X

अरुण आठवतो, तेव्हा..

ज्येष्ठ प्रकाशक दिलीप माजगावकर  यांनी रेखाटलेलं त्यांचं हृद्य शब्दचित्र..

‘माणूस’मधून आपल्या तडाखेबंद पत्रकारितेस प्रारंभ करणाऱ्या अरुण साधू यांनी पुढे पत्रकारितेबरोबरच ललित लेखनातही चौफेर कर्तृत्व गाजवलं. त्यांच्या पत्रकारितेतील धडपडीच्या काळात त्यांच्याच सोबत प्रकाशनाच्या क्षेत्रात उमेदवारी करणारे आजचे ज्येष्ठ प्रकाशक दिलीप माजगावकर  यांनी रेखाटलेलं त्यांचं हृद्य शब्दचित्र..

अरुण साधूची पहिली भेट माझ्या पक्की स्मरणात राहिली, कारण तो आणि मी एकाच दिवशी ‘माणूस’ नावाच्या शाळेत दाखल झालो. ‘माणूस’.. दि. १ जून १९६६. माझं महाविद्यालयीन शिक्षण नुकतंच पुरं झालेलं. ‘पुढे काय?’ या प्रश्नाची तोंडओळख चालू असतानाच माझे थोरले भाऊ- ‘माणूस’चे संपादक श्री. ग. माजगावकर मला म्हणाले, ‘‘मी ‘माणूस’ पाक्षिकाचं आता साप्ताहिक करतोय. तुझ्या मनात अन्य काही पक्कं ठरलेलं नसेल तर काही दिवस ‘माणूस’चं काम कर. वर्षभरात अंदाज घे. रमलास तर ठीक; नाही तर दुसरं काही.’’ मी ‘माणूस’च्या कार्यालयात दाखल झालो. कार्यालय म्हणजे ‘४१९, नारायण पेठ’ या पत्त्यावरच्या गोखले वाडय़ातली बारा बाय अठरा फुटांची खोली. त्या खोलीचे एका पार्टशिननं दोन भाग केलेले. आतल्या भागात आमचा संपादकीय विभाग.. म्हणजे दोन टेबलं आणि चार-सहा खुर्च्या. एक श्री. गं.साठी, एक निर्मला पुरंदऱ्यांसाठी आणि बाकी येणारे-जाणारे.

मी सकाळी लवकरच गेलेलो. अर्ध्या तासानं एक शिडशिडीत बांध्याचा सावळा तरुण आला. म्हणाला, ‘‘मी अरुण साधू. मी आजपासून ‘माणूस’च्या संपादकीय विभागात काम करणार आहे.’’ अरुणच्या अबोलपणामुळे अन् माझ्या नवखेपणामुळे आमच्या संभाषणाची गाडी फार पुढे सरकली नाही. थोडय़ा वेळाने श्री. ग. आले. त्यांनी आमची पुन्हा एकदा परस्परांशी ओळख करून दिली- ‘‘‘माणूस’चं व्यवस्थांपैकीय काम दिलीप पाहणार आहे.’’ नंतरच्या काळात ‘माणूस’च्या शाळेत हरकाम्याला व्यवस्थापक म्हणतात असं माझ्या ध्यानात आलं.

..तर अरुणची आणि माझी ही पहिली भेट.

जात्याच गंभीर प्रकृतीच्या अन् अत्यंत मितभाषी अरुणनं अक्षरश: दोन दिवसांत मला चकित केलं. पुढे अत्यंत गाजलेल्या त्याच्या लेखमालेचा- ‘आणि ड्रॅगन जागा झाला’चा पहिला लेख त्यानं श्री. गं.च्या हातात ठेवला.

त्यावेळी ‘माणूस’मधून वि. ग. कानिटकरांची ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ ही लेखमाला विलक्षण वाचकप्रिय ठरली होती. ती लोकप्रियता ध्यानी घेऊन तशा प्रकारच्या लेखमाला हे ‘माणूस’चं वैशिष्टय़ ठरावं, असं उद्दिष्ट श्री. गं.नी डोळ्यांपुढे ठेवलं होतं. अरुणनं दिलेला लेख त्या लेखमालेचं पहिलं पाऊल होतं. आणि मग पुढच्या प्रत्येक लेखाबरोबर ते पाऊल पुढे पुढेच पडत गेलं.

