‘हा माझा खासगी दस्तावेज आहे

हे मी स्वत:च स्वत:ला लिहिलेलं पत्र आहे

मी प्रतिविश्वामित्र आहे

ही जडणघडण माझी आहे

हा सारा अर्थस्वार्थ माझाच आहे

मी निर्माता, मी कर्ता आहे

माझाच मी बोलविता धनी आहे

हय़ा सावल्यांच्या दुनियेचा मीच काय तो सम्राट आहे..’

नाटककार आणि नाटय़धर्मी राजीव नाईक यांचे समांतर मराठी नाटय़-चळवळीतले योगदान महत्त्वाचे आहे. कोणत्याही कलेच्या परिसरात एका विषयाला धरून आपलं अवघं प्रातिभ आयुष्य वाहणारी अतिसंवेदनशील माणसं या जगात अस्तित्वात आहेतच. राजीव नाईक यांच्या मन:केंद्रात ‘नाटक’ ही गोष्ट ठळक असली तरी कथा, संगीत आणि भारतीय तत्त्वज्ञान या नाटय़विचारांशी संलग्न अशा काही विद्यांशीही ते स्वत:ला जोडून आहेत. ‘सांधा’, ‘आपसातल्या गोष्टी’, ‘साठेचं काय करायचं?’, ‘मातीच्या गाडय़ाचं प्रकरण’, ‘ऐन वसंतात अध्र्या रात्री’ अशा नाटकांमुळे ते मराठी विश्वाला परिचित आहेत नि ‘रङ्गविचार’ आणि ‘नाटय़विचार’ या नाटय़समीक्षात्मक लेखनातून गंभीर रंगकर्मीमध्येही नाईक यांचं नाव सतत चर्चेत असतं. त्यांच्या ‘मोकळा’ या कथासंग्रहाने मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. अर्थातच ‘कविता’ नावाच्या नाटकाच्या अत्यंत जवळच्या अशा साहित्यप्रकाराशी त्यांचा काही अनुबंध असणार हेही स्वाभाविक आहे. नाटक आणि काव्य या तशा परस्परसंबंध असलेल्या विद्या आहेत. नाटकात जे अव्यक्त राहते ते खूपदा कवितेतून व्यक्त होते. कारण दोन्ही विद्यांच्या काही मर्यादा आहेत. एखादा भाव व्यक्त करण्याच्या पातळीवरचा झाला तर तो नाटय़गत होतो आणि एखादे भावनाटय़ फारच शब्दांकित असले तर त्याला कवितेशिवाय व्यक्त व्हायला अन्य पर्याय नसतो. राजीव नाईक यांच्या ‘कविताबिविता’ या कवितासंग्रहाने हा महत्त्वाचा ‘अभिव्यक्ती’मागचा कार्यकारणभाव नव्याने पटावर आला आहे.

कवितेकडे पाहण्याचे जे काही गंभीर दृष्टिकोन आहेत, त्यातला एक अ-लगाम वा विमुक्त पद्धतीने व्यक्त होणं हा एक आहे. कवितेमध्ये सतत निमग्न असणाऱ्या किंवा कविता एके कविता अशी अभिव्यक्तीची एकच एक भाषा अवगत असलेल्या वा तीच विद्या आपली जीविका मानणाऱ्या कविसमूहाच्या पलीकडे अनेक माणसं- जी थेट कवितेशी नव्हे तर अन्य कला वा वेगळ्या सर्जनधर्माशी निगडित आहेत, त्यांच्यासाठी कविता ही अत्यंत खासगी, पण महत्त्वाची अभिव्यक्तीची शाखा असते. जणू त्यांनी स्वीकारलेल्या कलाक्षेत्रात जिथे आणि जेवढे त्यांना व्यक्त होता आले नाही, त्याचा निचरा त्यांची कविता करीत असते. त्यामुळे वरवर ते त्याला ‘कविताबिविता’ म्हणत, आपल्या विमुक्त उद्गारांना अ-गांभीर्याचा आयाम देत असले तरी त्या कविताच आहेत हे चाणाक्ष वाचक समजू शकतात. या संग्रहाच्या मलपृष्ठावर वसंत आबाजी डहाके यांनी केलेली पाठराखण याच अर्थाची आहे. ‘पृष्ठावर असते ती बिविता आणि वाचकांच्या मनात उरते ती कविता. बिविता उलगडल्या की कविताच राहतात.’ राजीव नाईक यांच्या काव्यसंग्रहाचं हे शीर्षक त्यांच्या अंतर्मनात उठलेल्या अनंत भावकल्लोळांच्या मागचा कविताप्रवण धागा अर्थाकित करणारे वाटते. केवळ २५ कवितांचा हा संग्रह- २५ महत्त्वाचे आत्ममग्न विषयांवरचे आपले कवितिक भाष्य वाचकांपुढे मांडते आणि या २५ विषयांची कवितेसाठीची निवडच नाईक यांच्या जीवनदर्शनाच्या कल्पनांना उजळ करणारी आहे हे कळते. येथे कविता, एका विशुद्ध प्राणतत्त्वासारखी समोर येते आणि आपल्याला स्पर्शत अस्वस्थ करून जाते.

