11 December 2017

News Flash

‘हिंदू स्वराज’चा साक्षेपी अनुवाद

‘हिंद स्वराज्य’ हे १९०९ मध्ये म. गांधींनी मूळ गुजरातीत लिहिलेले चिंतनात्मक पुस्तक.

लोकसत्ता टीम | Updated: October 1, 2017 2:46 AM

‘हिंद स्वराज्य’ हे १९०९ मध्ये म. गांधींनी मूळ गुजरातीत लिहिलेले चिंतनात्मक पुस्तक. त्याचा ‘इंडियन होम रूल’ हा इंग्रजी अनुवाद स्वत: गांधींनी १९१० मध्ये केला. मात्र या गुजराती व इंग्रजी आवृत्तींमधून दिसणारे गांधी हे वेगळे भासतात. ते कसे व का, याचा वेध घेत गांधीविचारांचे ज्येष्ठ अभ्यासक रामदास भटकळ यांनी या पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद पॉप्युलर प्रकाशनातर्फे उद्या- २ ऑक्टोबर रोजी प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने, या पुस्तकाला त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा संपादित अंश..

गांधीविचारांचा अभ्यास करणाऱ्याला ‘हिंद स्वराज’ या पुस्तकाची पारायणे केल्याशिवाय गत्यंतर नाही. तो काही धर्मग्रंथ नाही, पण एखादी उत्कृष्ट साहित्यकृती जशी दर वाचनात वेगळी भासते, त्याचप्रमाणे हे लहानसे चिंतनात्मक पुस्तक दर वाचनात नवीन विचारांना चालना देते म्हणून. मूळ गुजराती शीर्षकात ‘स्वराज्य’ शब्द वापरला असला, तरी गांधींनी जाणीवपूर्वक इंग्रजी आवृत्त्यांमध्ये ‘स्वराज’ शब्द वापरला आहे. ‘हिंद स्वराज’चे मूळ लेखन गांधींनी नोव्हेंबर १३ ते २२ दरम्यान इंग्लंडहून दक्षिण आफ्रिकेला येणाऱ्या ‘किल्डोनन कासल’ या आगबोटीवर गुजरातीत केले. ते डिसेंबर १९०९ मध्ये ‘इंडियन ओपिनियन’च्या दोन अंकांत प्रसिद्ध झाले. लगेच १९१० च्या जानेवारीत पुस्तकाची पहिली आवृत्ती दक्षिण आफ्रिकेतून इंटरनॅशनल प्रेसतर्फे प्रसिद्ध झाली. हिंदुस्थानातील मुंबई इलाख्याच्या शासनाने १३ मार्च १९१० ला प्रती जप्त केल्याची बातमी आली. गांधींनी स्वत: केलेल्या इंग्रजी अनुवादाचे पुस्तक घाईघाईत २० मार्च १९१० रोजी प्रसिद्ध करण्यात आले ते त्यामुळेच. १९१५ मध्ये गांधी हिंदुस्थानात परत आल्यावर हे इंग्रजी पुस्तक त्याच्या पहिल्या प्रकाशनानंतर दहा वर्षांनी, म्हणजे १९१९ मध्ये हिंदुस्थानात प्रथम प्रसिद्ध झाले. किंबहुना या बंदी घातल्या गेलेल्या पुस्तकाचे प्रकाशन आणि विक्री हा गांधींच्या ‘सविनय प्रतिकारा’चा भाग होता. १९२१ साली गांधींनी ‘यंग इंडिया’ पत्रिकेचे संपादकीय लिहिताना या पुस्तकाला ‘हिंद स्वराज ऑर इंडियन होम रूल’ असे नाव दिले. १९२१ मध्ये त्याच्या इतर आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आणि १९२४ मध्ये ते अमेरिकेतून ‘सर्मन ऑन द सी’ या नावाने हरिदास मजुमदार यांनी प्रसिद्ध केले. या पुस्तकाची सुधारलेली आवृत्ती १९३८ साली प्रसिद्ध झाली. त्याच वर्षी बदललेल्या राजकीय परिस्थितीत या पुस्तकावरील हिंदुस्थानातील बंदी उठवण्यात आली.