पुढे जवळजवळ सव्वा वर्ष सलग चाललेल्या त्या लेखमालेतून चिनी राज्यक्रांती, माओचं नेतृत्व, क्रांतीनंतरची वाटचाल.. बांबूच्या पडद्याआड दडलेलं हे आगळंवेगळं चिनी जग अरुणनं अत्यंत समर्थपणे जिवंत उभं केलं.

गंमत म्हणजे ‘नाझी’नंतर वि. ग. कानिटकरांनीही चीन आणि माओ याच विषयावर पुस्तक लिहिलं होतं-  ‘माओ क्रांतीचं चित्र आणि चरित्र’! हे पुस्तक आणि अरुणचं ‘आणि ड्रॅगन जागा झाला’ हे पुस्तक थोडय़ाफार फरकानं एकाच वेळी प्रकाशित झालं. कानिटकर आधीच प्रस्थापित असलेले ज्येष्ठ साहित्यिक. त्यांच्या नावाला ‘नाझी’चं यशोवलय लाभलेलं. अरुण त्यावेळी जेमतेम तिशीचा तरुण. त्याचं हे पहिलंच मोठं पुस्तक. आपल्या पुस्तकाची कानिटकरांच्या पुस्तकाशी अपरिहार्य तुलना होणार, याचा अरुणवर काहीसा ताण होताच. मात्र, एका वृत्तपत्रानं या दोन्ही पुस्तकांवर एकत्र लिहिलेल्या लेखात केलेला उल्लेख- ‘साधू नवे लेखक. त्यांची शैली काहीशी अनघड. कानिटकरांची शैली सफाईदार आहे. मात्र, माओच्या नेतृत्वाचे आणि एकूण विषयाचे मर्म साधूंना अधिक आकळलेले आहे.’ अशा प्रतिक्रियांनी वि. ग. कानिटकर थोडेसे नाराज झाले, तरी त्यांनीही अरुणच्या पुस्तकाचं कौतुक केलं. अरुणनं मात्र आपलं हे सवाईपण कधीही, कुठेही मिरवलं नाही.

त्याकाळी आमच्या घरी ‘न्यूजवीक’ आणि ‘टाइम’ ही नियतकालिकं येत. ‘माणूस’चं रूपडं ठरवताना श्री. गं.च्या डोळ्यापुढे प्रामुख्यानं या दोन नियतकालिकांचं प्रारूप होतं. ‘‘टाइम’ अन् ‘न्यूजवीक’ची ताकद असते त्यांच्या मुखपृष्ठकथांमध्ये. ‘माणूस’चं हेच वैशिष्टय़ बनायला हवं.. मुखपृष्ठकथा!’ हे होतं श्री. गं.चं मत. ‘माणूस’च्या संपादकीय विभागात त्यांनी आवर्जून अरुणचा समावेश केला होता, तो अशा मुखपृष्ठकथांसाठी. त्यामुळे अरुण ‘माणूस’च्या कार्यालयात आला की श्री. ग. आणि तो यांची मुखपृष्ठवार्ता या विषयावर चर्चा चाले. त्यांच्या या बौद्धिक घुसळणीत माझा सहभाग प्रामुख्यानं श्रवणभक्तीचा. मग एखादा विषय ठरला, की अरुण बाहेर पडे. कधी आपली भटकंती संपवून तो संध्याकाळचा पुन्हा कार्यालयात उजाडे; नाही तर थेट दुसऱ्या दिवशी.

आज ‘माणूस’चे त्याकाळचे अंक चाळताना या दोघांनी मुखपृष्ठवार्तासाठी हाताळलेले विषय अन् त्यांची विविधता पाहून मला कौतुकही वाटतं अन् चकितही व्हायला होतं. आपल्या जेमतेम दीड वर्षांच्या कारकीर्दीत अरुणनं इतकं प्रचंड काम केलं. आपल्या प्रसन्न, ओघवत्या शैलीत त्याकाळचे वेगवेगळे विषय टवटवीत ताजेपणानं त्याने वाचकांसमोर मांडले. मुलाखती वा व्यक्तिचित्रांमधून अनेक नामवंतांची त्याने वाचकांशी भेट घडवून दिली. एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, अटलबिहारी वाजपेयी, शंकराचार्य, जॉर्ज फर्नाडिस, गोव्याचे मुख्यमंत्री बांदोडकर, मधू लिमये.. किती नावं सांगावीत?

