अमेरिकेची सफर ही भारतीयांसाठी आता काही अप्रूपाची गोष्ट राहिलेली नाही. तरीही अमेरिकेला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांपकी अनेक जण अजूनही तिथल्या ‘माऊंट रशमोर’ला भेट देत नाहीत. केवळ एक शिल्प पाहण्यासाठी मुद्दाम एखाद्या ठिकाणी का जायचे? शिवाय इतर पाहण्यासारखे तिथे काही नाही, हेही एक त्यामागील कारण. आणि दुसरे म्हणजे अमेरिकेला घडविणाऱ्या राष्ट्राध्यक्षांबद्दल भारतीय पर्यटकांच्या मनात विशेष उत्सुकता नसावी. म्हणूनच माऊंट रशमोरबद्दल मुद्दाम लिहावेसे वाटले.

१८८५ साली न्यूयॉर्कचा अ‍ॅटर्नी चार्ल्स रशमोर हा अमेरिकेच्या साऊथ डाकोटा राज्यातल्या ब्लॅक हिल्स या टेकडय़ांतल्या खाणींच्या मालकी हक्कासंबंधी तपासणी करायला गेला होता. त्याच्यामुळे ‘माऊंट रशमोर’ असे नाव त्या टेकडय़ांना मिळाले. साऊथ डाकोटा राज्याला तेव्हा म्हणावा तसा उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध नव्हता. त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काहीतरी आगळेवेगळे करायला हवे, या विचारांतून एका शिल्पाची संकल्पना पुढे आली. १९२३ साली डाऊने रॉबिन्सन या इतिहासकाराने अमेरिकेच्या निर्मितीत महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या युगपुरुषांचं स्मारक ब्लॅक हिल्समध्ये निर्माण करण्यासाठी गुटझन बोरग्लम या शिल्पकाराला विनंती केली.

बोरग्लमचा जन्म अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या डॅनिश दाम्पत्याच्या पोटी १८६७ साली झाला. त्याने पॅरिस आणि न्यूयॉर्कमध्ये कला विषयाचे शिक्षण घेतले आणि पुढे तो विख्यात शिल्पकार झाला.

..तर डाऊने रॉबिन्सनच्या सूचनेनंतर १९२५ साली सरकारने ब्लॅक हिल्समध्ये स्मारक तयार करण्यासाठी अधिकृत परवानगीही दिली. बोरग्लम साऊथ डाकोटाला आला आणि त्याने टेकडीचा आकार, सूर्यप्रकाशाची सकाळची, माध्यान्हीची दिशा, ग्रॅनाइटचा पोत आणि दणकटपणा या सगळ्या बाबींचा विचार करून माऊंट रशमोरची या स्मारकासाठी निवड केली. अमेरिकन संघराज्याच्या उभारणीत आणि वाटचालीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचा या स्मारकासाठी विचार व्हावा असा प्रस्ताव बोरग्लमने मांडला. १९२९ मध्ये माऊंट रशमोर राष्ट्रीय स्मारक कायदा करून निधी जमवण्यासाठी आणि स्मारकाच्या कामाचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी कमिशनची स्थापना करण्यात आली. पण तरी सगळच काही आलबेल नव्हते. त्याच सुमारास अमेरिकन स्टॉक एक्स्चेंजमध्ये मोठी घसरण झाली. आणि अमेरिकेत आलेल्या मंदीच्या लाटेमुळे या प्रकल्पाला मोठा तडाखा बसला. अशा काहीशा नराश्यपूर्ण वातावरणात बोरग्लमने स्मारकासाठी खोदकामाला प्रारंभ केला.

शिल्पकार बोरग्लमने ज्या चार राष्ट्राध्यक्षांच्या चेहऱ्याची स्मारकासाठी निवड केली, त्यांत साहजिकपणे जॉर्ज वॉशिंग्टन यांचे नाव सर्वप्रथम पुढे आले. ग्रेट ब्रिटनविरुद्धच्या अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात वॉशिंग्टन यांनी सन्याचे नेतृत्व केले होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून वॉशिंग्टन यांची एकमताने निवड झाली. त्यामुळेच वॉशिंग्टन यांच्या चेहऱ्याला शिल्पाकृतीत पहिला मान मिळाला. १९३० साली स्वातंत्र्ययुद्धाच्या या नायकाचा.. पहिल्या राष्ट्राध्यक्षांचा चेहरा शिल्पाकृतीत साकारला गेला. त्यांचा चेहरा बाकीच्या तीन शिल्पाकृतींपेक्षा अधिक उंचीवर खोदला गेल्यामुळे त्याला उचित महत्त्वही प्राप्त झाले.

