News Flash

हृद्य कथामालिका

जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे शहर आणि खेडं हा भेद गेल्या काही दशकांपासून पुसट होत चाललेला आहे.

जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे शहर आणि खेडं हा भेद गेल्या काही दशकांपासून पुसट होत चाललेला आहे. दोन्हीकडचे लोक आपापली अंगभूत गुणवैशिष्टय़ं सोडून मुक्काम माहीत नसलेल्या कुठल्यातरी अनाम वाटेवर वेडय़ासारखे धावताहेत. या धावपळीत शहरातील गर्दी, गोंगाट, असुरक्षितता, अस्वच्छता आणि अस्वस्थता वाढली आहे. आधुनिकतेच्या हौसेपायी बहुतेक खेडी आपलं नैसर्गिक सुभग रूप मागे टाकून बकालपणाकडे झुकू लागलेली दिसताहेत. देशातले नैसर्गिकदृष्टय़ा समृद्ध असणारे अनेक प्रदेश निसर्ग पर्यटनाच्या वाढत्या रेटय़ामुळे धोक्यात आले आहेत. एकूणात सगळ्याच जगण्यावर बाजारीकरणाचा निष्ठुर वरवंटा सरसकट फिरतो आहे. या कोलाहलात मनाला आश्वस्त करणारं, रोजच्या चाकोरीवरचा गंज पुसून टाकून जगण्याचा नितळ पारदर्शी चेहरा दाखवणारं जे दुर्मीळ लेखन होत असतं त्यात रस्किन बॉण्ड यांच्या लेखनाचा समावेश करावा लागेल. आणि आता त्यांचं हे लेखन मराठीतही आलं आहे. त्यांच्या विविध कथांमधून ३९ कथा निवडून रोहन प्रकाशननं खास कुमारवर्गासाठी सहा पुस्तकांच्या मालिकेत त्या संग्रहित केल्या आहेत. रस्किन बॉण्ड यांच्या भावस्पर्शी आणि रोमांचक कथांचा हा गुलदस्ता नीलिमा भावे आणि रमा हर्डीकर- सखदेव यांनी मराठीत आणला आहे. ‘बोगद्यातला वाघ आणि इतर पाच कथा’, ‘चेरीचं झाड आणि इतर सात कथा’, ‘शहामृगाच्या तावडीत आणि इतर सहा कथा’, ‘जावाहून सुटका आणि इतर सात कथा’, ‘वावटळ आणि इतर सात कथा’, ‘टेकडय़ांच्या पलीकडे आणि मेहमूदचा पतंग’ अशी ही सहा पुस्तकांची मालिका आहे. ही मालिका कुमारांसाठी प्रकाशित झाली असली तरी ती मोठय़ांनाही खिळवून ठेवणारी आहे, हे इथं आवर्जून सांगायला हवं.

रस्किन बॉण्ड हे जगभर गाजलेले अँग्लो इंडियन लेखक. ते लहानाचे मोठे झाले ते डेहराडूनमध्ये. हिमालयातला समृद्ध, अम्लान निसर्ग त्यांनी नुसता पाहिला, अनुभवला नाही, तर तो त्यांच्या श्वासात, त्यांच्या रक्तात मिसळला. त्यांच्या जाणिवांमध्ये उमटलेली या निसर्गाची प्रतिबिंबंच कथारूप घेऊन पुढे कागदावर उतरली आहेत. या कथांमध्ये थरार आणि भय आहे, उत्कंठा आणि साहस आहे, प्रेम आणि मत्री आहे, रहस्य आणि कारुण्यही आहे.