गंभीर अन् अबोल अरुणच्या निरीक्षणाचा टीपकागद मात्र अत्यंत सावध अन् सक्षम होता. अनेक विषयांच्या व्यासंगी वाचनाची या टीपकागदाला पाश्र्वभूमी होती. त्याची समज उत्तम होती. विषयाचा गाभा तो अचूक पकडायचा. जोडीला प्रसन्न, ताजी, वाहती शैली होती. त्याच्या नंतरच्या ललित साहित्यात याचं प्रभावी चित्र उमटलंच; पण त्याआधीच्या त्याच्या कामगिरीतही याचा विलक्षण प्रत्यय कधी कधी येई.

१९६६ ची घटना. मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष स. का. पाटील हे त्यावेळचं एक बडं प्रस्थ. त्यावेळी काही कारणानं काही आमदारांनी   दिलेले सामुदायिक राजीनामे ही घटना गाजत होती.  ‘माणूस’साठी या मोठय़ा बातमीची मुखपृष्ठकथा करण्यासाठी आम्ही धडपडत होतो. त्याकरिता अरुण अन् त्याच्याबरोबर मी मुंबईत दाखल झालो होतो.        अरुणला स. का. पाटलांची मुलाखत हवी होती. पाच-सहा तास धडपडूनही आम्हाला ती संधी मिळत नव्हती. अखेर निराश होऊन आम्ही परतायचा विचार करत असतानाच कुणीतरी येऊन  अरुणला सांगितलं, ‘‘पाटीलसाहेब वरच्या मजल्यावरून निघताहेत. आत्ता लिफ्टनं खाली उतरतील.’’ मला तसंच मागे सोडून अरुण तीरासारखा वरच्या मजल्यावर धावला. नंतर मी पाहिलं तर चार-पाच मिनिटांनी तो स. का. पाटलांबरोबरच लिफ्टमधून बाहेर पडत होता. त्यांचा निरोप घेऊन माझ्याकडे येऊन अरुण म्हणाला, ‘‘चल, आपलं कव्हरस्टोरीचं काम झालं.’’ स. का. पाटलांबरोबरच्या अक्षरश: तीन-चार मिनिटांच्या बोलण्यातून अरुणनं त्यांना अत्यंत नेमकेपणानं गोष्टी विचारल्या होत्या. कळीचे मुद्दे त्यांच्याकडून जाणून घेतले होते. त्याच्या तीक्ष्ण अन् साक्षेपी दृष्टीनं टिपलेल्या मजकुरातून ‘माणूस’ची प्रभावी मुखपृष्ठकथा उभी राहिली.

तशीच मला आठवणारी दुसरी भेट अरुण अन् जॉर्ज फर्नाडिसची. १९६७ साल. जॉर्जचं नावही त्यावेळी फारसं कुणाला ठाऊक नव्हतं. बातमी होती- लोकलगाडीसमोर आडवे पडून गाडय़ा अडवणाऱ्या निदर्शकांची आणि त्यांच्या धगधगत्या पुढाऱ्याची. पोलिसांनी निदर्शकांना बेदम मारहाण करून निदर्शनं मोडून काढली. आंदोलनाचा तो धगधगता नेता मारहाणीमुळे मुंबईच्या सरकारी इस्पितळात भरती झालेला. अन् या आंदोलनाची मुखपृष्ठवार्ता करायला अरुण त्या नेत्याला- जॉर्जला भेटला. मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात जमिनीवर टाकलेल्या गादीवर घायाळ जॉर्ज पहुडलेला आणि त्याच्या शेजारी अरुण अन् मी त्याची मुलाखत घ्यायला उकिडवे जमिनीवर बसलेले. मुलाखत संपवून आम्ही परतलो.

