X

महात्मा गांधी आणि डॉ. हेडगेवार

गांधीजींचे विचार सर्वाना आजच्या युगासाठीसुद्धा मार्गदर्शक ठरू शकतात.

दोन ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस. या दिवशी देशाची सर्व जनता महात्माजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते व त्यांच्या अंगी असलेल्या सद्गुणांचे स्मरण करते. गांधीजींचे विचार सर्वाना आजच्या युगासाठीसुद्धा मार्गदर्शक ठरू शकतात. विशेष म्हणजे देशातील काही लोक- जे आपल्याला पुरोगामी, प्रगतिशील व धर्मनिरपेक्ष मानतात, तेसुद्धा गांधीजींच्या विचारांचा आदर करतात आणि गांधीजींना महात्मा मानून त्यांच्यापुढे नतमस्तक होतात. एका सनातनी, गौभक्त हिंदूला हे प्रगतिशील, पुरोगामी का पूज्य मानतात, हे एक मोठे गूढच आहे. या लेखात उद्धृत केलेली माहिती अप्पाजी जोशी- जे सरसंघचालक डॉ. हेडगेवारांचे परममित्र व सहकारी होते, तसेच काँग्रेस चे प्रमुख कार्यकत्रेही होते- त्यांनी दिली आहे. गांधीजींचा स्वभाव मनमिळाऊ असून सर्व प्रकारच्या, विचारांच्या लोकांशी ते प्रेमाचे संबंध ठेवत असत. वध्र्यामध्ये असताना त्यांचे वास्तव्य एका दुमजली आटोपशीर बंगल्यात असे. बंगल्याजवळील मोकळ्या मदानात त्यांना काही कार्यकत्रे शिबिराची तयारी करताना दिसले. त्या शिबिराच्या उभारणीचे दिवसेंदिवस प्रगत होणारे काम ते सकाळी फिरून परतताना पाहत असत. येथे कोणती परिषद, केव्हापासून होणार आहे, असे कुतूहल त्यांच्या मनात निर्माण झाले. यासंबंधी महादेव देसाईंना पाठवून त्यांनी चौकशीदेखील केली. त्यावेळेस रा. स्व. संघाची शिबिरे ही नाताळच्या सुट्टीत घेण्याची पद्धत असे. (तीच पद्धत जवळजवळ अजूनही चालू आहे.) १९३४ मधील डिसेंबरात वर्धा येथे झालेले शिबीर म. गांधींच्या भेटीमुळे चांगलेच गाजले. त्या शिबिराची मांडणी वध्र्याहून शेगांवकडे- म्हणजे हल्लीच्या  सेवाग्रामकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या अंगाला शेठ जमनालालजी बजाज यांची एक मोकळी जागा होती त्यावर केलेली होती. असे सनिकी पद्धतीचे संघाचे तळ म्हणजे सामूहिक परिश्रम व शिस्त यांच्या विकासाचे केंद्र असते. अनेक ठिकाणचे स्वयंसेवक स्वतच्या खर्चाने आपला गणवेश व अंथरूण-पांघरूण घेऊन एकत्रित येतात आणि उत्साहाने तीन-चार दिवस एकत्रित राहून सनिकांप्रमाणे अत्यंत काटेकोरपणे संचलनाचे कार्यक्रम करतात. यासाठी लागणारा खर्च हा स्वयंसेवकांनी दिलेल्या शुल्कातून व धान्यातून होत असतो. अशा या छावण्या स्वयंपूर्ण असतात. १९३४ च्या डिसेंबरातील संघाचे वध्र्याचे हे शिबीर पंधराशे स्वयंसेवकांचे होते. त्याच्या उभारणीसाठी स्वयंसेवकांची पंधरा-वीस दिवस त्या जागी सारखी ये-जा सुरू होती. २२ डिसेंबरला शिबीर सुरू झाले. त्यावेळच्या उद्घाटन समारंभाला नेहमीप्रमाणे वर्ध्यातील प्रतिष्ठित मंडळींना निमंत्रण दिलेले होते. अर्थात शेजारीच असलेल्या महात्माजींना व आश्रमीय मंडळींनाही निमंत्रण होते, हे सांगावयास नकोच. शिबिरातील शेकडो गणवेशधारी स्वयंसेवकांचे कार्यक्रम सुरू झाले व संघाचा घोष गर्जू लागला. महात्माजींना ते दृश्य बंगल्यातून सहज दिसत होते. त्याने ते प्रभावित झाले व त्यांनी महादेवभाई देसाई यांच्याजवळ शिबीर पाहण्यास जाण्याची इच्छा प्रदर्शित केली. तेव्हा महादेवभाईंनी वर्धा जिल्ह्य़ाचे संघचालक आप्पाजी जोशी यांना चिठ्ठी पाठविली की, ‘‘आपली छावणी आश्रमासमोर सुरू असल्याने स्वाभाविकच महात्माजींचे लक्ष तिकडे वेधले. ती पाहण्याची त्यांची इच्छा आहे. तरी कृपा करून आपणाला कोणती वेळ सोयीची आहे ते कळवावे. ते फारच कार्यमग्न आहेत. तरीही ते वेळात वेळ काढतील. तरी आपण येऊन वेळ ठरवून टाकलीत तर सोयीचे होईल.’’ या पत्रानंतर आप्पाजी आश्रमात गेले व ‘‘आपणास सोयीची वेळ सांगा, म्हणजे त्यावेळी आम्ही आपले हार्दकि स्वागत करू,’’ असे ते म्हणाले. पण महात्माजींचे त्यावेळी मौन असल्याने त्यांनी लिहून दाखविले की, ‘‘मी उद्या दि. २५ ला सकाळी सहा वाजता छावणीला भेट देऊ शकेन. तेथे मला दीड तास राहता येईल.’’ यावर आप्पाजींनी ‘‘वेळ आम्हाला मान्य आहे,’’ असा होकार देऊन निरोप घेतला.

दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक सहा वाजता महात्माजी शिबिरात आले. त्यावेळी त्यांना सर्व स्वयंसेवकांनी मोठय़ा शिस्तीने मानवंदना दिली. त्यांच्याबरोबर महादेवभाई देसाई, मीराबेन व इतर आश्रमीय मंडळी होती. ते भव्य दृश्य पाहून महात्माजींनी आप्पाजींच्या  खांद्यावर हात टाकून म्हटले की, ‘‘मी खरोखरच प्रसन्न झालो आहे. उभ्या देशात असे प्रभावी दृश्य अद्याप मी पाहिलेले नाही.’’ त्यानंतर त्यांनी शिबिरातील स्वयंपाकघराची पाहणी केली व पंधराशे लोकांचे जेवण एका तासात बिनबोभाट उरकते, एक रुपया व थोडे धान्य घेऊन सर्वाना नऊ जेवणे दिली जातात, तसेच येणारी तूट स्वयंसेवक भरून काढतात, इत्यादी माहिती ऐकून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यानंतर त्यांनी शिबिरामधील तात्पुरते रुग्णालय व स्वयंसेवकांच्या राहण्याच्या छपऱ्या यांचीही पाहणी केली. या रुग्णालयात उपचार घेणारे खेडुत व मजूर वर्गातील स्वयंसेवकही संघात असल्याचे त्यांच्या ध्यानी आले. राहण्याच्या तट्टय़ांच्या छपऱ्यात ब्राह्मण, महार, मराठा असे सर्व स्वयंसेवक सरमिसळ राहतात आणि पंक्तीत एकत्रच भोजनास बसतात, हे ऐकून त्यांनी ते पडताळून पाहण्यासाठी काही स्वयंसेवकांना चाचणीसाठी प्रश्नही विचारून पाहिले. तेव्हा, ‘‘हा महार, हा ब्राह्मण, हा मराठा, हा शिंपी असले भेदाभेद आम्ही संघात मानीत नाही. आपल्या शेजारी कोणत्या जातीचा स्वयंसेवक आहे याची आम्हांस दादही नसते. आम्ही सर्वजण हिंदू आहोत आणि म्हणून बंधू आहोत; तेव्हा एकमेकांना व्यवहारात उच्च-नीच लेखण्याची आम्हाला कल्पनाच शिवत नाही,’’ अशा आशयाचे विचार त्यांना स्वयंसेवकांच्या उत्तरांत ऐकावयास मिळाले. त्यावर महात्माजींनी आप्पाजींना प्रश्न केला की, ‘‘तुम्ही जातिभेदाची भावना कशी विसरावयास लावलीत? यासाठी आम्ही व इतर काही संस्था अविरत खटपट करीत आहोत, पण लोक ते भेदभाव विसरत नाहीत. अस्पृश्यता नष्ट करणे किती अवघड आहे, हे आपण जाणताच. असे असता या संघटनेच्या कक्षेत तरी तुम्ही ही अवघड गोष्ट कशी साधू शकलात?’’ त्यावर उत्तर मिळाले की, ‘‘सर्व हिंदूंमध्ये भावाभावाचे नाते आहे, हा भाव जागृत करून सर्व भेदाभेद नष्ट झाले. भावाभावाचे नाते बोलून नव्हे, तर आचरल्याने ही किमया घडली. याचे सर्व श्रेय डॉ. हेडगेवार यांना आहे!’’

