प्रिय उल्हासदादा,

मी रागावलेय तुमच्यावर प्रचंड! हे असं चालत नाही बरं का मैत्रीत.. याला काय अर्थ आहे? न सांगतासवरता अचानक बोलेनासे झालात आणि चक्क निघून गेलात.. अनेक गोष्टींची तक्रार आपण एकमेकांजवळ करायचो, तशीच ही तक्रारसुद्धा तुमच्याकडेच करावीशी वाटतेय. अजिबात पटलं नाही मला हे असं तुमचं निघून जाणं. आठवणींच्या कल्लोळात स्वत:ला हरवून बसलेय मी. काय काय आठवतंय.. माझ्या प्रबंधासाठी मी तुमच्या घरी २००५ साली पहिल्यांदा आले त्या क्षणापासून ते आपण शेवटचे बोललो त्या नोव्हेंबर १७ पर्यंतचे अनंत क्षण..! तुमच्या घरी तसं दबकत दबकतच पाऊल टाकलं होतं. एक खूप मोठा कलाकार.. पंचमदांकडे ज्यांनी अनेक अविस्मरणीय गाण्यांत संतूरवादन केलंय.. बाप रे! छाती दडपून टाकायला एवढं पुरेसं होतं. पण दार उघडताक्षणी समोर उभं राहिलं एक अत्यंत दिलखुलास, निरागस, हसऱ्या चेहऱ्याचं व्यक्तिमत्त्व. हेच ते? नक्की? असं वाटेपर्यंत तुम्ही वातावरण इतकं खेळकर करून टाकलंत, की लिहून आणलेले प्रश्न पडले बाजूला आणि मस्त गप्पांची बैठक रंगली आपली! मुळात हिंदी चित्रपट गीतांवर कुणी पीएच. डी. करतंय, एवढय़ा आत्मीयतेने गाण्यांचा, त्यातल्या बारकाव्यांचा विचार करतंय या कल्पनेनंच तुम्ही उत्तेजित झाला होतात. आणि मग आपल्या गप्पा गदिमा, बाबूजी, लक्ष्मीकांत- प्यारेलाल, खय्याम, जयदेव अशी एकेक मातब्बर मंडळी, त्यांच्याबद्दलचे तुमचे अनुभव.. अशी स्टेशनं घेत घेत ‘पंचम’ या हळव्या मकामवर येऊन पोचल्या.. घडय़ाळ बघायचं आपण बंद केलं.. रेखावहिनी मधूनमधून चहा वगैरे देत होत्या, कौतुकाने पाहत होत्या. गदिमांचं एक गाणं नुसतं कवितास्वरूपात मी म्हणून दाखवलं. त्या शब्दांनी तुमच्या डोळ्यांत तरळलेलं पाणी! कुंडली जमलीच मग आपली! हे पाणीच जोडतं अशी नाती. मग त्या नात्यांना व्याख्या लागत नाही दादा.. हो ना? त्या दिवसापासून मैत्रीचा एक घट्ट धागा गुंफला गेला. मग अगदी ‘संतूरच्या भावविश्वात’साठी गाणी निवडणं असो, ती गाणी तुम्हाला सी. डी.वर करून देणं असो.. सगळ्यात मला सहभागी करून घेतलंत. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या मताला किंमत दिलीत, हा तुमचा मोठेपणा.. आमची कॉलर उगीच ताठ!

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
pune school girl suicide, pune school girl attempts suicide
धक्कादायक! तरुणाच्या त्रासामुळे शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न; लोणी काळभोर येथील घटना

‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ पुरवणीत सदर लिहायला लागल्यावर दर रविवारी सकाळी तुमचा दीर्घ मुदतीचा फोन ठरलेला आणि ते मिश्कील बोलणं.. सगळं स्वच्छ आठवतंय. ‘नमस्कार सर’ म्हटल्यावर ‘मी रागावलोय आता तुझ्यावर..’ असा लटका राग. ‘का हो सर?’ असं विचारल्यावर, ‘हे असं इतकं छान लिहिलंस. रडवलंस तू मला सकाळी सकाळी!’ असं म्हणत मग सुरू व्हायचा तो गप्पांचा निरंतर प्रवाह..आणि लेख इतका बारकाईने वाचायचात, की एखादी बारकीशी चूकसुद्धा लक्षात आणून द्यायचात.. तासन् तास बोलायचो आपण. एकीकडे माझी स्वयंपाकघरात कामं सुरू असायची.. भांडय़ांचे आवाज येत असायचे तुम्हाला. मग म्हणायचात, ‘कामात आहेस ना?’ त्यावर माझं उत्तर-‘दादा, कामं नेहमीचीच असतात. तुमच्यासारख्या व्यक्तींशी बोलताना आम्ही किती श्रीमंत होत असतो हे कसं सांगू तुम्हाला?’ कैक विषय असायचे.