‘एक दिवस मी भारतीय रेल्वेचं चाक थांबवीन!’ – हे होतं अरुणनं जॉर्जवर लिहिलेल्या मुखपृष्ठवात्रेचं शीर्षक. त्यावेळी फारसा कुणी नसलेल्या जॉर्जची ती पोकळ वल्गना ठरली नाही. त्यानंतर झालेल्या १९७४ च्या देशव्यापी रेल्वे संपानं त्याचे उद्गार भाकित ठरले. त्या भावी भाकिताचा अरुणनं कितीतरी आधी त्या मुखपृष्ठवात्रेतून वेध घेतला होता.

त्याच वर्षी- म्हणजे १९६७ साली घडलेली महत्त्वपूर्ण घटना : शिवसेनेची स्थापना. दाक्षिणात्य लोकांना मुंबईमध्ये मिळणाऱ्या नोकऱ्या अन् रोजगारीच्या विरोधात भूमिका घेऊन शिवसेनेनं आंदोलन सुरू केलं. अरुणनं त्या आंदोलनावर लेखमाला लिहिली. केवळ सरकारी नोकऱ्यांमध्येच नाही, तर बिगरसरकारी क्षेत्रातही दाक्षिणात्य बहुसंख्येनं आहेत, हा मुद्दा अधोरेखित करून अरुणनं त्याचं वस्तुनिष्ठ विश्लेषण केलं. मराठी उद्योजकही दाक्षिणात्यांना नोकरीमध्ये प्राधान्य का देतात, याची सडेतोड कारणमीमांसा केली. त्यातून महाराष्ट्रीय माणसांच्या दोषांवर आणि दाक्षिणात्यांच्या गुणांवर स्पष्टपणे बोट ठेवलं. ही त्याची वार्तापत्रं इतकी प्रभावी होती, की दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी ‘माणूस’च्या कार्यालयात येऊन अरुणची प्रशंसा केली.

केवळ राजकारण-समाजकारण अशा विषयांमध्येच नाही, तर चित्रपट क्षेत्रासारख्या वलयांकित गोष्टीवरही अरुणनं आपल्या कामाचा ठसा उमटवला. निमित्त ठरलं- सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या आत्मचरित्राच्या शब्दांकनाचं. हंसाबाई आणि अरुणच्या झालेल्या  काही भेटींचा मी साक्षीदार होतो. एरवी अगदी कमी बोलणारा अरुण हंसाबाईंना बोलतं करायला ज्या खुबीनं संभाषण छेडत असे, ज्या हळुवारपणे एखाद्या नाजूक विषयाला हाताळत असे; त्यातून प्रत्येक मुलाखत अधिकाधिक खुलत जाई.. एखाद्या रंगत जाणाऱ्या मफिलीसारखी. आणि हे सगळं साधल्यावरही आमचा शालीन अन् साधासुधा अरुण अधूनमधून शंकित होई. ‘‘दिलीप, अरे, हंसाबाई इतक्या देखणं बोलताहेत, की ते सगळं मला शब्दांत पकडता येईल का, याची काळजी वाटतीय.’’ पण अरुणची ही शंका किती निराधार होती, हे ‘सांगत्ये ऐका’ या हंसाबाईंच्या आत्मचरित्रानं सिद्ध केलं. आजही मराठी आत्मकथांमध्ये हे आत्मचरित्र मलाचा दगड मानलं जातं.

दीडएक वर्ष ‘माणूस’च्या शाळेत घालवून अरुण मग मुंबईला गेला. ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये नोकरीला लागला. आणि मग केवळ वृत्तपत्र क्षेत्रातच नव्हे, तर इतर अनेक क्षेत्रांमध्ये तो बहरत गेला. या त्याच्या बहरण्यात आणि खुलण्यात फार मोठा वाटा त्याच्या अशोक जैन आणि दिनकर गांगल या मित्रांचा होता. त्यातही गांगलचा मोठा. पुढे या त्रिकुटाला कुमार केतकर येऊन मिळाले आणि या चौघांचं जिवाभावाचं मत्र जुळलं. या त्याच्या मित्रांनी त्याच्या लेखनाला अतिशय पोषक असं वातावरण मिळवून दिलं. त्याच काळात अरुणनं लिहिलेल्या ‘मुंबई दिनांक’ या कादंबरीनं त्याचं नाव सर्वतोमुखी बनवलं. लेखाच्या, बातमीच्या, पुस्तकाच्या, कादंबरीच्या, पटकथेच्या निमित्तानं अरुणचं नाव चच्रेत येई. पण तो कुठे वायफळ गप्पांमध्ये अडकलाय, ‘गॉसिप’मध्ये गुंतलाय, भंगूर राजकारणात रमलाय असं कधीच ऐकलं,