मी ‘हिंद स्वराज’ हे पुस्तक प्रामुख्याने इंग्रजीतून, तर अधूनमधून मूळ गुजरातीतून किंवा त्याच्या मराठी अनुवादातून वाचत आलो. हळूहळू त्या तीन भाषांतील वाचनांतून वेगवेगळा ध्वनी यायला लागला. तो का याचा शोध घ्यायला लागलो, तेव्हा सर्वप्रथम भेद जाणवला तो काही महत्त्वाच्या शब्दांच्या संदर्भात. मूळ गुजराती ‘हिंद स्वराज’मध्ये लेखकाने ‘सुधारो’ या शीर्षकाचे एक महत्त्वाचे प्रकरण लिहिले आहे आणि इंग्लंडमधील आणि हिंदुस्थानातील ‘सुधारो’ची चर्चा केली आहे. त्याऐवजी ‘इंडियन होम रूल’मध्ये इंग्रजीत ‘सिव्हिलायझेशन’ असा शब्द वापरला आहे. मराठी अनुवादात मुळात ‘सुधारणा’ हा शब्द होता. ‘सिव्हिलायझेशन’चा प्रतिशब्द ‘सुधारणा’ हे स्वीकारायला मी तयार नव्हतो. मग इंग्रजी-गुजराती शब्दकोशाचा आधार घेतला. एका कोशात ‘सिव्हिलायझेशन’चा अर्थ ‘सुधारो’ आणि त्याच प्रकाशकाच्या गुजराती-इंग्रजी कोशात ‘सुधारो’चा अर्थ ‘सिव्हिलायझेशन’ असा सापडला. परंतु इतर दोन शब्दकोशांत ‘सिव्हिलायझेशन’चे अर्थ ‘संस्कृती’, ‘सुधारेली स्थिति, ‘सुशिक्षितावस्था’ आणि ‘सुधारेली स्थिति के संस्कृति, सर्वे सुधारेलो देशो, संस्कारिता, राष्ट्रीय संस्कृति, ऊन्नती, ऊत्कर्ष’ असे दाखवले आहेत. इंग्रजी-मराठी कोशात ‘सिव्हिलायझेशन’चा अर्थ ‘सुधारणा’ असा कुठेच आढळेना. त्यातून गेल्या वीसेक वर्षांत भारतातील आर्थिक धोरणांच्या संदर्भात ‘सुधारणा’ या शब्दाला राजकीय कारणांसाठी विशिष्ट अर्थ प्राप्त झाला आहे, त्यामुळे या गोंधळात अधिक भर पडली.

‘सिव्हिलायझेशन’ आणि ‘सुधारो’ हे प्रकरण सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्हे निर्माण करीत असावे. मोहनदास गांधी आणि त्यांचे चुलतबंधू जमनादास गांधी यांच्या पत्रव्यवहारात हा प्रश्न उपस्थित झाला आहे. २८ ऑगस्ट १९११ च्या पत्रात गांधी लिहितात : ‘‘सिव्हिलायझेशन’ला जर योग्य गुजराती शब्द वापरायचा असेल, तर त्याचा अर्थ ‘सारी रहेणी’(चांगली राहणी) हा आहे. आणि माझा भावार्थ तोच आहे. Gujarati equivalent for civilization is ‘सुधारो’, हे वाक्य बरोबर आहे, पण मला ते सांगायचे नाही. Gujarati equivalent is good conduct या वाक्यातील बाकीचे संदर्भ बाजूला ठेवले, तरी गांधींना ‘सुधारो’च्या ऐवजी वेगळाच भाव सुचवायचा होता, असे दिसते. हा गुंता सोडवण्याची आवश्यकता ही माझ्या अनुवादामागची प्रमुख प्रेरणा आहे. या दिशेने शोध घेण्याची सुरुवात झाली ती या एका शब्दावरून. पुढे गुजराती ‘दारूगोळो’चा इंग्रजी पर्याय ‘ब्रूट फोर्स’ (मराठी : शस्त्रबळ), ‘सत्याग्रहा’चा इंग्रजी पर्याय ‘सोल फोर्स’ (मराठी : सत्याग्रह-आत्मबळ) अशी इतर प्रश्नचिन्हे दिसू लागली. मूळ गुजरातीत लेखक ‘प्रजा’ शब्द वापरतो, तर इंग्रजीत ‘नेशन’. अशी उदाहरणे वाढू लागली आणि मग या पुस्तकाच्या बहुभाषी पारायणांत भर पडू लागली. गांधींनी पुढे आपल्या इंग्रजी अनुवादात फारसा काही बदल केला नाही. १९३८-३९ साली महादेव देसाई यांनी प्रसिद्ध केलेल्या सुधारित आवृत्तीत केलेले फरक किरकोळ आहेत. त्याचा संदर्भ गुजराती आणि इंग्रजी संहितेतील महत्त्वाच्या मूलभूत स्वरूपाच्या शाब्दिक फरकांशी नाही हे लक्षात घेता, गुजराती-इंग्रजीतील फरक हे फक्त शाब्दिक नसून जाणीवपूर्वक आहेत असे मानण्यास हरकत वाटली नाही.