तुमच्या संतापाचा विषय म्हणजे संगीत क्षेत्रातलं राजकारण, मैफिलीत घुसलेले विविध गिमिक्स.. त्यावर काय अप्रतिम, परखडपणे लिहिलंत ‘लोकसत्ता’मध्ये तुम्ही! तुमच्या विलक्षण सौम्य व्यक्तिमत्त्वात एक तत्त्वनिष्ठ, परखड कलाकार होता. कलेशी प्रतारणा करणाऱ्या व्यक्ती, खोटं बोलणारी मंडळी त्यामुळे तुमच्यापुढे टिकूच शकली नाहीत कधी. फार व्यथित व्हायचात तुम्ही. एखादी माहिती तुमच्याकडून मिळाल्याचा उल्लेख मी माझ्या लेखात केला तरी तुम्हाला कोण आनंद! संगीतकार जयदेवबद्दल बोलत असताना तुम्हीच लक्षात आणून दिलंत की, ‘अल्ला तेरो नाम’ या गाण्याच्या अंतऱ्यात पंचमाला सा मानला तर ‘अल्ला तेरो नाम’चे म्हणजे धृवपदाचेच स्वर आहेत.’ माझ्या जयदेवजींवरच्या लेखात मी तसा उल्लेख केला.. त्याचंच कौतुक! मी म्हणायचे, ‘अहो, तसं लिहिलंच पाहिजे मी. त्यात काय?’ तर म्हणायचात, ‘अगं, एवढंही सौजन्य दाखवत नाहीत लोक!’ अनेकदा कुठलं तरी गाणं तुम्हाला खूप आवडायचं. मग मला फोन ठरलेला. ‘मृदुला, या गाण्यावर तू लिहिलंच पाहिजेस.’ ..मी निघायच्या गडबडीत असल्याचंही तुम्हाला कळायचं. म्हणायचात, ‘घाईत आहेस ना? पण मग मी विसरून जाईन गं हे गाणं. मग ती रुखरुख लागून राहील मनाला. म्हणून ताबडतोब तुला सांगून मोकळा होतो.’ कुठून यायची ही ऊर्मी, हा उमाळा? कधी कधी मी फोन घेऊ  शकले नाही की मेसेज करायचे- ‘पाच मिनिटांनी फोन करते दादा.’ ..आणि मग कामाच्या धबडग्यात दोन दिवस फोन करायला जमायचंच नाही. नंतर फोन केला की पहिलं वाक्य..‘वाट बघतोय तुझी पाच मिनिटं केव्हा संपतायत त्याची!’ मग गप्पा सुरू.. मला म्हणालात, ‘आपल्याला यश मिळायला लागलं की आपले ‘हितचिंतक’ वाढतात. मग खरे प्रॉब्लेम्स सुरू होतात.’ मी म्हणाले, ‘म्हणजे काय?’ तर म्हणालात, ‘अगं, आपल्या हितामुळे ज्यांची चिंता वाढते त्यांना मी ‘हितचिंतक’ म्हणतो.’ असं काही मार्मिक बोलणं ही तर तुमची खासियत. आणि लटकं रागवायचात पण! आठवणीनं फोन केला नाही की! जीव लावावा कसा.. लावून घ्यावाही कसा? तर असा! मी तुम्हाला ‘सर’ म्हणत असे. ते तुम्हाला फारसं रुचलं नाही. मग म्हणालात, ‘मला ‘दादा’ म्हण.’ या आपुलकीने माझं धाडस वाढलं आणि मी तुम्हाला चक्क ‘माझ्या कार्यक्रमात याल का?’ असं विचारलं. खरंच, केवढं हे धाडस! तुम्ही किती मोठे कलाकार! आमच्याबरोबर स्टेजवर आपली कला सादर करणार? पण माझ्यावरच्या आणि गाण्यांवरच्या प्रेमापोटी दादरला माझ्या ‘रहे ना रहे हम’मध्ये सहभागी झालात. पंचमवर अप्रतिम बोललात..आणि चक्क ‘मेरा कुछ सामान’ या गाण्यात संतूर वाजवलंत. तुम्हाला कल्पना नसेल- काय सोन्याचा क्षण दिलात मला तुम्ही! आणि सगळ्यात सुंदर होतं ते ‘तेरे लिये पलकों की झालर बुनू..’! कसं काय साध्य होतं तुम्हाला संतूरसारख्या वाद्यावर मींड आणि होल्ड नोट? काहीतरीच! त्या ‘हे’वरचा स्वर सलग लावायचात तुम्ही संतूरवर! श्रोते त्या रोमांचित करणाऱ्या क्षणांमुळे अचंबित.. आणि आम्ही स्तब्ध! हे अतक्र्यच होतं.