वॉशिंग्टननंतर ज्यांनी अमेरिकेची घटना निर्माण केली त्या थॉमस जेफरसन यांचे शिल्प निर्माण केले गेले. ठिसूळ ग्रॅनाइटमुळे या शिल्पाची मूळ जागा बदलून जेफरसन यांचा चेहरा वॉशिंग्टन यांच्या डाव्या बाजूला नव्याने खोदण्यात आला. जेफरसन यांनी १८०३ साली लुईसिआना प्रांत फ्रेंचांकडून विकत घेऊन अमेरिकन साम्राज्य दुपटीने वाढवले. हे करताना साऊथ डाकोटासह जवळजवळ १५ राज्यांची अमेरिकेत भर पडली. १९३६ साली जेफरसन यांचे शिल्प राष्ट्राला अर्पण केले गेले. त्या समारंभाला त्यावेळचे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट हजर होते.

‘अमेरिकेची फाळणी टाळणारा महापुरुष’ या शब्दांत ज्यांचे सार्थ वर्णन केले जाते त्या अब्राहम लिंकन यांचे शिल्प जेफरसन यांच्यानंतर १९३७ साली निर्माण करण्यात आले. गुलामगिरीची अमानुष प्रथा मोडीत काढण्यासाठी गुलामगिरीला पाठिंबा देणाऱ्या अमेरिकेत फार मोठे वर्चस्व असणाऱ्या धनाढय़ आघाडीशी अब्राहम लिंकन यांना सशस्त्र संघर्ष करावा लागला. त्यावेळी देशाची फाळणी होण्याची दाट शक्यता होती. पण साम-दाम-दंड-भेद अशा सगळ्या नीतींचा उपयोग करून लिंकन यांनी देशाची फाळणी टाळली. १८६२ साली गुलामगिरी नाहीशी करण्याची महत्त्वाची घोषणा केल्यावर १८६५ साली त्याची किंमत या महापुरुषाला खुनी हल्ल्यात आपल्या प्राणाची आहुती देऊन चुकवावी लागली.

सर्वात शेवटी १९३९ साली जेफरसन आणि लिंकन यांच्या शिल्पाकृतींच्या मधल्या भागात थिओडोर रुझवेल्ट यांचं शिल्प निर्माण करण्यात आलं. याच थिओडोर रुझवेल्ट यांच्या प्रेरणेने अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांना जोडणारा प्रसिद्ध पनामा कालवा निर्माण करण्यात आला. रुझवेल्ट यांची आणखी एक महत्त्वाची कामगिरी म्हणजे लाखो एकर प्रदेश मोकळा ठेवण्याचा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचा निर्णय त्यांच्या कारकीर्दीत घेतला गेला. या निर्णयामुळे अमेरिकेत आज निरनिराळ्या भागांत लाखो एकर मोकळी जागा संरक्षित ठेवून तिथे कुठलाही हस्तक्षेप न होता राष्ट्रीय वनसंपत्ती सुरक्षित ठेवली गेली आहे.

