भारतीय स्वातंत्र्यलढय़ाचा इतिहास आपल्याला माहीत असला तरी त्यात अनेक व्यक्ती, अनेक गट, अनेक चळवळी, घटना अशा आहेत ज्याच्यावर फारसा प्रकाश पडलेला नाही. अनेक जणांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी आपापल्या पद्धतीने, आपल्या परीने खूप प्रयत्न केले. त्यांना त्यात फारसे यश मिळाले नाही. आणि त्यामुळे त्यातल्या बऱ्याच जणांची नावेही कुणाला माहीत नाहीत. अर्थात याचा अर्थ त्यांच्या कामाचे महत्त्व कमी होते असा नाही. पडद्याआड राहिलेल्या अशाच एका चळवळीवर आणि स्वातंत्र्यसनिकावर ‘मी कधीही माफी मागणार नाही’ या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘आय शॅल नेव्हर आस्क फॉर पार्डन’ या सावित्री साव्हनी यांच्या पुस्तकाचा अवंती महाजन यांनी केलेला हा अनुवाद आहे.

शाळेत असताना भारतीय स्वातंत्र्यलढय़ाच्या संदर्भात ‘गदर पार्टी’बद्दल वाचल्याचे आठवते. पहिल्या महायुद्धाच्या इतिहासात ‘कामा गाटा मारू’ या जहाजाबद्दलही काहीएक उल्लेख होता. मात्र, त्यामागचा इतिहास खऱ्या अर्थाने उलगडला गेला आहे तो या पुस्तकात. हे पुस्तक म्हणजे खरे तर क्रांतिकारक पांडुरंग खानखोजे यांचे चरित्र आहे. पुस्तकाच्या मूळ लेखिका सावित्री यांचे ते वडील. मात्र, खानखोजे यांचे सगळे आयुष्यच भारतीय स्वातंत्र्यलढय़ाला वाहिलेले असल्याने त्यांच्या या लढय़ाचा इतिहासच त्यांचे चरित्र बनून आपल्यापुढे या पुस्तकाद्वारे आला आहे.

Iran Israel Attack Updates in Marathi
जप्त केलेल्या जहाजावरील १७ कर्मचारी भारतीय अधिकाऱ्यांना भेटणार, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलं स्पष्ट
NCERT tweaks Class 12th History book: Harappans indigenous, doubts over Aryan migration
एनसीईआरटी अभ्यासक्रमात बदल; ‘आता आर्य भारतातलेच’, काय सांगते नवे संशोधन?
Constitutional ethics Prime Minister and Chief Minister A political and constitutional issue
समोरच्या बाकावरून: घटनात्मक नैतिकता पणाला..
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर

लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने देशाच्या स्वातंत्र्यासाठी पेटून उठलेल्या एका तरुण मुलाची ही कथा आहे. क्रांती हाच त्याचा ध्यास होता. वध्र्याजवळच्या एका छोटय़ाशा गावातला हा मुलगा. घरातल्या परंपरागत, जुन्या चालीरीतींत वाढलेला हा मुलगा पुढे अनेक आंतरराष्ट्रीय घटनांचा साक्षीदार बनतो आणि त्याचे निधर्मी विचारसरणीच्या, ‘मानवता हीच सगळ्यात श्रेष्ठ’ असे मानणाऱ्या व्यक्तीत रूपांतर होते, त्याचीसुद्धा ही कथा आहे.

भारताच्या स्वातंत्र्याचा ध्यास लागलेल्या खानखोजेंनी लहानपणी केलेल्या काही उपद्व्यापांमुळे पोलिसांची त्यांच्यावर नजर होती. घरच्यांचा त्यांच्या कामाला विरोध होता. त्यावेळी स्वातंत्र्य मिळवायचे तर लष्करी शिक्षण घेतले पाहिजे, त्यासाठी परदेशात जावे लागले तरी चालेल असे त्यांच्या मनाने घेतले आणि १९०६ साली एक दिवस बोटीत बसून त्यांनी जपान गाठले. तिथून काही दिवसांनी ते अमेरिकेला पोहोचले. जिथे जाऊ तिथे समानधर्मी लोक (मग ते कुठल्याही देशाचे असोत!) शोधायची त्यांची धडपड चालू होती. या काळात उदरनिर्वाहासाठी शेतात काम, रुग्णालयात साफसफाई इथपासून अनेक कामे त्यांनी केली. यादरम्यान सॅनफ्रान्सिस्कोच्या लष्करी अकादमीतून त्यांनी प्रशिक्षण घेतले. पुढे ओरेगॉनमधून शेतकी पदवीही घेतली. स्वातंत्र्यासाठी लष्करी प्रशिक्षण आणि स्वातंत्र्योत्तर भारताला शेतीसंबंधी नवीन दृष्टी देण्यासाठी आपल्या या शिक्षणाचा उपयोग होईल म्हणून त्यांनी हे शिक्षण घेतले होते.

