07 March 2021

News Flash

.. पुन्हा उभा राहीन!

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून शिक्षण घेऊन मी पस्तीस वर्षांपूर्वी नगरला परत आलो.

गेली साडेतीन दशके कष्ट करून जे जमवले, ते संचित डोळय़ांदेखत अग्नितांडवाच्या भक्ष्यस्थानी पडताना होणाऱ्या वेदना शब्दातीत आहेत. या काळात मी जे जे काही जमवले, त्याचा मला फार मोठा अभिमान असायचा. कलाकार म्हणून मी जे काही करत आलो, त्यात माझा सारा जीव अडकलेला असायचा. एखादी मोठी शिल्पकृती तयार झाली, की नंतरच्या काळात पुन्हा कधीतरी लागेल, म्हणून मी त्या शिल्पाचे साचे (मोल्डस्) तयार करून ठेवायचो. असे अगणित साचे माझ्या स्टुडिओत होते. प्रत्येक कृती ही माझ्यासाठी माझ्या मनाचे एक स्पष्ट रूप असे. जिथे जिथे माझ्या कलाकृती पोहोचल्या आहेत, तिथे तिथे माझे मनही पोहोचलेले असते. कलावंत म्हणून आपण जे काही करतो त्याची अशी राख होणे, ही माझ्यासाठी दु:खकारक आणि क्लेशदायक घटना होती. माणूस म्हणून आपण मेंदूच्या साहाय्याने जे काही घडवतो, ते असे क्षणार्धात नष्ट होणे, ही हतबलता मला अधिक चिंतावून गेली.

..पण मी हरणार नाही, पुन्हा उभा राहीन!

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून शिक्षण घेऊन मी पस्तीस वर्षांपूर्वी नगरला परत आलो. जन्मभूमी असल्याने नगरची ओढ होतीच; त्याचबरोबर नगरमध्ये कलाविषयक आवड निर्माण व्हावी ही इच्छा होती. नोकरी न करता कलेवरच पोट भरावे हे ठरवले होते.

यासाठी कष्ट घ्यावे लागले. काही लोकांनी गैरफायदाही घेतला. परंतु हळूहळू मान्यता मिळू लागली. कलाप्रेमी वर्ग नगरमध्ये तयार झाला. नगरप्रमाणे नगरबाहेरही कामे मिळू लागली. नानाजी देशमुखांच्या चित्रकूटमधील ‘नन्ही दुनिया’साठी बनवलेले प्राणी माझी ओळख ठरली. तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी त्याचे कौतुक केले. साईबाबांच्या मूर्ती शिर्डीतच नव्हे तर परदेशातही गेल्या. वेगवेगळय़ा कला विद्यालयांमध्ये व्याख्याने तसेच प्रात्यक्षिके झाली. यातूनच युरोप आणि अमेरिकेत कला सादर करायची संधी मिळाली. व्यक्तिचित्रण हा माझा हातखंडा. भारतातील एकमेव व्यक्तिचित्रण स्पर्धा नगरमध्ये सुरू झाली.

कलात्मक गोष्टी जमवणे आणि कलाविषयक पुस्तकांचा संग्रह करणे हा माझा छंदच. संपूर्ण भारतात फिरत असताना तसेच परदेशातूनही अशा दुर्मिळ वस्तूंचा आणि पुस्तकांचा मोठा साठा माझ्याकडे जमा झाला. याचबरोबर काढलेली चित्रे आणि केलेल्या शिल्पांच्या प्रतिकृती यामुळे माझ्या स्टुडिओला एका म्युझियमचे स्वरूप प्राप्त झाले. केलेल्या शिल्पांचे अनेक साचे मी जपून ठेवले आहेत. या सर्वासाठी सध्याच्या मोठय़ा जागेत माझा स्टुडिओ होता. अक्षरधाम, भोपाळ, चित्रकूट, शिर्डी येथील मोठय़ा कामांमुळे सध्या अनेक मोठय़ा कामांचे प्रस्ताव आलेले आहेत. नगरमध्ये पर्यटनवाढीसाठी खूप काम करायचे मनात आहे. या सर्व भविष्यातील कामांची स्वप्ने रविवारच्या अग्नितांडवामुळे उद्ध्वस्त झाली. सर्व साचे, जमवलेल्या वस्तू, शिल्पे, चित्रे, पुस्तके यांची राखरांगोळी झाली. डोळय़ांदेखत सर्व संचिताचा नाश होत आहे, हे पाहणे नशिबात आले. समोर हे तांडव चालू आहे आणि आपण काहीच करू शकत नाही, अशी हतबलता निर्माण झाली. त्या वेळी मन इतके बधिर झाले, की काही सुचेना आणि मग या घटनेची भीषणता जाणवायला लागली. पुनश्च हरि ओम करावे लागणार याची जाणीव झाली.