‘मी माझाच

मी नार्सिसस, मी बहुरूपी, मी सोंगाडय़ा

मी इथे-तिथे, सगळीकडे- सर्वभर

मी चाणाक्ष, मीच वेडसर

मी देणारा, मीच घेणाराही

मीच तू, हा, तो, कोणीही

माझ्यातच मला

एक विश्वरूप दर्शन’      (त्याच्या कविता)

राजीव नाईक यांनी स्वत:च आपल्या शब्दऊर्मीचे विषय ठरवले आहेत. ‘नास्तिकाच्या कविता’, ‘राधेच्या कविता’, ‘चित्रांच्या कविता’, ‘नाटकाच्या कविता’, ‘मरणाच्या कविता’, ‘झाडापावसांच्या कविता’, ‘आरशांच्या कविता’ असं करता करता मधेच ‘म्हणण्याच्या कविता’, ‘शब्दांच्या कविता’, ‘आताशाच्या कविता’ अशा विषयसूचीतून त्यांनी अनेक मनविभ्रमांना आपले अंतर्विषय बनवले आहे. यातील वेगळेपणामुळेच ते लक्षणीय झाले आहेत. मात्र, ते विषय वैविध्यापुरतेच केवळ लक्षणीय नाहीत, तर त्यातील भावकल्लोळ वाचकाला अनुभूतीच्या खोलात नेण्याइतके गाढ जिवंत आहेत. कवितेत आवश्यक असलेली ही खेच आपल्याला ठायी ठायी जाणवत राहते. नाईक यांनी हे कवितापण निगुतीने सांभाळले आहे.

‘कुणासाठी हे ढग

बेभान बरसतात

..

झाडं अंग पुसत नाहीत

निथऽळऽऽत राहतात’

(पाऊसथेंबाच्या कविता)

‘अंक पडल्यावर

नाटय़ाचं शटल कुठे जातं’

(नाटकाच्या कविता)

 

‘स्मृतीतला पार्थिव दगडी पिरामिड

हा असा अचानक, अनपेक्षित, समोर, साक्षात

पारदर्शी झाला आणि भर लुव्रमध्ये भडभडून आलं’

(लुव्र म्युझियम, चित्रकारांच्या कविता)

 

‘कुणीच जगले नाही भूतकाळात

कुणीच जगणार नाहीत भविष्यकाळात

जे जगतात, ते मरतात वर्तमानात’  (कालावकाशाच्या कविता)

 

‘गाणं की शिल्प हय़ाचं उत्तर आल्यास बरं

नाही तर अबलख असला तरी उगा उरावर

कशाला नाचवा हा न उडणारा पंखवाला घोडा?’

(कलेच्या कविता)

 

‘नाही म्हटलं तरी हा प्रदेश तसा

तुळशी वृंदावनांचा, सारवल्या अंगणांचा

परकरी पोरींचा, सावरत्या सवाष्णींचा

गडांचा, वडांचा, घडवंचीचा’

..

‘पारावरच्या तंबाखूचा, फडातल्या फेटय़ाचा

धामधूमीचा, घालमेलीचा, विजनवाशांचा..’

(आणखी एक महाराष्ट्रगीत/ शब्दांच्या कविता)

‘कविताबिविता’ संग्रहातील प्रत्येक पानावर अशा अस्वस्थ ओळींचा कोलाज आपल्याला पाहायला मिळतो. राजीव नाईक हे नाटय़कर्मी आहेत हे विसरायला लावतील असे खास ‘कवितिक प्रदेश’ या संग्रहात विखुरलेले आहेत. एक संवादप्रवणता आणि चित्रदर्शित्व (कधी सेट, कधी प्रत्यक्ष स्थळ) ही दोन वैशिष्टय़े या संग्रहात दिसतातच; पण याहून काही प्रयोग करण्याचा प्रयत्न नाईक यांनी केला नाही तरी समकालीन कवितांच्या आधुनिक पेचांच्या जवळ त्यांची कविता जाते. (नव्या आधुनिक मराठी कवितेतले ढोबळ निबंध त्यात नाहीत.) नाटक हे एक अभिव्यक्तीचे पात्र म्हणून त्यांनी निवडलेले असले तरी त्याचवेळी ते कवितेनेही काठोकाठ भरलेले असल्याचे आपणास जाणवते आणि ते ओसंडल्यावर असे ‘कविताबिविता’तून रिते होते असे वाटते.

या संग्रहातल्या कविता गेल्या तीसअधिक वर्षांत लिहिलेल्या आहेत, असे नाईक यांनी सुरुवातीलाच कबूल केले आहे. म्हणजे जगण्याला समांतर असा त्यांचा प्रवास.. एखाद्या कवीसारखा निरंतर चिंतनातला.. चालू आहे आणि महेश एलकुंचवारांचा जो विचार प्रस्तावनेसारखा संग्रहाच्या सुरुवातीलाच आहे, त्या अर्थानेही अनुभवाचा हिरवागार लसलसता कोंभ वाचकांच्या तळहातावर ठेवण्याचा राजीव नाईक यांचा प्रयत्न ‘कविताबिविता’ने तडीस नेला आहे.

‘कविताबिविता’- राजीव नाईक, मौज प्रकाशनगृह, पृष्ठे- ७४, मूल्य- १२५ रु.

अरुण म्हात्रे

arunakashar@rediffmail.com