‘वाडा’ नाटय़त्रयीच्या तिसऱ्या भागात- ‘युगान्त’मध्ये नाटककार महेश एलकुंचवार यांनी एक वाक्य लिहिलं आहे : ‘मूल असणं आणि त्याचा दायाद त्याला देता न येणं याहून मोठा अपराध नाही.’ ‘दायाद’ म्हणजे इथे ‘वारसा’ हा अर्थ अभिप्रेत आहे. वारसा दोन प्रकारचा असू शकतो. एक म्हणजे वस्तूरूपातला आणि दुसरा म्हणजे मौखिकरूपातला. ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगान्त’ ही नाटय़त्रयी चंद्रकांत कुलकर्णी यांनी सुमारे पंचवीस वर्षांच्या अंतरानं दोनदा रंगभूमीवर आणली. दोन्ही वेळेस तिला अफाट प्रतिसाद मिळाला. आता हा ‘वाडा’रूपी वारसा पुढील पिढय़ांपर्यंत पोहोचवताना ‘युगान्त’मधल्या त्याच वाक्याचा विचार चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दळवी यांनी केला असावा. म्हणूनच जिगीषा प्रकाशनच्या माध्यमातून या नाटय़त्रयीवर आधारित ‘दायाद’ हे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केलं आहे. हे केवळ पुस्तक नाही; तर हा आहे एक अनमोल नाटय़ठेवा.. जो पुन:पुन्हा अनुभवावा, मनात ठेवावा आणि पिढय़ान ्पिढय़ा जपावा असा.

‘वाडा’ नाटय़त्रयी ही एक अजरामर नाटय़कृती आहे. ही नाटय़कृती अजरामर का आहे, हे प्रत्यक्ष ती पाहिल्याशिवाय आणि अनुभवल्याविना कळत नाही. नाटक वाचणं आणि ते प्रत्यक्ष पाहणं, यांत जमीन-अस्मानाचा फरक असतो. चाळीस वर्षांपूर्वीची ही नाटय़कृती आजही सर्वार्थानं समकालीन आहे, हे महेश एलकुंचवार आणि त्यांच्या लेखणीचं मोठेपण. ‘वाडा’ नाटय़त्रयीचा अनुभव केवळ समृद्ध करत नाही, तर अस्वस्थही करतो.. माणूस म्हणून विचार करायला भाग पाडतो. वास्तवातून अमूर्ततेचा प्रवास दाखवतो. आपल्या क्षणभंगुर आयुष्यात मानवी नातेसंबंध, आपुलकी, माणुसकी, प्रेम याच भावना शाश्वत असल्याची पुन्हा प्रकर्षांने जाणीव करून देतो.

तर, आता या पुस्तकाविषयी.. कुठल्याही (बऱ्याचदा चांगल्या) कामाचं डॉक्युमेंटेशन न करणं, मौखिक परंपरा चालू ठेवणं ही आपली संस्कृती. चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दळवी यांनी मात्र या संस्कृतीला फाटा दिला, हे महत्त्वाचं. त्याशिवाय हा ‘दायाद’ पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहोचूच शकला नसता. आणि मग ही नाटय़कृती पाहिलेली आताची पिढी पुढच्या पिढय़ांना नुसतीच सांगत राहिली असती, की आम्ही ‘वाडा’ नाटय़त्रयी पाहिली होती आणि ती किती भारी होती, वगैरे. ती का भारी होती, महत्त्वाची होती, हे सविस्तर मांडण्याचं काम ‘दायाद’ या पुस्तकातून झालं आहे. ही नाटय़त्रयी कशी घडली, ती घडवण्यासाठी काय विचार केला गेला, प्रत्यक्ष आखणी कशी झाली, या प्रवासात कोणत्या अडचणी आल्या याची वाचनीय माहिती या पुस्तकात आली आहे. पुस्तकात एकूण पाच विभाग आहेत. त्यातील ‘वाडा उभारताना’ आणि ‘वाडा जगताना’ या दोन विभागांतून प्रत्यक्ष नाटक घडण्याच्या प्रक्रियेची माहिती मिळते. समीक्षक या नाटय़कृतीबद्दल काय म्हणतात हे ‘अनुभवमग्न होताना’ या विभागात वाचायला मिळते. तर प्रेक्षकांच्या भावना ‘प्रतिसादाच्या चांदण्यात’ या विभागात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. १९९४ मधल्या त्रिनाटय़धारेबद्दलचा फ्लॅशबॅकही यात अंतर्भूत आहे. सोबत दोन्ही वेळची- म्हणजे १९९४ आणि २०१७ मधील ‘वाडा’ची भरपूर छायाचित्रं, नाटकाला मिळालेले पुरस्कार, नेपथ्याचं रेखाटन, प्रयोगाच्या जाहिराती, कुठे प्रयोग झाले आदी तपशीलही या पुस्तकात देण्यात आला आहे. एका अर्थानं हे पुस्तक म्हणजे एकाच नाटय़कृतीच्या दोन काळाचं दस्तावेजीकरण आहे.. दायाद आहे.