याचदरम्यान पंडित काशीराम, बिशनदास कोचर, लाला हरदयाळ, सोहनसिंग अशा काहीजणांशी त्यांची मत्री जमली. डॉ. सन यत् सेन, लेनिन यांच्यासारख्या नेत्यांच्या भेटी झाल्या. अमेरिकेत भारतीयांसाठी काम करणाऱ्या ज्या अनेक छोटय़ा संस्था होत्या त्यांच्या एकत्रीकरणातून ‘गदर पार्टी’ सुरू झाली. तिच्या ‘प्रहारक’ विभागाचे खानखोजे हे प्रमुख होते. इतरांना लष्करी प्रशिक्षण देणे हे त्यांचे मुख्य काम. भारताबाहेर राहून भारतासाठी चळवळ करणारी ‘गदर’ ही पहिलीच संस्था होती. भारतात यादवी युद्ध सुरू करून ब्रिटिश सरकारला रंजीस आणण्याची त्यांची योजना होती. त्यानुसार निरनिराळ्या ठिकाणांहून कार्यकत्रे भारतात जायला निघाले. स्वत: खानखोजेंनी जर्मनी, अमेरिका, पíशया, अफगाणिस्तान अशा मिळेल त्या मार्गाने प्रवास केला. त्यावेळी त्यांच्यावर जिवावरचे काही प्रसंगही ओढवले. परंतु त्यांची ही योजना सफल झाली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे संपर्काचा अभाव, खोली नसलेल्या योजना आणि तर्कशुद्धतेच्या अभावाची विचारसरणी! विखुरलेल्या स्वरूपात काम करून अशा मोठय़ा मोहिमेत यश मिळणे शक्यच नव्हते. असे असले तरी या चळवळीतील प्रत्येकाने आपल्यापरीने प्रयत्न केले, हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.

प्रचंड धडपडीनंतरही यश न आल्याने असेल, पण खानखोजेंचा चळवळीतील रस १९२४ च्या सुमारास संपला. त्यानंतर त्यांनी मेक्सिकोत राहून शेती केली. मक्याच्या नवीन जातींवर संशोधन केले. मोफत शेतकी शाळा काढल्या. नंतर ते भारतात स्थायिक झाले. पण ना त्यांचे भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे स्वप्न साकार झाले, ना देशाला शेतीत स्वयंपूर्ण बनवायचे! त्यादृष्टीने त्यांची शोकांतिकाच झाली असे म्हणावे लागेल.

या पुस्तकाने एका अप्रकाशित, दुर्लक्षित कामावर, त्या कालखंडावर प्रकाश टाकला आहे. इतक्या जुन्या कालखंडाची तपशिलात माहिती जमवणे हे तसे जिकिरीचेच काम. ते सावित्री साव्हनी यांनी चिकाटीने पार पाडले आहे.

खानखोजे हे मध्यमवर्गीय, साध्या कुटुंबातून आलेले. परंतु किरकोळ व्यक्तिमत्त्वाच्या या माणसाने आयुष्यभर एका ध्यासापोटी जे काम केले, प्रचंड कष्ट उपसले, अफाट भ्रमंती केली, ते वाचून आश्चर्यचकित व्हायला होते. हा सगळाच प्रवास रोमहर्षक आहे. पण पुस्तकात तो तितकासा उतरलेला नाही. घटना, नावे, ठिकाणे, कालखंड या सगळ्यांची जंत्री लांबलचक झाली आहे. नावे द्यायला हवीत हे खरे असले तरी संख्येमुळे ती लक्षात राहत नाहीत. त्यांचे संदर्भ लागणे कठीण होते. गर्दीमुळे मुख्य क्रांतिकारकांची व्यक्तिमत्त्वेही डोळ्यांसमोर उभी राहत नाहीत. खुद्द खानखोजेंच्या बाबतीतही हे झाले आहे. नेरिझजवळची त्यांची सुटका, लेनिन यांच्या प्रभावामुळे त्यांचे ‘लेनिनिस्त’ होणे असे उल्लेखनीय प्रसंग फार थोडे आहेत. अर्थात असे असले तरीही हे एका मोठय़ा आणि दुर्लक्षित कालखंडाचे दस्तावेजीकरण आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व नाकारून चालणार नाही. हे पुस्तक म्हणजे पांडुरंग खानखोजे या व्यक्तीचे चरित्र असले तरी तो गदर पार्टीचा आणि बहुतेकांना अज्ञात असलेला भारताचा इतिहास आहे.

  • ‘मी कधीही माफी मागणार नाही’ – सावित्री साव्हनी, अनुवाद- अवंती महाजन,
  • मेहता पब्लिशिंग हाऊस,
  • पृष्ठे- ३१०, मूल्य-३५० रुपये.

सीमा भानू