इतके बोलणे झाल्यावर घोषवादन सुरू होऊन सर्व स्वयंसेवक ‘दक्ष’ (Attention) मध्ये ताठ उभे राहिले व ध्वज वर चढू लागला. ध्वजारोहण पूर्ण झाल्यावर आप्पाजींबरोबरच महात्माजींनी भगव्या ध्वजाला संघाच्या पद्धतीने प्रणाम केला. ध्वजप्रणामानंतर महात्माजी शिबिरात असलेल्या संघ वस्तुभांडाराच्या जागी गेले. त्या भांडाराच्या एका बाजूला म्हणी, छायाचित्रे, घोष-वाद्यो व आयुधे वगरेंचे एक लहानसे प्रदर्शनच ठेवलेले हेाते. त्याच्या मध्यावर लक्ष वेधून घेणारे एक छायाचित्र आरास करून नीट मांडलेले होते. ते महात्माजींच्या पाहण्यात आले व त्यांनी नीट निरखून ‘हे कोणाचे?’ अशी पृच्छा केली.

‘‘हेच डॉ. केशवराव हेडगेवार!’’  आप्पाजींनी सांगितले.

‘‘अस्पृश्यता नष्ट करण्याच्या संदर्भात आपण ज्यांचा उल्लेख केलात ते डॉक्टर हेडगेवार हेच काय? यांचा संघाशी काय संबंध?’’ – महात्माजी.

‘‘हे संघाचे प्रमुख आहेत. यांना आम्ही सरसंघचालक म्हणतो. यांच्या नेतृत्वाखाली संघाचे सर्व काम चाललेले असते. यांनी तर हा संघ सुरू केला.’’ – आप्पाजी.

‘‘डॉ. हेडगेवार यांची भेट होऊ शकेल काय? तशी भेट झाल्यास प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच या संघटनेची माहिती करून घेण्याचा विचार आहे.’’ – महात्माजी. ‘‘उद्या शिबिराला डॉ. हेडगेवार भेट देणार आहेत. आपली इच्छा असेल तर ते आपणास भेटतील.’’

याप्रमाणे संवाद झाल्यानंतर महात्माजी आश्रमात परत गेले. जाता जाता ‘‘हे काम केवळ हिंदूंपुरतेच आहे; त्यात सर्वाना मोकळीक असती तर अधिक बरे झाले असते,’’ असे अभिमत व्यक्त करण्यास ते विसरले नाहीत. अर्थात त्यावर थोडी चर्चा झाली. तेव्हा त्यांनी ‘‘इतरांचा द्वेष न करता केवळ हिंदु-संघटन करणे हे राष्ट्रविघातक नाही,’’ ही गोष्ट मान्य केली.