या घटनेची तीव्रता थोडी कमी झाली ती कुटुंबीय, मित्रमंडळी आणि हितचिंतकांनी दिलेल्या पाठिंब्याने व दाखवलेल्या सहानुभूतीने. महाराष्ट्रभरातून असंख्य फोन आले. मी निराशावादी कधीच नव्हतो. आतापर्यंत मिळालेले यश हे परिस्थितीशी झगडूनच मिळवलेले आहे. स्टुडिओ जरी जळाला तरी शरीर, मन व हातातील कला अजून शाबूत आहे. पत्नी स्वाती साथ देत आहे. मुलगा शुभंकर आणि सून दोघेही कलाकार असून ते सोबत आहेत. मुलगी कलाश्री आणि इतर कुटुंबीयांचा पाठिंबा आहे.

परमेश्वर माझ्यातील कलाकाराची परीक्षा घेत आहे,असे मला वाटते. कुटुंबीयांच्या व मित्रांच्या सहकार्याने मी यातून नक्की बाहेर पडेन, असा मला विश्वास आहे. गरज आहे ती आपणा सर्वाच्या सहकार्याची.

 काही नोंदी                               

अखिल भारतीय स्तरावरील चित्रकार आणि शिल्पकार म्हणून आज प्रमोद कांबळे यांचे नाव घेतले जाते. हा दर्जा प्राप्त व्हायला त्यांनी केलेल्या साधनेचा, अभ्यासाचा आणि मेहनतीचा मी गेली ३५ वर्षे साक्षीदार आहे. चित्रकला आणि शिल्पकलेतील विविध माध्यमांवर त्यांची हुकमत आहे. जेव्हा त्यांना कोणतीही मान्यता नव्हती तेव्हापासून ते आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत.

प्रतिकूल परिस्थितीत घेतलेले शिक्षण, नोकरी न करता केवळ कलेवर उदरनिर्वाह करायचा निश्चय आणि त्यामुळे झालेली त्यांची धावपळ ही आम्ही नगरकरांनी पाहिली आहे. व्यक्तिचित्रे करण्यातील त्यांचे कौशल्य वादातीत आहे. मूर्तप्रकारात प्रावीण्य मिळवण्याशिवाय अमूर्ततेकडे वळू नये, अशी त्यांची धारणा आहे.

अंगभूत कलागुणांचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला. त्याचा उपयोग करून त्यांनी नानाजी देशमुखांची चित्रकूट येथील ‘नन्ही दुनिया’, तसेच अक्षरधाम, शिर्डी, भोपाळ येथे अद्वितीय कामे केली आहेत. त्याच कामांच्या आधारे त्यांना अनेक मोठय़ा कामांचे प्रस्ताव आलेले आहेत.

मात्र रविवारच्या अग्निप्रलयाने त्यांच्या स्टुडिओची राखरांगोळी झाल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणताही सामान्य माणूस या घटनेने खचून निराश झाला असता. परंतु माझी खात्री आहे, की मानसिक खंबीरता आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे प्रमोद कांबळे या आघातातून बाहेर पडतील. इ. स. २००० च्या सुमारास त्यांच्या जुन्या स्टुडिओलाही आग लागली होती. त्यात त्यांची बहुमोल चित्रे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. उमेदीच्या काळात निर्माण झालेल्या अशा कठीण परिस्थितीतून मार्ग काढून त्यांची प्रतिभा अधिक तेजाने तळपली होती.

या वेळी स्टुडिओची आणि आतील सर्व कलाकृतींची राखरांगोळी झाली आहे. परंतु राखेतून उंच भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे प्रमोद कांबळे यातून नक्की भरारी घेतील, याची मला खात्री आहे. आपण सर्व त्यांच्याबरोबर आहोतच.

स्टुडिओला आग लागली. शेकडो लोक जमा झाले. परंतु आगीच्या तडाख्यातून काही वस्तू बाहेर काढायच्या प्रमोद आणि त्यांच्या साथीदारांना मदत करायचे सोडून हे तरुण सेल्फी काढण्यात आणि व्हिडिओ शूटिंग करण्यात दंग होते. अस्ताव्यस्त लावलेल्या गाडय़ांनी अग्निशामक यंत्रणा स्टुडिओपर्यंत पोहोचू शकणार नाही, याचेदेखील भान त्यांना नव्हते. या तरुणांना सामाजिक जाणीव केव्हा येणार?

शब्दांकन : डॉ. रवींद्र साताळकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2018 1:52 am

Web Title: articles in marathi on indian artist pramod kamble
Next Stories
1 भैरप्पांच्या साहित्याचा रसस्पर्शी वेध
2 ऐतिहासिक चरित्रग्रंथ
3 पळस फुलला..
Just Now!
X