तुमची सूक्ष्म विनोदबुद्धी ठायी ठायी दिसायची. पण खरं सांगू, आजच्या भाषेत ज्याला attitude  म्हणतात तो तुमच्याकडे जरा हवा होता. स्वरयोग संस्थेतर्फे  तुम्हाला ‘वसंत देसाई पुरस्कार’ द्यायचा ठरला; आणि हे मी तुम्हाला फोन करून कळवलं.. तर तुमची प्रतिक्रिया काय? ‘मृदुला, मी खरंच योग्य आहे ना या पुरस्कारासाठी? मी नाही वाजवलं कधी वसंत देसाईजींकडे. तसं मी सांगून टाकू का त्यांना. त्यांचा काही गैरसमज नाही ना झालेला?’ इतकं साधं असावं माणसानं? कशासाठी? स्वत:ला एवढे कटू अनुभव येऊनही स्वभावातली निर्मळ प्रसन्नता  टिकवणं किती जणांना जमतं? अशा अनुभवांतून व्यक्ती एक तर तुसडी आणि उठसूट सगळ्यावर नकारात्मक टीका करणारी तरी होते, किंवा जास्तच परिपक्व होऊन या सगळ्याकडे त्रयस्थ नजरेने पाहायला शिकते. तुम्ही असेच झालात. जास्त क्षमाशील! कारण एक तर विलक्षण विनोदबुद्धी होती तुम्हाला. स्वत:वर विनोद करणाऱ्या अस्तंगत जमातीचे होतात तुम्ही. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले अनेक लोक आपण बघतो. स्वत:च्या कलेचा दर्प असणारे तथाकथित स्वयंघोषित सेलिब्रिटी जागोजागी दिसतात. त्या गर्दीत तुमचा हा गुण फार लख्ख उठून दिसायचा. माझ्या एका फोनवर आमच्या मुंबई विद्यापीठात आलात. सुंदर भाषण केलंत. स्वत:च्या अस्तित्वाचा उगीच कधी ताण येऊ  दिला नाहीत कुणावर. खरं म्हणजे तुमचं chromatic tuning… दहा थाटांची विशिष्ट रचना.. काही अत्यंत अवघड, क्लिष्ट रचना.. अनेक दिग्गज संगीतकारांकडचं तुमचं काम.. हे सगळं पुरेसं होतं ‘ग’ची बाधा व्हायला. पण तुम्ही कमालीचे साधे राहिलात. कारण एक विद्यार्थी कायम जिवंत होता तुमच्यात. आणि सर्वात दुर्मीळ गुण होता तो म्हणजे समोरच्याचं काही आवडलं तर भरभरून कौतुक करण्याचा. ‘तुझ्याएवढं बारकाईनं गाणं मीही ऐकलेलं नाही..’ हे सहज बोलताना कुठलेही कष्ट पडले नाहीत तुम्हाला. पण दादा, मला गाण्याकडे असं निरखून बघायला भाग पाडलंत तुम्ही.

