पाण्याकडे केवळ ‘एचटूओ’ या रासायनिक स्वरूपातच न पाहता, निसर्गाशी एकरूप होऊन जाणाऱ्या सांस्कृतिक ‘जीवनदायी’ दृष्टिकोनातून संजीवनी खेर यांनी त्यांच्या ‘जलसूक्त’ या पुस्तकात मांडणी केली आहे. पाण्याच्या अनेकविध अंगांचे सर्वागीण यथार्थ दर्शन या पुस्तकातून मिळते.

पाणी नसेल तर माणसाचे जगणेच शक्य होणार नाही, इतके मूलभूत महत्त्व या नैसर्गिक स्रोताचे आहे. म्हणूनच पाण्याला आपल्या संस्कृतीत ‘जीवन’ असे संबोधले आहे. पाण्याच्या समृद्धीत धनधान्याची सांस्कृतिक भरभराट सामावली आहे आणि साहजिकच पाण्याच्या दारिद्र्यात सामाजिक तंटे आणि विनाश सामावला आहे.

प्राचीन काळापासून चालत आलेल्या सामाजिक चालीरीती पाण्याकडे उदार अंत:करणाने पाहत होत्या. पाण्याचे महत्त्व समजून घेऊन या स्रोताचा योग्य आदर राखत होत्या. मात्र गेल्या काही दशकांमध्ये विकसित झालेल्या ‘आधुनिक’ समाजाने हा दृष्टिकोन सोडला आहे. याचे गंभीर परिणाम भावी पिढय़ांना भोगावे लागतील, असा खणखणीत इशारा खेर यांनी ‘जलसूक्त’मधून दिला आहे.

जगभरामध्ये विकसित झालेल्या बहुतेक सर्व संस्कृतींचा विकास हा नद्यांच्या काठीच होत होता. भारतीय संस्कृतीही याला अपवाद नाही. गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी, कृष्णा, कावेरी, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा या नद्या याच्या साक्षी आहेत. या सर्वाचे महत्त्व लक्षात घेऊन लेखिकेने या प्रत्येक नदीसाठी एक स्वतंत्र प्रकरण पुस्तकात समाविष्ट केले आहे. केवळ एवढेच नाही, तर राजस्थानमध्ये लुप्त झालेल्या, मात्र भारतीयांच्या मनामनांत जिवंत असणाऱ्या सरस्वती नदीवरील एक प्रकरणही पुस्तकात समाविष्ट आहे.

अतिशय भावरूप होऊन, भरपूर वाचन आणि अभ्यास करून वर उल्लेख केलेल्या नद्यांचा प्रवाह या पुस्तकात खळखळता ठेवला आहे. त्या त्या नद्यांच्या संदर्भातील सामाजिक चालीरीती आणि त्या मागची लोकभावना रंजक पद्धतीने खेर यांनी मांडली आहे; त्यामुळे ती वाचनीयही झाली आहे. नद्यांच्या उगमापासून ते समुद्राच्या संगमापर्यंतचे वर्णन पुस्तकात आले आहे.

नद्यांची सविस्तर वर्णने झाल्यावर शेवटच्या ४०-५० पानांमध्ये स्फुट अशा १०-१२ विषयांनाही लेखिकेने हात घातला आहे. जलाची पवित्रता, स्त्रीचे आणि नदीचे नाते, मनात रुंजी घालणारी मराठी-हिंदी गाणी हेही विषय हाताळले आहेत. पाण्याचे हे सांस्कृतिक नाते लेखिकेने अगदी कालच्या-आजच्या वर्तमानाशी आणून जोडले आहे. गावपातळीवरील जलसंधारणाच्या लोकचळवळींचा विशेष उल्लेख आणि त्यासाठी योगदान देणाऱ्या राजस्थानच्या राजेंद्रसिंहांपासून पाणी फाऊंडेशनच्या सत्यजित भटकळ व आमीर खानपर्यंतचे वर्णन पुस्तकाच्या शेवटामधील परिशिष्टात वाचायला मिळते.

‘जलसूक्त’ हे पुस्तक भारतातील नदी-संस्कृतींच्या इतिहासाचे परिपूर्ण दर्शन घडवते. आफ्रिकेतील नाईल नदी असो, दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन असो वा चीनमधील यांगत्से नदी असो,  भारताप्रमाणेच तेथील संस्कृतींचा विकास नदीकिनारीच झालेला आहे. त्यामुळे ‘जलसूक्त’च्या धर्तीवर जगभरातील अशा निवडक नद्यांचे आणि तेथे विकसित झालेल्या नदी-संस्कृतींचे वर्णन तुलनात्मकदृष्टय़ा पण एकत्रितपणे पुढील काळात एका नवीन पुस्तकात आले, तर ते जलसंस्कृतीच्या भाविकांना वाचायला नक्कीच आवडेल.

  • ‘जलसूक्त’- संजीवनी खेर,
  • ग्रंथाली प्रकाशन,
  • पृष्ठे- २२९ , मूल्य- २५० रुपये.

संतोष गोंधळेकर