्माला आलेलं संगीत हे त्यांचं फार मोठं यश आहे असं मला वाटतं.

kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

देवकाकांनी माझ्याकडून खूप गाणी गाऊन घेतली आहेत. नऊएक गाणी त्यांनी माझ्याकडून गाऊन घेतली. मुळात ते गायकाला पहिल्यांदा गाणं सांगतात फार सुंदर. गाण्याचे जे शब्द आहेत ते कसे उच्चारायचे, यावर त्यांचा नेहमी भर असतो. बाबूजी गाण्यांमध्ये शब्दांचा उच्चार जसे करायचे, त्याच पद्धतीने आणि तितक्या ताकदीने शब्दांचे उच्चार कसे करावे, काय केलं म्हणजे शब्द नेमका प्रभावीपणे येईल, हे ते फार छान समजावून सांगत. त्यांनी माझ्याकडून ‘काही बोलायाचे आहे’ हे गाणं पहिल्यांदा गाऊन घेतलं. त्यावेळचा माझा अनुभव खूपच सुंदर आहे. हे गाणं कसं गाशील, असं त्यांनी विचारलं. बाबूजी जसं गाणं समजून-उमजून गातात, त्या पद्धतीने, त्या वळणाने तुझं गाणं आलं पाहिजे, असं देवकाकांनी मला सांगितलं. मुळात त्या गाण्याचा भावार्थ आधी समजून घे- म्हणजे आपोआप ते गाणं कसं गायचं, हे लक्षात येईल. त्यांनी सांगितल्याप्रमाणे बाबूजींच्या शैलीतच ते गाणं गाण्याचा मी प्रयत्न केला. ते स्वत: जातीने प्रत्येक गोष्ट समजून सांगतात. त्यामुळे आपला हुरूप वाढतो. गाणं कसं गायचं, असा विचारही मनात येत नाही. म्हणजे ‘काही बोलायाचे आहे’ हे गाणं गात असताना केवळ शब्दांवरच त्यांचा भर नव्हता, तर त्यातील भावानुसार, चढउतारांनुसार तुमचे हातही हलले पाहिजेत. बाबूजी गाणं गात असताना त्यातील स्वरांप्रमाणे त्यांचे हातवारे होत असायचे. माझ्याकडूनही त्या पद्धतीनेच गाणं सादर झालं पाहिजे, हा देवकाकांचा आग्रह होता. आणि मी जेव्हा पहिल्यांदा हे गाणं गायलं तेव्हा निश्चितच त्यांना आनंद झाला असणार. कारण मी गात असताना त्यांच्या डोळ्यांत एक चमक होती. त्यांच्या डोळ्यांतली ती चमकच मला खूप काही सांगून गेली.

यशवंत देवांनी जेव्हा संगीतकार म्हणून चित्रपटसृष्टीत काम सुरू केलं.. म्हणजे पन्नासच्या दशकात- त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला खूप मोठमोठे संगीतकार होते. मराठी चित्रपटसृष्टीत त्यावेळी वसंत पवार होते. राम कदम होते. स्वत: बाबूजी होते. श्रीनिवास खळेंसारखा प्रतिभावान संगीतकार होता. तर या प्रतिभावंतांच्या गर्दीतही यशवंत देव यांनी संगीतकार म्हणून आपलं स्थान निर्माण केलं, हे त्यांचं मोठंच यश आहे. कुठल्याही संगीतकाराने आपलं स्वत:चं असं स्थान, आपली शैली निर्माण केली पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. अमुक एकासारखं गाणं करणं, त्या पद्धतीचं गाणं करणं, यापेक्षा आपलं स्वत:चं संगीत देणं ही संगीतकाराची खरी कला आहे. देवकाकांनी आपली स्वत:ची शैली विकसित करून संगीतक्षेत्रात स्वत:चा आब निर्माण केला आहे. त्यांच्या कुठल्याही चाली घ्या.. ‘अशी पाखरे येती’ असेल. या गाण्याचे शब्दच इतके गोड आहेत! त्यानंतर ‘कधी बहर कधी शिशिर, परंतु दोन्ही एक बहाणे, डोळ्यांमधले आसू पुसती ओठावरले गाणे..’ याला त्यांनी नेमकी चाल लावली आहे. याच गाण्याच्या पहिल्या ओळीत ‘बहर धुंद वेलीवर यावा, हळूच लाजरा पक्षी गावा’ची हळुवार चाल आणि त्यानंतर येणारी ‘आणि अचानक गळून पडावी, विखरून सगळी पाने’ यात जो विरह येतो, हे दोन्ही त्यांनी इतकं छान व्यक्त केलेलं आहे. त्यांनी ही चाल कशी लावली असेल? एकाच गाण्याच्या पहिल्या ओळीत प्रेमभावना आहे आणि दुसऱ्या ओळीत विरह. एक संगीतकार म्हणून चाल बांधताना त्यांनी ही स्वरांची किमया कशी केली असेल, याचं मला सतत कुतूहल वाटत आलं आहे.

यशवंत देवांनी संगीत दिलेली गाणी आजही टिकून आहेत, हीच त्यांची खरी किमया होय. संगीतकार संगीत का निर्माण करतो? कवी कशासाठी गीत लिहितो? गायक ते कशासाठी गातो? याचं निखळ उत्तर म्हणजे- लोकांना आनंद देण्यासाठी ते हे सगळं करतात. केवळ ‘स्वान्त सुखाय’ हा विचार त्या निर्मितीमागे नसतो. त्या गाण्यांचा आनंद लोकांना आजही मिळतो आहे. लताबाईंचं एक गाणं आहे.. ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे..’ यमन रागातलं हे गाणं देवांनी इतकं सुंदररीत्या बांधलं आहे, की आजही ते ऐकल्यानंतर ‘व्वा!’ असा उद्गार आपसूक तोंडून निघतो. यशवंत देव यांनी संगीताच्या क्षेत्रात अढळ स्थान मिळवलं आहे. मराठी चित्रपट संगीताच्या इतिहासात यशवंत देव हे नाव मैलाचा दगड म्हणूनच लिहिलं जाईल. कालानुरूप संगीतात अनेक प्रवाह येत राहतील, बदल होत जातील. आत्ताच्या गाण्यांविषयी काही बोलताच येत नाही. पण यशवंत देवांनी संगीतबद्ध केलेली जी गाणी आहेत, ती आजही अवीट गोडीची आहेत. ‘तुझे गीत गाण्यासाठी.. सूर लावू दे रे..’ हे त्यांनीच संगीतबद्ध केलेल्या गाण्याचे शब्द मी त्यांनाच समर्पित करतो.