‘वाडा उभारताना’ आणि ‘वाडा जगताना’ हे विभाग या पुस्तकाचे केंद्रबिंदू आहेत. कारण या विभागांमध्ये नाटकाची निर्मितीकथा आणि घडण्याच्या प्रक्रियेचा विचार आहे. ‘वाडा’ नाटय़त्रयीचं शिवधनुष्य चंद्रकांत कुलकर्णी यांनी दोन वेळा उचललं. ते उचलताना काय कष्ट करावे लागले, याविषयी त्यांनी ‘वाडय़ात माझं आतडं गुंतलंय’ या लेखात मांडलं आहे. त्यांच्या या लेखातून त्यांचा ‘वाडा..’ साकारण्यामागचा विचार व प्रक्रिया स्पष्ट झाली आहेच; शिवाय नाटक या माध्यमाविषयीचं त्यांचं मुक्तचिंतनही त्यात आहे. नाटककाराचे शब्द मंचावर आणताना  दिग्दर्शक काय काय करतो, हे त्यातून समजून येते. दिग्दर्शकाच्या नजरेतून वाडय़ाकडे पाहणं खूपच महत्त्वाचं आहे. खरं तर नाटक हे नाटककाराचं माध्यम आहे असं मानलं जातं. पण नाटक ही एक समूहकला आहे. निर्माता, प्रकाशयोजनाकार, नेपथ्यकार, संगीत दिग्दर्शक, विशेषत: अभिनेते हे या कलाकृतीतले महत्त्वाचे घटक असतात. नाटकाविषयी नाटककार आणि दिग्दर्शक जितका विचार करतो, तसाच या सर्वानासुद्धा करावा लागतो. भले तो विचार नाटककार आणि दिग्दर्शकाच्या विचारातूनच पुढे विकसित झाला असेल. मात्र, कलाकृतीच्या घडण्याविषयी या सर्वाना काहीतरी वाटत असतंच.. त्यांचाही काहीएक विचार असतो. या सर्वाच्या विचारांविना कलाकृतीला पूर्णत्व येऊ शकत नाही. ‘वाडा’ नाटय़त्रयीचे संगीतकार राहुल रानडे, नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये, वेशभूषाकार प्रतिमा जोशी-भाग्यश्री जाधव, प्रकाशयोजनाकार रवी-रसिक, निर्माते दिलीप जाधव, श्रीपाद पद्माकर या सर्वांनी त्यांच्या भावना मनमोकळेपणानं पुस्तकात व्यक्त केल्या आहेत.

‘वाडा’ नाटय़त्रयीत खरं तर नाटकाची प्रत्येक बाजू महत्त्वाची आहे. पण विशेषत्वानं उल्लेख करावा लागेल तो नेपथ्याचा. एक मोठा पट नेपथ्याच्या रूपानं प्रेक्षकांना पाहता येतो. नाटकागणिक बदलणारं नेपथ्य प्रेक्षकांचा विचारही बदलतं. प्रदीप मुळ्ये या अवलिया नेपथ्यकारानं उभारलेला हा ‘वाडा’ पुढे तो भग्न होईपर्यंत किती बारकाईनं त्याचा विचार केला आहे, हे वाचून थक्क व्हायला होतं. मुळ्येंना एकाच नाटकाचं दोन वेगळ्या काळांमध्ये नेपथ्य करण्याची संधी या नाटकाच्या रूपानं मिळाली. त्यामुळे दोन्ही वेळा नेपथ्यरचना करताना त्यांनी काय विचार केला, त्याची कशी डिझाइन्स तयार केली, हे यात सचित्र वाचायला मिळतं. अमूर्त ते मूर्ततेचा आणि मूर्त ते अमूर्ततेचा प्रवास त्यांनी नेपथ्यातून किती विचारपूर्वक मांडलाय, हे या लेखातून आकळतं.