दिसलं नाही. अरुणनं खूप मोठा साहित्यप्रपंच उभारला. अन् तोही अतिशय गुणवत्तापूर्ण. त्यामागे आपल्या कामावरील श्रद्धेनं साधनेतच रमण्याची त्याची ही वृत्ती होती. ‘रशियाची तिसरी क्रांती’, ‘ड्रॅगन जागा झाल्यावर’, ‘शुभमंगल’, ‘मुखवटा’ अशा पुस्तकांमुळे अरुण अखेपर्यंत ‘राजहंस’ परिवारात होताच.

अरुण गेले काही महिने आजारी होता, तरी या ना त्या कारणाने आम्ही संपर्कात होतो. मध्यंतरी प्रकृती बरी असताना तो, अरुणा आणि आम्ही दोघं एक दिवस मित्राच्या फार्महाऊसवर राहिलो. त्यावेळी त्याच्या डोक्यात घोळणाऱ्या नव्या कादंबरीच्या कथानकाबद्दल तो भरभरून बोलला. ते ऐकल्यानंतर मी गमतीनं म्हणालो, ‘‘आजपर्यंतची तुमची पुस्तकं चौकार होती, हे नवं पुस्तक म्हणजे सणसणीत षटकार ठरणार.’’ पण हे व्हायचं नव्हतं. झालं नाही. प्रकृतीनं त्याला साथ दिली नाही. खोकला हे निमित्त ठरलं. अरुण गेला.

त्याच्या जाण्यानं माझ्या मनातली त्या मंतरलेल्या काळाची पाखरं पुन्हा एकदा आठवणींसारखी भिरभिरली.

एका परीनं तो काळ अरुणच्या अन् माझ्या दोघांच्याही जडणघडणीचा काळ होता. आणि केवळ एवढंच नाही, तर काहीतरी नवं घडवू पाहणारे, नव्या दमाचे कितीतरी तरुण आमच्याभोवतीच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये नवं काही करण्यासाठी झटत होते, खपत होते. श्री. गं.ना मुळातच असं नवं शोधू इच्छिणाऱ्या, नवं करू बघणाऱ्या सगळ्या तरुणाईबद्दल अमाप प्रेम अन् अफाट जिव्हाळा. त्यामुळे त्या तरुणाईच्या दृष्टीनं ‘माणूस’ आणि श्री. गं.चं कार्यालय म्हणजे आपल्या समानधर्मीबरोबर अन् आपल्या अतक्र्य कल्पनांबरोबर अनिर्बंध घुम्मडझिम्मा घालण्याचं एक मोकळं अंगण. विजय तेंडुलकरांची ‘रातराणी’ फुलली ती याच काळात. त्यांच्या जागी नंतर आलेल्या रवींद्र पिंगेंनी ‘शतपावली’ केली ती याच अंगणात. त्यांच्या आगे-मागे वसंत सरवटे, बाळ ठाकूर, श्याम जोशी आणि सुभाष अवचट आले. त्यांच्या व्यंगचित्रांपासून ते ‘माणूस’च्या मुखपृष्ठांपर्यंतचे कमी-जास्त यशस्वी झालेले प्रयोग झाले ते याच काळात. ‘किर्लोस्कर’मध्ये डॉ. बी. डी. टिळक या प्रख्यात शास्त्रज्ञांवरचा एक लेख माझ्या वाचनात आला आणि त्या लेखाच्या लेखकाला- डॉ. दत्तप्रसाद दाभोलकरांना मी भेटलो. पहिल्याच भेटीत ‘दत्तप्रसाद’ नाव गळून पडले. तिथे ‘बंडय़ा’ आला. आणि त्यानंतर दहा वर्ष आधुनिक विज्ञानेश्वरीपासून ते नर्मदा धरणापर्यंत अनेक विषयांवर तो लिहिता राहिला. त्याच्यापाठोपाठ त्याचा धाकटा भाऊ नरेंद्र दाभोलकर आला. ‘माणूस’मधून बुवा-बाबांच्या सामाजिक गरजेचं विश्लेषण करू लागला. ‘अंधश्रद्धा निर्मूलन संघटने’ची स्थापना त्यानंतरची. ‘माँटीज डबल’ हा अनुवाद घेऊन अनंत भावे आले. त्यांच्यामागोमाग पुष्पा भावे यांनी प्रायोगिक रंगभूमीचा पदरव ऐकवला. ‘माणूस’नं आपलं काम केवळ छापील शब्दांपुरतं ठेवलं नव्हतं; तर श्री. ग. माजगावकरांनी अन्न-स्वतंत्रतेचा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी ‘श्री कैलास ते सिंधुसागर’ अशी पदयात्रा काढली. त्यानिमित्तानं संपर्कात आलेले विनायकदादा पाटील तर आमच्यातलेच एक बनून गेले.