हे असे का झाले असावे, याचा विचार करताना काही शक्यता उघडउघड दिसल्या. मूळ गुजराती लेखन इंग्लंडहून दक्षिण आफ्रिकेला परतताना झाले. तेव्हा इंग्लंडमध्ये इंडिया हाउस या श्यामजी कृष्णवर्मा यांच्या वास्तूतील क्रांतिकारी, त्यांचे हिंदुस्थानातील भाईबंद आणि एकूणच तरुण पिढीला सशस्त्र लढय़ाचे वाटणारे आकर्षण यांमुळे गांधी उद्विग्न मनस्थितीत होते. त्यांनी आपल्या मनातील खळबळीला वाट करून देण्यासाठी ही पुस्तिका लिहून काढली. त्यांच्यापुढे वाचकवर्ग हा गुजराती जाणणारा होता, तोही प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेतला. हे विचार त्यांना अस्वस्थ करून शांत राहू देईनात, असे गांधींनी सांगितले आहे. उबळ आल्यावर मातृभाषेतून लिहिणे हे साहजिकच होते. ‘हिंद स्वराज्य’ लिहिल्यानंतर इंग्रजी अनुवाद करण्यापूर्वी काही काळ गेला होता. मनातली खळबळ संपवून शीतमनस्क व्हायला तो वेळ पुरेसा होता. हे पुस्तक इतरांनीही वाचावे असे त्यांना वाटत होते. त्यांचे परमस्नेही हरमान कॅलनबाख यांना त्यांनी इंग्रजी रूपांतर तोंडी सांगितले; कॅलनबाख यांनी लिहून घेताना ते मूळ गुजरातीशी ताडून पाहण्याची फारशी शक्यता नव्हती. परंतु इंग्रजी शब्दयोजनेत त्यांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच लेखकासमोर वाचक म्हणून प्रामुख्याने इंग्लंडमधील त्यांचे स्नेही, समर्थक आणि विरोधकदेखील होते. इंग्रजी आवृत्तीच्या प्रस्तावनेत लेखकाने इंग्रजी आवृत्तीचा वाचक वेगळा आहे ही जाणीव स्पष्ट केली.

गुजराती आणि इंग्रजी संहितांचे वाचन करताना आणखी एक गोष्ट लक्षात आली. हा फरक अशा काही महत्त्वाच्या शब्दांच्या वापरात आहे, की ज्यामुळे एकूण चच्रेचा स्तर हा तत्कालीन संदर्भ पार करून वैश्विक पातळीवर जाऊ शकतो. उदाहरणार्थ, ‘दारूगोळा विरुद्ध सत्याग्रह’ या द्वंद्वापेक्षा ‘पाशवी बळ आणि आत्मबळ’ यांतील द्वंद्व हे सार्वकालिक आणि सर्वदेशीय होते. परंतु हा फरक फक्त तेवढाच नाही. एकूणच गांधींचे गुजराती लेखन हे खूपसे बोली भाषेत आहे. त्यात तत्कालीन गुजराती वाक्प्रचारांचा मुबलक उपयोग केला आहे. इंग्रजी लेखन हे खूपसे बौद्धिक पातळीवरील प्रबंधाच्या शैलीत मांडलेले आहे. त्यामुळे गांधीविचारांचा अभ्यास न झालेल्या इंग्रजी आणि गुजराती या दोन्ही भाषा जाणणाऱ्या वाचकाने या दोन भाषांतील संहिता स्वतंत्रपणे वाचल्या, तर त्याच्या प्रतिक्रिया काहीशा वेगळ्या होण्याची शक्यता आहे.

First Published on October 1, 2017 2:46 am

Web Title: articles in marathi on hind swaraj mahatma gandhi book