पहिल्या भारतीय महिला रसायनशास्त्रज्ञ असीमा चॅटर्जी यांच्या जन्मशताब्दी वर्षांची सांगता येत्या २३ सप्टेंबरला होत आहे. त्यानिमित्ताने या विज्ञानविदुषीच्या प्रचंड संशोधनात्मक कार्याचा परिचय करून देणारा लेख..

नव्याण्णव वर्षांपूर्वी भारतात जन्मलेली एक मुलगी रसायनशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेऊन ‘डॉक्टरेट इन सायन्स’ पदवी संपादन करते,अमेरिकेत जाऊन संशोधन करते, भारताचे नोबेल पारितोषिक समजले जाणारे शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक  मिळवते, भारतीय विज्ञान काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवते, राज्यसभेची खासदारकी तिच्याकडे चालून येते, ‘पद्मभूषण’ किताबाने ती सन्मानित होते.. अशी अविश्वसनीय वाटणारी कामगिरी करणाऱ्या या स्त्री-शास्त्रज्ञाच्या जन्मशताब्दी वर्षांची सांगता येत्या २३ सप्टेंबरला होत आहे.

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
peter higgs death marathi news, peter higgs god particle marathi news
‘देव कणा’चा सिद्धान्त मांडणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड… पीटर हिग्ज यांच्या ‘हिग्ज बोसॉन’ संशोधनाचे मोल काय?
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी

असीमा चॅटर्जी यांनी कोलकाता विद्यापीठातून रौप्य पदकासह सेंद्रिय रसायनशास्त्रातील एम. एस्सी. पदवी १९३८ साली संपादन केली व तेथूनच १९४४ साली त्या डी. एस्सी. झाल्या. ही पदवी मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या! पुढे कोलकाता विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून काम करत असतानाच १९४७ साली त्या संशोधनासाठी अमेरिकेला रवाना झाल्या. तेथे त्यांनी एल. एम. पार्कस्, एल्. झेक मैस्टर या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. तिथून त्या युरोपला गेल्या आणि झुरिक विद्यापीठातील १९३७ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ पॉल करीट यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संश्लेषणात्मक सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ (सिंथेटिक ऑरगॅनिक केमिस्ट्री) या विषयात संशोधन केले. १९५० मध्ये त्या भारतात परतल्या. भारतीय औषधी वनस्पतींवर त्यांनी विपुल संशोधन केले. वनस्पतींपासून मिळणाऱ्या अल्कालॉईड्स व कौमारीन्स या रासायनिक पदार्थाच्या संशोधनावर त्यांचा विशेष भर होता. सजीवांपासून वेगळे केले जाणाऱ्या रासायनिक पदार्थाना ‘नॅचरल प्रॉडक्ट्स’ (नैसर्गिक उत्पादने) असे म्हणतात. त्यांनी नॅचरल प्रॉडक्ट्सविषयी संशोधन केले. त्यासाठीच त्यांना ‘पहिल्या भारतीय महिला रसायनशास्त्रज्ञ’ असे संबोधले जाते.

भारत हा जैववैविध्याने समृद्ध देश आहे. त्यातील कित्येक वनस्पतींमध्ये औषधी द्रव्ये असतात. ही औषधी द्रव्ये वनस्पतींपासून मिळवणे व त्यांचा रासायनिकदृष्टय़ा अभ्यास करणे, त्यांची रचना शोधून काढणे, त्यांची प्रयोगशाळेत निर्मिती करणे या कामात त्यांनी स्वत:ल्ली वाहून घेतले. त्यांनी अज्मॅलीसिन व सर्पाजीन या रसायनांवर संशोधन करून त्यांची रचना स्पष्ट केली. जैसोसेहीझिन नावाचा रासायनिक पदार्थ ‘रोझ्या स्ट्रिक्टा’ असे शास्त्रीय नाव असलेल्या वनस्पतीपासून वेगळे करून त्याचे गुणधर्म शोधून काढले.