दुसऱ्या दिवशी सकाळी डॉ. हेडगेवारांचे वध्र्याला आगमन झाले. त्यावेळी वर्धा रेल्वेस्थानकावर त्यांना सनिकी पद्धतीने मानवंदना देण्यात आली व त्यानंतर सर्व स्वयंसेवक संचलन करीत शिबिरात परत आले. डॉक्टर शिबिरात पोहोचल्यावर थोडय़ाच वेळाने स्वामी आनंदजी हे डॉक्टरांना भेटीचे निमंत्रण देण्यासाठी महात्माजींकडून येऊन गेले व त्यांनी रात्री साडेआठची वेळ निश्चित केली. त्या दिवशी सायंकाळी पुण्याचे धर्मवीर ल. ब. तथा अण्णासाहेब भोपटकर यांच्या अध्यक्षतेखाली छावणीचा समारोप समारंभ थाटामाटाने पार पडल्यावर डॉ. हेडगेवार, अण्णासाहेब भोपटकर व आप्पाजी जोशी आदी मंडळी महात्माजींना भेटण्यासाठी आश्रमात गेली. तेथे दुसऱ्या मजल्यावरील खोलीत महात्माजींची बैठक असे. महादेवभाई देसाई यांनी प्रवेशद्वाराजवळ या सर्वाचे स्वागत केले व त्यांना या बठकीच्या जागी नेले. तेथे महात्माजींनीही पुढे होऊन या सर्वाना आत नेले व गादीवर आपल्या शेजारी बसविले. यानंतर जवळजवळ तासभर डॉक्टर व महात्माजी यांच्यामध्ये चर्चा चालू होती. अण्णासाहेब भोपटकर यांनीही या चच्रेत थोडासा भाग घेतला. यावेळी उभयतांत जे संभाषण झाले त्यातील काही ठळक भाग अत्यंत महत्त्वाचा असल्याने पुढे देत आहे.

महात्माजी : काल मी छावणीत येऊन गेल्याचे कळलेच असेल.

डॉ. हेडगेवार : हो तर! आपण भेट दिलीत हे स्वयंसेवकांचे भाग्यच म्हणावयाचे! मी त्यावेळी नव्हतो याचे वाईट वाटते. आपण भेट देण्याचे एकाएकी ठरविलेले दिसते. मला जर याची आधी कल्पना असती तर मी त्यावेळी येण्याचा निश्चित प्रयत्न केला असता.

महात्माजी : आपण नव्हता ते एका दृष्टीने बरे झाले. कारण आपल्या अनुपस्थितीमुळे मला आपल्याविषयी खरी माहिती मिळाली. डॉक्टर, आपल्या कॅम्पमधील संख्या, शिस्त, स्वयंसेवकांची वृत्ती व स्वच्छता वगरे अनेक गोष्टी पाहून मला फारच समाधान झाले. सर्वात मला आपला बँड फारच आवडला!

नंतर महात्माजींनी, ‘‘संघाला दोन-तीन आण्यांत जेवणे देणे कसे परवडते? आम्हाला अधिक खर्च का येतो? सामान पाठीवर घेऊन आपण कधी स्वयंसेवकांना वीस मल संचलन करीत नेले आहे काय?’’ वगरे प्रश्न विचारले. यावेळी महात्माजींशी जिव्हाळ्याचे व सलगीचे संबंध आल्याने अण्णासाहेब भोपटकर यांनी डॉ. हेडगेवार यांनी पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वीच थट्टेत सांगितले की, ‘‘तुम्हाला खर्च अधिक येतो तो तुम्ही सर्व मंडळी एकंदर ज्या पद्धतीने वागता त्यामुळे! नाव देता ‘पर्णकुटी’; पण आत असतो आपला राजेशाही थाट? तुमच्याप्रमाणे यांच्यात Discrimination नाही. संघाच्या तत्त्वाप्रमाणे वागाल तर तुम्हालाही दोन-तीन आणेच खर्च येईल. त्याला डॉक्टर कशाला हवेत? तुम्हाला थाट पाहिजे व खर्चही कमी पाहिजे. या दोन्ही गोष्टी एकदम कशा जमणार?’’