१९४१ साली शिल्पकार गुटझेन बोरग्लम यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात लिंकन बोरग्लम या त्यांच्या मुलाने स्मारकाचे राहिलेले काम ३१ ऑक्टोबर १९४१ साली पूर्णत्वास नेले. पुढे स्मारकाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त माऊंट रशमोर स्मारक परिसराचा मोठय़ा प्रमाणात विकास करण्यात आला. चारही राष्ट्राध्यक्षांचे चेहरे स्पष्ट न्याहाळता यावेत यासाठी ग्रँड व्ह्य़ू टेरेस बांधण्यात आली. तिथे उभं राहून चारही राष्ट्राध्यक्षांच्या चेहऱ्याचं थेट समोरून दर्शन घडतं. या गॅलरीपासून निघून परत गॅलरीकडे येणारी एक लांबलचक वर्तुळाकार पायवाट (जी ‘प्रेसिडेन्शियल ट्रेल’ या नावाने ओळखली जाते.) तयार केली गेली. या पायवाटेवरून चालत जाताना प्रत्येक चेहऱ्याचे अधिक जवळून स्वतंत्र दर्शन करणे शक्य होते. पायवाटेवरून परत येताना एक स्टुडिओ आहे. तिथे एवढय़ा मोठय़ा शिल्पाची निर्मिती करताना बोरग्लमने जे छोटे पुतळे प्रोटोटाइप म्हणून वापरले, ते ठेवलेले आहेत. एक पुस्तकालयही आहे. ग्रँड व्ह्य़ू टेरेसवर एक अ‍ॅम्फी थिएटर आहे- जिथे या प्रचंड स्मारकाची निर्मिती कशी झाली याची साद्यंत माहिती देणारी सुंदर चित्रफीत दाखवण्यात येते. ही फिल्म पाहिली की हे महाकाय शिल्प साकारताना किती अचूक योजना राबवली गेली याची कल्पना येते आणि शिल्पकाराच्या दूरदृष्टीचे आणि त्याने योजलेल्या सांघिक कौशल्याचे कौतुक वाटते.

या शिल्पातील नाकाची लांबी २० फूट, डोळ्याची रुंदी ११ फूट आणि जिवणी १८ फूट रुंद आहे.. यावरून या शिल्पाच्या भव्यतेची कल्पना यावी. हे शिल्प साकारताना ४०० कुशल-अकुशल कारागीर राबत होते. त्यांना त्याकाळी ताशी ३५ सेन्टस्पासून १५० डॉलपर्यंत मेहनताना मिळत असे. संपूर्ण शिल्पनिर्मितीच्या १४ वर्षांच्या काळात काही किरकोळ अपघात झाले, पण एकाही व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला नाही. सुमारे साडेचार लाख टन खडक सुरुंग लावून फोडण्यात आला. मूळ शिल्पनिर्मितीचा खर्च नऊ लाख ९० हजार डॉलर्स असून त्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त करण्यात आलेल्या विकासकामांसाठी पाच कोटी साठ लाख डॉलर्स खर्च झाला. शिल्पामध्ये निर्माण होणाऱ्या भेगा वेळोवेळी बुजवल्या जातात. २००५ साली पहिल्यांदा तीव्र दाबाखाली पाणी फवारून हे शिल्प धुतलं गेलं.

या शिल्प-स्मारकाकडे जाताना एक रस्ता (अ‍ॅव्हेन्यू) तयार केला गेला आहे- ज्याच्या दुतर्फा अमेरिकेच्या निरनिराळ्या राज्यांचे ध्वज लावलेले आहेत. या रस्त्यावर उभे राहून फोटो काढला तर शिल्पातील चारही राष्ट्राध्यक्षांच्या चेहऱ्याचा संपूर्ण फोटो पाश्र्वभूमीला मिळू शकतो. दरवर्षी ३० लाख पर्यटक या स्मारकाला भेट देतात.

या महाकाय शिल्पाशी निगडित एक गमतीदार प्रसंग आहे. हिचकॉकच्या ‘नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट’ या १९५९ सालातील कॅरी ग्रँटची प्रमुख भूमिका असलेल्या उत्कंठावर्धक सिनेमातला शेवटचा चित्तथरारक प्रसंग माऊंट रशमोर स्मारकाच्या पाश्र्वभूमीवर चित्रित केला गेला आहे. हिचकॉकला हा प्रसंग प्रत्यक्ष शिल्प असलेल्या टेकडीवर चित्रित करायचा होता. पण तशी परवानगी न मिळाल्यामुळे शिल्पाची प्रतिकृती स्टुडिओत तयार करून तो प्रसंग चित्रित केला गेला!

तर अशा या आगळ्यावेगळ्या शिल्प-स्मारकाला अमेरिकेच्या सफरीत भारतीयांनी आवर्जून भेट द्यायला हवी!

– राजीव मुळ्ये

ramuly48@gmail.com