चॅटर्जी यांनी मिरगीव(फिट्स)विरुद्ध ‘आयुष-५६’ हे औषध ‘मार्सिलिया मिन्युटा’ या वनस्पतीशास्त्रीय नाव असलेल्या वनस्पतीपासून वेगळे केले. चार वनस्पतींपासून हिवतापविरोधी औषध मिळविले. या औषधांचे त्यांनी स्वामित्व हक्कही (पेटंट्स) मिळवले. अनेक औषध उत्पादक कंपन्यांनी ही औषधे बाजारात आणली. सुपारी, तंबाखू, कॉफी इ. अनेक वनस्पतींमध्ये आढळणारी ‘अल्कालॉईड्स’, सुगंधी द्रव्यांमध्ये, तसेच स्वादासाठी वापरली जाणारी रसायने (कौमरीन्स) व वनस्पतींपासून मिळणाऱ्या तैलवर्गीय पदार्थामध्ये आढळणारी टर्पिनॉईड्स यांवर त्यांनी विपुल संशोधन केले व सेंद्रिय रसायनशास्त्र व औषधी रसायनशास्त्रात मोलाची भर घातली. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून साडेतीनशेहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ५९ विद्यार्थ्यांनी पीएच. डी. पदवी संपादित केली. चॅटर्जी यांनी ‘भारतीय वनौषधी’ या ग्रंथाच्या सहा खंडांचे १९७३-१९७७ या काळात संपादन केले. ‘कौन्सिल ऑफ सायंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च’ने प्रकाशित केलेल्या ‘द ट्रिटाईज ऑफ इंडियन मेडिसिनल प्लॅन्ट्स’च्या सहा खंडांच्या त्या मुख्य संपादिका होत्या. यात ७०० औषधी वनस्पतींची माहिती आहे.

भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. १९७५ साली भारतीय विज्ञान काँग्रेसचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. असे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ होत.

विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळतानाच त्यांचे संशोधन व शैक्षणिक कार्यही अव्याहतपणे सुरू असे. भारतातील औषधी वनस्पतींवर अधिक संशोधन व्हावे व त्यातून आयुर्वेदिक औषधे निर्माण केली जावीत यासाठी ‘रिजनल रिसर्च सेंटर’ उभारण्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कोलकाताच्या सॉल्ट लेक भागात ‘सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदा अॅण्ड सिद्धा’ हे केंद्र त्यांच्या प्रयत्नांमुळेच उभारले गेले. कोलकाता विद्यापीठात त्यांनी विविध पदांवर काम केले. याच विद्यापीठात ‘खरा प्रोफेसर ऑफ केमिस्ट्री’ या सन्माननीय पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. हे पद त्यांनी १९८२ पर्यंत भूषविले. देशातील विज्ञान-तंत्रज्ञानाच्या विकासात विद्यापीठातील संशोधन खूप महत्त्वाचे असते, असे त्या म्हणत.

त्यांचे पीएच. डी.चे एक विद्यार्थी एस. सी. पक्राशी त्यांच्याविषयी म्हणतात, ‘पुरेशी साधने,  रसायने व आर्थिक निधीही नसलेल्या विद्यापीठातील प्रयोगशाळांत संशोधन करण्यासाठी ते खूप कठीण दिवस होते. संशोधक मार्गदर्शकास (रिसर्च गाईड) अनेक गोष्टींसाठी स्वत:ला खर्च करावा लागत असे. त्याकाळी त्यांना केवळ ३०० रुपये अनुदान मिळायचे. तेही वार्षिक!’

आयुष्यातील प्रत्येक क्षण संशोधन व अध्यापनात घालवलेल्या असीमा यांना अनेक पदव्या, सन्मान प्राप्त झाले. नागार्जुन पारितोषिक व सुवर्णपदक (१९४०), इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमीचे सदस्यत्व (१९६०), शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक (१९६१), सर पी. सी. रे. पारितोषिक (१९७४), हरी ओम ट्रस्टचे सर सी. व्ही. रामन पारितोषिक (१९८२), प्रो. पी. के. बोस पारितोषिक (१९८९), भारतीय विज्ञान काँग्रेसचे सर आशुतोष मुखर्जी स्मरणार्थ सुवर्णपदक हे त्यापैकी काही. बेंगाल चेंबर्स ऑफ कॉमर्सने ‘वूमन ऑफ द ईयर’ म्हणून १९७५ साली त्यांचा गौरव केला. भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ (१९७५) हा किताब प्रदान केला. १९८२ मध्ये त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली.

‘श्रम हीच पूजा’ मानणाऱ्या चॅटर्जी यांनी ४० वर्षांपूर्वी एका बंगाली नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत ‘जिवंत असेतो माझी काम करण्याची इच्छा आहे..’ अशा शब्दात आपला निर्धार व्यक्त केला होता. आणि त्याप्रमाणे त्या आयुष्याच्या अखेरच्या काही दिवसांपर्यंत प्रयोगशाळेत जात असत आणि संशोधन व मार्गदर्शन करीत असत. अशा या विज्ञानविदुषीने २३ नोव्हेंबर २००६ रोजी जगाचा निरोप घेतला.

शहाजी मोरे

shahajibmore1964@gmail.com