या कथा तशा काल्पनिक नाहीत. हिमालयातल्या निसर्गाशी घट्ट बांधलेल्या रस्किन यांच्या आयुष्याचा प्रवाह हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांसारखा खळाळत असल्याचं आपल्याला या कथा वाचताना जाणवत राहतं. ते स्वत:, त्यांचे आजी-आजोबा, आई-वडील, मित्रमंडळी, शेजारी, पाहुणे, गावातले दुकानदार, टांगेवाले हे सगळे तर या कथांमधून आपल्याला भेटत राहतातच; पण याखेरीज हिमालयातली रसरशीत जंगलं, नाना तऱ्हेचे प्राणी-पक्षी, झाडं, फुलं, झरे, नद्या या सगळ्या गोष्टीही या कथांमध्ये रस्किन बॉण्ड यांच्या प्रातिभ स्पर्शानं माणसांइतक्याच जिवंत झालेल्या दिसतात. रस्किन यांची लेखनशैली वाचकांना त्यांच्या भोवतीच्या वास्तवाचं भान विसरायला लावणारी आहे. ती तुमच्या डोळ्यांसमोर नुसती चित्रं उभी करत नाही, तर ती तुमचं बोट धरून थेट तुम्हाला त्या प्रदेशात, त्या परिसरात घेऊन जाते. दृक्श्राव्य अनुभवांच्या बरोबरीने तुमच्या ऐंद्रिय जाणिवा जाग्या करणाऱ्या या कथा आहेत. ‘सीता आणि नदी’सारख्या कथेत तुम्ही आजी-आजोबांसोबत एका लहान बेटावर राहणाऱ्या लहानग्या सीतेसोबत नदीची माया आणि तिचा रौद्रावतार अनुभवता. ‘मांजराचे डोळे’मध्ये चांदण्या रात्रीचा गूढ थरार तुम्हाला श्वास रोखायला लावतो. ‘टेकडय़ांच्या पलीकडे’मध्ये गळ्यात किणकिणणाऱ्या घंटा बांधलेल्या मेंढय़ा जशा मुक्त हिंडतात, तसे तुम्ही किशन आणि सोमीसोबत शिवालिक टेकडय़ांची सुंदर सफर करता. ‘कावळोबांचे कारनामे’ वाचताना तुम्ही कावळ्याच्या नजरेतून स्वत:कडे बघायला शिकता. ‘तो किपलिंग होता’मध्ये तुम्ही किपलिंगच्या शेजारी बसून त्याच्या लेखनाच्या आठवणीत रमून जाता. ‘चेरीचं झाड’मध्ये राकेशसारखे आपणही शेतातल्या चेरीच्या झाडासोबत इंचाइंचाने मोठे होत जातो. ‘जावाहून सुटका’मध्ये आपण रस्किन आणि त्याच्या बाबांसोबत जीव मुठीत धरून डिंगीच्या आधारानं समुद्रातला थरारक प्रवास करतो. ‘खिडकी’सारख्या कथेत आपण आंब्याच्या आणि वडाच्या झाडावरच्या पाखरांचे दोस्त होऊन जातो.

खरं तर या सगळ्या कथांमध्ये आपणच असतो फुसंडून वाहणारी नदी, आपणच असतो वसंताची चाहूल लागताक्षणी आकाशात उडणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांच्या माळेतला एक पक्षी, नाना कीटकांना आणि पक्ष्यांना अंगाखांद्यावर खेळवणारं घरासमोरचं वडाचं झाड आपण असतो; आणि चवताळलेल्या अस्वलीपासून रामूला वाचवणारा वाघही आपणच असतो. कथेतल्या व्यक्तिरेखांपासून, त्या परिसरापासून आपण स्वत:ला अलिप्त ठेवूच शकत नाही, इतकी या कथांची आणि कथनाची विलक्षण ताकद आहे. निसर्गाच्या श्वासात आपला श्वास मिसळून टाकणाऱ्या अतिशय संवेदनशील माणसाची जबरदस्त निरीक्षणशक्ती, माणूस म्हणून असलेला त्याचा निरतिशय साधेपणा, जगण्याच्या गाभ्याशी पोचलेल्या लेखकाची अलौकिक प्रतिभा या सगळ्याचा कथा वाचताना येणारा प्रत्यय मनातले कोलाहल शमविणारा तर आहेच; पण तो आपल्या आतल्या अनेक परिचित-अपरिचित ऊर्मीना साद घालणाराही आहे.

मुख्यत: हिमालयातलं लोकजीवन, श्रद्धा-समजुती, तिथली ऋतुचित्रं या सगळ्याचं नितांतसुंदर दर्शन घडविणाऱ्या या सगळ्या कथा आहेत. आपल्या प्रदेशाची अत्यंत उत्कट ओढ आणि त्या मातीचा धपापणारा श्वास, क्षणार्धात प्रचंड उलथापालथ घडवणारा निसर्ग आणि निसर्गाच्या या उग्र रूपाला सामोरं जाण्याचा माणसाचा दुर्दम्य आत्मविश्वास, कधीतरी भयानक घेरून येणारं एकटेपण आणि माणसामाणसांमधले फार फार लोभस असे निर्हेतुक बंध अशा अनेकरंगी धाग्यांची वीण या कथांनी गुंफली आहे. रस्किन बॉण्ड यांच्या मूळ कथांमधले हे रंग-गंध अनुवादातही तेवढय़ाच अस्सलतेनं उतरले आहेत. या पुस्तकमालिकेचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या चित्रांनी रस्किन बॉण्ड यांच्या शब्दांना अतिशय देखणी सोबत दिली आहे. रस्किन यांच्या कथांमधले सगळे भाव या चित्रांमध्ये जिवंत झाले आहेत. एकूणच आशय आणि निर्मिती या दोन्ही अंगांनी समृद्ध अशी ही रस्किन बॉण्ड मालिका लहान-मोठय़ा सगळ्यांनी आवर्जून वाचावी अशी आहे.

‘रस्किन बॉण्ड यांच्या भावस्पर्शी व रोमांचक कथांचा गुलदस्ता- सहा पुस्तकांचा संच’

अनुवाद- नीलिमा भावे आणि रमा हर्डीकर-सखदेव

रोहन प्रकाशन, पुणे, पृष्ठे- ६८४, मूल्य- ९०० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2017 3:03 am

Web Title: articles in marathi on books of ruskin bond
Next Stories
1 अनुभवाचा हिरवा लसलसता कोंभ
2 दुर्लक्षित विषयाचा समीक्षावेध
3 ‘गोवा हिंदू’चा श्वास
Just Now!
X