ज्यांच्या माध्यमातून ‘वाडा..’तील अस्सल व्यक्तिरेखा उभ्या राहिल्या आहेत, त्या सर्वच कलाकारांची प्रामाणिक मनोगतं ‘दायाद’च्या ‘वाडा जगताना’ या विभागात आहेत. वैभव मांगले, निवेदिता सराफ, चिन्मय मांडलेकर, प्रसाद ओक, सिद्धार्थ चांदेकर, भारती पाटील, पौर्णिमा मनोहर, प्रतिमा जोशी, नेहा जोशी, राम दौंड या सर्वाच्या अनुभवाची जातकुळी एक असली तरीही प्रत्येकाची त्याला भिडण्याची शैली निराळी आहे. त्यामुळे तालीम प्रक्रियेची ही हकिगत अत्यंत रोचक झाली आहे. एखाद्या नाटकानं कलाकार समृद्ध होतो, घडतो म्हणजे नेमकं काय, हे या कलाकारांचे लेख वाचून कळतं. कलाकारांच्या समर्पणातून, समरस होण्यातूनच ही अजरामर कलाकृती उभी राहिली आहे. तसंच महेश एलकुंचवारांची प्रदीर्घ मुलाखतही समृद्ध करते. नाटकाविषयी, साहित्याविषयी आणि एकूणच जगण्याविषयीचा त्यांचा सघन विचार या मुलाखतीतून वाचायला मिळतो. याखेरीज पूर्वीच्या ‘वाडा’च्या नटसंचातील सचिन खेडेकर, त्यावेळचे निर्माते ‘आविष्कार’ नाटय़संस्थेचे अरुण काकडे यांच्यासह अतुल देऊळगावकर, सुधीर पटवर्धन, विजय तापस यांचे लेखही उत्तम आहेत. या पुस्तकातील खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात दोन्ही काळांतली छायाचित्रं पाहायला मिळतात. तसंच हिंदीमध्ये झालेल्या ‘वाडा’च्या प्रयोगाची दखलही छायाचित्रांच्या रूपानं घेण्यात आली आहे.

चंद्रकांत कुलकर्णी यांनी नाटक साकारण्याचं शिवधनुष्य जसं पेललं, तसंच प्रशांत दळवी यांनी ‘दायाद’ हे पुस्तक संपादित करण्याचं आव्हान लीलया पेललं आहे. अतिशय तयारीनं, विचारपूर्वक त्यांनी या पुस्तकाचं संपादन केलं आहे. ‘वाडा’ नाटय़त्रयीनं जी गुणवत्ता राखली, त्याच गुणवत्तेचं हे पुस्तक आहे. आताच्या व्यामिश्र काळात भाषेकडे लक्ष दिलं जाणं कठीणच असतं. मात्र, या पुस्तकाबाबतीत तसं झालेलं नाही. भाषेचा दर्जा प्रत्येक लेखात जपला आहे. तसंच पुस्तकाच्या एकूण गुणवत्तेकडेही विशेष लक्ष देण्यात आलं आहे. नेहा मांडलेकर यांनी टिपलेले एक अत्यंत सूचक असे कृष्ण-धवल छायाचित्र चित्रकार दत्तात्रय पाडेकर यांनी मुखपृष्ठासाठी कलात्मकरीत्या योजले आहे. रंगमंचाच्या अवकाशात शून्यात बघणाऱ्या  आईची पाठमोरी आकृती जणू पुढच्या काळाकडेच बघतेय असं वाटतं.

प्रत्येक मराठीप्रेमी, नाटय़प्रेमी अभ्यासक-वाचकांच्या संग्रही असावा असा हा मराठी रंगभूमीला संपन्न करणारा दायाद आहे. रंगभूमीवरील लक्षणीय प्रयोगाच्या दस्तावेजीकरणाचं हे महत्त्वाचं पाऊल आहे. या पुस्तकाच्या निमित्तानं मराठी रंगभूमीला दस्तावेजीकरणाचं महत्त्व पटावं अशी अपेक्षा आहे. कारण संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळाविषयी खूप बोललं जातं, प्रत्यक्षात त्याबद्दल फार काही वाचायला मिळत नाही. या पुस्तकानंतर तरी महत्त्वाच्या मराठी नाटकांच्या दस्तावेजीकरणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत.

  • ‘दायाद- वारसा ‘वाडा’त्रयीचा..’
  • संपादन- प्रशांत दळवी,
  • जिगीषा प्रकाशन
  • पृष्ठे- २४७, मूल्य- ७५० रुपये.

चिन्मय पाटणकर