अर्थात महात्माजी व अण्णासाहेब यांच्यातील ही खेळीमेळीची लटकी थट्टा सर्वाच्या मनमोकळ्या हास्यात तेव्हाच विरून गेली. त्यानंतर महात्माजींनी संघाची घटना, वृत्तपत्रीय प्रचार वगरेंविषयी माहिती विचारण्यास सुरुवात केली, तोच मीराबेनने पुढे येऊन म. गांधींना घडय़ाळ दाखवले व नऊ वाजले असल्याचा संकेत केला. तेव्हा ‘‘आपली निजावयाची वेळ झालेली दिसते!’’ असे म्हणत डॉ. हेडगेवार निरोप घेऊ लागले. त्यावर ‘‘छे! छे! आपण आणखी थोडा वेळ बसू शकतो! आणखी अर्धा तास मी सहज जागा राहीन,’’ असे म्हणत महात्माजींनी चर्चा सुरू ठेवली.

महात्माजी : डॉक्टर, आपली संघटना चांगली आहे. मला असे समजले आहे की, आपण दीर्घकाळपर्यंत कॉंग्रेसचे कार्य करीत होता. मग कॉंग्रेससारख्या लोकप्रिय संस्थेच्या छायेखालीच अशी स्वयंसेवक संघटना का चालविली नाहीत? निष्कारण निराळी संघटना का काढलीत?

डॉ. हेडगेवार : मी प्रथमत: कॉंग्रेसमध्येच हे कार्य सुरू केले होते. १९२० च्या नागपूर कॉंग्रेसमध्ये तर मी स्वयंसेवक विभागाचा कार्यवाह होतो आणि माझे मित्र डॉ. परांजपे हे अध्यक्ष होते. त्यानंतरही आम्ही दोघांनी कॉंग्रेसमध्ये अशी संघटना असावी म्हणून प्रयत्न केले. पण यश मिळाले नाही. तेव्हा हा स्वतंत्र प्रयत्न केला.

महात्माजी : कॉंग्रेसमधील प्रयत्नांना का यश आले नाही? पुरेशा पशांचे पाठबळ मिळाले नाही म्हणून?

डॉ. हेडगेवार : छे! छे! पशांची अडचण नव्हती. पशाने अनेक गोष्टी सुकर होत असतील, पण या जगात नुसत्या पशावर काहीच यशस्वी ठरू शकत नाही! येथे पशांचा प्रश्न नसून अंत:करणाचा आहे.

महात्माजी : उदात्त अंत:करणाची माणसे कॉंग्रेसमध्ये नव्हती व नाहीत असे आपणाला म्हणावयाचे आहे काय?

डॉ. हेडगेवार : माझ्या म्हणण्याचा तसा आशय नाही. काँग्रेसमध्ये अनेक चांगली माणसे आहेत. आम्ही स्वत:ही काँग्रेसमध्येच होतो. पण प्रश्न आहे तो मनोवृत्तीचा. एक विवक्षित राजकीय कार्य सफल करण्याच्या दृष्टीने काँग्रेसच्या मनोवृत्तीची घडण करण्यात आली आहे. त्यावर दृष्टी ठेवूनच काँग्रेसचे कार्यक्रम आखण्यात येतात व त्या कार्यक्रमांच्या पूर्ततेसाठी तिला स्वयंसेवक हवे असतात. स्वयंप्रेरणेने कार्य करणाऱ्यांच्या बलशाली संघटनेकडून राष्ट्रापुढील सर्व समस्या सुटू शकतील यावर काँग्रेसचा विश्वास नाही. सभा-परिषदांतून खुर्च्या -टेबल उचलण्यासारखी कामे पही न घेता करणारे मजूर म्हणजे स्वयंसेवक अशी काँग्रेसमधील लोकांची धारणा आहे. अशा धारणेतून राष्ट्राची सर्वागीण उन्नती करणारे स्वयंत्स्फूर्त कार्यकत्रे कसे उत्पन्न होणार? त्यामुळे काँग्रेसमधील कार्य उभे राहू शकले नाही.