..आता कधी ऐकू ते खळखळून हसणं? कुणाकडून ऐकू मार्मिक कोटय़ा? तुमच्या सूक्ष्म विनोदबुद्धीला कशी दाद देऊ? कुणाला हक्काने फोन करू- काही शंका असली तर? खास कलेच्या क्षेत्रातल्या राजकारणी तक्रारी कुणाला सांगू आता? आपण शेवटचे बोललो ते साधारण १०-१२ नोव्हेंबरला.. शुभा मुद्गल आणि डॉ. अनिश प्रधान यांच्या फिल्म संगीतावरच्या एका सेमिनारबद्दल! त्यात मी चर्चासत्रात व्यासपीठावर असावं, ही तुमची तीव्र इच्छा तुम्ही पूर्ण केलीत शेवटी. स्वत: जमशेदपूरला गेलात आणि आजारी पडलात. ध्यानीमनी नसताना अनिश प्रधानांचा मला फोन येतो काय; ‘पंडित उल्हास बापटने आपको बुलाने को कहा है।’ असं ते म्हणतात काय.. सगळंच अतक्र्य. दादा, मी त्या सेमिनारमध्ये फक्त तुम्हाला खुर्चीवर बसवलं होतं समोरच्या. असं नव्हतं सामील व्हायचं मला तिथे तुमच्याशिवाय. पण जाता जाता हासुद्धा हट्ट पूर्ण करून गेलात ना? आणि भेटलाही नाहीत पुन्हा. असं वाटतंय, तुम्ही गेल्यावर सोशल मीडियावर जे उधाण आलंय.. तुमची संतूरवरची भावगीतं.. तुमचं योगदान.. कुठल्या गाण्यांमध्ये तुम्ही संतूर वाजवलंय.. वगैरे वगैरे.. यातलं जरा तरी कौतुक तुम्ही असताना झालं असतं ना, तरी लहान मुलासारखं हरखून मला फोन लावला असतात तुम्ही. ‘बघ, माझ्यावर काय लिहून आलंय ते!’असं म्हणाला असतात. कारण कुठेतरी राजकारणाची झळ तुम्हालाही पोचली होतीच. आता हा लेख तुम्ही कसा वाचणार? तुमच्या पंच्याहत्तरीला लिहिलं असतं तुमच्यावर- खूप मनापासून.. आणि शाबासकी मिळवली असती तुमची.

पंचमला दिलेलं वचन पाळलंत. तो म्हणाला होता, ‘जैसे हो, वैसेही रहो।’ तसेच राहिलात साधेसुधे. फिल्मीगिरीचा स्पर्श नसलेले. ‘तेरे लिये पलको की झालर बुनू..’ हे तुमचं सगळ्यात आवडतं पंचमचं गाणं. तुमची पंचमभक्ती ही तशीच समर्पित. जणू पंचमलाच उद्देशून हे म्हणत असायचात तुम्ही. तो सगळ्यात हळवा कोपरा होता तुमचा. पण दादा, आमच्या पापण्यांवरचा अश्रूंचा पडदा हटायला तयार नाही ना! गेलात ना आपल्या दोस्ताला भेटायला त्याच तारखेला (अ) शुभमुहूर्त साधून? तुम्हीच लिहिलं आहे- ‘चार जानेवारी ही तारीख मला चोर जानेवारी अशी वाटते. कारण पंचमदांना आपल्यापासून कोणीतरी हिरावून घेऊन गेलं.’ तीच तारीख! तुम्हालाही नेलं कोणीतरी आमच्यापासून लांब. ऐसा नहीं होता दोस्त.. ये गलत किया आपने. माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला हजर राहणार होतात. ‘मी बोलणार आहे हं तुझ्या लिखाणावर,’ असं स्वत:च बजावलं होतंत. आपला करार होता. तो मोडलात तुम्ही. वाटतंय, एखाद्या सकाळी तुमचा फोन येणार आणि तुम्ही म्हणणार, ‘कामात आहेस ना? पण हे गाणं ऐक.. लिही याच्यावर.’ दादा, म्हणूनच खूप रागावलेय तुमच्यावर मी. आता माझी पाच मिनिटं कधीच नाही संपणार.. कधीच नाही..

डॉ. मृदुला दाढे जोशी

mrudulasjoshi@gmail.com