आणि ‘माणूस’च्या परिघाबाहेरही कितीतरी नवे उन्मेष फुलत होते. वाङ्मयात दलित वाङ्मयाचा प्रवाह जोमानं वाहायला लागलेला. दया पवारांचं ‘बलुतं’ गाजत होतं. अशोक शहाणे, वृंदावन दंडवते यांच्या लिटिल् मॅगेझिनची पहाट झाली होती. दिनकर गांगलांची ‘ग्रंथाली’ चळवळ बाळसं धरू लागली होती. रंगभूमीवर नव्या प्रयोगांची, नव्या कल्पनांची लाट उसळलेली होती. रत्नाकर मतकरी, अमोल पालेकर, सई परांजपे, जब्बार पटेल ही मंडळी त्यांच्या नाटय़ क्षेत्रातील प्रयोगशीलतेमुळे लोकांचं लक्ष वेधून घेत होती. जुना सिनेमा कात टाकत होता. गोविंद निहलानी, श्याम बेनेगलांनी नव्या चित्रपटाकडे प्रेक्षकवर्ग वळवायला सुरुवात केली होती. कुमार सप्तर्षी, अनिल अवचट अशा तरुणांची ‘युक्रांद’ जोमात आलेली.

‘माणूस’च्या कामामुळे मी या साऱ्यांशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष जोडला गेलेला होतो. या साऱ्यांच्या सृजनशीलतेनं, नवनिर्मितीच्या ओढीनं तो सारा काळ भारलेला होता. आणि त्या काळातल्या त्या सगळ्या मंतरलेल्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक घडामोडींशी अरुण पूर्णपणे एकरूप झालेला होता. तो ‘माणूस’मध्ये असतानाच्या काळात त्याचं हे एकरूपत्व मी अनुभवलं होतंच; पण तो नंतर मुंबईला गेल्यानंतरही ते सतत मला जाणवत राहिलं.

अरुण गेला. तो काळही मागे पडला. आज त्या काळाचा आठव येतो तेव्हा वाटतं, ती जणू त्या काळात निघालेली या साऱ्या तरुण सर्जकांची तेजस्वी शोभायात्राच होती. काळाच्या ओघात त्या यात्रेतून तेंडुलकर गेले, पिंगे गेले, वि. ग. कानिटकर गेले, नरेंद्र दाभोलकर गेला, पाडगांवकर गेले, वसंत सरवटे गेले.. आणि आता अरुण गेला. तसं हे जाणं अटळच. स्वीकारावं लागतंच. मनोमन इच्छा मात्र अशी, की ही शोभायात्रा पुन्हा एकदा झळाळावी आणि दिमाखाने पुढे जावी. त्या काळाप्रमाणेच याही काळातले नवे सर्जक त्यात सामील व्हावेत.

हीच कदाचित अरुणला खरी आदरांजली ठरेल.

First Published on: October 1, 2017 3:16 am
Outbrain