महात्माजी : मग स्वयंसेवकांसंबंधी आपली कल्पना काय?

डॉक्टर : देशाच्या सर्वागीण विकासासाठी जो आत्मीयतेने आपले सारसर्वस्व अर्पण करण्यास सिद्ध होतो अशा नेत्याला आम्ही स्वयंसेवक समजतो. आणि असे स्वयंसेवक घडविण्यावर संघाचे लक्ष आहे. या संघटनेत स्वयंसेवक व पुढारी असा भेद नाही. आम्ही सर्वजण स्वयंसेवक आहोत अशी सदैव जाणीव ठेवून आम्ही परस्परांना समान समजतो व सर्वावर सारखेच प्रेम करतो. आम्ही कोणत्याच प्रकारच्या भेदाला थारा देत नाही. इतक्या अल्पावधीत पशांचे व इतर साधनांचे पाठबळ नसताही संघकार्याचा जो विस्तार होऊ शकला, त्याचे रहस्य यात आहे.

महात्माजी : छान! आपल्या कामाच्या यशात देशाचे हित खरोखरच सामावलेले आहे. पण खरेच डॉक्टरजी, आपल्या संघटनेचा वर्धा जिल्ह्य़ात चांगलाच जम बसला आहे असे ऐकतो. मला वाटते, प्रामुख्याने शेठ जमनालाल बजाज यांच्या सर्व प्रकारच्या आर्थिक साहाय्यावरच हे घडले असेल.

डॉक्टर : आम्ही कोणापासून आर्थिक साहाय्य घेत नाही.

महात्माजी : मग एवढय़ा मोठय़ा संघटनेचा खर्च कसा भागविता?

डॉक्टर : आपल्या खिशातून गुरुदक्षिणेच्या रूपाने अधिकांत अधिक पैसे देऊन स्वत: स्वयंसेवक हा भार पेलीत असतात.

महात्माजी : खरेच विलक्षण आहे! पण आपण कोणाकडूनही धन स्वीकारणार नाही?

डॉक्टर : जेव्हा समाजाला हे कार्य त्याच्या विकासासाठी आवश्यक वाटेल तेव्हा धन अवश्य स्वीकारू. अशी स्थिती झाल्यावर आम्ही न मागताच लोक पशांच्या राशी आणून संघापुढे ओततील. असे आर्थिक सहाय्य स्वीकारण्यात आमची आडकाठी नाही. पण संघाची पद्धती मात्र आम्ही स्वावलंबी ठेवली आहे.

महात्माजी : तर मग आपणाला या कार्यासाठी आयुष्याचा सर्व वेळ लावावा लागत असणार! मग तुम्हाला आपला डॉक्टरी व्यवसाय करणे कसे जमते?

डॉक्टर : मी व्यवसाय करीतच नाही.

महात्माजी : तर मग आपल्या कुटुंबाचा निर्वाह कसा चालतो?

डॉक्टर : मी विवाहच केला नाही.

महात्माजी या उत्तराने काहीसे विस्मित झालेले दिसले. त्या भरात ते उद्गारले- ‘‘अस्सं! आपण विवाह केलेला नाही. छान! यामुळेच इतक्या अल्प काळात आपणास असे यश मिळत आहे.’’  यावर ‘‘मी आपला फार वेळ घेतला. आपले आशीर्वाद असले की सर्व मनासारखे होईल. आता रजा मागतो,’’ असे म्हणत डॉक्टर जाण्यासाठी उठले. महात्माजी त्यांना दारापर्यंत पोचवावयास आले आणि निरोप देताना म्हणाले की, ‘‘अंगीकृत कार्यात निश्चित यशस्वी व्हाल!’’ यावर डॉ. हेडगेवारांनी त्यांना नमस्कार केला व ते निघाले.

 

– मधू देवळेकर

mydeolekar@yahoo.com

(लेखक भाजपचे माजी आमदार आहेत.)

 

वाचा / प्रतिक्रिया द्या
Outbrain